गांधी जिंकले, गांधी हरले...

    09-Dec-2022   
Total Views |
MODI



गुजरात निवडणुकीत एक गांधी जिंकले आणि दुसरे गांधी हरले. महात्मा गांधी जिंकले आणि राहुल गांधी हरले. गुजरात निवडणुकीचा विषय गांधी विरूद्ध गांधी असा नव्हता, मग गांधी जिंकले आणि गांधी हरले हे कसे काय? म्हणून प्रथम आपण महात्मा गांधी थोडे समजून घेऊया.


प्रत्येक राज्याचा एक चेहरा असतो. महाराष्ट्राचा चेहरा छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तसा गुजरातचा चेहरा महात्मा गांधी आणि सरदार वल्लभाई पटेल आहेत. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांना जातीय राजकारणाचा विषय करण्यात आलेला आहे. ‘शरद पवार झिंदाबाद!’ ‘महाराज मराठ्यांचे आणि महाराज ब्राह्मणविरोधक’ अशी त्यांची प्रतिमा व्होटबँक निर्माण करण्यासाठी करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा ‘शरद पवार झिंदाबाद!’

सुदैवाने महात्मा गांधी यांची जात काढणारा आणि सरदार वल्लभई पटेल यांची जात काढणारा एखादा ‘शरद’ गुजरातेत जन्मलेला नसल्यामुळे महात्मा गांधी आणि सरदार वल्लभाई पटेल हे जातींच्या पलीकडे गेलेेेले थोर राष्ट्रीय नेते झालेले आहेत. गांधींच्या विचाराला ‘गांधीवाद’ म्हणतात. या गांधीवादाचा एक घटक म्हणजे मुसलमानांचे टोकाचे तुष्टीकरण. गुजरातच्या जनतेने हा गांधीवाद स्वीकारलेला नाही. आताच्या निवडणुकीत 230 मुसलमान उमेदवार होते, त्यातील फक्त एक उमेदवार निवडून आला आहे. गांधीवादाचा दुसरा विषय गरिबीत राहा, खेड्यात राहा, जन्मजात कर्मे करा, अत्यंत साधे राहा, हा आहे. गुजरातची जनता उद्यमी आहे. कर्मशील आहे, गरिबीत राहणे तिला आवडत नाही. खेड्यात श्रीमंती निर्माण होत नाही. ती शहरात निर्माण होते. म्हणून गुजरातच्या जनतेने शहरांचा विकास केला.

हे दोन विषय सोडले तर आणखी एक गांधी उरतात आणि हे गांधी शेवटच्या पंगतीतील शेवटच्या माणसाचा आईच्या ममतेने विचार करणारे गांधी आहेत. प्रत्येक गरिबाला महात्मा गांधी हे नेहमीच आपल्या अत्यंत जवळचे वाटत आलेले आहेत. परमेश्वरानंतर आपला विचार करणारा व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी. महात्मा गांधीजींची सेवाकार्ये, चरखा, खादी, मीठ, जैविक शेती, कौशल्य विकास, श्रमाधारित जीवन, अशा सर्व संकल्पना शाश्वत आणि चिरंतन सत्यात मोडणार्‍या आहेत. मुस्लीम तुष्टीकरण हा तात्कालिक विषय होता आणि यंत्रसंस्कृतीला विरोध हा कालचक्र उलटे फिरविणारा विषय होता. हे दोन्ही विषय आता संपले आहेत आणि फक्त शाश्वत गांधी आता उरले आहेत.

या शाश्वत गांधीजींच्या विचारांना राजसत्तेच्या कार्यक्रमात, लोककल्याणाच्या योजनांत, नरेंद्र मोदी यांनी बसविले. शाश्वत गांधी त्यांनी शासकीय धोरणाच्या आणि प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे काम केले. गांधीजींनी खादीचा आग्रह धरला. कारण, प्रत्येकाला वस्त्र लागतात, ती जर स्वदेशी घेतली तर आपल्या लोकांना काम मिळेल आणि पैसा मिळेल. नरेंद्र मोदी यांनी अनेकवेळा सांगितले की, खादीची वस्त्रे घ्या. काहीना काही तरी घ्या, टॉवेल घ्या, रूमाल घ्या आणि लोकांनी त्याचे आचरण सुरू केले आहे. गांधीजी स्वच्छेतेचे भोक्ते होते. नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ हे अभियान चालवून ‘हर घर शौचालय’ हे करून दाखविले. गांधीजींनी शेतकर्‍यांच्या हक्कासाठी चंपारण्याचा लढा दिला. सरदार पटेल यांनी बारडोली सत्याग्रहाचा लढा दिला. दोन्ही लढे यशस्वी झाले. या शेतकर्‍याच्या खात्यात मधले सगळे दलाल डावलून आता पैसे जमा होतात. ‘शेतकरी सुखी तर देश सुखी’ हे गांधीजींचे धोरण होते, मोदींनी ते प्रत्यक्षात आणले.

साबरमतीच्या काठी महात्मा गांधीजींचा आश्रम आहे. जेव्हा या आश्रमाची स्थापना झाली तेव्हा साबरमती नदीत पाणी होते. नंतर ही नदी आटत गेली. नरेंद्र मोदी यांनी ‘नर्मदा परियोजना’ यशस्वी करून नर्मदेचे पाणी साबरमतीत आणले. आता ही वाहती नदी आपण पाहू शकतो. महात्मा गांधीजींनी साबरमतीच्या आश्रमात एक अस्पृश्य जोडपे ठेवले होते. लोकांनी त्याचा विरोध केला. आश्रमाला देणग्या देणे बंद केले. परंतु, महात्मा गांधीजी आपल्या निर्णयावर ठाम राहिले. एके दिवशी अचानकपणे एक धनिक माणूस आश्रमात आला. त्याने आश्रम पाहिला आणि फार मोठ्या रकमेची देणगी देऊन तो गेला.

‘अस्पृश्यता हा आपल्या धर्मावरील कंलक आहे,’ असे गांधीजी म्हणत असत. आज अस्पृश्यता सार्वजनिकरित्या कुणी पाळत नाही. आजचा विषय त्यांना सन्मान आणि राष्ट्रजीवनात महत्त्वाचे स्थान देण्याचा आहे. नरेंद्र मोदी ते करतात. रामनाथ कोविंद भारताचे राष्ट्रपती झाले. महात्मा गांधी यांनी स्त्री-पुरूष असा भेद केला नाही. नारीशक्ती याबाबत ते फार जागरूक होते आणि स्त्रियांच्या कल्याणासाठी त्यांनी खूप काही केले. त्यांच्याच प्रेरणेने ठक्कर बाप्पा यांनी वनवासी क्षेत्रात काम सुरू केले. रविशंकर महाराज यांनी गुन्हेगार जातीजमातीत काम सुरू केले. नरेंद्र मोदी यांनी वनवासी क्षेत्रातील एक महिला द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती केले आहे.

नावात गांधी असून काय उपयोग, गांधी जीवनात यावा लागतो. कोट्यवधी रुपयांची कंटेनर यात्रा हा काही गांधीविचार नव्हे. गांधी म्हणजे हातात काठी, अंगावर पंचा, पायात साध्या चपला, असे गांधी दांडयात्रेला निघाले होते आणि या यात्रेने सर्व देश थरारित झाला. नेहरू-गांधी घराणे महात्मा गांधीजींचे नाव अनेकवेळा घेते. राज्यसत्ता असताना त्यांनी महात्मा गांधी हा वार्षिक भाषणाचा आणि चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध वाचण्याचा विषय केला. महात्मा गांधीजींनी जे सांगितले त्याच्या 100 टक्के विरोधी आर्थिक धोरणे आखली. महात्मा गांधीजींनी स्वदेशीचा आग्रह धरला. आमच्या पिढीला नेहरू-गांधी घराण्याच्या काळात अमेरिकन गव्हाच्या चपात्या खाव्या लागल्या.

 बाजारातून अनेकवेळा तांदूळ गायब होत असे. महात्मा गांधीजींनी सांगितले की, “मी तुम्हाला एक तावीत देतो, त्याप्रमाणे तुम्ही आपली कोणतीही योजना आखताना या योजनेचा शेवटच्या पंगतीतील शेवटच्या माणसाला काही लाभ होणार आहे का, हा विचार करा, तो होणार असेल तर योजना राबवा, नाहीतर सोडून द्या.” समाजवादी समाजरचनेच्या आर्थिक काळात गरीब अधिक गरीब झाला, श्रीमंत अधिक श्रीमंत झाला. शेवटच्या पंगतीतील माणूस उघडा-नागडा पडला.

नरेंद्र मोदी आणि भाजपा स्वत:ला कधीच गांधीवादी मानत नाहीत, पण ते गांधीजींना नाकारतदेखील नाहीत. शाश्वत गांधीजी त्यांना आपले वाटतात. भारतीय जीवनमूल्ये आदर्शवत जीवन जगणारे महात्मा गांधी होते. अनुसरण त्यांच्या जीवनमूल्यांचे करावे लागते. 2012 पासून आपल्या देशात गुजरातच्या विकासाच्या मॉडेलची चर्चा सुरू झाली. ‘गुजरात विकास मॉडेल’ (आ गुजरात मैं बनवाऊ छे) असे शब्द वापरले गेले. आज अनेक राज्ये त्याचे या-ना-त्या प्रकारे अनुसरण करतात. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी शासनाने त्याचे अनुसरण करण्याऐवजी वसुली सरकारचे मॉडेल उभे केले. त्यामुळे ते आता घरी बसले आहेत. गुजरातच्या जनतेने ‘गुजरात मी घडविला आहे’ हे वाक्य या निवडणुकीत प्रत्यक्ष आणून दाखविले.

केजरीवाल यांनी अनेक गोष्टी फुकट देण्याच्या घोषणा केल्या. त्यांच्या हे लक्षात आले नाही की, गुजराती माणूस फुकटखाऊ नाही. कष्टाची भाकरी खाणारा आहे. गुजरात म्हणजे दिल्ली नव्हे. आज ना उद्या दिल्लीच्या माणसालाही लक्षात येईल की, केजरीवालांनी फेकलेल्या तुकड्यांवर जगण्यात पुरूषार्थ नाही आणि म्हणून तेदेखील पुरूषार्थी सरकार तेथे आणतील.राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांची नक्कल करत ‘भारत जोडो’ यात्रा काढली. तिचा उद्देश काँग्रेसचे पुनरूज्जीवन करण्याचा आहे, काँग्रेसचा जनाधार वाढविण्याचा आहे. उद्देश चांगला आहे. परंतु, त्याचे प्रतिबिंब या निवडणुकीत काही पडले नाही.


 हिमाचल प्रदेशात काँग्रेसला विजय मिळालेला आहे. म्हटले तर तो फसवा विजय आहे. काँग्रेस आणि भाजप यांच्या मतात चार-पाच टक्क्यांचे अंतर आहे. भाजपच्या बंडखोरांची मते त्यात मिळविली, तर ती काँग्रेसपेक्षा जास्त होतात. आकड्यांच्या गणितात काँग्रेस जिंकली, पण लोकांनी स्वीकरण्याच्या गणितात काँग्रेस खूप मागे आहे. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपा जिंकली. म्हणजे काय झाले, तर शाश्वत गांधी यांच्या शाश्वत विचारांचा विजय झालेला आहे. राहुल गांधी आणि त्यांची काँग्रेस गुजरातेत अपयशी ठरली आणि हिमाचल प्रदेशातील यश हे भासमान यश आहे. याचे कारण काँग्रेसने शाश्वत गांधीना सोडलेले आहे. असा हा गांधी विरूद्ध गांधींचा संग्राम आहे.







आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.