साम्राज्यवादी, अराजकवादी अभिजात साहित्य

Total Views |
 
literature
 
 
 
इंग्रजांच्या मनात शेक्सपिअरला जे स्थान आहे, तेच रशियनांच्या मनात पुश्किनला आहे. साम्यवाद्यांनाही पुश्किन मान्य होता. कारण, झारशाहीमध्ये पिचून निघाणार्‍या गोरगरीब कष्टकरी रशियन समाजाचं मर्मभेदक चित्रण पुश्किन करतो. पण, आता येरमोलेन्कोने पुश्किनवर साम्रज्यवादी म्हणून हल्ला चढवला आहे.
 
 
'व्यक्ती आणि वल्ली’ हे पु.ल.देशपांड्याचं पुस्तक गेली 60 वर्षे वाजत-गाजत राहिलेलं आहे. खरोखर पाहिलेल्या, अनुभवलेल्या अनेक व्यक्तींचं एकत्रीकरण करून त्यात आपल्या कल्पनांचे रंग मिसळून पुलंनी यातलं प्रत्येक व्यक्तिचित्र घडवलेलं आहे, म्हणून त्यांनी स्वत:च प्रस्तावनेत म्हटलंय की, यातल्या व्यक्ती मला प्रत्यक्षात भेटलेल्या आहेतही आणि नाहीतही.
 
 
ब. मो. पुरंदर्‍याचं असंच एक व्यक्तिचित्राचं पुस्तक आहे. त्याचं नाव आहे - ‘पुरंदर्‍यांचा सरकारवाडा.’ एक किंवा अनेक व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वांचं मिश्रण करून बाबासाहेबांनी यातलं प्रत्येक व्यक्तिचित्र रेखाटलेलं आहे. त्यातली एक व्यक्ती आहे भास्करबुवा.सासवडच्या सरदार पुरंदर्‍यांच्या इतिहासप्रसिद्ध वाड्यावर देवपूजा करणारे एक साधे भटजी. घडतं असं की, पुण्याच्या शेतकी कॉलेजात प्राध्यापकी करणार्‍या रायासाहेब पुरंदरे यांचे काही मित्र सासवडला येतात. गप्पा मारताना मराठी साहित्याचा विशेषत: काव्याचा विषय निघतो. एक मित्र शेरा मारतो, मराठी काव्य म्हणजे फक्त धर्म नि अध्यात्म. नुसतं देव- देव करण्यापलीकडे मराठी कवींना काय समजतंय? नेमका हा शेरा ऐकायला भटजी भास्करबुवा तिथे पोहोचतात. मराठी कवी आणि कविता यांचा हा अपमान ऐकून ते खवळून उठतात.
 
 
...आणि मग पुढचा तास-दीड तास त्या माजघरात ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ, रामदास, वामन पंडित, मोरोपंत, शाहीर सगनभाऊ, शाहीर प्रभाकर अशा तमाम संत-पंत-तंत कवींची काव्यसरिता दुथडी भरून वाहत राहिली. भास्कर अस्स्खलितपणे बोलत राहिला. मराठी संत-पंत-तंत कवींच्या साहित्यात त्या भरजरी पैठण्या-शालू- शेले याचं सौंदर्यं उलगडून सांगत राहिला.पुणेकर प्राध्यापक मंडळी थक्क होऊन ऐकत राहिली.
 
 
या सगळ्या 1940च्या दशकातल्या गोष्टी आहेत. प्रत्यक्षात 1942 सालानंतर मराठी साहित्यात नवकथा, नवकविता यांची एक मोठी लाट आली. या नवसाहित्यिकांवर पाश्चिमात्त्य साहित्याचा मोठा प्रभाव होता.झालं होतं असं की, धर्माचा प्रभाव आणि साम्राज्यशाहीचा प्रभाव या दोघांनाही नाकारणारी, किंबहुना त्यांना उलथून पाडण्यात यशस्वी झालेली सोव्हिएत समाजव्यवस्था देशोदेशींच्या साहित्यिकांना अत्यंत आकर्षक वाटत होती. सोव्हिएत सत्ताधार्‍यांनी राजे -राण्यांची कत्तल केली होती नि चर्चेस बुलडोझर फिरवून जमीनदोस्त केली होती. आपलं राज्य हे शोषित-पीडित-वंचित -कष्टकरी-श्रमिक अशा सर्वसामान्य जनतेचं राज्य असून इथे कुणीही लहान-मोठं नाही सर्व समान आहेत, असा जगाचा समज करून देण्यात सोव्हिएत राज्यकर्त्यांनी भरघोस यश मिळवलं होतं. शिवाय हिटलरचा वंशवादी साम्राज्यवादही सोव्हिएत रशियाने रोखून पराभूत केला होता.
 
 
या यशाची एक झिंग पाश्चिमात्त्य नवसाहित्यिकांना आली होती. त्यामुळे चर्च, बायबल, धार्मिक समजुती, साम्राज्यवाद, लष्करवाद, वंशवाद, युद्ध अशा सर्वच गोष्टींना नाकारत समाजवाद, साम्यवाद, लोकशाही, शांततामय सहजीवन, यंत्रयुग, विज्ञान, तंत्रज्ञान अशा नव्या संकल्पनांच्या आधारे साहित्यनिर्मिती करणं, असा एक ‘ट्रेंड’ तिकडे सुरू झाला.
 
 
आपल्याकडे अशी स्थिती नव्हती, पोप आणि चर्च ही संस्था यांनी पश्चिमेत जसा धुमाकूळ घातला होता, तशी स्थिती आपल्याकडे कधीच नव्हती. शिवाय अव्वल इंग्रजी कालखंडापासून आपल्याकडे ज्या समाजप्रबोधानच्या चळवळी झाल्या, त्यामुळे धर्माची जाचक बंधनं खूपच शिथिल झालेलीच होती. इंग्रजी साम्राज्यवादाविरुद्ध आपला लढा होताच. पण, त्यात आपल्याला मिळालेला विषय हा शांततावाद्यांच्या अहिंसक आंदोलनामुळे नसून इंग्रजी साम्राज्याकडे माणूस बळ न उरल्यामुळे मिळालेला होता, हे आपल्या समाजाला कळलंच नाही किंवा कळलं तर वळलं नाही. त्यामुळे आपल्या नवसाहित्यिकांनी आपल्या देशाच्या उज्ज्वल, धार्मिक आणि राजकीय परंपरा नाकारल्या. बरचसं नवसाहित्य हे इंग्रजी गुलामगिरीमुळे आणि स्वातंत्र्योत्तर काळातल्या आदर्शच नसल्यामुळे भरकटलेल्या भ्रष्ट झालेल्या, सडलेल्या, किडलेल्या, यंत्रयुगाच्या वेगाशी जुळवून घेऊ न शकलेल्या समजाचं चित्रण आहे. नवकथाकार सरळच सांगतात की,एखाद्या उकिरड्यावर सुंदर यथावास्तव शब्दचित्रण करण्यातूनसुद्धा सौंदर्यबोध होऊ शकतो.
 
 
इथपर्यंतही ठीक आहे. पण, नवसाहित्याने नव्याच्या हव्यासाने जुन्याला आणि त्यातही हिंदू समाजाच्या सगळ्या साहित्याला ‘कलोनियल’, ‘शौव्हेनिस्टिक’, ‘मिस्टिक’, ‘रिव्हायव्हलिस्ट’ अशा शेलक्या साम्यवादी शिव्या हासडून बाद ठरवून टाकलं. या सगळ्या शब्दांचा मुख्य भाव एकच- ‘तुम्ही जुनाट, मागास आणि प्रतिगामी आहात.’ नुकतचं स्वातंत्र्य मिळालेल्या बिचार्‍या हिंदू समाजाला यावर कसं ‘रिअ‍ॅक्ट’ व्हावं, तेच समजेना. ज्यांना समजत होतं, त्यांची तशी प्रतिक्रिया व्यक्त करण्याची हिंमत झाली नाही. कारण, एकंदर समाजावर, माध्यमांद्वारे या डाव्यांचा प्रचंड प्रभाव होता. आजही आहेच.
 
 
आता ज्या सोव्हिएत रशियाने हे सगळं घडवून आणलं, त्यांचं काय झालं? सोव्हिएत समाजव्यवस्था अपशयी ठरली, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या डबघाईला आली आणि अखेर कोसळून पडली. सोव्हिएत संघाचे मांडलिक देश स्वतंत्र झाले. या घालमेलीतून प्रत्यक्षात राजा नसलेला पण हळूहळू राजासारखाच सर्वासत्ताधीश बनलेला पुतीन नावाचा नेता निर्माण झाला. त्याने पुन्हा आपल्या जुन्या साम्राज्यातल्या देशांवर जबर बसवायला सुरुवात केली. फेबु्रवारी 2022 मध्ये त्याने एकेकाळी आपला मांडलिक असणार्‍या उक्रेन (युक्रेन नव्हे) देशावर सैनिकी आक्रमण केलं ते असून चालूच आहे. उक्रेनचे चार प्रांत त्याने रितसर रशियाला जोडून घेतले आहेत. प्रत्यक्ष रणांगणात उक्रेनी सेना रशियन सैन्याला निकाराने प्रतिकार करीत आहेत, असं पाश्चिमात्त्य माध्यमं म्हणत आहेत. पण, आता उक्रेनी बुद्धिमंत रशियाविरोधात लेख वगैरे लिहू लागले आहेत. सोव्हिएत रशियन प्रचार खात्याच्याच तालमीत तयार झाल्यामुळे हे उक्रेनियन बुद्धिमंत अगदी तशाच भाषेत बोलत आहेत. म्हणजे काय? आपल्याकडचं उदाहरण घेऊन सांगतो. रामायण-महाभारत हे अत्यंत फालतू पलायनवादी साहित्य आहे, असं म्हणताना मार्क्सवादी विचारवंत कशी भाषा वापरतात पाहा- रामायण-महाभारत ही कसली आलेत महाकाव्यं? आणि कसला आलाय त्यात इतिहास? गुराखी पोरं गुरांना चरायला सोडल्यावर वेळ घालवण्यासाठी एकमेकांना काल्पनिक गोष्टी सांगून एकमेकांचे मनोरंजन करीत असत त्या गोष्टी म्हणजेच ‘रामायण, महाभारत.’
 
 
बौद्धिक घमेंडीने ओतप्रोत भरलेल्या या चार वाक्यात भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहास, संस्कृती, परंपरा आणि श्रद्धा यांची कशी सुंदर वासलात लावलीय ना! बोलणारे लबाड आणि ऐकून विश्वास ठेवणारे भोट! तर आता उक्रेनी बुद्धिमंत म्हणतायत, पुतीनने आमच्यावर आक्रमण केलंय यात आश्चर्य नाही. अभिजात रशियन साहित्यच मुळी अशा गोष्टींना प्रेरणा देणारं आहे. ती पाहा ओक्सना झाबुझको नामक उक्रेनियन विदुषी. ती म्हणजे गेली 100-150 वर्ष पश्चिमी साहित्य सृष्टी रशियन साहित्याला डोक्यावर घेऊन नाचलेय. तो अलेक्झांडर पुश्किन, तो लिओ टॉलस्टॉय, तो फ्योदोर दोस्तोव्हस्की यांना महान साहित्यिक म्हणून पश्चिमेने जगासमोर आणलं. अगदी सामान्यांतल्या सामान्य माणसाच्या जीवनाचं चित्रण करणार्‍या त्यांच्या कलाकृती, साम्राज्यवाद, वंशवाद, सैनिकशाही, भांडवलवाद यांच्या दडपशाहीखाली पिचून निघणार्‍या सामान्य माणसाच्या भावविश्वाचे असंख्य सोलीव पापुद्रे त्यांनी अतिशय कलात्मकरीतीने जगासमोर मांडले. पण, माझं म्हणणं असं आहे की, हे सगळे रशियन लेखक पक्के साम्राज्यवादी होते. आजच्या पुतीनच्या आक्रमणाचा मूळ आधार त्यांची पुस्तक हाच आहे.
 
 
वोलोदिमीर येरमोलेन्को हा एक उक्रेनियन तत्वचिंतक आहे. तो म्हणतो, ‘तुम्ही ज्याला अभिजात रशियन साहित्य म्हणून मारे नावाजता, ते सगळं साहित्य साम्राज्यवादी मनोवृत्तीने भरलेलं आणि क्रौर्याला उत्तेजन देणारं आहे.’ अलेक्झांडर पुश्किन हा रशियन साहित्यिक त्यांच्या हयातीत आणि आजही रशियन जनतेचा जीव की प्राण होत आहे. 1799 ते 1837 हा त्याचा काळ. फक्त 38 वर्षांच्या आयुष्यात त्याने कविता, नाटकं, लघुकथा प्रवासवर्णन आणि परीकथा अशा काही चमकदार लिहिल्या की, रशियन जनता त्याला आपलं सर्वस्व मानते. इंग्रजांच्या मनात शेक्सपिअरला जे स्थान आहे, तेच रशियनांच्या मनात पुश्किनला आहे. साम्यवाद्यांनाही पुश्किन मान्य होता. कारण, झारशाहीमध्ये पिचून निघाणार्‍या गोरगरीब कष्टकरी रशियन समाजाचं मर्मभेदक चित्रण पुश्किन करतो.
 
 
पण, आता येरमोलेन्कोने पुश्किनवर साम्रज्यवादी म्हणून हल्ला चढवला आहे. कारण, गोरगरिबांवर दडपशाही करणार्‍या झार निकोलस पहिला याच्यावर कडाडून हल्ला करणारा पुश्किन दुसर्‍या बाजूला त्याच झारची नि त्याच्या शक्तिमान लष्कराची स्तुतीही करताना दिसतो. 1830-31 मध्ये पोलंडने झारविरुद्ध साम्राज्यवादी, अराजकवादी अभिजात साहित्य बंड केलं. झारने ते कठोरपणे मोडून काढलं. नंतर कॉकेशल पर्वतीय परिसरातील अनेक छोटी-छोटी राज्यं झारने बलाचा प्रयोग करून आपल्या अमलाखाली आणली. पुश्किनला हा रशियन समाजाचा विजय वाटतो. रशियाच्या तळपत्या तलवारीने मध्य आशियातल्या अऩेक लोकसमूहांना जिंकून घेतलं. याबद्दल पुश्किन आनंदाने विजयगीतं रचतो. येरमोलेन्कोच्या मते, पुतीन यांच्या आपल्या आक्रमक साम्राज्यवादामागे पुश्किन सारख्यांच्या साहित्याचीच प्रेरणा आहे.
 
 
फ्योदोर दोस्तोव्हस्की म्हणजे तर जगभरचा नवसाहित्यिकांचा साम्यवाद्यांचा प्राणप्रिय लेखक. त्याच्या 16 कादंबर्‍या, 17 लघुकथा आणि पाच भाषांतरित साहित्यकृती नवकथालेखक रोज भक्तिभावाने वाचत असत. पण, आता उक्रेनियन विचारवंत त्यास दोस्तोव्हस्कीला ‘शौव्हेनिस्ट’ म्हणजे अराजकवादी अशी अगदी ठेवणीतली साम्यवादी शिवी देत आहेत. का? तर म्हणे 1880-81 साली झारने मध्य आशियातील तुर्कमेनिस्तानतच्या अनेक जहागिर्‍या जिंकून घेताना ज्या बेछूट कत्तली केल्या, त्यांचा दोस्तोव्हस्की ‘रशियन साम्राज्याचा विजय’ म्हणून गौरव करतो. त्याचप्रमाणे दोस्तोव्हस्की हा कट्टर ग्रीक ऑर्थोडॉक्स पंथीय ख्रिश्चन होता. त्यामुळे त्याच्या कथा- कादंबर्‍यांतल्या पात्रांच्या तोंडून तो कॅथलिक ख्रिश्चन आणि ज्यू यांच्यावर टीका करतो. त्यांना हीन लेखतो. उक्रेनियन विचारवंतांच्या मते पुतीन आज जे बोलतायत आणि वागतायत त्याच्या मुळाशी हीच मनोवृत्ती आहे.
 
 
ही अगदी खास डावी मांडणी आहे. जी गोष्ट तुम्हाला अनुकूल असेल ती पुरोगामी, प्रागतिक, आधुनिक आणि जी गोष्ट तुम्हाला प्रतिकूल असेल ती प्रतिगामी, बुरसटलेली, मागास, साम्राज्यवादी.आपल्याला रशिया आणि उक्रेन दोघांचीही काळजी करण्याची गरज नाही. कारण, ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी असल्यामुळे ते एकमेकांचं बघून घेतील. आपण आपली काळजी करूया. ज्या मुसलमानांनी गेली एक हजार वर्षं भारतात धुमाकूळ घातला, त्यांच्याबद्दल कुणी ‘ब्र’ काढलं, तर ती का माणसं नाहीत? त्यांना का मनं नाहीत? असा ‘गोड गोड गोष्टी’ छाप भावनिक आक्रोश करून हिंदू समाजाला भावनिक ‘ब्लॅकमेल’ करायचं आणि हिंदू समाजाने फक्त तीन मंदिर द्या, अशी मागणी केली, तर हिंदूंवर प्रतिगामी, ‘शौव्हेनिस्ट’, ‘रिव्हायव्हलिस्ट’ म्हणून तुटून पडायचं ही ढोेंगं आता आपणच बंद पाडायला हवीत. त्यासाठी रामायण, महाभारताबरोबरच चाणक्यही पुनःपुन्हा वाचायला हवा.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.