कालचक्राचा प्रवास (लेखांक-2)

    15-Nov-2022   
Total Views |
modi covid
आज आपण आपल्या मुळाकडे जाऊ लागलो आहोत. इंग्रजांच्या अनेक खाणाखुणा मिटवून टाकण्याचे काम केंद्र शासनाने सुरू केले आहे. राजपथाचा ‘कर्तव्यपथ’ झाला. कोंडलेली बुद्धी मुक्त झाली आणि चंद्रावर पाऊल ठेवण्याच्या स्थितीत आलो आहोत. शत्रूने आपल्यावर हल्ला करावा आणि आपण प्रेते मोजत बसावी, ही स्थिती जाऊन आता शत्रूला प्रेते मोजण्याची वेळ आपण आणली आहे.



प.जवाहरलाल नेहरू यांचा समाजवाद 1990 साली कोसळला आणि खासगीककरणाचे युग आले. नवीन पिढीला हे ऐकून गंमत वाटेल की, 1990 पर्यंत घरात साधा टेलिफोन घ्यायचा असेल, तर दोन-तीन वर्षे रांगेत राहावे लागे. गॅसची जोडणी मिळविण्यासाठी एक वर्ष तरी जात असे आणि स्कूटर किंवा गाडी घ्यायची असेल, तर पैसे भरून दोन-तीन वर्षे थांबावे लागे. नेहरूंच्या समाजवादाने ही अवस्था निर्माण केली होती. नरसिंहरावांनी अर्थव्यवस्थेवरील बंधने काढून टाकली आणि अर्थव्यवस्थेला मुक्त केले. संविधानाच्या भाषेत सांगायचे, तर अर्थव्यवस्थेला ‘लिबर्टी’ दिली. बंधने मोकळी झाल्यानंतर हळूहळू आपण मोबाईलच्या युगात प्रवेश केला. आता मोबाईल शॉपमध्ये जा, पैसे भरा, सिमकार्ड घ्या आणि खिशात मोबाईल ठेवून केव्हाही, कुणाशीही, कधीही बोला. नव्वदच्या दशकापूर्वी पुण्यात कुणाशी बोलायचे असेल, तर ’ट्रंककॉल’ लावावा लागे, त्याचे बील वारेमाप येत असे. आता तर पुणेच काय, अगदी देशात कुठेही कधीही क्षणात आपण बोलू शकतो.



अर्थव्यवस्था ही तशी भौतिक संकल्पना आहे. अर्थव्यवस्थेचा संबंध गरजेच्या वस्तूंशी येतो. ’सेक्युलॅरिझम’ ही भौतिक संकल्पना नाही, ही वैचारिक आणि मानसिक संकल्पना आहे. नेहरूंच्या ‘सेक्युलॅरिझम’चा अर्थ झाला- हिंदूंना ठोका, मुसलमानांना जवळ करा, धर्मांतर करणार्‍या मिशनर्‍यांचे लाड करा, त्यांना पुरस्कार द्या. हिंदूतून फुटून निघण्यासाठी धर्मगटांना प्रोत्साहन द्या. जैन, बौद्ध, शीख, आर्य समाज, लिंगायत इत्यादी लोकांच्या मनात ही भावना भरा की, आम्ही हिंदू नाही. आमचा धर्म वेगळा. त्यांना आंदोलने करायला लावा आणि त्यांना धार्मिक अल्पसंख्याकांचा दर्जा द्या.






हे सर्व कार्य ‘सेक्युलॅरिझम’ या एका शब्दामुळे देशात घडत राहिले.येथे ’धर्म’ या शब्दाच्या अर्थावर थोडे विवेचन केले पाहिजे. माणसाने माणसाशी कसे वागावे, माणसाने प्राणिसृष्टीशी कसा व्यवहार करावा, माणसाने निसर्गाशी कसे संबंध ठेवावे, हे सांगणारे नियम म्हणजे धर्म असतो. या धर्माच्या अगोदर हिंदू, बौद्ध, जैन असे शब्द लावले, तरी मूळ धर्माचा अथर्र् बदलत नाही. बदल उपासना पद्धतीत होतो. कुणी देव मानतात, कुणी देव मानत नाहीत. कुणाला मूर्तिपूजा प्रिय आहेत, तर दुसर्‍याला मूर्तिपूजा चालत नाही. एखादा ग्रंथालाच सर्वश्रेष्ठ मानतो. परंतु, माणसाच्या आचारधर्माविषयी भारतात जन्मलेल्या सर्व धर्मपंथांत एकवाक्यता असते. त्यांना आपापसात लढविणे, हे पाप आहे. ते ‘सेक्युलॅरिझम’ने केले.



noida



‘सेक्युलॅरिझम’ने दुसरे पाप केले, ते म्हणजे ‘जे जे हिंदू ते ते निंदू’ अशी भूमिका त्यांनी घेतली. वेद, उपनिषदे, पुराण, रामचरितमानस, ज्ञानेश्वरी अशा सर्व धार्मिक ग्रंथांची अनेक ’सेक्युलर’ पंडितांनी ‘सेक्युलर’ भाषेत चिकित्सा केलेली आहे, ती हिंदू श्रद्धांविरोधी आहे. ’सेक्युलॅरिझम’चे तिसरे पाप म्हणजे सर्व साधू-संत, महात्मे, थोर राष्ट्रपुरूष यांची त्यांनी जातीत विभागणी केली. गोस्वामी-तुलसीदास - ब्राह्मण, कबीर-वीणकर, रोहिदास - चर्मकार, गाडगेबाबा-परीट, ज्ञानेश्वर-ब्राह्मण, तुकाराम-वाणी, महात्मा फुले-माळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर-दलित, रामदास स्वामी - ब्राह्मण, छत्रपती शिवाजी महाराज-मराठा, या जातिकरणातून एकही संतमहात्मा सुटला नाही. हा ‘सेक्युलॅरिझम’ येथेच थांबला नाही, त्याने पगडी-पागोट्याचे राजकारण सुरू केले. पगडी ब्राह्मणांची, पागोटे बहुजन समाजाचे. पुरणपोळी ब्राह्मणांची, नळी बहुजन समाजाची. म्हणजे वस्त्रांचेदेखील जातिकरण झाले आणि खाण्याच्या पदार्थांचे ही जातिकरण झाले. महाराष्ट्र शाहू-फुले-आंबेडकर यांचा झाला. रानडे-गोखले-टिळक-आगरकर यांचा नाही, असे न बोलताच सांगितले गेले. म्हणजे समाज परिवर्तनाचा महान विचार मांडणारेदेखील जातीच्या चौकटीत बसविले गेले.
ही बौद्धिक कोंडी एखाद्या गळूसारखी वाढत गेली. शरीराच्या नाजूक भागी गळू झाले की, खूप त्रास होतो. ते कधीकधी आपोआप फुटते, तर कधी शस्त्रक्रिया करून काढावे लागते. अशी शस्त्रक्रिया 1986 सालापासून आपल्या देशात सुरू झाली. अयोध्येतील रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन 1986 साली सुरू झाले. त्या अगोदर एकात्मता रथयात्रा झाली. राम-जानकी रथयात्रा झाली. या दोन यात्रांनी हिंदू समाज ढवळून निघाला.






1986 नंतर जन्मलेल्या पिढीला त्याची कल्पना येणार नाही. एकात्मता यात्रेत भारतमाता आणि गंगाजल याने सामान्यातील सामान्य हिंदूदेखील विद्युतभारित झाला. या यात्रा पाहण्याचे, त्यात सहभागी होण्याचे आणि स्थानिक ठिकाणी यात्रेचे कार्यक्रम आयोजित करण्याचे भाग्य मला लाभले. जनशक्ती काय असते, याचे प्रत्यक्ष दर्शन तेव्हा घडले. हिंदू समाज झोपलेला असतो, पण तो जेव्हा जागा होतो, तेव्हा शब्दश: तो विश्वरूप दर्शन दाखवितो. हे ‘सेक्युलॅरिझम’चे गळू मुळासकट उद्ध्वस्त व्हावे, अशी ईश्वराची योजना असावी. या काळात रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका सुरू झाली होती. रविवारी सकाळी 9 वाजता मालिकेचा भाग सुरू होई, तेव्हा रस्त्यावर भटकी कुत्री सोडली, तर वाहनंही नसत आणि माणसंही नसत.



babari



प्रत्येक घर माणसाने गजबजून गेलेले असे आणि सर्वजण टीव्ही समोर बसलेले असत. राम-जानकीच्या सामर्थ्याचा साक्षात अनुभव तेव्हा आला. भारत सनातन आहे, अमर आहे आणि तो आता झोपेतून जागा होत आहे, याची अनुभूती आली. रामजन्मभूमी मुक्तीसाठी लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा झाली. अडवाणी यांच्यावरील लेखात त्याचे वर्णन केले आहे. या रथयात्रेने आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या घणाघाती भाषणांनी अभेद्य ‘सेक्युलॅरिझम’च्या किल्ल्याच्या भिंती कोसळू लागल्या. त्याला भगदाड पडायला लागली. 1992 साली हिंदू जनतेने रामजन्मस्थानावरील बाबराचे स्मारक असलेले तीन घुमट जमीनदोस्त केले. ही सांस्कृतिक क्रांती होती, राजकीय क्रांतीची नांदी होती आणि वैचारिक क्रांतीची सुरूवात होती. ही अशी त्रिविध क्रांती आहे, याचे आकलन तेव्हा आपल्या देशातील एकाही ‘सेक्युलर’ पंडिताला झाले नाही, ते बाबरीचा मातम करत बसले. ‘ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, क्यू हुआ’ हे गाणे आळवत बसले.




यानंतर या हिंदू जागृतीच्या कालखंडात आपण जगत आहोत, त्या कालखंडाकडे हिंदू समाज दमदार पावले टाकीत निघाला. समाजवाद आणि ‘सेक्युलॅरिझम’ या दोन विदेशी संकल्पना मानणारी काँग्रेस हळूहळू अस्ताला जात चालली. अनेक राज्यांतून तिची सत्ता गेली. केंद्रातूनही सत्ता गेली. मध्यंतरी दहा वर्षे मनमोहन सिंग यांचे कडबोळे सरकार लंगडत लंगडत चालत राहिले. 2014 साली तेही गेले. 2019 साली ‘सेक्युलॅरिझम’ आणि समाजवादाची थडगी डोक्यावर घेऊन काँग्रेस नगण्य पक्ष होत गेला. आज आपण आपल्या मुळाकडे जाऊ लागलो आहोत. इंग्रजांच्या अनेक खाणाखुणा मिटवून टाकण्याचे काम केंद्र शासनाने सुरू केले आहे. राजपथाचा ‘कर्तव्यपथ’ झाला. कोंडलेली बुद्धी मुक्त झाली आणि चंद्रावर पाऊल ठेवण्याच्या स्थितीत आलो आहोत. शत्रूने आपल्यावर हल्ला करावा आणि आपण प्रेते मोजत बसावी, ही स्थिती जाऊन आता शत्रूला प्रेते मोजण्याची वेळ आपण आणली आहे.






जागतिक राजकारणात नेहरू काळात आमची प्रतिमा भिकेचा कटोरा आणि अर्थहीन प्रवचने देणारा देश अशी झाली होती. आज आपल्या हातात भिकेचा कटोरा नाही, दानाचा कटोरा आहे. अन्नधान्य-औषधे आणि जीवनावश्यक वस्तू अमेरिकेसहित सर्व गरजवंत देशांना आपण पुरवितो. हिंदू जागा झाला आणि त्याचा परिणाम म्हणून ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले. कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा झाल्या. आपण जेव्हा आपल्या मुळाकडे जातो, आपल्या सनातन विचाराचा अभिमान बाळगतो. ते जीवनात आणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आजचा समर्थ आणि जगाला दिशा देणारा भारत उभा राहत असतो. या ठिकाणी येण्यासाठी खूप कष्ट पडलेले आहेत. त्याचे वाचन, स्मरण नव्या पिढीने जरूर करायला पाहिजे.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.