आपल्या देशात हत्तींच्या अस्तित्वाचा इतिहास मोठा आहे. पूर्वेकडील उत्तरखंडपासून ते केरळ पर्यंत हे दिसून येते. जंगलात हत्तींचा वावर हा जंगलाच्या समृद्धीचा मापदंड आहे. परंतु, गेल्या काही वर्षातील मानवी क्रियाकलापांमुळे या प्राण्याचे अधिवासावर परिणाम झाला आहे. त्यामुळे, या हत्तींवर स्थलांतरीत होण्याची वेळ आली आहे. जाणून घेऊया भारतातील हत्तींबद्दल...
गेल्या महिन्याच्या बातम्यांमधील सर्वात लक्षवेधून घेणारी बातमी होती. ती म्हणजे, छत्तीसगढमधून 35 हत्तींनी महाराष्ट्राच्या गडचिरोलीला धडक दिली. त्या हत्तींनी अजून 100 किमींचा प्रवास करून नवेगाव नागझिरा उद्यानात थाट मांडलाय. असे म्हटले जात आहे की, हत्तींचा हा कळप आता त्याच कॉरिडॉरमध्ये फिरतोय, जिथे त्यांचे पूर्वज 300 वर्षांपूर्वी फिरायचे. ऐतिहासिकदृष्ट्या, हत्ती संपूर्ण भारतीय उपखंडात पसरलेले होते. परंतु, आता त्यांची लोकसंख्या देशभरात विचित्र पद्धतीने अस्तित्व टिकवून आहे. प्रामुख्याने हे दक्षिण, उत्तर आणि ईशान्य भारतात आढळतात. भारताचा जवळजवळ पाच टक्के भूभाग हा ’प्रोटेक्टेड’(रिझर्व्ह) आहे, म्हणजेच वन्यजीवांसाठी राखीव आहे. असे असता, 80 टक्के हत्ती हे या ’प्रोटेक्टेड’(रिझर्व्ह) भागांचा बाहेर आढळतात. भारतामध्ये हत्तीला बर्याच वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते, एक दैवी व अत्यंत हुशार प्राणी, गोष्टींमधला नायक, जंगलांचा राखणदार आणि या उलट, त्याला विनाशाचा अग्रदूतसुद्धा म्हटले जाते. आजच्या लेखात हत्ती या बहुआयामी प्राण्याविषयी जाणून घेऊया.
जगभरातील पौराणिक कथांमध्ये हत्तींचा उल्लेख आढळतो आणि हिंदू धर्मामध्ये त्यांना खास महत्त्व आहे. हा हिंदूंचा सर्वात महत्त्वाच्या देवताचा जीवंत अवतार मानला जातो, तो म्हणजे गणेश किंवा गणपती. अर्थात, गणपतीच्या आगळ्यावेगळ्या रूपामागील कथा आपल्याला माहीतच असेल आणि ती पुन्हा सांगायची गरज नाही. विद्वानांच्या मते, गणपतीच्या प्रत्येक भागाचे प्रतीकात्मक महत्त्व आहे. त्याचे डोकं बुद्धी आणि ज्ञान प्राप्त करण्याच्या क्षमतेचे प्रतीक आहे, तर त्याचे मोठे कान काळजीपूर्वक ऐकण्यासाठी धैर्य देतात. गणेशाचे छोटे डोळे भविष्य पाहतात आणि सत्य ओळखू शकतात, तर त्याची लांब सोंड चांगले आणि वाईट शोधण्यात मदत करते. त्याचप्रमाणे मोठे पोट आयुष्यातील सर्वोत्तम आणि वाईट हे दोन्ही अनुभव पचवण्याच्या क्षमतेचे प्रतीक आहे. इंद्रदेवाच्या वाहनाचे नाव ’ऐरावत’ आहे आणि तो कोणी दुसर्या प्राणी नसून हत्ती आहे. हत्ती त्याच्या शहाणपणा, बुद्धिमत्ता आणि संयमासाठी प्रसिद्ध आहेच व ते बुद्ध यांच्याशी फार पूर्वीपासून संबंधित आहेत, ज्यांच्या शिकवणीने (धम्म) बौद्ध धर्माची स्थापना केली. धर्मग्रंथांनी बुद्धाचे वर्णन हत्तीचे प्रतीक म्हणून केले आहे - शांत, समतोल आणि सावध. पाषाण युगापासून, जेव्हा हत्तींना प्राचीन कातळशिल्प आणि गुहेतील कलेद्वारे दर्शविले जात होते, तर त्यापुढे ते चित्र, शिल्प, संगीत, चित्रपट आणि अगदी वास्तुकला यासह विविध कला प्रकारांमध्ये चित्रित केले गेलेत. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील सड्यावर हत्तीच्या आकाराचे कातळशिल्प आढळले आहे, ज्याच्यातून हत्तीचा मानव आयुष्यावर किती प्रभाव होता ते दिसून येते.
वर स्पष्ट केल्याप्रमाणे, भारतातील 80 टक्के हत्ती संरक्षित क्षेत्राबाहेर आहेत. या वस्तुस्थितीमागील कारण म्हणजे हत्ती, ही अत्यंत गतिमान प्रजाती आहेत. त्यांना अस्तित्वासाठी प्रचंड भूभाग लागतो आहे. आफ्रिकेतील हत्ती कोरड्या हंगामात पाणी शोधण्यासाठी शेकडो मैलांचा प्रवास करतात. त्याचप्रमाणे आशियाई हत्तींनाही जगण्यासाठी मोठ्या जंगलांची आवश्यकता असते. औद्योगिकीकरण, वाढती लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जंगले, गवताळ प्रदेश आणि विविध नैसर्गिक अधिवासांमध्ये कमालीची घट झाली आहे, जे हत्तींच्या अस्तित्वासाठी फारच गरजेचे आहे. उष्णकटिबंधीय देशांमध्ये आपण भूउपयोगात एक विलक्षण कल पाहतो; तो म्हणजे संरक्षित क्षेत्रातील जंगले कृषी क्षेत्रांनी वेढलेली असतात. ऐतिहासिकदृष्ट्या, शेतीसाठी जागा तयार करायला जंगले साफ केली गेली, तीच ‘फॅशन’ अजूनही सुरू आहे. यामुळे तृणभक्षी प्राण्यांकडून पिकांची नासधूस, मांसाहारी प्राण्यांकडून पाळीव गुरांची शिकार यासारखी स्थिती निर्माण होते, जी अशा भागातील लोकांसाठी हानिकारक आहे. हत्ती हे मानव-वन्यजीव संघर्षाच्या केंद्रस्थानी आहेत. भारतात जिथे जिथे हत्तीचं अस्तित्व आहे, तिकडच्या शेताजवळ त्यांचा पाऊलखुणा आढळतातच, पिकं खाणे आणि ती खाताना त्यांना तुडवणे हे सामान्यपणे दृष्टीस येते. बदल्यात शेतकरी हत्तींकडे आक्रमक होतात, तेव्हाच परिस्थिती चिघळते.
जंगलाजवळ शेती आणि फळबागा असल्याकारणाने हत्तींना अन्न शोधावे लागत नाही. त्यामुळे ते सारखे यायला लागतात. पूरक पोषण आणि राहायला जागा मिळाल्यावर हत्तीचा कळप जास्त लांब वावरत नाही. त्यांना शेतीपासून लांब ठेवायचे बरेच उपक्रम राबवले गेले, पण हत्ती हा अतिशय बुद्धिमान प्राणी असल्याकारणाने तो प्रत्येक उपक्रमावर तोडगा काढून शेत आणि फळं खाण्यास यशस्वी होतो. सोलर फेन्स (विद्युत तार), फटाके, आग/आजचे गोळे, आवाज करणे, मधमाशांचा वापर, इत्यादी प्रकार आपल्याकडे वापरून झाले आहेत, पण हत्तींना कायमचे दूर ठेवण्यात 100 टक्के यश मिळाले नाही. यामुळे माणसांना नाईलाजाने शस्त्रं उचलावी लागतात. शेतकरी बरेच महिने शेतात पिकं, फळं आणि भाज्या पिकवण्यास राबतो आणि जेव्हा त्याचा कष्टाचे चीज व्हायची वेळ येते, तेव्हाच हत्ती येऊन सर्व नष्ट करून टाकतो, मग ते शेतकरी आक्रमक होणार नाहीत का?
देशभरात हत्ती-मानव संघर्षामध्ये हजारो हत्ती आणि मानव बळी पडतात. या गोष्टीला ना पूर्णपणे माणूस जबाबदार आहे, ना हत्ती. हत्तींची त्यांच्या सुळ्यासाठी म्हणजेच ‘इव्हरॉय’साठी शिकार केली जाते. फक्त आशियन हत्तींच्या नरांमध्ये सुळे दिसतात, त्यामुळे त्यांना अनेकदा लक्ष्य केले जाते. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, शिकार करण्याच्या अत्यंत दबावामुळे हत्तींना सुळे येणं बंद झाले आहे. तामिळनाडूमध्ये सुळे नसलेल्या हत्तींना ’मखना’ म्हणतात. 2016 साली केनिया सरकारने 105 टन ‘आयव्हरी’ पेटवली, या कृती मागचा हेतू जगाला केनियामधील हत्तींवरील शिकारीच्या भीषण संकटाचा संदेश देणं.
मानव-हत्ती संघर्ष कमी करण्यावर भर देणारे नियुक्त धोरण असणे, ही काळाची गरज आहे. हत्तींकडून नुकसान झालेल्या पिकांची वेळेवर भरपाई, हत्तींना दूर ठेवण्यासाठी संशोधनाभिमुख उपाययोजना आणि हत्तींना इजा पोहोचवणार्यांना कठोर शिक्षा यासारख्या बाबींचा त्यात अंतर्भाव करणे गरजेचे आहे.