नष्ट्रप्राय पक्ष्याचे रत्नागिरीत दुर्मीळ दर्शन; महाराष्ट्रातील दुसरीच छायाचित्रित नोंद

    25-Nov-2022   
Total Views |
sociable lapwing


मुंबई (अक्षय मांडवकर) -
महाराष्ट्रामध्ये दुर्मीळ असलेल्या 'सोशेबल लॅपविंग' ( sociable lapwing ) या पक्ष्यांची रत्नागिरीमधून नोंद करण्यात आली आहे. 'क्रिटिकली एनडेंजर्ड' म्हणजेच 'नष्ट्रप्राय' श्रेणीमध्ये नोंद असलेल्या या पक्ष्याची ही महाराष्ट्रातील दुसरीच छायाचित्रित नोंद आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या पक्ष्याच्या अस्तित्वाचा पहिलाच छायाचित्रित पुरावा मिळाल्यामुळे जिल्ह्यातील पक्षी वैभव पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
 
 
रत्नागिरी शहर आणि त्याच्या आसपासच्या भागातील कातळ सडे, गवताळ भाग हा पक्ष्यांच्या विविधतेने संपन्न आहे. अनेक प्रजातीचे स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी या भागात पाहायला मिळतात. भारतात स्थलांतर करुन येणारा दुर्मीळ 'सोशेबल लॅपविंग' ( sociable lapwing ) हा पक्षी रत्नागिरी शहरानजीक आढळून आला आहे. पक्षी निरीक्षक एॅड. प्रसाद गोखले हे रत्नागिरी शहराजवळ १८ नोव्हेंबर रोजी पक्षीनिरीक्षणाकरता गेले होते. त्यावेळी त्यांना जळालेल्या गवतामध्ये एका पक्ष्याचा वावर दिसला. प्रथमदर्शी हा पक्षी त्यांना वेगळा जाणवल्यामुळे त्यांनी लागलीच त्याचे छायाचित्र काढले. त्यानंतर त्याची ओळख पटवल्यानंतर हा पक्षी दुर्मीळ 'सोशेबल लॅपविंग' ( sociable lapwing ) असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामधून यापूर्वी या पक्ष्याच्या नोंदी आहेत. मात्र, त्यांसंदर्भातील छायाचित्रित पुरावा नाही. अमरावती जिल्ह्यात ११ वर्षांपूर्वी आढळलेल्या या पक्ष्याचे छायाचित्र आहे. 



'सोशेबल लॅपविंग' ( sociable lapwing ) हा टिटवीच्या प्रजातीमधील एक पक्षी आहे. हा स्थलांतरित पक्षी असून तो कझाकिस्तान, किर्गिझस्तान आणि तजिकिस्तान या देशांमध्ये वास्तव्य करतो आणि हिवाळ्यात भारतातील गुजरात आणि राजस्थानमधील भागात स्थलांतर करत असल्याची माहिती तज्ज्ञ पक्षी निरीक्षक आदेश शिवकर यांनी दिली. महाराष्ट्रातील त्याची नोंद दुर्मीळ असून तो जगातील 'नष्ट्रप्राय' पक्ष्यांच्या यादीत येत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.


पक्षी निरीक्षक एॅड. प्रसाद गोखले
bird

२७ ते ३० सेंटीमीटर आकाराचा हा पक्षी तपकिरी रंगाचा असतो. त्याचे डोके आणि पोटाचा भाग हा काळा असतो. तर त्यांची पांढरी भुवई उठून दिसणारी असते. हा पक्षी थोडा गवताळ अथवा ओसाड भाग, उजाड माळरान, पडीक शेतजमिनी, ओलावा असलेल्या भागातील अधिवासात आढळून येतो. गवताळ प्रदेशात मिळणारे टोळ, रातकिडे व अन्य किटक तसेच धान्य हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे. या प्रजातीच्या संख्येमध्ये सातत्याने घट होत असल्याने 'इंटरनॅशनल युनियन फाॅर काॅन्झर्वेशन आॅफ नेचर' या संस्थेने त्याची नोंद जगातील 'नष्ट्रप्राय' श्रेणीमधील पक्ष्यांच्या यादीत केली आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.