साडेतीन लाख रुपये किलोचा टिळा

Total Views |

Kesar
 
 
 
केशर ही वस्तू इतकी अवास्तव महाग असण्याचं कारण त्याची खर्चिक, वेळखाऊ प्रक्रिया हे आहे. केशरचे कंद जमिनीत पेरले जातात. त्याला जांभळ्या रंगाची जमिनी सरपट पानं आणि फुलं येतात. प्रत्येक फुलाला पिवळसर रंगाचे तीनच पराग येतात. ते हाताने खुडायचे. कागदाच्या थरांमध्ये ते ठेवून वर जड वजन ठेवून ते उन्हातच वाळवायचे. मग त्याच्या वड्या होतात. हे सर्वोत्कृष्ट दर्जाचं केशर होय. त्याला ‘शाही केशर’ असं नाव आहे. असं एक किलो केशर तयार करायला किती फुलं लागतात माहितीय? तब्बल ८० हजार फुलं! म्हणून ते एवढं महाग पडतं!
 
 
 
या फेब्रुवारी महिन्यातच स्पॅनिश पोलीस खात्याला एक खबर मिळाली की, एक फार किंमतवान घबाड इराणमधून स्पेनमार्गे अमेरिकेत जाणार आहे. अर्थातच तस्करी पद्धतीने म्हणजे बेकायदेशीरपणे! स्पॅनिश पोलिसांनी धाड टाकून घबाड ताब्यात घेतले. धाड पथकाला थोडं आश्चर्यच वाटलं की, काय बरं असेल या खोक्याच्या आत? कारण, खोक्याचं वजन होतं जेमतेम ४५० किलो. पण, जेव्हा खोकं उघडलं गेलं, तेव्हा आतून निघालेल्या मालाचं एकूण वजन होतं ४०० किलो नि किंमत अमेरिकन बाजारभावानुसार १४०० डॉलर्स प्रति किलो. म्हणजे सुमारे एक लाख, पाच हजार रुपये प्रति किलो आणि ती वस्तू होती केशर. इराणच्या खुरासान प्रांतात उत्पादित झालेलं उत्तम प्रतीचं केशर, स्पेनमार्गे तस्करीने अमेरिकत चाललं होतं. तस्करीने का? कारण, अणुबॉम्ब विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरून अमेरिकेने इराणवर आर्थिक बहिष्कार टाकलेला आहे. कोणताही इराणी माल सरळ मार्गाने अमेरिकेत पाठवता येत नाही. मग चोरुन पाठवा! खरी गंमत आणखीनच पुढे आहे. स्पॅनिश अधिकार्‍यांनी या मालाची तपासणी, मूल्यावरूनसुरू केल्यावर त्यांना असे आढळलं की, हा सगळाच माल उत्तम प्रतीचा नाही. थोडासाउत्तम, त्यापेक्षा जास्त मध्यम प्रतीचा आणि सर्वात जास्त अत्यंत हलक्या प्रतीचा माल पाठवून एकप्रकारे खरेदीदाराची फसवणूकच करण्यात येणार होती. या प्रकरणाची माहिती झाल्यावर फ्रेंच पोलीस आणि युरोपियन युनियनच्या ‘युरोपोल’ या पोलीस खात्याच्या अधिकार्‍यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की, केशराच्या स्मगलिंगमधला किमान ११ टक्के माल हा खोटा भेसळीचाच असतो.
 
 
 
यावरून आपल्याकडची १९७०च्या दशकातली एक घटना आठवली. फोर्टमधल्या एका सरकारी ऑफिसात अनेक घाबरट मराठी कारकुनांच्या मेळ्यात कुणी एक जेठमलानी किंवा सदारंगानी होता. तो उंची सिगारेटी, उंची फ्रेंच परफ्यूम्स, चायना सिल्कच्या साड्या, स्ट्रेचलॉन डबल नेट सूटिंग वगैरे सगळा माल ऑफिसात विकण्याचा जोडधंदा करीत असे. आपल्या एका मराठी कारकुनाने मोठ्या हिमतीने कुलाब्याच्या कुठल्याशा काळोख्या वस्तीतून ५० रोलेक्स मनगटी घड्याळं प्रत्येकी १०० रुपयाला मिळवली. १९७०च्या दशकात रोलेक्स घड्याळ ही रोल्स रॉईस मोटार इतकीच अपूर्वाईची वस्तू होती. दुसर्‍या दिवशी मोठ्या हुशारकीने त्याने सदारंगानीला आपला माल दाखवला. तेव्हा कुचेष्टेने आणि दयेने सदारंगानी त्याला म्हणाला, “तात्या, धंदा आणि त्यातून चोरीचा धंदा करणं तुमची कामं नाहीत रे बाबा. हे बघ...” म्हणून त्याने एक रोलेक्स घड्याळ उचलून तात्याच्या डोळ्यांसमोर धरलं. तरी, तात्याची ट्यूब पेटेना. तेव्हा सदारंगानी त्याला म्हणाला, “अरे, या घड्याळाला एकच काटा आहे. तुझे पाच हजार रुपये अक्कलखाती जमा झाले.” १९७०च्या दशकात पाच हजार ही मोठी रक्कम होती. तात्याला धड रडूसुद्धा फुटेना.
 
 
 
असो. तर आपण पुन्हा २०२२ मधल्या केशर प्रकरणाकडे वळू. केशराला संस्कृतमध्ये ‘कुंकुम’ असा शब्द आहे. गेली हजारो वर्षं भारतीय म्हणजे हिंदू स्त्रिया आणि पुरुषसुद्धा कपाळावर कुंकुमतिलक लावल्याशिवाय घरातून बाहेर पडत नाहीत. पुरुष स्थलपरत्वे आणि आवडीनुसार चंदन, गोपीचंदन, भस्म, अबीर अशा वस्तूंचा देखील टिळा लावतात. पण, स्त्रिया कपाळावर आणि भांगात कुंकूच भरतात. प्राचीन संस्कृत साहित्यात स्त्री-पुरुष प्रसाधनांमध्ये आणि सुवासिक द्रव्यांमध्ये केशराचा उल्लेख असतोच. उत्तर भारतातलं ‘कान्यकुब्ज’ म्हणजे आताचं कनौज हे शहर उत्तम सुवासिक द्रव्यांसाठी शतकानुशतकं प्रसिद्ध आहे. ही सुवासिक द्रव्यं बनवण्यासाठी चंदन, वाळा, गुलाब, हीना म्हणजे मेंदी, कस्तुरी, ऊद, धूप यांच्याप्रमाणेच केशराचाही वापर होत असे. यांपैकी ऊद, धूप हे झाडांचे चीक आहेत, गुलाब, हीना ही फुलं, पानं आहेत, कस्तुरी हा मेणासारखा पदार्थ कस्तुरीमृगाच्या नराच्या बेंबीतून स्त्रवत असतो. म्हणजे तो प्राणिज पदार्थ आहे. चंदनाचे वृक्ष दक्षिण भारतात विपुल आहेत. पण, केशर हे काय आहे? ते कुठे पिकतं? भाषेमध्ये ‘केशराचं शेत’ असा शब्दप्रयोग तर आहे. पण, केशराची शेती भारतात कोणत्या प्रांतात होत असे? कोण लोक त्या पिकापासून केशराचं उत्पादन करीत असत, याचा स्पष्ट उल्लेख नाही. आपल्या आजच्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर पुरुष आपल्या कपाळावर कुंकुमतिलक क्वचित केव्हातरी उत्सवप्रसंगी लावतात. स्त्रियांना देखील चित्रपटातल्या फॅशनच्या आहारी जाऊन, कपाळावर कुंकू लावण्याची प्राचीन घरंदाज प्रथा जवळपास मोडीत काढल्यातच जमा आहे.
 
 
 

Kesar1 
 
 
 
आता त्यांनी लावलंच कुंकू तर ते एक ‘फॅशन’ म्हणून, प्रसाधन म्हणून, विविध रंगाचं असतं. नवर्‍याच्या नावाने लालभडक कुंकू लावणं वगैरे भावनिक गोष्टी, तर आता हास्यास्पदच ठरू लागल्या आहेत. तरी ज्या काही थोड्या फार महिला महालक्ष्मीला, अंबाबाईला वगैरे कुंकू वाहतात, ते काही केशरापासून बनवलेलं नसतं. ते हळद म्हणजे हळकुंड, पापडखार, डिंक, टाकणखार इत्यादी पदार्थांपासून बनवलं जातं. अशा कुंकवाच्या वापराची देखील काही शतकांची परंपरा आहे. अनेक घराणी पिढ्यान्पिढ्या उत्तम दर्जाचं कुंकू बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, त्यांना माहित आहे, तेव्हापासून ते लोक हळकुंडच वापरत आहेत, केशर नव्हे. मग ही केशराची शेती होती तरी कुठे? नि कोणत्या कालखंडात? जो काही ऐतिहासिक पुरावा आज उपलब्ध आहे, त्यानुसार भारतात फक्त काश्मीर याच प्रांतात केशरची शेती केली जात होती. त्यातही पुन्हा काश्मीरचा पद्मपूर हा जिल्हा सर्वोत्कृष्ट केशरासाठी प्रसिद्ध होता. हे प्राचीन पद्मपूर म्हणजेच आधुनिक पांपोर. जगाच्या इतिहासात एक मोठी गमतीदार स्थिती अनुभवायला मिळते. अत्याधुनिक युग हे विज्ञान-तंत्रज्ञानाचं युग मानलं जातं. या विज्ञान-तंत्रज्ञानाचा उगम कुठे झाला? तर युरोप खंडात झाला. युरोपीय विद्वान स्वतःचं म्हणतात की, बायबलची जाचक बंधनं झुगारुन देऊन आम्ही प्राचीन रोमन आणि ग्रीक विद्वानांचं ज्ञानभंडार उपसू लागलो, तेव्हा आम्हाला या विज्ञान-तंत्रज्ञानाची बीजं गवसली. रोमन आणि ग्रीक तत्वज्ञ म्हणतात की, आम्हाला हे ज्ञानभांडार अरबांकडून मिळालं आणि इस्लामपूर्व अरब विद्वान म्हणतात की, आम्हाला हे ज्ञान भारतीयांकडून (म्हणजेच हिंदूंकडून) मिळालं. पण, म्हणून आजचा कोणताही पाश्चिमात्य विद्वान स्पष्टपणे असं कबूल करत नाही की, सर्वच क्षेत्रातल्या आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाची बीजं अखेर भारतापर्यंत पोहोचतात. असं मान्य करायला त्यांना कमीपणा वाटतो. मग ते मोठ्या कलात्मक शब्दांत असं म्हणतात की, अमुक एका ज्ञानाचा, कलेचा तंत्रज्ञानाचा वस्तूचा नेमका उद्गम कुठे झाला, हे सांगणं मोठं अवघड आहे. पण, इसवी सनाच्या अमक्या-तमक्या शतकात अमुक ती वस्तू चीन किंवा इजिप्तमध्ये वापरात होती, असं आढळलं आहे. मग पुढे बराचसा शाब्दिक घोळ आणि मग मध्येच एक वाक्य - ‘अमकी ती वस्तू इसवी सन पूर्व अमुक काळात भारतात होती, असं वाटतं.’ बस् , एकच वाक्य पुन्हा पुढे शाब्दिक पाल्हाळ चालू.
 
 
 
अगदी त्याच चालीवर, ते लोक केशराच्या भारतातल्या हजारो वर्षांच्या वापराला, उत्पादनाला ‘हिस्ट्री ग्राऊंडेड इन मिस्टरी’ अशा शब्दांमध्ये उडवून टाकून एकदम इराण, ग्रीस यांच्याकडे वळतात. असो. तर आज जगात ग्रीस, फ्रान्स, इटली, स्पेन, अमेरिका इत्यादी अनेक देश केशराची शेती करतात. पण, त्या सगळ्यांचं मिळून उत्पादन एकंदर उत्पादनाच्या जेमतेम दहा टक्के भरतं. एकटा इराण देश एकंदर जागतिक उत्पादनाच्या ९० टक्के केशर पिकवतो. त्यात पुन्हा खुरासान या प्रांतातलं केशर अत्युच्च दर्जाचं असतं. काश्मीरच्या पांपोर जिल्ह्यातलं उत्पादन १९८८-८९पासून इस्लामी अतिरेकी कारवायांमुळे जे बंद पडलं, ते आता चालू झालं आहे का, हे कळायला मार्ग नाही. बाजारात तुम्हाला अस्सल काश्मिरी केशर म्हणून साडेतीन लाख रुपये किलो या भावाने जे केशर दिलं जातं, ते प्रत्यक्षात अफगाणिस्तान किंवा स्पेनमधलं असावं. आता अफगाणिस्तानी उत्पादनही थांबलं असावं. कारण, तालिबानला शेतीबिती करण्यात स्वारस्य नाही. केशर ही वस्तू इतकी अवास्तव महाग असण्याचं कारण त्याची खर्चिक, वेळखाऊ प्रक्रिया हे आहे. केशरचे कंद जमिनीत पेरले जातात. त्याला जांभळ्या रंगाची जमिनी सरपट पानं आणि फुलं येतात. प्रत्येक फुलाला पिवळसर रंगाचे तीनच पराग येतात. ते हाताने खुडायचे. कागदाच्या थरांमध्ये ते ठेवून वर जड वजन ठेवून ते उन्हातच वाळवायचे. मग त्याच्या वड्या होतात. हे सर्वोत्कृष्ट दर्जाचं केशर होय. त्याला ‘शाही केशर’ असं नाव आहे. असं एक किलो केशर तयार करायला किती फुलं लागतात माहितीय? तब्बल ८० हजार फुलं! म्हणून ते एवढं महाग पडतं! फुलामध्ये पांढरे परागही असतात. तेही वेगळे काढून असंच केशर तयार करतात. मात्र, ते मध्यम प्रतीचं असतं. त्याला ‘मोगल केशर’ म्हणतात. मग फुलं उरतात. ती पाण्यात उकळवून निवळी काढून टाकून त्याचंही केशर बनवतात. त्याला ‘लांचा ’असं म्हणतात. हे हलक्या प्रतीचं समजलं जातं. आता एवढे मानवी श्रम आणि मानवी कार्यदिवस ज्या वस्तूच्या उत्पादनात गुंतलेले आहेत, ती वस्तू अत्यंत महाग असणारच.
 
 
 
त्यामुळेच केशराच्या निर्यातीमधून इराणला खूप मोठा महसूल मिळतो. पण, इराणने अणुविकास कार्यक्रम धडाक्याने हाती घेतल्यावर अमेरिकेने त्याच्यावर आर्थिक निर्बंध (सॅक्शन्स) घातले. स्वत: अमेरिका आणि तिच्या मित्र देशांनी इराणबरोबरचा सर्व व्यापार थांबवला. आता तुम्ही अधिकृतपणे बंदी घातलीत की चोरटा व्यापार सुरू झालाच म्हणून समजा. तसे इराणी व्यापार्‍यांनी अमेरिकेत माल पोहोचविण्याचे नवे मार्ग आणि डॉलर्स मिळवर्‍याचे नवे ‘हवाला’ सावकार शोधून काढले. अमेरिकेलाही हे समजतच होतं. त्यामुळे २०१५ पासून तिने निर्बंध थोडे ढिले करायला सुरुवात केली. तेवढ्यात डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले नि २०१८ पासून त्यांनी पुन्हा इराणवर कडक बहिष्कार टाकला. झालं. पुन्हा जुने तस्करी मार्ग, हवाला रॅकेट्स आणि भेसळयुक्त मालाची सुरुवात झाली. देशोदेशींच्या बँका पुन्हा सतर्क झाल्या.अनेक नामी-बेनामी खाती बंद करण्यात आली. तस्करांच्या आवडत्या उंची दारु, अमली पदार्थ, कलावस्तू वगैरे नेहमीच्या वस्तूंमध्ये पुन्हा केशर या वस्तूची भर पडली. या सगळ्या हजारो, लाखो, कोट्यवधींच्या खर्‍या-खोट्या व्यापारी जगात आपली सामान्य माणसाची भूमिका काय? आपण रोज सकाळी केसर कस्तुरी ललाटी, हार कंठी साजिरा’ म्हणून गणपती बाप्पा किंवा पांडुरंगाला आळवताना, मनातल्या मनात समाधान मानायचं की, आपण देवाला जो केशराचा म्हणून टिळा लोवतोय तो चक्क साडेतीन लाख रुपये प्रति किलो किमतीचा आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.