चेहरा ना देखो, चेहरे ने लाखों को लूटा...

Total Views |
 
द फेसमेकर
 
 
 
 
‘चेहरा’ हा मुख्य मुद्द्यावरून या सर्व गोष्टी निघण्याचं मुख्य कारण म्हणजे डॉ. लिंडसे फिट्झहॅरिस या विदुषीचं ताजं पुस्तक ‘द फेसमेकर.’
 
 
'दिल को देखो, चेहरा ना देखो, चेहरे ने लाखों को लूटा, दिल सच्चा और चेहरा झूठा।’ 1970च्या मनमोहन देसाईंच्या ’सच्चा झूठा’ या चित्रपटाचं हे ‘टायटल साँग’ होतं. गीतकार होते इंदिवर आणि संगीतकार कल्याणजी आनंदजी. हिंदी चित्रपटसृष्टीत 1969 ते 1973 ही वर्षं राजेश खन्नाची होती. ‘आराधना’, ‘दो रास्ते’, ‘सफर’, ‘कटी पतंग’, ‘आनंद’, ‘हाथी मेरे साथी’, ‘दुष्मन’, ‘अमर प्रेम’ असे त्यांचे एका पाठोपाठ एक चित्रपट येत होते नि ‘पब्लिक’ वेडं झालं होतं. त्यातलाच 1970चा ‘सच्चा झूठा’ हा एक ‘हिट’ चित्रपट. कवी श्यामलाल बाबूराय यांचं ‘इंदिवर’ हे काव्यरचनेसाठी घेतलेलं टोपणनाव. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते गीतरचनेसाठी उर्दू-फारसी शब्द टाळून शक्यतो अस्सल देशी शब्द वापरत. खुद्द ‘इंदिवर’ हा शब्दही अस्सल संस्कृत आहे. त्याचा अर्थ आहे, निळ्या रंगाचं कमळ. ‘दिल को देखो, चेहरा ना देखो, चेहरेने लाखों को लूटा’ अशा शब्दांमधून कवीने एक चिरंतन सत्य सांगितलं असलं, तरी चित्रपट कामुक, हिंसेने भरलेला, तर्कशास्त्र वगैरेंचा मागमूस नसलेला एक देमार हिंदी चित्रपट होता. मनमोहन देसाईंचा चित्रपट आणखी कसा असणार?
 
 
खलनायक आणि नायक हे अगदी हुबेहूब सारखे दिसत असतात. याचा फायदा घेऊन खलनायक नायकाला आपल्या जागी ठेवून अनेक दरोडे घालतो नि नामानिराळा राहतो, असं एकूण कथानक. अशा छापाचे अनेक चित्रपट त्या पूर्वीही आले होते नि नंतरही आले. त्यात 1962चा दिग्दर्शक शक्ती सामंता आणि नायक शम्मी कपूर यांचा ‘चायना टाऊन’ नि 1978चा दिग्दर्शक चंद्रा बारोट आणि नायक अमिताभ बच्चन यांचा ‘डॉन’ हे विशेष गाजलेले चित्रपट. हिंदी चित्रपट म्हटलं की, तर्कशास्त्र वगैरे गुंडाळून ठेवूनच तो बघायचा असतो, तरच पैसा वसूल करमणूक होते, हे खरं असलं; तरी दिग्दर्शकाची म्हणून वेगळी फोडणी असतेच. ती फोडणी देऊन पदार्थ झणझणीत बनवण्यात शक्ती सामंता आणि चंद्रा बारोट नक्कीच सरस होते.
 
 
पण, हेच विषय जेव्हा हॉलिवूडवाले हाताळतात, तेव्हा वेगळाच अस्सल नमुना आपल्याला बघायला मिळतो. 1958च्या दिग्दर्शक मायकेल अ‍ॅण्डरसन आणि नायक रिचर्ड टॉड, खलनायिका अ‍ॅनी बॅक्स्टर यांच्या ‘चेस अ कू्रकेड शॅडो’ या मूळ चित्रपटावरुन हे सगळेच हिंदी चित्रपट उचललेले होते. मूळ चित्रपटात नायक/खलनायक यांचा ‘डबल रोल’ नाही, तरीही रहस्य असं काही ठासून भरलेलं आहे की, अखेरच्या क्षणापर्यंत फक्त अंदाजच करीत राहतो.
 
 
1997 साली हॉलिवूडने याच कथाबीजाला कालानुरुप फोडणी देऊन एक भन्नाट चित्रपट बनवला, त्याचं नाव ‘फेस ऑफ.’ हाँगकाँगनिवासी चिनी ख्रिश्चन असलेल्या जॉन वू या दिग्दर्शकाच्या या चित्रपटात नायक जॉन ट्रॅव्होल्टा आणि खलनायक निकोलस केन यांनी अभिनय-अ‍ॅक्शन यांची बहार करुन सोडली. गुप्तचर अधिकारी असणारा नायक, खलनायक आणि त्याच्या टोळीचा सफाया करीत असताना खलनायक जखमी होऊन कोमामध्ये जातो. खलनायकाच्या मदतनीसाकडून नायकाला एवढंच कळतं की, या लोकांनी कोणाला तरी अतिमहत्त्वाच्या स्थानावरबॉम्ब पेरून ठेवलेलं आहे. नायक वरिष्ठांच्या अनुमतीने आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने स्वत:च्या चेहर्‍यावर प्लास्टिक सर्जरी करवून पूर्णपणे खलनायकाचं रुप धारण करतो. खलनायकाच्या टोळीत शिरुन तो केवळ बॉम्बच नव्हे, तर एकूण टोळीची सगळीच पाळमुळं जाणून घेण्याच्या मागे लागतो. तोच इकडे खलनायक कोमामधून शुद्धीवर येतो. काय घडलंय, हे कळल्यावर तो प्रतिडाव म्हणून स्वत:वर प्लास्टिक सर्जरी करवून नायकांचं रुप धारण करतो. मग, खरा नायक-खोटा नायक नि खरा खलनायक-खोटा खलनायक यांची जी काही गुंतागुंत होते, ती अभिनित करायला ट्रॅव्होल्टा आणि केन यांसारखे ताकदीचे अभिनेतेच हवेत. त्या दोघांनी एकमेेकांचा अभिनय अप्रतिम केलाय.
 
 
यावरुन आठवण झाली विजया मेहतांच्या ‘हयवदन’ची. ‘कथासरित्सागर’ या भारताच्या प्राचीन कथाभांडारात विद्वान पंडित देवदत्त आणि त्याचा जिवलग मित्र पहिलवान कपिल याची चमत्कारिक कथा आहे. त्यांच्या मुंडक्यांची अदलाबदल होते. या मूळ कथेवरून गिरीश कर्नाड यांनी कन्नड भाषेत ‘हयवदन’ हे नाटक लिहिलं. 1984 साली ते मराठी रंगभूमीवर विजया मेहतांनी दिग्दर्शित करुन आणलं. पंडित देवदत्ताची भूमिका रवींद्र मंकणी, तर पहिलवान कपिल ही भूमिका उदय म्हैसकर करीत असत. त्यांच्या मुंडक्यांची अदलाबदल झाल्यावर ते दोघे एकमेकांचा जो अभिनय करत असत, तो थक्क करणारा असे. त्यात ते अभिनेते, दिग्दर्शिका आणि रंगाभूषाकार सर्वांचाच वाटा होता. चित्रपटापेक्षाही रंगभूमीवर प्रत्येक प्रयोगात असा अभिनय वठवणं हे अर्थातच जास्त अवघड होतं.
 
 
असो. ‘चेहरा’ हा मुख्य मुद्द्यावरून या सर्व गोष्टी निघण्याचं मुख्य कारण म्हणजे डॉ. लिंडसे फिट्झहॅरिस या विदुषीचं ताजं पुस्तक ‘द फेसमेकर.’ आपल्याकडे हल्ली समाजमाध्यांमुळे गल्लोगल्ली इतिहास शाहीर, इतिहासतज्ज्ञ, इतिहास व्याख्याते वगैरे लोक बोकाळलेले आहेत. कुणीही उठतो आणि केवळ आडनाव साधर्म्याच्या बळावर आपण अमक्या-तमक्या ऐतिहासिक घराण्याचे आजचे वंशज आहोत वगैरे जाहीर करतो. अशा गोष्टींचा अस्सलपणा पारखून घ्यावा लागतो. याची समाजमाध्यमांवरूनइतिहास वाचणार्‍यांना कल्पनाही नसते आणि पर्वाही नसते.
 
 
पाश्चिमात्य देशातही असे झटपट रंगारी आहेतच. इतिहासाचा आधार घेऊन लिहिलेली त्यांची झटपट पुस्तकं ‘बेस्ट सेलर’ यादीत येऊन भरपूर खपतातसुद्धा, पण अस्सल इतिहास म्हणून त्यांना काहीही महत्त्व नसतं, हे खुद्द त्या लेखकाला आणि वाचकांनाही माहीत असतं. म्हणून तर त्यांच्या देशात राजकीय इतिहासाबरोबरच सामाजिक इतिहास, सांस्कृतिक इतिहास अशा इतिहासाच्या अनेक शास्त्रांमध्ये संशोधन, चिंतन लेखन सतत चालू असतं. त्यातलीच एक शाखा म्हणजे ‘मेडिकल हिस्ट्री’ - वैद्यकीय इतिहास!
डॉ. लिंडसे फिट्झहॅरिस या वैद्यकीय इतिहासकार आहेत. ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठात ‘हिस्ट्री ऑफ मेडिसीन’ हाच त्यांच्या संशोधनाचा विषय होता. त्या फक्त 40 वर्षांच्या आहेत. म्हणजे त्यांना तरुणीच म्हटलं पाहिजे. पण काय आहे की, आपल्याकडच्या साहित्यिकांनी काही-काही शब्दांच्या अर्थांना नको त्या छटा प्राप्त करून दिल्या आहेत. उदा. ‘विचारवंत’ हा शब्द घ्या.
 
 
‘विचारवंत’ हा शब्द आला की, तो माणूस डाव्या विचारधारेचा म्हणजेच हिंदुत्वद्वेष्टा असणार, अशी जवळपास खात्रीच असते, तसंच ‘तरुणी’ हा शब्द आली की, आता यापुढे काहीतरी रंगेल आशयाचा मजकूर असणार, अशी वाचकांची समजूत होते.
परंतु, स्वत: तरुणी असूनही डॉ. लिंडसे फिट्झहॅरिस यांच्या या ताज्या संशोधनपर पुस्तकातला विषय अतिशय गंभीर आहे. एक तरुण संशोधिका युद्ध, युद्धातला मानवी विध्वंस आणि त्यावर डॉ. हेरॉल्ड गिलिस या प्रख्यात शल्यतज्ज्ञाने योजलेले उपाय, त्याने केलेल्या हजारो शस्त्रक्रिया-शल्यक्रिया यांवर पुस्तक लिहिते, हीच विस्मित करून सोडणारी बाब आहे.
 
 
आधुनिक युद्धशास्त्राच्या इतिहासानुसार बंदूक आणि तोफ ही उडती हत्यारं म्हणजे ‘फायर आर्म्स’ सुमारे 13 ते 14व्या शतकापासून वापरातआली. सरणार्‍या प्रत्येक शतकागणिक त्यांचा पल्ला, त्यांचा मारा, त्यांची भेदकता आणि त्यांची घातकता अधिकाधिक विध्वंसक होत गेली. त्या विध्वंसाचा पहिला भीषण प्रत्यय 1914 ते 1918 पर्यंत चाललेल्या पहिल्या महायुद्धात फार प्रकर्षाने आला. यापूर्वीच्या युद्धांमध्ये तलवारी,भाले, धनुष्यबाण अशा शस्त्रांनी माणसांची मुंडकी उडत, हात-पाय छाटले जात; बंदुकांमधून मारल्या जाणार्‍या शिशाच्या छर्‍यांनी शरीराला भोकं पडत. तोफांमधून पडणार्‍या तप्त गोळ्यांनी शरीरं भाजून निघे. लढाई जिंकणारा पक्ष पराभूत पक्षाच्या सैनिकांचे हात तोडण्याची किंवा नाक-कान छाटण्याची शिक्षा देत असे.
 
 
पण, 1914 साली सुरू झालेल्या या महायुद्धात दोन्ही प्रतिस्पर्धी सैन्यांना असा अनुभव आली की, फार मोठ्या प्रमाणावर सैनिकांचे चेहरे विद्रूप होत आहेत. याची मुख्य कारणं आहेत, नव्यानेच रणांगणावर आलेली ‘मशीनगन’ आणि ‘शार्पनेल’ म्हणजे अणकुचीदार खिळे किंवा तत्सम धातूचेतुकडे भरलेले तोफांचे गोळे. ‘मशीनगन’ ही जराही न थांबता सलग शेकडो गोळ्या झाडण्याची क्षमता असणारी बंदूक बेछूटपणे चालवली जाते. तिच्या गोळ्या समोरच्या लक्ष्याच्या छातीत किंवा पोटात तर घुसतातच; पण डोळे, कान, नाक, कपाळ, हनुवटी, गाल, मान अशा कुठेही घुसतात आणि तिथली हाडं, मांस जाळून टाकतात. नव्या तोफांच्या गोळ्यांमधले ‘शार्पनेल्स’ म्हणजे टोकेरी, धारदार खिळे किंवा तत्सम वस्तू दारूच्या स्फोटाने गरम होऊन उडतात आणि मानवी शरीरात कशाही, कुठेही घुसून तो अवयव जाळून टाकतात. या जखमांमुळे हात किंवा पाय शरीरापासून तुटून वेगळे पडले, तर त्या जखमेवर कसे उपचार करायचे, हे त्या काळातल्या रणांगणाचा पिछाडीवर हजर असणार्‍या वैद्यकीय पथकातल्या डॉक्टरांना माहिती होतं. उदा. फ्रान्समधल्या नू शॅपेल भागातल्या रणकंदनात एका ब्रिटिश सैनिकाचा एक गाल ‘शार्पनेल’च्या तुकड्याने साफ फाटून गेला.
 
 
अतिरक्तस्रावाने तो सैनिक जागीच कोसळला, पण मेला नाही. पिछाडीच्या वैद्यकीय पथकाने त्याच्या डोळ्याकडची कातडी नि तोंडाकडची कातडी शक्य तितकी खेचून ठाके घालून टाकले. त्याचा जीव वाचला, पण आता त्याला तोंड मिटताच येईना आणि पापण्यांची उघडझापच करता येईला. कारण, या दोन्ही क्रियांसाठी आवश्यक असणार्‍या कातडीच्या सुरकत्या प्रमाणाबाहेर ताणल्या गेल्या होत्या. अशी शेकडो उदाहरणं होती. कुणाचे कान बेपत्ता, कुणाच्या नाकाच्या जागी फक्त भोकं उरलेली. कुणाचा जबडा, कुणाची हनुवटी बेपत्ता, कुणाच्या भुवया आणि पापण्याच जळून गेलेल्या. कुणाचे ओठच कापले गेल्यामुळे तोंडाच्या जागी फक्त एक लांबट चीर दिसते आहे.
 
 
अशा जखमींवर उपचार करण्याची जबाबदारी ब्रिटिश सरकारने डॉ. हेरॉल्ड गिलिस या शल्यक्रियाविशारदावर-सर्जनवर सोपवली. किंबहुना ब्रिटिश सैन्याचा मुख्य वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉ. सर विल्यम अर्बुथनॉट-लेन याच्यामागे लागून डॉ. गिलिसने अशा चेहरे विद्रूप झालेल्या सैनिकांवर शल्यक्रिया करण्यासाठी खास रुग्णालय उघडायला लावलं. 1917च्या जून महिन्यात लंडन शहरात हे एक हजार खाटांचं खास रुग्णालय उघडण्यात आलं. पुढच्या वर्षभरात डॉ. हेरॉल्ड आणि त्याच्या सहकार्‍यांनी किमान पाच हजार सैनिकांवर 11 हजार शल्यक्रिया करून त्यांना त्यांचे चेहरे परत मिळवून दिले. आज ज्याला आपण ‘प्लास्टिक सर्जरी’ म्हणतो, त्या शल्यशस्त्रक्रियेचा जन्म हा असा झाला.
 
 
या शल्यक्रियांसाठी त्या रुग्णालयात शरीराच्या अन्य भागांवरील कातडी काढून वापरणं किंवा इतर अनेक बारीकसारीक तांत्रिक क्रियांचा शोध डॉ. हेरॉल्डला त्या शल्यक्रिया करीत असतानाच लागत गेला. निवेदनातला हा तांत्रिक भाग तज्ज्ञ वाचकांसाठी आवश्यक, पण सामान्य वाचकांसाठी कंटाळवाणा होण्याचा धोका असतो. लेखिकेने तसं होऊ न देता दोन्ही गटातील वाचकांचं कुतूहल शमेल, असं लेखन केलं आहे.
 
 
डॉ. हेरॉल्ड गिलिसचा जन्म 1882 सालचा. तो मूूळचा न्यूझीलंडचा. 1903 साली तो केम्ब्रिजमध्ये दाखल झाला. मग आपल्या वैद्यकीय संशोधनात तो इतका गुंग होउन गेला की, थेट 1956 साली तो एकदा न्यूझीलंडला भेट देऊन आला. 1960 साली तो लंडनलाच मरण पावला. त्याने निर्माण केलेल्या ‘प्लास्टिक सर्जरी’ या विज्ञानशाखेच्या आता ‘री-कन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी’ आणि ‘कॉस्मेटिक सर्जरी’ अशा दोन नव्या शाखा निघाल्या आहेत.
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.