तीन कथा, एक लक्ष्य...

    19-Feb-2022   
Total Views |

Sanjay Raut
 
 
खा. संजय राऊत यांची पत्रकार परिषद, कशी नसावी अशी झाली. त्यांनी आक्रस्ताळेपणे भाषण केले. पत्रकारांनी (बिचारे पत्रकार) ते ऐकले. प्रश्न विचारण्यास बंदी होती. प्रश्नोत्तराशिवाय पत्रकार परिषद केवळ संजय राऊतच घेऊ शकतात. त्यांच्या परिषदेवरून जाणवले की, ते फार घाबरलेले आहेत.
 
 
खूप गाजावाजा करून खा. संजय राऊत यांनी दि. १५ फेब्रुवारीला मुंबईत पत्रकार परिषद घेतली. संजय राऊत यांचे बोलणे फारशा गांभीर्याने घ्यायचे नसते, एवढी समज मला असूनही मी ही पत्रकार परिषद पाहिली आणि ऐकली. संजय राऊत यांचे बोलणे गांभीर्याने का घ्यायचे नाही, तर ते पोपट आहेत. त्यांचा बोलविता धनी शरदराव पवार आहेत. म्हणून पोपटाची पोपटपंची ऐकण्याऐवजी मालकाचे बोल ऐकणे हे अधिक चांगले! म्हणून शरदराव पवार काय बोलतात, हे मी गांभीर्याने पाहात आणि ऐकत असतो.
 
खा. संजय राऊत यांची पत्रकार परिषद, कशी नसावी अशी झाली. त्यांनी आक्रस्ताळेपणे भाषण केले. पत्रकारांनी (बिचारे पत्रकार) ते ऐकले. प्रश्न विचारण्यास बंदी होती. प्रश्नोत्तराशिवाय पत्रकार परिषद केवळ संजय राऊतच घेऊ शकतात. त्यांच्या परिषदेवरून जाणवले की, ते फार घाबरलेले आहेत. शूर व्यक्ती शूरत्वाची वटवट करीत नाही. रस्त्यावर किंवा रेल्वेच्या डब्यात भांडण होतं. एकजण म्हणतो,“हिंमत असेल तर हात लाव, मी मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही.” दुसरा म्हणतो,“हिंमत असेल तर तू हात लाव, मी पण कच्या गुरुचा चेला नाही.” अशा बोलबच्चनांचे भांडण दोन बोकडांच्या युद्धासारखे असते. या दोघांपैकी जर एखादा शूर असेल, तर तो तोंडातून शब्द काढत नाही, तर समोरच्याच्या कानाखाली मारतो,नाहीतर एक ठोसा मारतो. संजय राऊत यांची ही बोलबच्चनगिरी आहे. योगायोग कसा असतो बघा, त्यादिवशी रात्री मी जातककथाच्या पुस्तकाचे पान उघडले आणि लागोपाठ तीन कथा वाचल्या. या तिन्ही कथा संजय राऊत यांना एकदम फीट बसणार्‍या वाटल्या. यालाच म्हणतात योगायोग.
 
धर्मानंद कोसंबी यांच्या पुस्तकातील जातककथा आहेत. संजय राऊत हे तसे चांगले पत्रकार आहेत. ‘सामना’ दैनिकाचे कार्यकारी संपादक झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या सहवासात आले. शूर माणसाचा सहवास त्यांना लाभला. पण, नंतर त्यांचा सहवास शरदराव पवार यांच्याशी अधिक वाढला. शरदराव पवारांना काही करून शिवसेना-भाजप युती मोडायची होती. ते काम त्यांनी संजय राऊत यांच्याकडून करवून घेतले आणि आजही ते चालूच आहे. असो. तर ‘सहवासाचे फळ’ असे या जातककथेचे शीर्षक. जातककथा लांबलचक असतात, म्हणून त्या अगदी थोडक्यात सांगतो. दधिवाहन हा वाराणसीचा राजा होता. त्याच्या बागेत आंब्याचे एक झाड होते. या झाडाला अत्यंत गोड आंबे लागत असत. हे आंबे तो इतर राजांना भेट पाठवीत असे. पण त्यापूर्वी बारीक सुईने आंब्याच्या कोयीमध्ये विष टाकून ती कोय उगवणार नाही याची काळजी घेई. आंबे आपल्याकडेच असले पाहिजेत, हा त्यामागचा हेतू.
 
एका राजाला, दधिवाहन राजाची ही युक्ती समजली. राजाच्या झाडाचा गोड आंबा हा कडू आंबा कसा होईल, यासाठी त्याने आपला विश्वासू माळी दधिवाहन राजाकडे पाठविला. या माळ्याने दधिवाहन राजाचा विश्वास संपादन केला. माळी कौशल्याने त्याने ऋतूत न उगवणारी फळे, फुले निर्माण करून दाखविली. राजाने त्याला आमराईचा प्रमुख केले. गोड आंबा देणार्‍या झाडाभोवती त्याने कडुलिंब आणि इतर दुसर्‍या कडू जातीची खूप झाडे लावली. त्यांची मुळे आंब्याच्या झाडाच्या मुळात मिसळली आणि झाडाला कडू रसाचा पुरवठा झाला. राजा बागेत आला असता त्याने एक पिकलेला आंबा काढला आणि खायला सुरुवात केली. तो अत्यंत कडू लागला. एवढे गोड फळ कडू कसे झाले, म्हणून त्याने बोधिसत्वाला त्याचे कारण विचारले. बोधिसत्वाने निरीक्षण करून सांगितले, “महाराज, या झाडाभोवती सर्व प्रकारची कडू रस देणारी झाडे लावली आहेत. त्यातील रस आंब्याच्या झाडात मिसळले गेले आहेत, म्हणून आंबा कडू झाला.” युतीचे फळ असे आंब्यासारखे गोड होते, ते संजयरूपी नावाच्या माळ्याने वाईट संगत धरुन अतिशय कडू केले. या झाडाला लवकर गोड फळे लागणे आता कठीण आहे.
 
ही कथा वाचल्यानंतर दुसर्‍या कथेकडे येऊया. कथेचे शीर्षक आहे, ‘मूर्खाला मौन शोभते.’ एक फेरीवाला एका गाढवावर आपले सामान घालून दारोदार सामानाची विक्री करून आपला निर्वाह करीत असे. काम झाले की, तो गाढवाला शेतात वाघाचे कातडे घालून सोडून देत असे. लोकांना वाटे की, वाघ आला आणि लोक घाबरून पळून जात. गाढव यथेच्छ चरत असे. एके दिवशी गाढव असेच एका शेतात वाघाचे कातडे पांघरुण गेले. शेतकरी घाबरून पळाला. बोधिसत्वाला त्याने हे सांगितले. बोधिसत्व अनेक तगड्या लोकांना घेऊन शेतात आला. वाघाला घालविण्यासाठी त्यांनी वाद्ये वाजवायला सुरुवात केली. हे ऐकून गाढव घाबरले आणि ओरडू लागले. वाघाचे कातडे पांघरलेला हा गाढव आहे, हे लोकांच्या लक्षात आले आणि लोकांनी त्याला यथेच्छ बडविले. तो बेशुद्ध होऊन खाली पडला. त्याला बघण्यासाठी त्याचा मालक आला. त्याची ती अवस्था पाहून तो म्हणाला, “बा गाढवा, वाघाचे कातडे पांघरल्यामुळे खूप दिवस तुला चरता आले असते. परंतु, एका ओरडण्याने तू मरण ओढवून घेतले आहेस.” ‘ईडी’च्या दंडूक्याने संजय राऊत घायाळ झाले आहेत. वाघाचे कातडे तर पांघरले आहे, पण राजकारणात जनाधार लागतो, आमदार, खासदार पाठीशी उभे असावे लागतात. शीर्षस्थ, राजकीय नेतृत्वाबरोबर असावे लागते. यावेळेला पत्रकार परिषदेत कुणीच नव्हते. संजय राऊत यांनी मनसोक्त ओरडण्याचे काम केले. ‘ईडी’चा पुढचा दणका कधी बसतोय, ते बघूया.
 
तिसर्‍या कथेचे शीर्षक आहे, ‘साधूच्या सहवासाचे फळ.’ संगत चांगली असेल, तर त्याचे फळ चांगले मिळते. एक उपासक काही कामानिमित्त जहाजातून परदेशी निघाला. त्यात जहाजातून एक न्हावी प्रवासाला चालला होता. न्हाव्याची बायको उपासकाला म्हणाली, “महाराज, माझ्या पतीची काळजी घ्या.” तो म्हणाला, “ठीक आहे.” पुढे जहाज वाळवंटात सापडते आणि बुडते. तो उपासक आणि न्हावी एका बेटावर येऊन पोहोचतात. त्या निर्मनुष्य बेटावर उपासक कंदमुळे आणि फळे खाऊन राहू लागतो. न्हावी मात्र पक्षी आणि छोटे प्राणी मारुन खाऊ लागतो. उपासकाने शाकाहाराचे व्रत सोडले नाही. हे पाहून एका नागदेवतेला त्याची धन्यता वाटली. तो नाग त्याच्या समोर येऊन त्याला म्हणाला,“मी माझ्या शरीराची होडी करतो आणि तुम्हाला तुमच्या देशात नेऊन सोडतो.” त्याप्रमाणे तो आपल्या शरीराची होडी करतो आणि उपासकाला त्या होडीत बसायला सांगतो. उपासक म्हणतो, “मी एकटा येणार नाही, माझ्याबरोबर या न्हाव्यालाही घेऊन जाईल.” नाग म्हणतो, “या न्हाव्याने हिंसा करून पाप केले आहे. त्याला नेता येणार नाही.” तेव्हा उपासक म्हणतो, “मी माझे अर्धे पुण्य त्याला देतो. म्हणजे तो पुण्यवान होईल आणि माझ्याबरोबर येईल.” अशा प्रकारे त्या दोघांची युती होते. आणि होडीतून ते दोघे किनार्‍यावर येतात.
 
शिवसेनेशी युती करून भाजपने सेनेला आपल्या पुण्याचे वाटेकरी केले. यामुळे युतीचे जहाज खडकांवर न आपटता किनार्‍याला लागले. मोदींच्या प्रभावामुळे अनेक आमदार निवडून आले. पण, काही दुष्ट बुद्धीच्या लोकांना हे पहावले नाही. त्यांनी युतीत खोडा घातला आणि पुढचा सगळा इतिहास आपल्याला माहीत आहे. मागील निवडणुकीत भाजपने सत्तेत सेनेला पुण्याचे वाटेकरी केले नसते तर यासाठी भगवतांचे शब्द असे आहेत, “या न्हाव्याने जर या उपासकाची कास धरली नसती, तर समुद्रातच त्याचा नाश झाला असता!” हे शहाणपण खासदार, पत्रकार संजय राऊत यांना का नसावे? काही समजत नाही. अशा या तीन कथा वाचा, आनंद घ्या आणि विसरा!
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.