विश्वनाथ - रामेश्वराचा ‘बंध’

    22-Dec-2022   
Total Views |
modi



काशी-तामिळ संगमाद्वारे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व या मुद्द्यास पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणण्यास भाजपला यश आले आहे. कारण, या संगमाचे केंद्रस्थान होते ते काशिविश्वनाथ आणि रामेश्वर ज्योतिर्लिंग. याद्वारे कथित द्रविड थियरीसदेखील थेट आव्हान देण्यात आले आहे.


काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी २०२२च्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेस तडा देणारे भाषण केले होते. त्यामध्ये त्यांनी भारत हे राष्ट्रच नसल्याचा धक्कादायक दावा केला होता. त्याचप्रमाणे दक्षिण भारत हा उत्तर भारतापेक्षा पूर्णपणे वेगळा असल्याचे सांगून त्यांनी दक्षिण भारतातील फुटीरतावादी प्रवृत्तींना पाठिंबा व्यक्त केला होता. त्या भाषणामध्ये राहुल गांधी यांनी भारतामध्ये सर्व राज्यांना समान अधिकार असून त्यांच्यावर केंद्रीय पद्धतीने म्हणजेच केंद्र सरकारला राज्य करता येणार नाही, त्यांचा आवाज दाबता येणार नाही. त्यांची स्वतंत्र संस्कृती, इतिहास, परंपरा यावर केंद्रीय पद्धतीने दडपण आणता येणार नाही आणि तसा विद्यमान केंद्र सरकारचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, असा दावा केला होता.



त्याचप्रमाणे तुम्हाला (विद्यमान केंद्र सरकार) राज्यांवर राजाप्रमाणे राज्य करता येणार नाही. तुम्ही तामिळनाडू आणि केरळवर कधीही राज्य करू शकत नाही, तामिळनाडूवर ‘नीट’ लादू शकत नाही, पंजाबवर कृषी कायदे तुम्ही लादू शकत नाहीत, काश्मीरमध्ये तुम्ही तुमचा अजेंडा रेटू शकत नाहीत, असे म्हटले होते. आता राहुल यांचे हे वक्तव्यही निव्वळ राजकारणातून केलेले वाटू शकेल. मात्र, त्यामध्ये प्रादेशिक अस्मितांना फुंकर घालून त्यांचा वापर आपल्या राजकीय अजेंड्यासाठी करण्याचा जुना खेळ राहुल गांधी यांना पुन्हा खेळायचा असल्याचे त्याद्वारे स्पष्टपणे दिसले होते. त्यातही तामिळनाडूचा त्यांनी विशेष उल्लेख केला, याच तामिळनाडूमध्ये द्रविडस्तानची मागणी अधूनमधून डोके वर काढत असते; हा संदर्भ लक्षात घेतल्यास राहुल गांधी यांच्यात भाषणामागील नेमका मनसुबा लक्षात येतो.


संसदेमध्ये असे भाषण दिल्यानंतर अवघ्या पाच ते सहा महिन्यांनंतर लगेचच राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेस प्रारंभ केला होता. या यात्रेची सुरुवात त्यांनी दक्षिण भारतातून केली, यात्रेच्या प्रारंभीच त्यांनी एका ख्रिश्चन धर्मगुरूची भेट घेऊन त्यांच्यासोबत धार्मिक चर्चा केल्याचा दावा केला होता. मात्र, या ख्रिश्चन धर्मगुरूने केवळ येशू ख्रिस्त हाच देव असून, हिंदू देवी-देवता हे थोतांड असल्याचा दावा केला होता. तो पाद्री हे वक्तव्य करत असताना राहुल गांधी हे मान डोलावून जणू काही तो दावा मान्य करत असल्याचेही दिसले होते. त्यापूर्वी दक्षिण भारतातून कर्नाटक राज्यातून देशव्यापी ‘हिजाब’चा मुद्दा पेटविण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या छापेमारीतून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या शीर्षस्थ नेतृत्वास प्रामुख्याने दक्षिण भारतातूनच अटक करण्यात आली होती. तसेच, गेल्या काही वर्षांपासून तामिळनाडू राज्यात फुटीरतवादी आणि देशविघातक शक्ती पुन्हा डोके वर काढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा उत्तर विरूद्ध दक्षिण वादास खतपाणी घालण्याची काही घटकांची तयारी असल्याचे दिसून आले आहे.


मात्र, या वादास प्रत्युत्तर म्हणून केंद्र सरकारने आयोजित केलेल्या काशी-तमिळ संगमकडे पाहता येईल, ज्याचा गेल्या आठवड्यातच समारोप झाला. समारोप समारंभाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे संबोधन झाले. त्यांच्या भाषणाद्वारे भविष्यातील राजकारणाचे संकेत मिळतात. अमित शाह म्हणाले की, “स्वातंत्र्यानंतर देशाच्या सांस्कृतिक एकात्मतेमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न झाला. आता ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ निर्माण करण्याची वेळ आली आहे. भारताच्या सांस्कृतिक ऐक्यानेच हे शक्य आहे. यामध्ये काशी तमिळ संगमसारख्या कार्यक्रमांची भूमिका महत्त्वाची ठरते. देशाच्या संस्कृतींना जोडण्याचा प्रयत्न दीर्घकाळ झाला नाही. आता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी दक्षिणेतून आलेल्या आदी शंकराचार्यांनी उत्तर आणि दक्षिणेच्या दोन महान संस्कृती जोडण्याचा प्रयत्न केला होता, यानंतर असा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केल्याचाही दावा शाह यांनी यावेळी केला होता. एकीकडे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी तामिळनाडूतील कन्याकुमारी ते काश्मीर अशी ‘भारत जोडो’ यात्रा सुरू करत आहेत. त्याचवेळी भाजपने दक्षिण आणि उत्तर भारताला जोडण्यासाठी सांस्कृतिक एकतेचा नवा प्रयोग केला आहे.

 
काशी तमिळ संगम कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने काशी हिंदू विद्यापीठामध्ये केले होते. या कार्यक्रमाचा उद्देश वाराणसी आणि तामिळनाडू यांच्यातील ज्ञान, प्राचीन सभ्यता आणि संबंधांचे जुने नाते पुन्हा जीवंत करणे आणि सांस्कृतिक देवाणघेवाण सुरू करणे हा असल्याचे सांगण्यात आले. काशी तमिळ संगमच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक म्हणजे काशिविश्वनाथ तामिळनाडूतील रामेश्वरम ज्योतिर्लिंग यांच्यातील शतकानुशतकांचे नाते पुन्हा एकदा जोरकसपणे देशासमोर मांडणे, हेदेखील होते. महिनाभर चाललेल्या या संगमामध्ये सामाजिक, आर्थिक, कला, नाट्य, शास्त्र, संगीत, स्थापत्त्य या आणि अशा अनेक घटकांवर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये काशिविश्वनाथ मंदिरात खासदार इलयराजा यांनी सादर केलेली संगीतसेवा विशेष आकर्षण ठरली. या कार्यक्रमासाठी तामिळनाडूमधून सुमारे अडीच हजार लोक अधिकृतरित्या सहभागी झाले होते. त्यामध्ये विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक आणि उद्योजक अशा विविध स्तरातील लोकांचा समावेश होता. त्याशिवाय या कार्यक्रमाचे औचित्य साधून खास उत्तर प्रदेशात धार्मिक आणि पर्यटनासाठी आलेल्या तामिळ नागरिकांची संख्या दहा हजारांहून अधिक होती.


इतिहासकारांच्या मते चोल काळातील शिलालेखांमध्ये वाराणसीचा उल्लेख आढळतो. काशिविश्वनाथ आणि विशालाक्षी मंदिरे तामिळनाडूमध्ये अनेक ठिकाणी आढळतात. तमिळनाडूतही काशी नावाचे शहर आहे. त्याचवेळी काशीमध्ये मोठ्या संख्येने तामिळ लोक येतात आणि राहतात. अलीकडे काशिविश्वनाथ मंदिराच्या विश्वस्त मंडळामध्ये एका तामिळ सदस्याचाही प्रवेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे काशीहूनही मोठ्या संख्येने लोक रामेश्वराला जातात, अशी धार्मिक यात्रा दोन्ही राज्यांमध्ये प्राचीन काळापासून घडत आली आहे. १७व्या शतकात शैव कवी कुमारगुरुपार तामिळनाडूहून काशीला आले. येथे त्यांनी मठ बांधला. मठ बांधल्यानंतर ते पुन्हा परत तंजावरमध्ये परतले होते. मात्र, त्या मठास आजही वाराणसीमध्ये ‘काशीमठ’ या नावाने ओळखले जाते. त्याशिवाय वाराणसीतील हनुमान घाट परिसरात शेकडो वर्षांपूर्वी तामिळनाडूतून येऊन वाराणसीमध्ये स्थायिक झालेली जवळपास २०० तामिळ कुटुंबे राहतात.


उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूतील हा असा धार्मिक-सांस्कृतिक संबंध जोरकसपणे मांडण्याचे काम स्वातंत्र्यानंतर प्रथमच झाले आहे. याद्वारे दक्षिण आणि उत्तर भारतामध्ये असलेला स्वाभाविक असा धार्मिक-सांस्कृतिक बंध आता अधिक घट्ट होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे प्रामुख्याने तामिळनाडूतील द्रमुक-अद्रमुकद्वारे जीवंत ठेवण्यात आलेल्या भाषक वादावरही विराम लागण्याची सुरुवात याद्वारे होणार आहे. काशी तमिळ संगमचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व वादांना पूर्णविराम दिला. ते म्हणाले की, तमिळ भाषा ही जगातील प्राचीन भाषांपैकी एक आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. त्याच्या विकासासाठी काम केले पाहिजे. प्रत्येकाला त्याच्याबद्दल माहीत असले पाहिजे.


काशी-तामिळ संगमाद्वारे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व या मुद्द्यास पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणण्यास भाजपला यश आले आहे. कारण, या संगमाचे केंद्रस्थान होते ते काशिविश्वनाथ आणि रामेश्वर ज्योतिर्लिंग. याद्वारे कथित द्रविड थियरीसदेखील थेट आव्हान देण्यात आले आहे. कारण, तामिळनाडूमध्ये उत्तरेतील हिंदुत्व वेगळे आणि दक्षिणेतील हिंदुत्व वेगळे अशी काहीशी मांडणी करण्यात येते. देशातील पुरोगामी टोळकेदेखील त्यास खतपाणी घालत असते. मात्र, या संगमाद्वारे हा समज भिरकावून टाकण्यास प्रारंभ होणार आहे. कारण, संगमामध्ये सहभागी झालेले लोक आपला अनुभव तामिळनाडूनमध्ये जाऊन सांगतील. दोन्ही राज्यांमधील धार्मिक- आध्यात्मिक-सांस्कृतिक परंपरा कशा एकमेकांशी निगडीत आहेत, यावर काशीसह तामिळनाडूनध्येही चर्चा होईल. त्यामुळे कथित द्रविड थियरी आणि त्या थियरीच्या आड लपून देशविघातक अजेंडा रेटणार्‍यांच्या भूमिकेवरही विचार केला जाईल. त्यामुळे दीर्घकालीन विचार करता काशी-तामिळ संगग हा देशाच्या सामाजिक-राजकीय अवकाशासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे, यात कोणतीही शंका नाही.






आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.