हिंदू समाजाच्या इतिहास, वर्तमान, भविष्याचा वेध

Total Views |
 
हिंदू
 
 
 
 
‘हिंदू विश्वराष्ट्राचा इतिहास’ हा ग्रंथ पु. ना. ओक यांनी लिहून स्वत:च प्रकाशित केला. आता त्यालाही 40 वर्षे उलटून गेली आहेत. कुणीतरी हा ग्रंथ अद्ययावत करून नव्याने प्रकाशित करण्याची गरज होती. ओक यांच्या प्रतिपादनाचा मुख्य मुद्दा असा होता की, आज जगातले जे प्रमुख संप्रदाय किंवा धर्म आहेत, ते गेल्या सुमारे तीन हजार वर्षांमध्ये निर्माण झालेले आहेत. परंतु, हे जग तर लक्षावधी वर्षांपूर्वी निर्माण झालेले आहे. मग तीन हजार वर्षांपूर्वीच्या या संप्रदायांपूर्वी जगामध्ये कोणता धर्म होता? यावर ओक यांचे उत्तर आहे की, तो हिंदू धर्म होता. परंतु, पाश्चिमात्त्य विद्वानांना हे मान्य करायचेच नाही, म्हणून ते त्या प्राचीन धर्माला ‘हीदन’, ‘चेगन,’‘निसर्गपूजक’ इत्यादी नावे देतात.
 
 
प्रस्तुत ‘हिंदू ः कोण होते?’ कोण आहेत? कोण होतील?’ हा तब्बल साडेतीनशे क्राऊन आकाराचा पृष्ठांचा ग्रंथ म्हणजे एक प्रकारे पु. ना. ओकांच्या प्रतिपादनाचा अद्यद्यावत अवतार आहे. लेखक सुनील सोनवणे ‘शिवेंदू’ हे तामिळनाडूमधल्या महाबलिपुरम् येथे एका खासगी कंपनीत नोकरी करीत होते. तिथे अचानक त्यांना हिंदू धर्म आणि इतरही धर्मांचा इतिहास, तत्वज्ञानआणि संस्कृती यांचा सखोल अभ्यास करण्याची प्रेरणा झाली. सतत 18 वर्षे त्यांनी तसा अभ्यास केला आणि मगच हा ग्रंथ लिहिला आहे.
 
 
ग्रंथ लिहिण्यापूर्वी त्यांनी फार महत्त्वाचे असे काही निष्कर्ष काढले आहेत. त्या निष्कर्षांचे सार असे की, हिंदू धर्म हा जगातला सर्वांत प्राचीन धर्म असून तो पूर्णपणे ज्ञानावर (खरे म्हणजे विज्ञानावर)आधारित आहे. परंतु, दुर्दैवाने आजच्या हिंदू समाजातील 99 टक्के लोकांना आपल्याच धर्माची कमीत कमी माहिती आहे. हिंदूंनी आपल्या जाती-पंथ-भाषा यांच्यातील भेद मिटवून आपल्या धर्माची खरी ओळख जर करून घेतली नाही, तर हिंदू धर्माचा अंत अगदी जवळ येऊन ठेपला आहे.
 
 
हिंदू धर्म हा जगातील सर्वांत प्राचीन धर्म आहे, हे सांगताना लेखक ख्रिश्चन, मुस्लीम, बौद्ध, ज्यू, पारशी, शिंटो, कन्फ्युशियस, ताओ, जैन, बहाई आणि शीख या संप्रदायांचीही माहिती देतो. या जगाची, किंबहुना सृष्टीची निर्मिती कशी झाली? मानवजात कशी नि केव्हा अस्तित्त्वात आली? याबद्दल प्रत्येक संप्रदायाचे काही एक म्हणणे आहे. आधुनिक विज्ञान म्हणते की, ही सृष्टी एका महास्फोटातून क्रमशः निर्माण झाली, यालाच ‘बिग बँग थिअरी’ असे म्हणतात. लेखक या ठिकाणी आपल्याला दाखवून देतो की, महास्फोट सिद्धांत आणि हिंदूंच्या पुराणांमधील सृष्टीनिर्मितीच्या कथा यांत खूपच साम्य आहे. आजचे वैज्ञानिक महास्फोट सिद्धांत आजच्या शास्त्रीय परिभाषेत सांगतात, तर हिंदू पुराणे कथेच्या रूपात तोच आशय सांगतात.
 
 
यानंतर लेेखक हिंदू समाजाची आज काय स्थिती आहे? ती स्थिती त्याला का प्राप्त झाली आहे? आणि आगामी काळात त्याची काय दशा होण्याची शक्यता आहे? या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा आणि भाष्य करतो. या चर्चेसाठी लेखकाने मांडलेली सर्व आकडेवारी ही 2011च्या म्हणजेच ताज्या जनगणनेवरआधारित आहे. (2021 ची जनगनणा ‘कोविड’मुळे अद्याप झालेली नाही) आज जगातल्या 196 देशांपैकी फक्त भारत, नेपाळ आणि मॉरिशस या तीनच देशांमध्ये लक्षणीय अशी हिंदू लोकसंख्या शिल्लक आहे आणि त्या लोकसमूहांनी कमालीची धर्मग्लानी आलेली आहे.
 
 
अशा प्रकारच्या अध्ययनाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना लेखकाने भरपूर वाचन, चिंतन करून एक वाचनीय ग्रंथ आपल्यासमोर ठेवला आहे. या ग्रंथाची दुसरी आवृत्ती अवश्य निघाली पाहिजे. ती निघताना लेखकाने काही पथ्ये कटाक्षाने पाळावी. एक म्हणजे ग्रंथाची यादी द्यावी. दुसरी म्हणजे वाक्यरचना आणि मुद्रिते योग्य व्हावीत, यासाठी एखाद्या कुशल संपादकाचे साहाय्य घ्यावे. तिसरे म्हणजे अभिनिवेश रहित प्रतिपादन करावे. एकंदरीत ग्रंथ अवश्य वाचावा,विकत घेऊन संग्रही ठेवावा, असा झाला आहे.
 
 
पुस्तकाचे नाव : हिंदू कोण होते? कोण आहेत? कोण होतील?
 
लेखक : सुनील सोनवणे ‘शिवेंदू’
 
प्रकाशक : कृष्णा प्रकाशन, ठाणे
 
पृष्ठसंख्या : 350
 
मूल्य : रू. 350/-
 
(पुस्तकाचे लेखक सुनील सोनवणे ‘शिवेंदू’ यांचा संपर्क क्रमांक - 9834702690)
 
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.