‘ऑपरेशन त्रिशूल’ आणि ‘ऑपरेशन अजगर’

Total Views |
  
'Navy Day'
 
 
 
 
 
दरवर्षी 4 डिसेंबर हा दिवस ‘नौदल दिवस’ म्हणून साजरा केला जातो. तसेच डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा हा ‘नौदल सप्ताह’ म्हणून साजरा होतो. भारतीय नौदलातल्या कित्येक परंपरा हा ब्रिटिशांचा वारसा आहे. पण, ‘नौदल दिवस’ आणि ‘नौदल सप्ताह’ हे मात्र पूर्णपणे स्वतंत्र भारताच्या बहादुर नौसैनिकांच्या पराक्रमाशी निगडित आहेत. त्या शौर्यगाथेचा हा परिचय...
 
 
1971 सालच्या डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा. बांगलादेशच्या समस्येवरून भारत-पाकिस्तान युद्धाला तोंड फुटलेलं होतं. भारताच्या पूर्व आणि पश्चिम सीमांवर घनचक्कर लष्करी लढाया सुरू होत्या. भारतीय लष्कर पाकिस्तानी प्रदेशात पुढे घुसत होतं आणि हवाई दल त्याला संरक्षण व आक्रमण अशा दोन्ही रीतींनी हवाई छत्र पुरवित होतं.
 
 
त्याचवेळी भारतीय नौदल हा नवा भिडू रिंगणात उतरला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1947-48 साली पाकिस्तानने आणि 1962 साली चीनने भारतावर आक्रमण केलं. त्यावेळी झालेल्या लढाया जमिनीवरच्या होत्या. नौदलाचा तिथे संबंधच नव्हता. 1965 साली पाकिस्तानने भारतावर आक्रमण केलं, तेव्हा भारतीय नौदल नुसतं युद्धसज्ज नव्हे, तर युद्धोत्सुक होतं. पण, नेतृत्वाने नौदलाला फक्त संरक्षक गस्त घालण्याचंच काम दिलं.
 
 
आता मात्र नेतृत्वाने नौदलाला ‘आगे बढो’चा आदेश दिला. भारतीय नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल एस. एम. (सरदारीलाल मथरादास) नंदा यांच्या आदेशानुसार, आरमार कारवाई प्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल हिरानंदानी यांनी संपूर्ण योजना आखली.
 
 
दि. 4 डिसेंबर, 1971 या दिवशी सहा भारतीय युद्धनौकांचा एक गट कराचीपासून 250 सागरी मैल (460 किमी) अंतरावर येऊन थांबला. सिंध प्रांताची राजधानी कराची हे पाकिस्तानचं एकमेव बंदर होतं. पाकिस्तानचा संपूर्ण सागरी व्यापार कराचीमधूनच चालत असल्यामुळे नौदल आणि व्यापारी जहाज कंपन्या यांची मुख्यालयंही कराचीतच होती. शिवाय इराणी आखातामार्फत होणारा तेलसाठा कराची बंदरातच मोठमोठ्या टाक्यांमध्ये साठवून ठेवला जात होता. साहजिकच पाकिस्तानने कराची बंदराची संरक्षण व्यवस्थाही मजबूत करून ठेवलेली होती.
 
 
पण, हे सगळं लक्षात घेऊनच भारतीय नौदल सेना नायकांनी आपली योजना आखली होती. त्या योजनेचं सांकेतिक नाव होतं ‘ऑपरेशन ट्रायडेन्ट.’ ट्रायडेन्ट म्हणजेच त्रिशूल. भारतीय नौदलाची ‘आयएनएस नि:पात’, ‘आयएनएस निर्घात’ आणि ‘आयएनएस वीर’ ही तीन क्षेपणास्त्रधारी जहाजं कराचीवर हल्ला करायला निघाली. भारताचा त्रिशूल कराचीच्या रोखाने सुटला. त्रिशूलाच्या प्रत्येक पात्याची धार म्हणजे प्रत्येक जहाजावर ‘स्टाईक्स’ ही 40 सागरी मैल पल्ल्यापर्यंत मारा करणारी क्षेपणास्त्र होती. कराचीच्या दक्षिणेला 250 सागरी मैलांवर थांबून हा त्रिशूल अंधार पडण्याची वाट पाहू लागला. या तीन क्षेपणास्त्रधारी जहाजांना पाकिस्तानी पाणबुड्यांपासून संरक्षण देण्यासाठी ‘आयएनएस किलतान’ आणि ‘आयएनएस काटचाल’ ही दोन पाणबुडीरोधक जहाजं आणि या सगळ्यांनाच इंधन पुरवण्यासाठी ‘आयएनएस पोषक’ हे तेलवाहू टँकर जहाज असा हा सहा जहाजांचा गट होता. कराचीपासून 250 सागरी मैल दूर असल्यामुळे पाकिस्तानच्या शोधक रडार यंत्रणेपासूनही हा गट सुरक्षित होता.
 
 
दि. 4 डिसेंबर, 1971 हा दिवस मावळला. पसरत्या अंधारात कारवाई सुरू झाली. या कारवाईचे सूत्रधार कमांडर बभ्रुभान यादव हे स्वत ‘आयएनएस नि:पात’वरूनएकंदर कारवाईचं संचालन करीत होते.बभ्रुभान म्हणजे बभ्रुवाहन. महाभारतातला अर्जुनाचा, राजकन्या चित्रांगदेपासून झालेला पराक्रमी पुत्र वीर बभ्रुवाहन.
 
 
‘आयएनएस किलतान’ या पाणबुडीरोधक जहाजाला पुढे ठेवून ‘निःपात’, ‘निर्घात’ आणि ‘वीर’ या तिन्ही क्षेपणस्त्रधारी नौका कराचीच्या रोखाने सरकू लागल्या. कराचीपासून 70 सागरी मैल अंतरावर त्यांना पहिली शिकार दिसली. ‘पीएनएस खैबर.’ कराचीच्या संरक्षणासाठी गस्त घालणारीपाकिस्तानी विनाशिका ‘खैबर.’ ठीक रात्री 10.45 ला ‘आयएनएस निर्घात’ने ‘खैबर’च्या दिशेने पहिलं ‘स्टाईक्स’ क्षेपणास्त्रडागलं. कृतांत काळाप्रमाणे पाकड्यांना भारतीय विमान वाटलं आणि म्हणून त्यांनी त्यांच्यावर विमानविरोधी तोफा डागल्या. क्षेपणास्त्रविरूद्ध तोफगोळे म्हणजे तलवारीला नेलकटरने उत्तर देण्यासारखंच. पण, हे कळायला डोकं लागतं. नुसते गुडघे असून भागत नाही त्या क्षेपणास्त्राने ‘खैबर’चा पहिला बॉयलर खलास केला. ‘खैबर’चं चलनवलन आणि वीजपुरवठा थांबला, ते बुडालं मात्र नाही. आणखी चार मिनिटांनी म्हणजे 10.49 ला ‘निर्घात’वरून दुसरं क्षेपणास्त्र सुटलं. याही वेळी ‘खैबर’च्या मूर्खांनी त्याच्यावर तोफगोळे डागून ते पाडण्याचा प्रयत्न केला. त्या क्षेपणस्त्राने ‘खैबर’चा दुसरा बॉयलर अचूक टिपला. पुढच्या काही मिनिटांतच ‘खैबर’ बुडालं. भारताच्या वायव्येकडच्या हिंदुकुश पर्वतात खैबर खिंड आहे. याच खिंडीतून इस्लामी आक्रमक भारतावर तुटून पडले होते. तेच ‘खैबर’ हे नाव दिमाखाने मिरवणारी‘खैबर’ ही विनाशिका समुद्राच्या तळाशी पाठवून भारतीय नौदलाने मोठा काव्यात्म सूड साधला.
 
 
ठीक 11 वाजता ‘आयएनएस निःपात’लाआणखी दोन सावजं दिसली. ‘एम.व्ही.व्हीनस चॅलेंजर’ हे मालवाहू जहाज आणि त्याला संरक्षण देणारी पाकिस्तानी विनाशिका ‘पीएनएस शहाजहान.’ ‘निःपात’ने दोन्हीवरएकेक क्षेपणास्त्र डागलं. ‘व्हीनस चॅलेंजर’ वरचा माल म्हणजे दारुगोळा होता. अमेरिकेने व्हिएतनामच्या सायगाव बंदरातून पाठवलेली दारुगोळ्याची रसद घेऊन ते जहाज कराचीकडे येत होतं. क्षेपणास्त्राच्या मार्‍याने तो दारुगोळा धडाकून पेटला आणि ‘चॅलेंजर’ बुडालं. ‘शहाजहान’ बुडालं नाही, पण त्याची प्रहारक्षमता खलास झाली.
 
 
भारताचा त्रिशूल झपाट्याने पुढे निघाला तेवढ्यात ठीक 11.20 ला त्यांना आणखी एक शिकार दिसली ‘आयएनएस मुहाफीज.’ पाकिस्तानची सुरुंगशोधक नौका. ‘निघात’ आणि ‘नि:पात’नंतर आता ‘वीर’ची पाळी होती.‘आयएनएस वीर’ने ‘मुहाफीज’च्या रोखानेएक क्षेपणास्त्र सोडलं ते इतकं अचूक बसलं की ‘मुहाफीज’ काही मिनिटांत बुडून दिसेनाससुद्धा झालं. मुख्यालयाला धोक्याचा संदेश पाठवण्याइतकाही अवसर त्याला मिळाला नाही.
 
 
आता भारतीय युद्धनौका कराचीपासून फक्त 14 सागरी मैल अंतरावर येऊन उभ्या राहिल्या. कैमारी या ठिकाणच्या अवाढव्य तेल टाक्या त्यांच्या पूर्ण टप्प्यात आल्या. पुन्हा एकदा ‘आयएनएस नि:पात’वरून कमांडर बभ्रुभान यादवांनी दोन ‘स्टाईक्स’क्षेपणास्त्र डागली. त्यांनी आपले काम चोख बजावलं. पाकिस्तानी तेलसाठे धडाडून पेटले. ‘ऑपरेशन त्रिशूल’ अगदी शतप्रतिशत यशस्वी झालं. शिवाय भारतीय नौदलाची कसलीही हानी झाली नाही. स्वतःच्या रक्ताचा एक थेंबही न सांडता, पण शत्रूच्या गोटात मात्र विनाश आणि विध्वंस यांचा कहर माजवून भारतीय युद्धनौका सुखरूपपणे मुंबई बंदरात परतल्या.
यानंतर लगेच म्हणजे तीनच दिवसांनी दि. 8 डिसेंबर, 1971 रोजी ‘ऑपरेशन पायथॉन’ ही दुसरी कारवाई सुरू झाली. पायथॉन म्हणजे अजगर. अजगर आपल्या शत्रूला गिळून पचवून टाकतो. त्याचं नामोनिशाणच शिल्लक ठेवत नाही.
 
 
भारतीय नौदलाने दि. 6 डिसेंबर, 1971 पासून अनेक छोटे गट कराचीच्या रोखाने सोडले. पाकिस्तानी नौदल प्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल मुझफ्फर हसन आणि पाकिस्तानी वायूदल प्रमुख एअर मार्शल अब्दुल रहीम खान यांची धावपळ उडाली. कारण, नेमका कोणता गट पुढे सरकणार याचा त्यांना अंदाज येईना.
 
 
दि. 8 डिसेंबर, 1971चा सूर्य मावळला. ठीक 6 वाजता. भारतीय नौदलाची ‘आयएनएस विनाश’ ही क्षेपणास्त्रवाहू नौका पुढे सरकली. भारताच्या सर्वभक्षक अजगराचं हे तोंड होतं, तर त्याचा देह होता ‘आयएनएस तलवार’ आणि ‘आयएनएस त्रिशूल’ या फ्रिगेट जातीच्या युद्धनौका.
 
 
मार्‍याच्या टप्प्यात पोहोचल्यावर ‘विनाश’ने कैमारी तेलसाठ्याच्या उर्वरित टाक्यांवर एक क्षेपणास्त्र सोडलं. दाट अंधार पडला होता आणि समुद्र खवळला होता. तशातच पाकिस्तानी इंधनवाहू टँकर ‘पीएनएस डाक्का’, पनामा या देशाचा तेलवाहू टँकर ‘एसएस गल्फ स्टार’ आणि ब्रिटिश मालवाहू जहाज ‘एसएस हरमत्तन’ हे भारतीय नौदलाच्या मार्‍यात सापडले. ‘गल्फ स्टार’ आणि ‘हरमत्तन’बुडाली, तर ‘डाक्का’ जायबंदी झालं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कैमारी तेलसाठे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. ही आग एवढी भीषण होती की, ती नंतर बरेच दिवस बर्‍याच लांबूनही दिसत होती. पाक नौदलाचं साफ कंबरडंच मोडलं. भारतीय नौदलाने, आपण कोणत्याही आंतराष्ट्रीय दर्जाच्या नौदलाइतकेच कुशल योद्धे आहोत, याचा झणझणीत प्रत्यय दिला.
तेव्हापासून भारतीय नौदल डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा ‘नौदल सप्ताह’ म्हणून व 4 डिसेंबर हा दिवस ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करतात.
 
 
या पराक्रमासाठी व्हाईस अ‍ॅडमिरलगुलाब मोहनलाल हिरानंदानी यांना नौसेना पदक, कमांडर बभ्रुभान यादव यांना महावीरचक्र, तर लेफ्टनंट कमांडर बहादुर नरिमन कवीना लेफ्ट कमांडर इंद्रजित शर्मा, लेफ्ट. कमां. ओमप्रकाश मेहता आणि मास्टर चीफ एम. एन. संगल यांना वीरचक्र प्रदान करण्यात आले.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.