सिंधुदुर्गात पुन्हा ‘राणे पॅटर्न’चा डंका

एकट्या कणकवलीत 17 पंचायती बिनविरोध

    09-Dec-2022   
Total Views |
nitesh rane



मुंबई
:कोकणात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये नितेश राणे यांच्या ‘पॅटर्न’चा डंका वाजत असल्याचे चित्र आहे. नितेश राणेंच्या कणकवली विधानसभा मतदारसंघात निवडणूक सुरु असलेल्या ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक ग्रामपंचायती बिनविरोध करत त्यावर भाजपने आपला झेंडा रोवल्याचे आकडेवारीसह सिद्ध झाले आहे. एकट्या कणकवली विधानसभेत निवडणूक होत असलेल्या 20 ग्रामपंचायतींपैकी 17 ग्रामपंचायती बिनविरोध काढण्यात राणेंना यश आले आहे. नारायण राणेंच्या एकहाती वर्चस्वाखाली चालणार्‍या कोकणात आता पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या राजकीय स्थित्यंतरांमुळे ‘राणे पॅटर्न’ पुन्हा एकदा यशस्वी होत असल्याचे समोर आले आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया सुरु आहे. विधानसभा आणि लोकसभेपेक्षाही क्लिष्ट आणि अवघड मानल्या जाणार्‍या ग्रामपंचायतीच्या निवडणुका विधानसभेची ‘सेमीफायनल’ म्हणून ओळखल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या राजकीय पक्षाचा वरचश्मा असतो. तोच तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणावर मांड ठोकून राज्य करतो, हे साधारण गणित आहे. नारायण राणे यांचे केंद्रात प्रमोशन झाल्यानंतर कोकणात नितेश आणि निलेश या राणे पुत्रांनी यांनी भाजपची बाजू खंबीरपणे सांभाळली असून ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये त्याचा प्रत्यय आला आहे.

गावाच्या विकासासाठी सहकार्याची नेतृत्वाची भूमिका


ग्रामपंचायत निवडणुकीत होणारा खर्च आणि त्यातून निर्माण होणारे वाद टाळण्यासाठी भाजपकडून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाधिक ग्रामपंचायती बिनविरोध करण्याचा प्रयत्न फलद्रूप होताना दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपप्रणित पॅनलचे 29 सरपंच आणि 800 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आणण्यात राणेंना यश आले आहे. स्थानिक नेतृत्वाकडून गावाच्या विकासासाठी सहकार्य करण्याची भूमिका घेतल्यानंतर ग्रामस्थांकडूनही या भूमिकेला साद देत निवडणुका बिनविरोध करण्याचे परस्पर सहमतीने ठरवण्यात आले आणि निवडणुका न घेता सरपंच आणि सदस्य निवडीची प्रक्रिया अनेक ठिकाणी पार पडली आहे.

‘डबल इंजिन’ सरकारमुळे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारा योजनांचा लाभ


गेल्या आठ वर्षांपासून देशात विराजमान असलेल्या मोदी सरकारतर्फे देशभरात विविध योजनांच्या माध्यमातून ‘अंत्योदयाचा’ संकल्प सिद्धीस नेला जात आहे. देशातील शेवटच्या घटकापर्यंत सरकारच्या योजना पोहोचवून त्या व्यक्तीला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सरकारच्या माध्यमातून केले जात आहे. ‘प्रधानमंत्री घरकुल योजना’ असेल किंवा महिलांच्या साठी महत्त्वाची असलेली ’उज्ज्वला गॅस’ योजना यासारख्या अनेक योजना कार्यान्वित केल्यामुळे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारा योजनांचा लाभ जनसामान्यांमध्ये भाजपविषयी सकारात्मक करणारा ठरत आहे. त्यासोबतच राज्यात पाच वर्षे दमदारपणे कामगिरी केलेल्या फडणवीस सरकारने सर्व सामाजिक घटकांना विकासाच्या समान संधी देऊन सोशल इंजिनिअरिंग करत सर्वसमावेशक सरकार देण्याचा प्रयत्न केला होता. तसेच, विद्यमान फडणवीस-शिंदे सरकारदेखील त्याच धर्तीवर काम करत असल्यामुळे भाजपविषयी सर्वसामान्यांमध्ये असलेली भावना निवडणुकीतून परिवर्तित झाल्याचे बोलले जात आहे.

विकासाच्या वाटेवर नव्याने कात टाकणारे कोकण



मागील काही वर्षांमध्ये कोकण नव्याने कात टाकत असल्याचे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. सलग दोन वर्षे ‘तोक्ते’ आणि ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा सहन करूनही कोकण पुन्हा एकदा नव्या जिद्दीने वाटचाल करण्यासाठी उतरले आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून कोकणात लाखो कोटींचे प्रकल्प आणून कोकणाचा कायापालट करण्यासाठीच्या योजना केवळ आखल्या जात नसून त्या कार्यान्वितही केल्या जात आहेत. नाणार असेल किंवा बारसू या ऑईल रिफायनरींच्या माध्यमातून रोजगार स्वयंपूर्णतेच्या बाबतीत कोकणाला स्वावलंबी बनवण्याचे फडणवीस-शिंदेंचे प्रयत्न सिद्धीस जातील, असे आशादायी चित्र सरकारच्या कामगिरी आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे कोकण नव्याने कात टाकत आहे आणि ही खर्‍या अर्थाने ‘आत्मनिर्भरते’च्या वाटेने चालणार्‍या कोकणचे नवे चित्र कोकणचे भविष्य सांगायला पुरेसे आहे. त्यामुळे कोकणचा सर्वंकष विकास करणार्‍या केंद्र आणि राज्य सरकारच्या पाठीशी कोकणवासीयदेखील खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासक चित्र महाराष्ट्रासमोर दिसत आहे.


 
विकासात्मक कार्य करणार्‍या भाजपवर लोकांचा विश्वास

देशात सुरु झालेल्या विकासाच्या राजकारणाला लोकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपच्या माध्यमातून लोकांच्या समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी जे काही प्रयत्न सुरु झाले आहेत, त्याला यश मिळत असून लोकांना न्याय मिळत आहे, ही भावना जनतेत निर्माण झाली आहे. लोक आता भावनिकतेच्या आणि द्वेषाच्या राजकारणाला भीक घालत नसून विकासात्मक ध्येयधोरणांवर चालणार्‍या भाजपविषयी त्यांच्या मनात चांगली भावना निर्माण झाली आहे. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध असून कोकणाचा विकास करणे या उद्दिष्टांखाली आम्ही काम करत आहोत आणि भविष्यातही करत राहू.
- नितेश राणे, आमदार, भाजप



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.