राज्याभिषेक, नियतीचा दगड, इयान हॅमिल्टन वगैरे

Total Views |
king

दि. 6 मे, 2023 रोजी नवा राजा चार्ल्स तिसरा हा त्या एडवर्ड राजाच्या खुर्चीत जेकबच्या दगडावर बसून विधिवत राजपद ग्रहण करेल. दुर्दैवाने हा समारंभ बघायला अ‍ॅडव्होकेट इयान हॅमिल्टन हजर असणार नाही. कारण, तो 3 ऑक्टोबर रोजी वयाच्या 97व्या वर्षी मरण पावला आहे. 


8 सप्टेंबर 2022 रोजी ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरी ही मरण पावली. राजा किंवा राणी मरण पावल्यावर, युवराजाला राज्याभिषेक झाल्याशिवाय मृत राजाचे अंत्यविधी होत नाहीत, ही प्राचीन पद्धत जगातल्या सर्व धर्म आणि संस्कृतींमध्ये समान आहे. त्यानुसार युवराज चार्ल्स याला ताबडतोब ‘राजा चार्ल्स तिसरा’ म्हणून घोषित करण्यात आलं. आता दि. 6 मे, 2023 या दिवशी त्याला समारंभपूर्वक सिंहासनावर बसवलं जाईल. या राज्यारोहणाच्या काही प्राचीन प्रथा आणि परंपरा आहेत.

सेंट्रल लंडनमध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत, त्यातल्या कित्येक वास्तू गेल्या किमान एक हजार वर्षांपासून उभ्या आहेत. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची वास्तू म्हणजे वेस्टमिन्स्टर अ‍ॅबी. अ‍ॅबी किंवा खरा उच्चार अबी म्हणजे पाद्री आणि नन्स यांच्या निवासाची व्यवस्था असलेलं मोठं चर्च. वेस्टमिन्स्टर हे त्या जागेचं मूळ नाव आहे. हे चर्च इसवी सन 960 या वर्षी या ठिकाणी उभारण्यात आलं. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे गेली 1062 वर्षं ते सतत नांदतं-गाजतं-वाजतं आहे. प्रथम इंग्लंडचे आणि मग ब्रिटनचे सगळे राजे आणि राण्या इथेच राज्यावर बसले. त्यांचे आणि राजघराण्यातल्या सर्वांचेच विवाह इथेच झाले आणि अंत्यविधीही इथेच झाले. ब्रिटिश समाजातल्या अनेक थोरामोठ्यांचे अंत्यविधी आजही वेस्टमिन्स्टर अ‍ॅबीमध्येच होतात.

नव्या राजाच्या राज्यारोहणामध्ये ‘कॉरोनेशन चेअर’ला फार महत्त्व आहे. लक्षात घ्या, सिंहासन वेगळं आहे. सिंहासनावर बसण्यापूर्वी राजाला या लाकडी खुर्चीवर बसवण्यात येतं. ही खुर्ची कोरीव आहे. ओक वृक्षाच्या लाकडातून ही खुर्ची कोरुन घडवण्यात आली आहे. राजा सर्व राजचिन्हं धारण करून प्रथम या खुर्चीत बसतो. काही धार्मिक विधी, मंत्रपठण वगैरे होते. मग राजा तिथून उठून त्या खुर्चीच्या मागे काही अंतरावर आणि थोड्या उंचावर ठेवण्यात आलेल्या मुख्य सिंहासनावर आरुढ होतो, म्हणजेच मुख्य सिंहासनापेक्षा थोडं जास्तच महत्त्व या खुर्चीला आहे. कारण, ही खुर्ची 800 वर्षं जुनी आहे. 1297 ते 1300 या कालखंडात राजा एडवर्ड यांच्या आज्ञेने ती घडवण्यात आली.


 आज राजघराण्याकडे ज्या काही प्राचीन लाकडी वस्तू आहेत, त्यातली ती बहुधा सगळ्यात जुनी वस्तू आहे. त्या खुर्चीची बैठकीची फळी आणि पाय यांच्यामध्ये एक खण आहे. त्या खणात एक अत्यंत प्राचीन आणि म्हणूनच अनमोल असा दगड आहे, त्याला म्हणतात ‘स्टोन ऑफ स्कून’ किंवा ‘स्टोन ऑफ डेस्टिनी.’ 26 इंच ु 16.7 इंच ु 10.5 इंच या आकाराचा आणि 152 किलो वजनाचा हा दगड लाल रंगाचा चुनखडीचा दगड आहे. त्याच्या दोन टोकांना दोन लोखंडी गोल कड्या बसवण्यात आलेल्या आहेत.

बायबल या धर्मग्रंथाचे दोन भाग आहेत- ‘ओल्ड टेस्टामेंट’ म्हणजे जुना करार आणि ‘न्यू टेस्टामेंट’ म्हणजे नवा करार. ‘जुना करार’ हा ज्यू लोकांना पूज्य आहे, तर नवा करार ख्रिश्चन लोकांना पूज्य आहे. जुन्या कराराचा पहिलाच भाग आहे ‘जेनेसिस’ म्हणजे उत्पत्ती. यात जगाची उत्त्पती कशी झाली इथपासून ज्यू लोक पॅलेस्टाईनमध्ये कसे आले इत्यादी असंख्य प्राचीन कथा आहेत. ज्यू, ख्रिश्चन आणि मुसलमान या आजच्या तीनही संप्रदायांचा मूळ पुरुष एकच होता. तो म्हणजे आभ्राम (ज्यू उच्चार), अब्राहम (ख्रिश्चन उच्चार) किंवा इब्राहिम (इस्लामी उच्चार). म्हणून तर या तीनही संप्रदायांना ‘अब्राहमिक रिलिजन्स’ असं म्हटलं जातं. अब्राहमचा मुलगा इसाक आणि इसाकचा मुलगा जेकब.


जेकब हा ख्रिश्चन उच्चार. ज्यू उच्चार ‘याकोव्ह’ आणि इस्लामी उच्चार ‘याकूब.’ या जेकबलाच पुढे ‘इस्रायल’ असं नाव मिळालं. इस्रायलला 11 मुलगे आणि एक मुलगी होती. या 11 मुलग्यांच्या 11 टोळ्या या आजच्या ज्यू लोकांची मूळ घराणी मानली जातात, तर हा जेकब पॅलेस्टाईनमध्ये प्रवास करत असताना एका दगडाची उशी करून झोपला. झोपेत त्याला अनेक देवदूतांचं दर्शन झालं. जागा झाल्यावर जेकबने उशाला घेतलेल्या दगडाला पवित्र मानून त्याची त्याच जागी प्रतिष्ठापना केली. पुढे संत जेरेमी याने हा पवित्र दगड आयर्लंडमध्ये आणला. तिथून तो स्कॉटलंडमध्ये आला. इंग्लंडचा राजा एडवर्ड पहिला याने 1296 मध्ये स्कॉटलंड देश जिंकला. तेव्हा इतर लुटीसोबत त्याने हा दगडही आणला. मग 1300 मध्ये जेव्हा त्याची ओक लाकडाची खुर्ची तयार झाली, तेव्हा त्या खुर्चीच्या तक्तपोशीखाली एक खास खण बनवून त्याने तो पवित्र दगड कायमचा त्या खणात ठेवला.

म्हणजे आता गंमत पाहा. जेकब हा कोणत्या काळात होऊन गेला, हे माहिती नाही. इसवी सन पूर्व 1836 ते इसवी सन पूर्व 1689 हा त्याचा कालखंड असावा, असा अंदाज आहे. पण, तो पॅलेस्टाईन निवासी होता. त्याने त्या पवित्र दगडाची स्थापना केली ते ठिकाण आजच्या पॅलेस्टाईनमधील वेस्ट बँक भागातील बैन एल हे असावं, असा इस्रायली पुरात्वशास्त्रज्ञांचा तर्क आहे. तिथून तो दगड संत जेरेमी याने उचलला आणि आयर्लंडमध्ये आणला. संत जेरेमीचा काळ इसवी सन पूर्व 650 ते इसवी सन पूर्व 570 असा मानला जातो. ज्यू आणि ख्रिश्चन दोघेही त्याला संत प्रेषित मानतात. त्याने हा दगड पॅलेस्टाईनमधून उचलून आयर्लंडमध्ये का आणि केव्हा आणला, तिथून तो स्कॉटलंडमध्ये कुणी, का आणि केव्हा नेला; प्रथम आयर्लंडचे आणि मग स्कॉटलंडचे राजे त्या दगडावर बसून स्वतःलाराज्याभिषेक करून घेत असत, हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत.


king 2

पण, इंग्लंडचा राजा एडवर्ड पहिला याला ही सगळी परंपरा माहीत होती. म्हणून तर त्याने स्कॉटलंड जिंकल्यावर तो पवित्र दगड ताब्यात घेतला आणि आपल्या सिंहासनाखाली बसवला. इंग्लंड, स्कॉटलंड आणि आयर्लंड यांची आपसात भरपूर युद्ध आणि सुनासुनी झालेली आहे. स्कॉटलंड, आयर्लंड आणि वेल्स या देशांमधले लोक स्वतःला केल्टिक किंवा कोल्टिक वंशाने मानतात, तर इंग्रज हे स्वतःलाजर्मेनिक वंशाचे मानतात. इंग्रजांनी प्रथम वेल्स मग आर्यलंड आणि अखेर स्कॉटलंड जिंकला. वर्षानुवर्षे त्यांच्या मारामार्‍या चालूच होत्या.


 अखेर 1707 मध्ये त्यांच्यात तह होऊन या चार देशांचा मिळून ग्रेट ब्रिटन उर्फ युनायटेड किंगडम हा देश बनला. त्यावर्षी म्हणजे 1707 साली आपल्याकडे घडलेली महत्त्वपूर्ण घटना म्हणजे औरंगजेब बादशहा मेला.असो. तर अशाप्रकारे 1300 पासून तो ‘स्टोन ऑफ स्कून’ किंवा ‘स्टोन ऑफ डेस्टिनी’ इंग्लंडच्या राजसिंहासनाच्या एक भाग बनला. पुढे ते ओक लाकडाचं सिंहासन वेस्टमिन्स्टर अ‍ॅबीमध्ये ठेवण्यात आलं. त्याचा वापर फक्त समारंभापुरताच करण्यात येऊ लागला. एरवी दरबारात राजाला किंवा राणीला बसण्यासाठी वेगळं सिंहासन वापरण्यात येऊ लागलं.

20व्या शतकात आयर्लंडने ब्रिटनपासून वेगळं होण्यासाठी सशस्त्र चळवळ सुरू केली. त्यात त्यांना यश मिळून तीन चतुर्थांश आयर्लंड स्वतंत्र झाला. आता ब्रिटनमध्ये फक्त उत्तर आयर्लंड राहिला आहे. याचा परिणाम स्कॉटिश लोकांच्याही मनावर झाला. मात्र, त्यांचा कल संपूर्ण स्वातंत्र्यापेक्षा स्वायत्तता मिळावी याकडे राहिला. 1920 पासून यासंबंधी चर्चा राहून अखेर 1979 साली प्रथमच सार्वमत घेतलं गेलं. त्यात संपूर्ण स्वातंत्र्य नको, पण स्वायत्तता हवी, असाच लोकांचा कौल राहिला. 1997 साली पुन्हा सार्वमत घेण्यात आलं आणि ब्रिटिश पार्लमेंटच्या अंतर्गत स्वतंत्र स्कॉटिश पार्लमेंट अस्तित्वात आलं.
या आधीच म्हणजे 1996 साली इंग्रज राजघराण्याने तो पवित्र दगड वेस्टमिन्स्टर अ‍ॅबीमधल्या एडवर्डच्या लाकडी खुर्चीतून बाहेर काढून स्कॉटलंडला परत केला.


स्कॉटिश पार्लमेंटने नंतर असा निर्णय घेतला की, तो दगड आता राजधानी एडिंबरो शहरातल्या स्कॉटिश राजघराण्याच्या एडिंबरो कॅसल या राजवाड्यात ठेवायचा. मात्र, स्कॉटलंड अजूनही युनायटेड किंगडमचा भाग असल्यामुळे राणी एलिझाबेथनंतर जेव्हा केव्हा नव्या राजाचं राज्यारोहण होईल, तेव्हा तो दगड पुन्हा समारंभापुरता वेस्टमिन्स्टर अ‍ॅबीमध्ये न्यायचा.त्यानुसार आता दि. 6 मे, 2023 रोजी नवा राजा चार्ल्स तिसरा हा त्या एडवर्ड राजाच्या खुर्चीत जेकबच्या दगडावर बसून विधिवत राजपद ग्रहण करेल. दुर्दैवाने हा समारंभ बघायला अ‍ॅडव्होकेट इयान हॅमिल्टन हजर असणार नाही. कारण, तो 3 ऑक्टोबर रोजी वयाच्या 97व्या वर्षी मरण पावला आहे.

इयान हॅमिल्टन हा स्कॉटलंडमधल्या ग्लासगो विद्यापीठातला एक कायद्याचा विद्यार्थी होता. स्कॉटिश नॅशनल पार्टी या स्कॉटलंडला अधिक स्वायत्तता मिळावी, अशी मागणी करणार्‍या पक्षाचा तो कट्टर समर्थक होता. दि. 24 डिसेंबर, 1950च्या रात्री हॅमिल्टन आणि त्याच्या तीन मित्रांनी एक अचाट्य उद्योग केला. ते वेस्टमिन्स्टर अ‍ॅबीमध्ये गुपचुप घुसले. त्यांनी एडवर्डच्या लाकडी खुर्चीच्या खणातून तो पवित्र दगड खेचून बाहेर काढला आणि पळवून नेला. हे करताना त्या चुनखडीच्या दगडाचे चक्क दोन तुकडे झाले. ही चोरी त्यांनी इतक्या सहजपणे केली की, आता या दगडाचं पुढे काय करावं, हेच त्यांना कळेना. अखेर एप्रिल 1951 मध्ये म्हणजे चार महिन्यांनी ‘चर्च ऑफ स्कॉटलंड’च्या अधिकार्‍यांनी तो दगड व्यवस्थित जोडून पोलिसांकडे सोपवला.पोलिसांनी तो पुन्हा वेस्टमिन्स्टर अ‍ॅबीमध्ये आणून इयान हॅमिल्टन आणि त्याच्या तीन मित्रांविरुद्ध आरोपपत्रदाखल केलं. त्यांच्यावर प्रत्यक्ष खटला मात्र कधीच झाला नाही.

पुढच्या काळात इयान हॅमिल्टन स्वत:च एक नामवंत फौजदारी वकील म्हणून प्रसिद्धीस आला. एका गाजलेल्या खटल्यात त्याने असा युक्तिवाद केला की, ‘राणी एलिझाबेथ दुसरी हिचा उल्लेख स्कॉटलंडमध्ये फक्त राणी एलिझाबेथ एवढाच करावा. कारण, इंग्रज लोकांसाठी ती दुसरी आहे. आम्हा स्कॉटिश लोकांसाठी ती पहिलीच आहे. राणी एलिझाबेथ पहिली (राज्यकाल-1558 ते 1603) ही इंग्लंड आणि आयर्लंडची राणी होती. आमची नव्हे.’

हॅमिल्टनचा हा युक्तिवाद कायद्याने मान्य केला नाही. पण, स्कॉटिश लोकांच्या स्वायत्ततेच्या मागणीची तीव्रता यातून लोकांच्या ध्यानी आली. ते कसंही असो. यातून स्कॉटिश लोकांच्या केल्टिक वंश, इंग्रजांच्या जर्मेनिक वंश, त्यांच्यातल्या परंपरागत मारामार्‍या; एकीकडे आधुनिकता वगैरेंचा उदोउदो करतानाच जेकब नावाच्या कुणा पौराणिक व्यक्तीशी आपला संबंध आहे. हे दाखवण्याच्या, परंपरेला चिकटून राहण्याचा आग्रह हे सर्व पुन्हा एकदा दिसलं.हे लोक आमच्या रामायण-महाभारताला गुराख्यांच्या काल्पनिक कथा म्हणतात नि पुराणांना चमत्कारिक, काल्पनिक कथा म्हणून हिणवतात. स्वत: मात्र तशाच पौराणिक अब्राहम, जेकब नि जेरेनी यांना चिकटून राहतात. तरी ते रॅशनल आणि आम्ही प्रतिगामी! यंव रे गब्रू!!


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.