पंजाबसाठी निर्णायक निवडणूक

    18-Feb-2022   
Total Views |
Punjab
 
 
 
पंतप्रधानांच्या 'नव्या पंजाब'च्या संकल्पनेमध्ये अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे अन्य राजकीय पक्षांची सरकारे पाहिलेल्या पंजाबी मतदार भाजपच्या पारड्यात आपले मत मोठ्या प्रमाणावर या मुद्द्यासाठी देऊ शकतो.
 
 
पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये यावेळी पंचरंगी सामना रंगत आहे. काँग्रेस, आप एकटेच रिंगणात आहेत, भाजपने कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नव्याने स्थापन झालेल्या पंजाब लोक काँग्रेसशी युती केली आहे. भाजपसोबत पूर्वी असलेला अकाली दल यंदा बसपासोबत युती करून निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. पंजाब निवडणुकीचा प्रचार आज, १७ फेब्रुवारी रोजी थंडावणार आहे. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे रविवारी २० फेब्रुवारी रोजी मतदान होईल. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला सत्ता मिळेल, असा कल व्यक्त केला जात आहे. मात्र, भाजप आणि पंजाब लोक काँग्रेस यांची युती मोठे म्हणावे, असे यश मिळवू शकेल, अशी शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभांनंतर निर्माण झाल्याची स्थिती आहे. यापूर्वी सुरक्षाव्यवस्थेमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने पंतप्रधानांना आपला दौरा अर्ध्यातच रद्द करून दिल्लीत परत जावे लागले होते. त्यानंतर मात्र पंतप्रधानांच्या पंजाबमधील प्रचारसभांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र आहे. आपल्या भाषणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'नया पंजाब' ही संकल्पना मतदारांपुढे मांडली आहे. ते म्हणाले, “नव्या पंजाबची उभारणी ही नवभारताच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाची आहे. नव्या पंजाबमध्ये समृद्ध वारसा आणि विकास हे परस्परांशी निगडित असतील. नवा पंजाब संधींनी परिपूर्ण आणि कर्जमुक्त असेल. 'नव्या पंजाब'मध्ये प्रत्येक मागासवर्गीय बंधू-भगिनींना सन्मान मिळेल, सर्व स्तरावर त्यांचा योग्य सहभाग असेल.”
 
राज्यातील सत्ताधारी काँग्रेसवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, “काँग्रेस पक्ष विघटित होत आहे. आपसात भांडणारे पंजाबला स्थिर सरकार देऊ शकत नाहीत. आपल्या खुर्च्या वाचवण्याचा प्रयत्न करणारे हे लोक पंजाबचा विकास करू शकत नाहीत. पंजाबला गांभीर्याने काम करणार्‍या सरकारची गरज आहे. देशाची सुरक्षा. काँग्रेसचा इतिहास असा आहे की, ते पंजाबसाठी कधीही काम करू शकत नाही आणि काँग्रेसला जे करायचे आहे, त्यात काँग्रेस हजारो अडथळे निर्माण करते.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'नव्या पंजाब'ची घोषणा करणे हे अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे. कारण, पंजाब राज्याची सध्याची स्थिती अतिशय चिंताजनक आहे. पंजाबचे भुराजकीय स्थान, अमली पदार्थांचा वाढता वापर, शस्त्रास्त्र तस्करी आणि बेकायदेशीर धर्मांतरणांमुळे पंजाबमधील सामाजिक ऐक्य धोक्यात आले आहे. अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात दुर्देवाने यापूर्वीच्या काँग्रेस आणि अकाली दलाच्या सरकारांनी काहीही केले नाही. त्यामुळे पंजाबमधील अनेक पिढ्या अमली पदार्थांच्या व्यसनात गुरफटल्या आहेत. या मुद्द्याचे गांभीर्य ओळखून भाजपने 'अमली पदार्थ मुक्त पंजाब' असा नारा दिला आहे. पंतप्रधानांच्या 'नव्या पंजाब'च्या संकल्पनेमध्ये अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे अन्य राजकीय पक्षांची सरकारे पाहिलेल्या पंजाबी मतदार भाजपच्या पारड्यात आपले मत मोठ्या प्रमाणावर या मुद्द्यासाठी देऊ शकतो.
 
 
पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये यावेळी शेतकरी हा मुद्दादेखील महत्त्वाचा ठरत आहे. शेतकर्‍यांच्या पाठिंब्यावर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी पंजाबमध्ये केला आहे. काँग्रेस असो, कॅप्टन अमरिंदर सिंग असोत की, अकाली दल असोत, अथवा आम आदमी पार्टी; या प्रत्येकाने शेतकर्‍यांचा जनाधार मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी शेतकर्‍यांनी स्वत: संयुक्त समाज मोर्चा काढत विधानसभा निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली आहे. याशिवाय आणखी एक शेतकरी नेते गुरुनाम सिंह चढूनी यांनी संयुक्त संघर्ष पक्षाची स्थापना केली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी शेतकर्‍यांचा पाठिंबा मिळण्याची आशा बाळगली होती, त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. पंजाबच्या राजकारणात शेतकरी हे नेहमीच मोठी मतपेढी राहिली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे पंजाबमधील ७०-७५ टक्के लोकसंख्या थेट कृषी क्षेत्राशी निगडित आहे. राज्याच्या 'जीडीपी'मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा सुमारे २५ टक्के आहे. राज्यातील विधानसभेच्या एकूण ११७ जागांपैकी ३५-४० जागा शहरी भागातील आहेत, तर जवळपास ७० जागांवर शेतकर्‍यांचा प्रभाव आहे. सर्वाधिक ७० जागा असलेल्या माळवा प्रदेशात शेतकरी हा सर्वांत प्रभावी घटक आहे. अकाली दलापासून ते आम आदमी पक्षापर्यंत ग्रामीण मतदारांचा पाठिंबा मिळत आहे. याच कारणामुळे शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचा सर्वात जुना मित्र पक्ष असलेल्या अकाली दलाने 'एनडीए'पासून फारकत घेतली. शेतकरी मतांच्या पाठिंब्यावर अकाली दल २०१२ मध्ये सत्तेवर आला, तर त्यांच्या नाराजीमुळे २०१७ मध्ये सत्ता गमवावी लागली होती. २०१७च्या निवडणुकीत त्यांना केवळ १५ जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला केवळ तीन जागा जिंकता आल्या. दुसरीकडे, आम आदमी पक्षाला २० जागा मिळाल्या, त्यापैकी १७ जागा माळवा विभागातून मिळाल्या. जिथे शेतकरी महत्त्वाची भूमिका बजावतात. अकाली दलाला सत्तेपासून दूर करून काँग्रेसने बहुमताने विजय मिळवला. माळवा विभागात ४० जागा जिंकल्या होत्या. दुसरीकडे, माझा विधानसभेच्या २५ पैकी २२ आणि दोआबमध्ये २३ पैकी १५ जागा जिंकल्या. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पाठिंब्यामुळे काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. मात्र, आता शेतकरी संघटनांनीच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने शेतकर्‍यांची मतांची होणारी विभागणी हे कोणाच्या पथ्यावर ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
 
डेरे यंदाही निर्णायक ठरणार?
 
पंजाबच्या राजकारणात डेर्‍यांचा मोठा प्रभाव आहे. रविदास समाजातील 'डेरा सचखंड बल्लान' (जालंधर), 'डेरा सच्चा सौदा' (सिरसा, हरियाणा) आणि 'डेरा राधा स्वामी बियास' (अमृतसर) यांच्या अनुयायांची संख्या लाखोंच्या घरात आहे. पंजाबच्या निवडणुकीत ते कोणत्याही उमेदवाराचे नशीब बदलू शकतात. त्यामुळेच प्रत्येक पक्षाचे नेते डेर्‍यांच्या आश्रयाला जाऊन आशीर्वाद घेत आहेत. कारण, डेरा प्रमुखांच्या एका इशार्‍यावर त्यांचे लाखो अनुयायी अर्थात मतदार आपला राजकीय कौल ठरवित असतात. बुधवारी गृहमंत्री अमित शाह 'डेरा ब्यास' येथे भेट दिली, तर मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी 'डेरा सचखंड बल्लान' येथे संत निरंजन दास यांचे आशीर्वाद घेतले. 'डेरा सच्चा सौदा'चा प्रमुख गुरमीत राम रहीम निवडणुकीच्या काळात तुरुंगाबाहेर आला आहे. निवडणुकीत कोणास पाठिंबा देणार हे 'डेरा सच्चा सौदा'ची राजकीय शाखा गुरुवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. 'डेरा बियास' प्रमुख गुरिंदर सिंग धिल्लन यांनीही मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी विधानसभा निवडणुकीच्या चार दिवस आधी 'डेरा बियास' येथे राधा सोमी डेराचे प्रमुख बाबा गुरिंदर सिंग ढिल्लोन यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे तासभर ही भेट झाली आणि त्यात कोणत्या विषयांवर चर्चा झाली, हे पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आले आहे.
 
'राधा स्वामी डेरा बियास'चा पंजाबमध्येच नव्हे, तर देशात आणि परदेशात चांगला जनाधार आहे. बाबा जयमल सिंग यांनी १७९१ मध्ये डेरा स्थापन केला होता. हा डेरा नेहमीच राजकारणापासून दूर राहिला आहे. डेरा समर्थकांची संख्या मोठी असूनही डेर्‍याने राजकारणापासून नेहमीच चार हात दूर राहण्याची भूमिका घेतली आहे. चरणजित सिंग चन्नी यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर दोनदा डेर्‍यास भेट दिली आहे. याशिवाय भाजपचे पंजाब निवडणूक प्रभारी गजेंद्र सिंह शेखावत यांनीही डेरा प्रमुखांची भेट घेतली आहे. माजी कॅबिनेटमंत्री बिक्रम सिंह मजिठिया यांचाही डेरामध्ये चांगलाच प्रभाव आहे. त्यामुळे राधा स्वामी डेर्‍याने भाजपच्या पारड्यात आपले वजन टाकण्याचा निर्णय घेतल्यास भाजपसाठी ते निर्णायक ठरू शकते.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.