‘चिनगारी का खेल बुरा होता है...’

    04-Feb-2022   
Total Views |

Rahul Gandhi 1
 
 
राहुल गांधी यांच्या भाषणांची खिल्ली उडविण्याची एक प्रथा निर्माण झाली आहे. अनेकदा त्यांची भाषणे ही खिल्ली उडविण्याजोगी असतीलही. मात्र, यावेळी आपल्या साधारण तासाभराच्या भाषणामध्ये राहुल गांधी यांनी ‘भारत हे ‘राष्ट्र’ नाही’ असा अतिशय धोकादायक आणि फुटीरतावादास खतपाणी घालणारा विचार मांडला. त्यामुळे खिल्ली उडविणे थोडे बाजूला ठेवून यापुढे काँग्रेसच्या राजकारणाकडे बारकाईने बघणे गरजेचे आहे.
 
 
राजकारणात येणारे नैराश्य हे अतिशय भयानक असते. त्यातही जर तुमचा पक्ष देशात दीर्घकाळ सत्तेत असेल, देशाला आपली जहागिरी आणि नागरिकांना आपली प्रजा समजण्याची एकप्रकारची मग्रुरी असेल; तर अशा परिस्थितीमध्ये सत्तेची नशा अथवा चटक सुटणे हे फार अवघड असते. कारण, सत्ता असतानाच्या काळात एकप्रकारची राजेशाही पद्धतीने आपले हितसंबंध जपण्याची सवय लागते. त्यातही गंभीर बाब म्हणजे देशाचा इतिहास, समाजजीवन आणि राज्यपद्धती यांचा गैरवापर करण्याची सवय जडते. त्यामुळे सत्ता गेल्यानंतर या सर्व हितसंबंधांना बाधा पोहोचल्यानंतर पुन्हा सत्ता प्राप्त करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी केली जाते. त्यासाठी राष्ट्रीय हितांना बाधा पोहोचली तरी बेहत्तर, अशी भूमिका घेण्यात येते.
 
सध्या अशीच स्थिती देशात दीर्घकाळ राज्य केलेल्या काँग्रेस पक्षाची झाली आहे. काँग्रेसला २०१४ साली सत्ता गेल्याचा बसलेला धक्का २०१९ साली अधिक तीव्र झाला. त्यानंतर पुन्हा सत्ता प्राप्त करण्यासाठी काँग्रेस पक्ष अगदीत घायकुतीला आल्याचे दिसते. त्यासाठी लागेल त्या तडजोडी करण्याची तयारी हा पक्ष दाखवित आहे. त्यासाठी मग देशविरोधी ‘तुकडे-तुकडे गँग’चे समर्थन करणे, सुधारित नागरिकत्व कायद्यास विरोध करण्याच्या नावाखाली अराजक पसरविणार्यांना साहाय्य करणे, कृषी कायद्यांना विरोध करण्याच्या नावाखाली शेतकर्यांची ढाल पुढे करून खलिस्तानवादी, नक्षलवादाच्या समर्थकांना पाठिंबा देणे, असे प्रकार हा पक्ष सध्या करीत आहे. मात्र, त्यापुढे जाऊन देशामध्ये अराजकता अथवा मोठ्या प्रमाणावर संशयाचे वातावरण निर्माण करून एकप्रकारे गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण करण्यासाठी काँग्रेस उत्सुक आहे की काय, असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.
 
तसा प्रश्न निर्माण होण्याचे कारण म्हणजे काँग्रेस खासदार आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दि. २ फेब्रुवारी रोजी लोकसभेत केलेले भाषण. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास प्रारंभ झाला असून, आता दोन्ही सभागृहांमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. त्यामध्ये काँग्रेस पक्षाकडून चर्चेस प्रारंभ राहुल गांधी यांनी केला. भाषणामध्ये त्यांनी मांडलेल्या काही मुद्द्यांचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.
 
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणामध्ये भारत हे नेशन म्हणजे राष्ट्र नसून ‘युनियन ऑफ स्टेट’ - राज्यांचा संघ असल्याचे विधान केले. हे विधान करताना त्यांनी भारत हे कधीही ‘राष्ट्र’ नव्हते, असा दावा केला. भारतामध्ये सर्व राज्यांना समान अधिकार असून त्यांच्यावर केंद्रीय पद्धतीने म्हणजेच केंद्र सरकारला राज्य करता येणार नाही, त्यांचा आवाज दाबता येणार नाही. त्यांची स्वतंत्र संस्कृती, इतिहास, परंपरा यावर केंद्रीय पद्धतीने दडपण आणता येणार नाही आणि तसा विद्यमान केंद्र सरकारचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, असा दावा केला. आता वरवर पाहाता राहुल गांधी यांच्या या दाव्यामध्ये फारसे वावगे वाटण्याचे कारण नाही. मात्र, भारत हे ‘राष्ट्र’ नाही; हा त्यांचा दावा एकूणच भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला हरताळ फासणारा आहे. त्यामध्ये फुटीरतावादास खतपाणी घालण्याचा त्यांचा स्पष्ट प्रयत्न असल्याचे दिसते.
 
भारत हे ‘नेशन’ नसून ‘युनियन ऑफ स्टेट’ असल्याचे राहुल गांधी ज्या पद्धतीने सांगत आहेत, त्याद्वारे केंद्र-राज्य संघर्ष वाढविण्याचा त्यांचा अथवा त्यांच्या पक्षाचा मनसुबा असल्याचे स्पष्ट होते. या मुद्द्याविषयी घटना समितीमध्ये दीर्घ चर्चा झाल्या आहेत, त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले मत अतिशय महत्त्वाचे ठरते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या दि. ४ नोव्हेंबर, १९४८ रोजीच्या भाषणामध्ये अतिशय स्पष्टपणे म्हटले की, मसुदा समितीस हे स्पष्ट करावयाचे आहे की, भारत हा महासंघ (फेडरेशन) असला तरीही त्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यांनी केलेल्या कराराचा तो परिणाम नाही आणि हा महासंघ कराराचा परिणाम नसल्याने कोणत्याही राज्याला त्यापासून वेगळे होण्याचा अधिकार नाही, त्यामुळे तो अविनाशी आहे. त्याचप्रमाणे घटनाकर्त्यांनी अनेक महत्त्वाचे अधिकार हे केंद्राच्या हाती सोपविले आहे, याचा अर्थ स्पष्ट आहे की, घटनाकर्ते भारताकडे ‘राज्यांचा संघ’ असे न पाहाता ‘राष्ट्र’ म्हणूनच पाहात होते.
 
त्यामुळे राहुल गांधी हे घटनाकर्त्यांना खोटे ठरविण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे स्पष्ट होते. मात्र, असे ते का करीत आहेत, याचा विचार होणे आवश्यक आहे. राहुल गांधी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, “तुम्हाला (विद्यमान केंद्र सरकार) राज्यांवर राजाप्रमाणे राज्य करता येणार नाही. तुम्ही तामिळनाडू आणि केरळवर कधीही राज्य करू शकत नाही, तामिळनाडूवर नीट लादू शकत नाही, पंजाबवर कृषी कायदे तुम्ही लादू शकत नाहीत, काश्मीरमध्ये तुम्ही तुमचा अजेंडा रेटू शकत नाहीत.“ आता राहुल यांचे हे वक्तव्यही निव्वळ राजकारणातून केलेले वाटू शकेल. मात्र, त्यामध्ये प्रादेशिक अस्मितांना फुंकर घालून त्यांचा वापर आपल्या राजकीय अजेंड्यासाठी करण्याचा जुना खेळ राहुल गांधी यांना पुन्हा खेळायचा असल्याचे स्पष्ट दिसते. त्यातही तामिळनाडूचा त्यांनी विशेष उल्लेख केला, याच तामिळनाडूमध्ये ‘द्रविडस्तान‘ची मागणी अधूनमधून डोके वर काढत असते; हे विसरून चालणार नाही.
 
अशाच प्रकारे आपल्या राजकीय फायद्यासाठी प्रादेशिक अस्मितांना खतपाणी घालण्याचे काम राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांनी केले होते. सत्तेसाठी इंदिरा गांधी यांनी पंजाबमध्ये जर्नेलसिंगभिंद्रनवाले नावाचा भस्मासूर उभा केला आणि खलिस्तान चळवळीस मोठे बळ दिले. पुढे याच चळवळीने इंदिरा गांधींचा बळी तर घेतलात, मात्र देशासमोर एका मोठ्या समस्येलाही कायमचे जन्माला घातले. राहुल यांच्या वडिलांना म्हणजे राजीव गांधी यांनी तामिळ अस्मितेस कुरवाळण्यासाठी जे काही केले, त्यामुळे त्यांचाही बळी गेलाच; त्यासोबतच भारताच्या परराष्ट्र धोरणावरही अतिशय दूरगामी परिणाम झाला.
 
मात्र, त्याचे भान न ठेवता राहुल गांधी हे राज्यांना भडकविण्याचे काम करीत आहेत. त्यासाठी केंद्र सरकार राज्यांना गुलामाप्रमाणे वागणूक देत असल्याचा चिथावणीखोर दावा त्यांनी केला. मात्र, राहुल गांधी यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. ती म्हणजे, विविध प्रदेशातील सरदारांनी आपल्याला कुनिर्सात करावा, ही गुलामगिरीची पद्धत मुघलांच्या काळात भारतात आली. तीच पद्धत आपल्या फायद्यासाठी गांधी-नेहरू घराण्याने पुढे चालविली. त्यातूनच ‘इंदिरा इज इंडिया अॅण्ड इंडिया इज इंदिरा’ असा उद्दाम नारा जन्मास आला होता. राज्यांना आपले गुलाम समजण्याच्या काँग्रेसी मानसिकतेतूनच मनास वाटेल तेव्हा राज्यांची सरकारे बरखास्त करण्याची प्रथा काँग्रेसच्या काळात होती, याचा विचार राहुल गांधी करतील याची सुतराम शक्यता नाही.
 
राहुल गांधी यांच्या भाषणातून आणखी एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे ‘भारत हे एक राष्ट्र आहे’ या संकल्पनेवर आता काँग्रेसचा विश्वास राहिलेला नाही. अशाच प्रकारे भारताला ‘राष्ट्र’ मानण्यास डावी विचारसरणी नेहमीच नकार देत असते. भारत हे प्राचीन काळापासून ‘राष्ट्र’ आहे, हा विचार संपुष्टात आणण्यासाठी डावी विचारसरणी कार्यरत असते. त्यामुळे काँग्रेसने आपल्या पक्षातील वैचारिक विश्व हे डाव्यांना आंदण दिल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. कारण, गेल्या काही वर्षांतील काँग्रेसचे राजकारण पाहिल्यास त्यामध्ये कट्टरतावादी डाव्या विचारांचा प्रादुर्भाव आता स्पष्टपणे दिसत आहे. देशांतर्गत फुटीरतावाद वाढीस लागला, तर त्याचा लाभ आपले शत्रू म्हणजे पाकिस्तान आणि चीन घेणार, यात कोणतीही शंका नाही. कारण, सध्या जागतिक राजकारणामध्ये भारत बजावित असलेल्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे पाक आणि चीन हे अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे भारताच्या शत्रूंना लाभ होईल, अशी भाषा काँग्रेस पक्ष का बोलत आहे, हा प्रश्न निर्माण होतो.
 
 
राहुल गांधी यांच्या भाषणांची खिल्ली उडविण्याची एक प्रथा निर्माण झाली आहे. अनेकदा त्यांची भाषणे ही खिल्ली उडविण्याजोगी असतीलही. मात्र, यावेळी आपल्या साधारण तासाभराच्या भाषणामध्ये राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे पुढील दोन वर्षांसाठीचे राजकारण नेमके कशा प्रकारचे असेल, याची चुणूक दाखविली आहे. त्यांचे भाषण हे काँग्रेस समर्थकांना अतिशय जबरदस्त वाटले, तर विरोधकांनी नेहमीप्रमाणे त्या भाषणाची खिल्ली उडविण्यास प्रारंभ केला आहे. मात्र, भाषणाचे कौतुक करणे आणि खिल्ली उडविण्यापलीकडे जाऊन राहुल गांधी यांनी भाषणामध्ये मांडलेल्या मुद्द्यांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. कारण, त्यांनी मांडलेले मुद्दे हे वरवर पाहाता अतिशय वैचारिक भासत असले तरीही त्यामध्ये फुटीरतावादाची बिजे असल्याचे स्पष्टपणे जाणवते. अर्थात, भारतीय समाज अशा प्रकारे फुटीरतावादास कधीही स्वीकारणार नाही. त्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष सध्या ज्या प्रकारचे राजकारण करीत आहेत, ते पाहाता त्यांना अटलबिहारी वाजपेयी यांच्या या कवितेची आठवण करून देणे आवश्यक आहे-
 
 
‘इसे मिटाने की साजिश
करनेवालों से कह दो
चिनगारी का खेल बुरा होता है
औरों के घर आग लगाने का जो सपना
वो अपने ही घर में सदा खरा होता है’
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.