‘पसमांदा अब हुक्का नहीं भरेगा...’

‘पसमांदा’ मुस्लिमांना आपलेसे करण्याची भाजपची रणनिती

    17-Nov-2022   
Total Views |
ps

मुस्लिम राजकारणास मिळणार कलाटणी
 
 
 

नवी दिल्ली, पार्थ कपोले :
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी आझम खान यांच्या रामपूर या बालेकिल्ल्यामध्ये आयोजित ‘पसमांदा’ मुस्लिमांच्या मेळाव्यात अतिशय आक्रमकपणे 'बड़े मियां से कह दो, अब पसमांदा समाज हुक्का भरने का काम नहीं करेगा' अशी घोषणा केली. या घोषणेद्वारे मुस्लिम समाजातील मागास वर्गांना भाजपने साद घातली आहे.
 
देशाच्या पंतप्रधानपदाचा मार्ग हा उत्तर प्रदेशातून जातो. कारण, या राज्यामध्ये लोकसभेच्या तब्बल ८० जागा आहेत. त्यामध्ये भाजपने २०१४ आणि २०१९ साली अनुक्रमे ७१ आणि ६२ जागांवर विजय प्राप्त केला होता. त्यामुळे भाजपचा विजय सोपा झाला होता, यात कोणतीही शंका नाही. पुन्हा एकदा २०२४ साली उत्तर प्रदेशात मोठा विजय मिळविण्यासाठी भाजप सज्ज झाला असून त्यासाठी राज्यातील मुस्लिम राजकारणास मोठी कलाटणी देण्याची तयारी सुरू केली आहे.
 
उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये ‘पसमांदा’ मुस्लिम समुदायास भाजपने केंद्रस्थानी आणले आहे. ‘पसमांदा’ मुस्लिमांमध्ये त्यामध्ये अन्सारी, सलमानी, इद्रीसी, फकीर, अल्वी, कुरेशी, घोसी, रैने, रंगरेज, विणकर, धुनिया, मन्सूरी, धोबी, नाई, गुजर, लोहार, सैफी, कासागर, मल्लाह, गड्डी-घोसी, नट, मेसन यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशात मुस्लिम समाजाची टक्केवारी १९.२६ टक्के आहे, त्यामध्ये तब्बल ८० टक्के वाटा हा पसमांदा समुदायाचा आहे. ‘पसमांदा’ मुस्लिम लाभार्थ्यांची एक विशेष श्रेणी आहे. ते सामाजिकदृष्ट्या मागासलेले, सांस्कृतिकदृष्ट्या गुलाम आणि आर्थिकदृष्ट्या उपेक्षित लोक आहेत.
 
विनामूल्य अन्नधान्य, पंतप्रधास आवास योजना, उज्ज्वला योजना, शेतकरी सन्मान निधी, शौचालय योजना, आयुष्मान भारत, हर घर जल – नल से जल आदी योजनांचे ‘पसमांदा’ समाजातील लाभार्थी जवळपास ४ कोटी असल्याचा भाजपचा दावा आहे. या योजनांमुळे उच्चजातीय मुस्लिमांच्या दबावाखाली दीर्घकाळ राहिलेल्या ‘पसमांदा’ समुदायास विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्याची संधी प्राप्त झाली आहे.
 
 
या चार कोटी लाभार्थ्यांपैकी लक्षणीस टक्क्याने भाजपच्या पारड्यात मत टाकले तर, राज्याच्या राजकारणास मोठी कलाटणी मिळणार आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये ‘पसमांदा’ समुदायातील दानिश अन्सारी यांना मंत्री बनवून थेट संदेशही दिला आहे.
 


ms 
 
 
या पार्श्वभूमीवर भाजपने रामपूर येथे ‘पसमांदा’ मुस्लिमांच्या घेतलेल्या मेळाव्यास विशेष महत्व प्राप्त होते. कारण, रामपूर हा समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांचा बालेकिल्ला समजला जातो. आजपर्यंत मुस्लिम समुदायाच्या मतांवर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांनी हक्क सांगितला होता. मात्र, भाजपच्या ‘पसमांदा’ धोरणामुळे मुस्लिमांमधील संख्येने मोठ्या असलेल्या समुदायास आर्थिक – सामाजिक विकासाचा मार्ग सापडला आहे. त्यामुळे मायावती यांनी भाजपच्या हे धोरण म्हणजे फसवणूक असल्याची टिका केली आहे. मात्र, त्याचे खरे कारण हे हक्काची मतपेढी निसटणे हेच आहे.
केवळ उत्तर प्रदेश नव्हे, देशव्यापी परिणाम होणार
 
उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्वासह विकास ही संकल्पना प्रस्थापित झाली आहे. त्याचवेळी केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातीस सर्व घटकांना मिळेल, याची काळजी राज्य सरकारद्वारे घेतली जात आहे. त्यामुळे भाजपची पारंपरित मतपेढी अधिक घट्ट होत आहे, त्यासोबतच मुस्लिम समाजातील मागास वर्ग असलेल्या ‘पसमांदा’ समुदायास विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजपने काम सुरू केले आहे. यामुळे मुस्लिम राजकारणामध्ये पुढारलेला मुस्लिम समाज विरुद्ध मागास राहिलेला मुस्लिम समाज हे द्वंद्व सुरू होणार आहे. उत्तर प्रदेशसह देशभरातील मुस्लिम समुदायावर याचा परिणाम होणार आहे. कारण, देशातील बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांमध्येही ‘पसमांदा’ मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.