होय, हिंदूच!

    08-Oct-2022   
Total Views |
 
हिंदू
 
 
 
सोक्रेटिसने सांगितलेल्या वक्तव्याच्या तीन कसोटी आहेत - बोलणे हे सत्य, उपयुक्त व हितकारक असावे. तसे नसेल तर बोलू नये. गीतेत भगवंतानी सांगितले आहे - अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत्। अर्थात, बोलणे हे उद्वेग निर्माण न करणारे, सत्य, प्रिय व हितकारक असावेत. त्या उपदेशाला अनुसरून - जे उद्वेग निर्माण करते, जे सत्य नाही, जे प्रिय नाही, जे हितकारक नाही आणि जे आपल्याला उपयुक्त पण नाही, असे वक्तव्य आपण का ऐकावे? कुणी असे म्हटले की, चोल राजे हिंदू नव्हते. त्या वक्तव्याची सत्यता पडताळण्यासाठी हिंदू म्हणजे काय आणि चोल राजे कोण होते, याचा शोध या लेखातून घेऊयात.
 
 
हिंदू धर्म इतका प्राचीन आहे की तो इतर धर्मांच्यापेक्षा वेगळा आहे, हे समजण्यासाठी त्याला नाव देण्यासाठी त्यावेळी दुसरा कोणताही धर्म अस्तित्वात नव्हता. हिंदूंनी स्वत:च्या धर्माला ‘सनातन धर्म’ म्हटले. ज्याला आदि नाही, अंत नाही असा धर्म... जो मानव जातीच्या सुरुवातीपासून अस्तित्वात आहे असा धर्म.
 
 
ज्यावेळी बाहेरील लोकांना भारतीयांची ओळख झाली, तेव्हा त्यांनी देशाला, तिथे राहणार्‍यांना आणि त्यांच्या धर्माला नाव दिले. इसवी सन पूर्व सहाव्या शतकात पारशी लोकांनी आपल्याला ‘सिंधू’ नदीवरून ‘हिंदू’ म्हटले. इसवी सन पूर्व चौथ्या शतकात ग्रीकांनी ‘हिंदू’चे‘इंडस’ व ‘हिंद’चे ‘इंडिया’ केले. अरबांनी ‘हिंद’ म्हटले. चिनी लोकांनी ‘इंदू’ म्हटले. एकूणच लक्षात येईल की, हिंदू/इंदू/इंडियन हे शब्द एकाच शब्दाचे वेगवेगळ्या लोकांनी केलेले वेगवेगळे उच्चार आहेत. ही सगळी नावे एकाच धर्माची आहेत.
 
 
 
 
हिंदू
 
 

सूर्य, हनुमान

 
 
 
‘हिंद’ म्हणजेच ‘इंडिया’, हिंदू म्हणजेच इंडियन
 
 
भारतीयांनी मात्र स्वत:च्या देशाला - ‘भारतवर्ष’, ‘जंबूद्वीप’, ‘भारतखंड’ अशा नावांनी संबोधले. प्राचीन ग्रंथात ‘इंडिया’ असे नाव मिळणार नाही. संस्कृत अथवा तामिळ पुराणातसुद्धा ‘इंडिया’ हे नाव मिळणार नाही. त्याचा अर्थ ‘चंद्रगुप्त मौर्य इंडियन नव्हता’ किंवा ‘गौतमीपुत्र सातकरणी इंडियन नव्हता’ किंवा ‘पृथ्वीराज चौहान इंडियन नव्हता,’ असा जर कुणी केला तर ते चूक आहे!
 
 
अगदी तसेच भारतीयांनी ग्रंथात स्वत:चे - साधू, साध्वी, वैष्णव, शैव, नाथपंथी, वैदिक, पौराणिक, स्मार्त, शाक्त, कापालिक, जैन, बौद्धपासून पिता, पुत्र, कन्या, राजा, नागरिक, मानवपर्यंत अनेक ‘धर्म’ सांगितले आहेत. पण, सरसकट सगळ्यांना ‘हिंदू’ हे नाव धार्मिक ग्रंथात सापडणार नाही. त्याचा अर्थ जर कोणी ‘मौर्य हिंदू नव्हते’ किंवा ‘यादव हिंदू नव्हते’ किंवा ‘होयसळ हिंदू नव्हते’ असा केला तर ते पण चुकीचेच आहे.
 
 
‘हिंदू’ हा शब्द बाहेरचा व अर्वाचीन असल्याने त्याच्या अलीकडच्या काळात वेगवेगळ्या व्याख्या केल्या गेल्या.
आपण वर पाहिलेच आहे की, पाश्चिमात्यांच्या दृष्टीने ‘हिंदू’ या शब्दाचा अर्थ ‘इंडियन’ या शब्दाप्रमाणेच ‘हिंद’ किंवा ‘इंडिया’चा रहिवासी असा आहे.
 
 
संविधानानुसार ‘हिंदू’ म्हणजे-शीख, जैन, बौद्ध, वैष्णव, शैव, शाक्त, लिंगायत, नाथपंथी, वारकरी, ब्रह्मो समाज, प्रार्थना समाज, भटके विमुक्त, वनवासी, जनजाती इत्यादी सर्व पंथीय हिंदू आहेत. भारतात राहणारी व्यक्ती जी पारशी नाही, ज्यू नाही, मुस्लीम नाही किंवा ख्रिश्चन नाही, ती सुद्धा हिंदू आहे. Article 25(2)(b)
 
 
स्वा. सावरकरांच्या व्याख्येनुसार - जो सिंधू नदीपासून सागरापर्यंत पसरलेल्या देशाला आपली पितृभूमी व आपली पुण्यभूमी मानतो तो हिंदू.
 
 
 
 
 
हिंदू
 
 
 
 
आणि सामान्य भारतीयाच्या दृष्टीने, जो वेद मानतो, पुराण मानतो, वैदिक वा पौराणिक देवतांची उपासना करतो तो हिंदू आहे.
आता चोल राजांना वरील सर्व व्याख्यांच्या नुसार ‘हिंदू’ म्हणता येईल का ते पाहू.
 
 
दक्षिणेतील 12 अलवार वैष्णव संत चोलांना पूज्य होते. 63 शिवभक्त असलेले नयनार संत चोलांना पूज्य होते. त्यांनी बांधलेल्या मंदिरातून नयनारांच्या मूर्ती पाहायला मिळतात. अगस्ती आदि वैदिक ऋषींच्या मूर्तील पाहायला मिळतात.
चोल राजांनी बांधलेली मंदिरे पाहा- बृहदेश्वर शिव मंदिर, कोरांगनाथ विष्णू मंदिर, ऐकुडी बालसुब्रमाण्यम स्कंद मंदिर, ऐरावातेश्वर शिव मंदिर इत्यादी शेकडो मंदिरे आहेत. श्रीलंका जिंकल्यावर तिथे सुद्धा चोलांनी बांधलेली हिंदू देवांची मंदिरे आहेत. चोल मंदिरांतून इंद्र, अग्नी, वरुण, वायू, ब्रह्म, सूर्य, विष्णू, हरिहर, अर्धनारीश्वर, नटराज, सप्तमातृका, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, गणपती, कामदेव, रति आदी वैदिक व पौराणिक देवतांच्या मूर्ती आहेत.
 
 
चोल काळात निर्माण केल्या गेलेल्या ब्राँझच्या मूर्ती त्यांचे सौंदर्य, रेखीवपणा आणि तंत्रज्ञान यासाठी प्रसिद्ध आहेत. यामध्ये - नटराज, शिव-पार्वती, विष्णू-लक्ष्मी, हरिहर, बाळकृष्ण इत्यादींच्या अत्यंत मनोहर मूर्ती आज भारतात आणि जगातील अनेक संग्रहालयातून पाहायला मिळतात.
 
 
 
 
हिंदू
 
 
 
चोलांनी संस्कृत, तामिळ, तेलगु व कन्नड भाषेत लेख लिहिले आहेत. कैलासनाथर मंदिरावरील शिलालेखात चोल राजाने काशीहून आलेल्या साधूंची विविध ग्रामांमध्ये राहण्याची व्यवस्था केल्याचे लिहिले आहे. राज राजा चोलने बृहदेश्वर मंदिर बांधण्यासाठी काशीहून चार विद्वान पंडित बोलावून घेतल्याचे लिहिले आहे. उमापरमेश्वरी देवीला सोन्याचे दागिने करून घातल्याचे लिहिले आहे. कल्याणसुंदर मूर्तीला अर्थात शिव-पार्वतीच्या विवाह मूर्तीला दागिने अर्पण केल्याचे एका लेखात लिहिले आहे. असा हिंदू धर्मातील साधूसंतांचा, योग्यांचा, विद्वानांचा, पंडितांचा, देवांचा, मंदिरांचा उल्लेख असलेले शेकडो दानपत्रे वा शिलालेख आहेत.
 
 
चोलांच्या मंदिरातून गंगा, यमुना, सरस्वतीच्या मूर्ती पाहायला मिळतात. गंगा-यमुना-सरस्वती नद्या चोलांना पूज्य होत्या. उत्तरेला जेव्हा गंगेपर्यंत चोल राज्याचा विस्तार झाला, तेव्हा राजेंद्र चोल राजाने नवीन राजधानी बांधली-गंगईकोंड चोलपुरम्.
चोल राजे पारशी, ज्यू, मुस्लीम किंवा ख्रिश्चन नव्हते, म्हणून आजच्या संविधानानुसार ते हिंदू होय. त्यांना सिंधूपासून समुद्रापर्यंतची भूमी पितृभूमी व पुण्यभूमी होती म्हणून ते हिंदू. शिव-विष्णू-पार्वती-स्कंद-गणपती-इंद्र हे देव ते पूजत म्हणून सुद्धा ते हिंदूच! वरील सर्व निकष लावून त्यांना आजच्या भाषेत ‘हिंदू’ असेच संबोधले जाईल.
 
 
आता चोल राजे हिंदू नव्हते असे म्हणणरे स्वत: कोण आहेत, हे तपासायला हवे. जे हिंदूंचे विभाजन करू इच्छितात ते हिंदू आहेत का? जे हिंदुस्थानला तोडू पाहतात ते हिंदुस्थानी आहेत का? ते भारताला पुण्यभूमी मानतात का?
ज्यांना हिंदुस्थानविषयी आत्मियता नाही, ज्यांना भारताविषयी आस्था नाही, जे खोटे बोलून भारतीयांच्यामध्ये फूट पडतात, अशा लोकांची संगत नको! त्यांचे बोलणे ऐकू नये, त्यांचे शब्द वाचू नयेत हेच उत्तम.
 
 
ज्या देशाने सत्याला देवापेक्षा मोठे स्थान दिले, ज्या देशाचे ब्रीद ‘सत्यमेव जयते’ आहे, त्या देशात खोटे बोलण्याला, त्यातूनही जाणूनबुजून खोटे बोलण्याला, जनात मोठे स्थान असलेल्या मनुष्याच्या खोटे बोलण्याला अतिशय कठोर दंड असायला हवा.
खोटे बोलून, नुकसान करून नंतर माफीनामे देऊन नामानिराळे होणे जनता स्वीकारणार नाही, हे महाजनांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे ... म्हणून हा लेख.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.