पुरोगामींच्या खांद्यावर उद्धवसेना!

    04-Nov-2022   
Total Views |
 
उद्धव ठाकरे
 
 
 
 
‘आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक आणि हिंदुत्ववावादी’ असे वारंवार सांगून सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार्‍या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची वाटचाल खर्‍या अर्थाने मात्र उलट्या दिशेनेच सुरू आहे. हिंदुत्ववाच्या नावाने बोटे मोडणार्‍या आणि बाळासाहेबांना विरोध करणार्‍या मंडळींना मानाचे पान ठाकरे वाढत असल्याचे कित्येक प्रसंगांतून दिसून आले. मग त्या हिंदुत्वद्वेष्ट्या सुषमा अंधारे असोत किंवा आता येत्या काळात होऊ घातलेल्या युतीतील भागीदार प्रकाश आंबेडकर!
 
 
 
हिंदुत्ववावादाला प्रखर विरोध करणारी ही मंडळी उद्धव ठाकरेंना आता एकाएकी आपलीशी का वाटू लागली? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेस सोबत महाविकास आघाडीचं कडबोळं केल्यानंतर ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेत मोठा बदल दिसून आला. त्याची उदाहरणं सुद्धा सातत्याने समोर आलेली आहेत. मग ते गणपती आणि इतर हिंदू सणांवर लादण्यात आलेल्या जाचक अटी असोत किंवा दुसर्‍या बाजूला ईद आणि अन्य सणांना देण्यात आलेली मोकळीक असो.
 
 
 
कधी कुठल्या कॅलेंडरवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख ‘जनाब बाळासाहेब’ म्हणून करण्यात आला, तर कधी ‘आयटीआय’च्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर अचानकपणे उर्दू भाषा भवन बांधण्याची कल्पना असो. या सगळ्या प्रातिनिधिक बाबींमधून हिंदूविरोधी कृती आणि हिंदूविरोधी चेहर्‍यांवर उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे वाढणारे प्रेम ठळकपणे समोर आले. हिंदू सणांवर लादलेल्या निर्बंधांमुळे आणि त्याच वेळी इतर सणांना दिलेल्या मोकळीकीमुळे ठाकरेंवरील रोष वाढत होता आणि सरकार गेल्यानंतरही त्यांची ती विशिष्ट धर्मीयांना कुरवाळण्याची भूमिका काही केल्या जात नाही.
 
 
 
हिंदुत्वाची मशाल घेऊन मैदानात उतरून हिंदुत्व आणि महाराष्ट्राचे रक्षण करण्याच्या वल्गना करणार्‍या ठाकरेंची सेना खर्‍या अर्थाने हिंदू विरोधकांच्याच खांद्यावर आहे. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना असलेल्या शिंदे गटाचे आव्हान परतवून लावायचे असेल, तर खरा हिंदुत्ववाद आणि बाळासाहेबांच्या विचारांची धगधगती मशाल स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही, हे वास्तव. पण, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे हा पर्याय स्वीकारतील का, याचे उत्तर मिळणे देण्यासाठी कुठल्याही राजकीय पंडितांची गरज नाही.
 
 
युती औटघटकेची ठरू नये!
 
 
सत्ताबदलानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी वाट्टेल ते राजकीय प्रयोग करायला बिनदिक्कतपणे सामोरी जात आहे. एका जुन्या म्हणीनुसार साहस आणि मूर्खपणा यात एक पुसटशी रेषा असते. जाहीर सभांमध्ये आक्रमक भाषणे करणे आणि केलेल्या वक्तव्यांवर ठाम राहणे या बाळासाहेबांच्या वृत्तीला ‘साहसी’ म्हणून संबोधलं गेलं. पण, त्याच्या अगदी विपरित दिलेले शब्द न पाळणे, आपल्याच भूमिकांवरून मागे फिरणे आणि परिस्थितीचे भान न बाळगता कुणालाही अंगावर घेणे याला ‘मूर्खपणा’ म्हणण्याशिवाय दुसरा शब्दच नाही.
 
 
 
अशीच काहीशी स्थिती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची! सत्ता आणि पक्षावरील नियंत्रण हातातून गेल्यानंतर हातघाईला आलेले ठाकरे थेट प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन सोबत युती करायला निघाले आहेत. तिसरा पर्याय म्हणून ‘वंचित’चा प्रयोग करणार्‍या आंबेडकरांनी राजकारणातील अनेक भिडू जमा करून ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला होता. 2018 मध्ये ‘एमआयएम’ला ‘वंचित’मध्ये सहभागी करण्यासाठी ‘एमआयएम’ पक्षाचे आमदार इम्तियाज जलील यांनी ‘एमआयएम’चे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याशी चर्चा केली व ती सकारात्मक ठरली. त्यानंतर ओवेसी यांनी दि. 2 ऑक्टोबर, 2018 रोजीच्या औरंगाबादमधील वंचित बहुजन आघाडीच्या सभेमध्ये बहुजन वंचित आघाडीला साथ देण्याचे जाहीर केले आणि ‘एमआयएम’ पक्ष आघाडीमध्ये सहभागी झाला.
 
 
 
पण, 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तिकीटवाटपावरून त्यांच्यात मतभेत झाले आणि वंचितमधून ‘एमआयएम’ बाहेर पडली. वास्तविक महाराष्ट्रात ‘एमआयएम’चा वाढत प्रभाव पाहता जागावाटपात थोडी सबुरीची भूमिका घेणे अपेक्षित होते. पण, बाळासाहेब आंबेडकरांनी तसे केले नाही. त्यांच्या या भूमिकेमुळे ‘एमआयएम’ आणि वंचित वेगळे झाले.
 
 
 
आज ठाकरेसेना आणि प्रकाश आंबेडकर ‘शिवशक्ती-भीमशक्ती’च्या नावाखाली युतीसाठी पुढाकार घेत आहेत. पण, धरसोड वृत्तीचे ठाकरे आणि शिवसेनेचा फारसा मुलाहिजा न ठेवणारे प्रकाश आंबेडकर यांच्यात भविष्यात जरी यदाकदाचित युती झालीच तर ती कितपत टिकेल याबाबत साशंकताच आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.