लोकशाही आणि संविधानाचा विजय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2022   
Total Views |

Lokshahi
 
 
 
हा विजय भारतीय लोकशाहीचा आणि भारतीय संविधानाचा विजय आहे. भारतीय संविधानाने संसदीय पद्धतीची राजवट दिली. या संसदीय पद्धतीचा अतिशय महत्त्वाचा नियम असा की, सर्वांनाबरोबर घेतल्या शिवाय मतांची बेरीज करता येणार नाही. म्हणून सर्वसमावेश राहाणे सर्वांना आवश्यक आहे. जे जातींना धरून राहतील, ते नेहमी विजयी होणार नाहीत आणि लोकशाहीचा विजय यासाठी आहे की, लोकशाहीचे मूलतत्त्व सर्व सत्तेचा उगम जनतेतून होतो. या जनतेने आपली शक्ती काय आहे, हे दाखवून दिले.
 
 
 
पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल १० मार्चला जाहीर झाले. चार राज्यांत भाजप सत्तेवर आली. पंजाबमध्ये आम आदमी पार्टी सत्तेवर आली. सगळ्यात जुन्या पक्षाला म्हणजे काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला. उत्तर प्रदेशात मायावती यांनादेखील मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर या राज्यांत भाजप काही ठिकाणी तिसर्‍यांदा, काही ठिकाणी दुसर्‍यांदा सत्तेवर आला. या सर्व घटनाक्रमांवर सर्व माध्यमांतून सर्व प्रकारचे विश्लेषण झालेले आहे. यामुळे यात काही नवीन भर घालावी, असे काही नाही. फक्त काही निष्कर्षांबाबतीत आपण सावध असलो पाहिजे. उत्तर प्रदेशात मायावती संपल्या, काँग्रेसमुक्त भारत होणार, अरविंद केजरीवाल यांच्या रुपाने मोदींना पर्याय देईल, असे नेतृत्व उभे राहात आहे, जातवादाचा पराभव झालेला आहे, हे सर्व निष्कर्ष अत्यंत घाईने काढलेले निष्कर्ष आहेत. कोणताही राजकीय पक्ष निवडणुकीतील पराभवाने संपत नसतो. १९८५ साली लोकसभेत भाजपचे दोन खासदार होते. २०१९ साली त्यांची संख्या ३००च्या वर गेली. १९८५ साली याच राजकीय विश्लेषकांनी भाजप संपला, असे मृत्यूलेख लिहिले. मायावती आणि काँग्रेस यांच्यावर मृत्यूलेख लिहिणारे फार उथळ पाण्यातील आहेत. त्यांचे लेखन वाचावे आणि विसरून जावे, या लायकीचे असते. काँग्रेस ही या देशाची एकेकाळची राष्ट्रीय चळवळ होती, तिचे रुपांतर आज ‘घराणेशाहीचा पक्ष’ असे झालेले आहे. या घराणेशाहीतून काँग्रेस मुक्त झाली की, ती नव्या रुपात उभी राहील. मायावती यांचा चेहरा हा समाजातील मागासवर्गीय वर्गाचा चेहरा आहे. हा मागासवर्गीय वर्ग जोपर्यंत अस्तित्वात आहे, तोपर्यंत हा चेहरा पुसता येणार नाही. निवडणुकीतील हवा अनुकूल नव्हती, म्हणून त्यांचा पराभव झाला. उद्या ही हवा अशीच असेल, असे कोणी ठामपणे म्हणू शकत नाही.
 
 
 
चार राज्यांत भाजपचा विजय झाल्यामुळे हा विजय कोणाचा, याबद्दल देखील माध्यमांतून मतं मांडली गेली आहेत. हा विजय योगी आदित्यनाथ आणि मोदी यांचा आहे. मोदी यांना कोणी प्रतिस्पर्धी नाही, हा राष्ट्रवादाचा विजय आहे, हा विजय हिंदुत्व आणि विकास यांचा विजय आहे, हा विजय जातवाद आणि अल्पसंख्य तुष्टीकरण यांचा पराभव आहे. ही सर्व मते कमी अधिक प्रमाणात खरी आहेत. निवडणूक हा संग्राम असल्यामुळे तो लढणारा नेता लागतो. म्हणून विजयाचे श्रेय नेत्याला देण्यात काही गैर नाही. भाजप समर्थकांचेदेखील हेच म्हणणे आहे आणि ते त्यांनी निकालावरील प्रतिक्रिया देताना मांडले आहे. निवडणूक निकालासंबंधी विरोधी मते देखील आहेत. काहींच्या मते हा सांप्रदायिकतेचा विजय आहे, हिंदू धार्मिकतेचा विजय आहे, हा अधिकारवादी पक्षाचा विजय आहे, त्यामुळे उदारमतवादी मूल्यांना पुढील काळात धोका निर्माण होईल. तसेच, सेक्युलॅरिझमचादेखील हा पराभव आहे. देशाच्या बहुविधतेला भाजपचा विजय धोकादायक आहे, अशी सर्व मते गळ्यात मफलर, खांद्यावर शबनम, दाढीचे खुंटे थोडे वाढविलेले आणि केसं अस्ताव्यस्त असलेले तथाकथित विचारवंत ‘गला फाडफाड कर चिल्ला रहे है।’
 
 
 
हे त्यांचे ‘चिल्लाने’ तसे नवीन नाही. २०१४ पासून ते सुरू झाले आहे आणि २०२२पर्यंत ते तसेच चालू आहे. आपल्या देशात अभिव्यक्तिस्वातंत्र्य असल्यामुळे एखाद्याला रडण्याचे स्वातंत्र्य आहे आणि दुसर्‍याला हसण्याचे स्वातंत्र्य आहे. मफलर आणि शबनबवाल्यांच्या स्वातंत्र्याचा आपण आदर केला पाहिजे. या निवडणुकीत विजय कोणाचा झाला? हा प्रश्न तसाच राहातो. या निवडणुकीत विजय जनतेचा झाला, लोकशाहीचा झाला आणि संविधानाचा झाला. ही जनता कोण आहे? शबनमवाली जनता नाही. ती सामान्य जनता आहे. ‘उदारमतवाद’, ‘सेक्युलॅरिझम’, ‘अधिकारशाही’, ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्य’ असले शब्द या जनतेच्या शब्दकोषात नाहीत. बहुसंख्यांना ते उच्चारता देखील येणार नाहीत. त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रश्न तर दूरच राहिला. या सर्व संकल्पना समाजातील अत्यल्प अल्प मताच्या आहेत. हे आपल्या हस्तिदंती मनोर्‍यात बसून तारे तोडत असतात.
 
 
 
Constitution
 
 
 
सामान्य जनतेच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचे विषय तीन आहेत
* सुरक्षा
* सुशासन
* सन्मान
 
सुरक्षा या विषयात जीवन जगण्याची सुरक्षा, अन्न सुरक्षा, आरोग्य सुरक्षा, शिक्षण सुरक्षा, असे सर्व विषय येतात. सामान्य माणसाला तुमचा उदारमतवाद काय आहे, याच्याशी काही देणंघेणं नसतं. रोजच्या जगण्याच्या संदर्भातील माझ्या सुरक्षेचे काय? मला माफक किमतीत अन्नधान्य मिळणार की नाही? शिक्षण मिळणार की नाही? आरोग्याचे काय? हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असतात. आम्ही सेक्युलरवादी आहोत आणि तुम्ही सांप्रदायिकवादी आहात या वटवटीला त्याच्याकडे काही किंमत नसते. राज्यावर येणार्‍या पक्षाने आणि नेत्याने सुशासनाद्वारे ही सुरक्षा द्यावी, ही सर्व सामान्य माणसाची अपेक्षा असते. राज्य आपले पोट भरण्यासाठी चालवू नये. आपल्या परिवाराचे महत्त्व वाढविण्यासाठी चालवू नये, आपल्या सहयोगी लोकांना लाभ होईल, यासाठी राज्य चालवू नये. सर्व सामान्य माणसाचा विचार त्यात असावा. सुशासनात कायद्याचे राज्य, गुन्हेगारांवर नियंत्रण, भ्रष्टाचारावर नियंत्रण, गुन्हेगार आणि भ्रष्टाचारी यांना शासन, सामान्य माणसाला संरक्षण हे विषय येतात. तो जो करील, त्याच्या मागे लोक उभे राहातात. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथांनी हे करून दाखविले, लोक त्यांच्या मागे गेले.
 
 
 
‘सामाजिक सन्मान’ हा भाकरी इतका महत्त्वाचा विषय असतो. भिकेची भाकरी गोड लागत नाही. सन्मानाची भाकरी गोड लागते. हा सर्वांचा अनुभव आहे. सामान्य माणसाला जे काही मिळेल ते सन्मानाने मिळाले पाहिजे, त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे आणि क्षमतेप्रमाणे समाज जीवनात त्याला स्थान मिळाले पाहिजे. नाक्यावर बसून चप्पल शिवणारा चर्मकार आणि सकाळी दूध घालायला येणारा दूधवाला, बाजारात भाजी विकणारी भाजीवाली, आपआपला कामधंदा करीत असतात. कर्म कोणतेही लहान किंवा मोठे नसते. या प्रत्येकाचा सन्मान होणे गरजेचे आहे. भाजपने हा विचार या देशात शासनाच्या माध्यमातून खोलवर रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्लीत एका नाक्यावर चर्मकाराच्या शेजारी जमिनीवर आधुनिक वेषातील तरुणी बसली आणि आपली चप्पल तिने शिवण्यासाठी त्याच्याकडे दिली. ती सुस्थितीतील मुलगी होती, पण तिला चर्मकाराच्या शेजारी जमिनीवर बसण्यात कसलीही खंत वाटली नाही. तोही भारावून गेला आणि चप्पल शिवण्याचा मोबदला घेण्यास त्याने नकार दिला. सामाजिक सन्मानाचे विषय असे सहज सोपे असतात. ही भावना नरेंद्र मोदी यांच्या व्यवहारातून हळूहळू झिरपत झिरपत सर्व समाजापर्यंत पोहोचत आहे.
 
 
 
हा विजय संघशक्तीचा विजय आहे. संघ कधी राजकारणात उतरत नाही. निवडणूक प्रचारात संघाचे अधिकारी कधी भाग घेत नाहीत. सरसंघचालक अमूक पक्षाला मत द्या, असे कधी सांगत नाहीत. तरीही हा विजय संघशक्तीचा विजय कसा ठरतो? अभिजीत मुझुमदार हे पत्रकार आहेत, ‘फर्स्ट पोस्ट’वर त्यांचा एक लेख मी वाचला. त्यांची इंग्रजी वाक्य अशी आहेत, "The BJP's staying power comes from a well-defined ideology, clear chain of command, unity of purpose, and relentless, quiet work even in places that never seemed would embrace it." याचा भावार्थ असा, सत्तेवर राहाण्याचा भाजपचा मार्ग सुनिश्चित तत्त्वज्ञान, मजबूत पक्षसंघटन, लक्ष्यासंबंधी एकवाक्यता, अथक आणि शांतपणे आपल्याला प्रतिकूल वातावरणात काम करण्याची क्षमता यामुळे निर्धारित होतो.
 
 
 
अभिजित मुझुमदार यांना संघ किती माहीत आहे, मला माहीत नाही. पण, त्यांनी जे म्हटले तो संघमार्ग आहे. सुरक्षा, सुशासन आणि सन्मान या तीन गोष्टी निश्चित तत्त्वज्ञानातून उदय पावतात. भाजपचे तत्त्वज्ञान राष्ट्रवादाचे तत्त्वज्ञान आहे. एक देश, एक संस्कृती, एक जन हा भाजपचा राष्ट्रवाद आहे. हा लोकांत भेदभाव करीत नाही. समाजाचे जातीत विभाजन करीत नाही. तसेच, धर्मगटात विभाजन करीत नाही. ‘सबका साथ सबका विकास’ ही त्याची अभिव्यक्ती आहे. सिद्धांत दिशा देतात, सिद्धांत संघटनभाव निर्माण करतात, आणि सिद्धांत लक्ष्य निश्चित करतात. जेव्हा विचारांसाठी समर्पित होऊन कार्यकर्ते काम करतात, तेव्हा विजय हा ठरलेला असतो. फक्त तो विजय प्राप्त करण्यासाठी तगडी मेहनत आणि काही कालखंड जावा लागतो. १९२५ सालापासून संघाच्या लाखो स्वयंसेवकांनी या मार्गावरून चालून देशात आमूलाग्र परिवर्तनाचा एक महामार्ग तयार करत आणलेला आहे. हे काम अथकपणे आणि न थकता झालेले आहे, आज चाललेले आहे आणि उद्याही चालणार आहे. विजय या मार्गाचा आहे.
 
 
 
हा विजय भारतीय लोकशाहीचा आणि भारतीय संविधानाचा विजय आहे. भारतीय संविधानाने संसदीय पद्धतीची राजवट दिली. या संसदीय पद्धतीचा अतिशय महत्त्वाचा नियम असा की, सर्वांनाबरोबर घेतल्या शिवाय मतांची बेरीज करता येणार नाही. म्हणून सर्वसमावेश राहाणे सर्वांना आवश्यक आहे. जे जातींना धरून राहतील, ते नेहमी विजयी होणार नाहीत आणि लोकशाहीचा विजय यासाठी आहे की, लोकशाहीचे मूलतत्त्व सर्व सत्तेचा उगम जनतेतून होतो. या जनतेने आपली शक्ती काय आहे, हे दाखवून दिले. लोकशाहीचा दुसरा मूलभूत सिद्धांत निवडीच्या स्वातंत्र्याचा आहे. या निवडीच्या स्वातंत्र्याचा जनतेने शहाणपणाने उपयोग केलेला आहे. म्हणून आपण म्हणूया आमची लोकशाही आणि संविधान चिरायू होवो!
 
 
@@AUTHORINFO_V1@@