पाकिस्तान, कारा-कलपाकस्तान, ज्येष्ठमध वगैरे

Total Views |
 
काराकलपाक
 
 
 
 
गेल्या साधारण पाच वर्षांच्या काळात काराकलपाक लोकांना अचानकपणे एका नव्या फायदेशीर व्यवसायाचा शोध लागला आहे. तो म्हणजे ज्येष्ठमध या औषधी वनस्पतीची शेती. अरल समुद्राच्या पात्रात आणि परिसरात ही झाडं विपुल प्रमाणात आहेत. ती मुळासकट उपटायची आणि त्याचे भारे बांधून ‘काराकलपाक बोयान’ या कंपनीच्या आवारात आणून टाकायची हा अनेकांचा रोजगार बनला आहे.
 
 
 
भारताला राजकीय सुधारणा देण्यासाठी नोव्हेंबर 1930 ते डिसेंबर 1932 या कालखंडात इंग्लंडमध्ये तीन गोलमेज परिषदा झाल्या. यातली तिसरी आणि शेवटची परिषद दि. 24 डिसेंबर, 1932 रोजी संपल्यानंतर मार्च 1933 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्याबाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली. पण, त्यादरम्यान जानेवारी 1933 मध्ये एक महत्त्वपूर्ण घटना घडली. चौधरी रहमत अली या एका पंजाबी वकिलाने ‘पाकस्तान-नाऊ ऑर नेव्हर’ या मथळ्याचं एक पत्रक लंडनमध्ये प्रसिद्ध केलं. शब्द नीट लक्षात घ्या- ‘पाकस्तान.’ पंजाबसाठी ‘पी’, अफगाणसाठी ‘ए’, काश्मीरसाठी ‘के’ सिंधसाठी‘एस’ आणि बलुचिस्तानमधला ‘स्तान’ असे शब्दांचे अंश घेऊन त्याने ‘पाकस्तान’ हा शब्द बनवला. पुढच्या पत्रकांमध्ये त्याने थोडी सुधारणा करून ‘पाकस्तान’ला ‘पाकिस्तान’ बनवलं. ‘पी’, ‘ए’, ‘के’ ही अक्षरं पहिल्या अर्थानेच आणि ‘आय’ हे अक्षर ‘इंडस’ किंवा ‘सिंध’ या अर्थाने असं जुगाड करून त्याने ‘पाकिस्तान’ हा फारसी, उर्दू भाषांच्या चलनाशी मेळ खाणारा शब्द बनवला.
 
 
 
‘कारा-कलपाकस्तान’ या शब्दाचा या आधुनिक जुगाडाशी काहीही संबंध नाही. किंबहुना, तो शब्द वरीलप्रमाणे तोडून लिहिला-बोलला जातही नाही. पण, भाषिक वैशिष्ट्य लक्षात यावं म्हणून मी मुद्दाम तो तसा लिहिला आहे. कारा म्हणजे काळा. हिंदी भाषेच्या जवळपास सर्व बोलींमध्ये ‘काळा’ या शब्दाचा ‘कारा’ हा प्रतिशब्द अस्तित्वात आहे. श्रावणाच्या ऋतुमध्ये ‘उमडघुमड कर’येणार्‍या ‘कारे बादरवा’ म्हणजे काळ्या ढगांच्या वर्णनांची असंख्य गीतं आहेत.
 
 
 
‘कलपाक’ किंवा ‘कल्पाक’ म्हणजे एक विशिष्ट जातीच्या मेंढीच्या लोकरीची बनवलेली उंच टोपी. या टोपीचं वैशिष्ट्य म्हणजे बाहेर ऊन असताना ती डोक्याला, मानेला आणि कानांना थंडावा देते, तर बाहेर थंड हवा असताना आतल्या अंगाला ऊब देते. ही कल्पाक मेंढी मध्य आशियाई भागात सर्वत्र आढळते.
 
 
 
आता ‘स्तान’ हा सरळच ‘स्थान’ या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे. हा, पण तसं कोणताही आंतरराष्ट्रीय भाषातज्ज्ञ कबूल करीत नाही. त्यांच्या मते ‘स्तान’ हा जुन्या पर्शियन किंवा फारसी भाषेतला शब्द आहे आणि ही जुनी फारसी भाषा किंवा नवी इराणी भाषा या ‘इंडो-इरानियन भाषिक कुल’ या कुळापासून निघालेल्या आहेत. तशाच संस्कृत आणि इतर उत्तर भारतीय भाषाही त्याच कुळापासून निघालेल्या आहेत.या सगळ्या शब्दांच्या खेळाचं तात्पर्य हे की, फारसी ही प्राचीन भाषा आहे; संस्कृत नव्हे. कारण, संस्कृत ही प्राचीन भाषा आहे, हे मान्यकेलं, तर मग भारत देश आणि तिथले हिंदू लोक यांचंही प्राचीनत्व मान्य करावं लागतं ना!
असो. तर ‘कारा-कलपाक-स्तान’ या शब्दाचा आशय म्हणजे ‘कळपाक या काळ्या लोकरीची टोपी घालणार्‍या लोकांचा देश.’ आता शब्दांची गंमत पाहा. ‘कलपाक’ किंवा ‘कल्पाक’प्रमाणेच ‘अलपाक’ किंवा ‘अल्पाका’ नावाचा मेंढीसदृश प्राणी मुख्यतः दक्षिण अमेरिकेत आढळतो. जीवशास्त्रीयदृष्ट्या तो मेंढीच्या कुळातला नाही. पण, मेंढीसारखाच दिसतो आणि अंगावरील उबदार लोकरीसाठी मेंढीप्रमाणे पाळला जातो. एकेकाळी म्हणजे मराठी माणूस जेव्हा धोतर, सदरा, कोट,टोपी असा वेष धारण करीत असे, त्या काळात अल्पाका वुलनचा कोट घालणं ही अद्ययावत ‘फॅशन’ होती. आता कृत्रिम धाग्यामुळे वुलनचे कोट, सूट मागे पडले.
 
 
 
काराकलपाकस्तान हा सध्याच्या उझबेकिस्तान या देशातला एक स्वायत्त प्रांत आहे. अयोध्या आंदोलनाच्या काळात आपल्याकडे एक घोषणा फार लोकप्रिय झाली होती. ‘तेल लगायो डाबर का और नाम मिटा दो बाबर का!’ आता यात ‘डाबर’ या आयुर्वेदिक औषधी उत्पादक कंपनीचा काहीही संबंध नवहता. पण ‘डाबर’ आणि ‘बाबर’ हे छान यमक जुळलं. या ‘डाबर ’नावाचीही एक वेगळीच गंमत आहे. डॉ. एस. के. बर्मन हे खरं म्हणजे आयुर्वेदिक वैद्य होते.1884 साली त्यांनी कोलकाता शहरात दारोदार फिरून आपली औषधं विकायला सुरुवात केली. तत्कालीन कोलकात्यात ‘कॉलरा’ आणि ‘मलेरिया’ हे रोग वारंवार धुमाकूळ घालीत. डॉ. बर्मन यांच्याकडे त्यांवर रामबाण औषधं होती. औषधं आणि डॉक्टर दोन्ही लोकप्रिय झाले. डॉक्टरमधला ‘डा’ आणि बर्मनमधला ‘बर’ अशी लघुरूपं (मराठीत ‘शॉर्टफॉर्म’) वापरून ‘डाबर’ ही कंपनी सुरू झाली. आज भारतासह अनेक देशांमध्ये कोट्यवधींचा व्यवसाय करणारी ती एक अव्वल बहुराष्ट्रीय कंपनी आहे.
 
 
 
आणि बाबर हा उझबेग तुर्क होता. मुघल हे त्याच्या कबिल्याचं नाव होतं. चंगेझखान हा मंगोल म्हणजे आजच्या मंगोलियाचा रहिवासी होता. मंगोलियापासून पूर्व युरोपपर्यंत त्याचं विशाल साम्राज्य होतं. पुढे त्याचा एक मुलगा चगताईखान याच्या नंतरच्या पिढीतल्या कुणीतरी इस्लामचा स्वीकार केला. चगताई, चंगेझ हे निसर्गपूजक होते. मध्य आशियातल्या तुर्कवंशीय कबिल्यांनीही याच काळात केव्हातरी इस्लामचा स्वीकार केला. हे मंगोल आणि तुर्क यांच्यात रोटीबेटी संबंध झाले. चगताईखानाच्या घरातली एक मुलगी फरघान या ‘खानत’मधल्या तैमुरच्या घराण्यात दिली गेली. आता इथेही शब्दांची गंमत पाहा. इस्लामचा उगम अरबस्तानात झाला. तिथे ‘खान’ ही पदवी नाही. पण, मंगोल आणि तुर्कांमध्ये ‘खान’ ही पदवी होती. श्रेष्ठ, प्रमुख म्हणजे खान आणि या खानाची राजवट म्हणजे ‘खानत’ किंवा इंग्रजीत ‘खानेट.’ जशी सुलतानाची ती ‘सल्तनत’ तशी खानाची ती ‘खानत.’ आता हा तैमूर तुर्कवंशीय होता. त्याचा खापर-खापर-खापर पणतू म्हणजे बाबर. तैमूरचा एका लढाईत पाय तुटला होता. म्हणून त्याला ‘तैमूरलंग’ म्हणजे ‘लंगडा तैमूर’ असं नाव पडलं होतं. त्याचाच इंग्रजी अपभ्रंश म्हणजे ‘टॅमरलेन.’
 
 
 
बाबरापासून औरंगजेबापर्यंत सर्व बादशाहांना आपण चंगेझखान किंवा खरं तर चगताईखान आणि तैमूरलंग यांचे वारस आहोत, याचा फार अभिमान वाटत असे. पुढे सदाशिवभाऊ पेशव्यांनी दिल्लीचं पातशाही तख्त घणाचे घाव घालून फोडलं, तेव्हा ‘चकत्यांची पातशाही’म्हणजे ‘चगताई पातशाही बुडाली’ म्हणून दिल्लीतल्या मुसलमानांना फार दुःख झालं. ‘चकत्यांची पातशाही’ हे खास मराठी शब्द हा वृत्तांत दिल्लीहून पुण्याला कळवणार्‍या पत्रलेखकाचे.
 
 
 
तसाच ‘मोगल’ किंवा ‘मोंगल’ हा शब्द ‘मुघल’ या मूळ शब्दाचा आपल्या लोकांनी केलेला अपभ्रंश आहे. त्याचा ‘मंगोल’शी संबंध नाही. तैमूरलंग हा फरघाना राज्याचा तुर्कवंशीय मुघल कबिल्याचा अमीर होता. ‘अमीर’ म्हणजे ही प्रमुख, श्रेष्ठ. या नंतरच्या काळात इस्लामी राजवटींमध्ये अरबी शब्दांबरोबरच असंख्य तुर्की, मंगोली, मध्य आशियाई, फारशी शब्द रूळत गेले. खान, अमीर हे त्यातलेच शब्द.इस्लामी जगतातला सर्वश्रेष्ठ जो खलिफा, त्याचं स्थानदेखील अरबस्तानातल्या बगदादहून अनातोलियातल्या इस्तंबूलला हललं. म्हणजे खलिफा पद अरबांकडून तुर्कांकडे आले.
 
 
 
तर ‘उझबेग’ हा मूळ शब्द ‘उझ’ म्हणजे मूळचे आणि ‘बेग’ म्हणजे मालक स्वामी धनी म्हणजे सिरदर्या आणि अमुदर्या या दोन नद्यांच्या खोर्‍यात वसलेल्या भूमीचे मूळ मालक ते उझबेग तुर्क. आता इंग्रजी आणि रशियन प्रभावामुळे हा शब्द ‘उझबेक’ असा लिहिला जातो. त्या उझबेकांची भूमी तो उझेबेकिस्तान.
 
 
 
1920 सालानंतर सोव्हिएत रशियाने मध्य आशियातले सगळे तुर्कवंशीय देश क्रमाक्रमाने आपल्या पंजाखाली आणले. त्यात 1924 साली उझबेकिस्तानचाही क्रम लागला.सोव्हिएत राजवटीने अनेक अचाट उद्योग केले. त्यातला एक म्हणजे फरघाना प्रांतातल्या कापूस उत्पादनाला भरपूर पाणी उपलब्ध व्हावं म्हणून त्यांनी 1930 साली सिरदर्या नदीवर एक प्रचंड धरण बांधलं. याचा परिणाम अरल समुद्रावर झाला. उझबेकिस्तानाच्या वायव्येला काराकलपाकस्तान हा स्वायत्त प्रांत आहे. राष्ट्रीयदृष्ट्या काराकलपाक नागरिक हे उझेबेकीच असले तरी त्यांची राहणी,भाषा, सभ्यता, उझबेकींपेक्षा वेगळी आहे. काराकलपाकस्तानच्या सीमेवर अरल समुद्र हे तब्बल 68 हजार चौरस किमी क्षेत्रफळाचंविशाल सरोवर आहे. त्याचं पाणी खारट आहे, त्यामुळे त्याला ‘समुद्र’ म्हटलं गेलं असावं. या अरल समुद्रात मासेमारी करणं आणि कलपाक मेंढ्यांचे कळप बनवून त्यांच्या लोकरीपासून नानाविध वस्तू बनवणं, हे कलपाक लोकांचे परंपरागत उद्योग होते. सिरदर्या नदीवरच्या नव्या धोरणामुळे कापूस लागवड हा नवा व्यवसाय त्यांना मिळाला.
 
 
 
पण, जे धरणाच्या ओलिताखाली येत होते, त्यांनाच. बाकीच्यांची पंचाईत झाली. कारण, अरल समुद्राला पाणी पुरवणारी मुख्य नदीच अडवली गेली. त्यामुळे 1930 पासून आज 2022 पर्यंत आटत आटत आज अरल समुद्र एक पाणथळ वाळवंट उरलं आहे. मासेमारी आणि आनुषंगिक व्यवसाय बंद पडले. मग आता काराकलपाक लोकांनी पोटासाठी काय करावं? बहुसंख्य लोक धरणाच्या ओलिताखाली येणार्‍या भागात स्थलांतर करून कापूस पिकवू लागले. पण, इकडे अरल समुद्र परिसरात वाळवंट आक्रमण सुरू करू लागले. एका बाजूने काराकुम वाळवंट आणि दुसर्‍या बाजूला अरलकुम वाळवंट. एकेकाळी जगभरातल्या चौथ्या क्रमांकाचं विशाल सरोवर असणारा अरल समुद्र असा मृत समुद्र होतोय म्हटल्यावर सगळे निसर्गप्रेमी चिंतेत पडले. आता त्याला पुनरूज्जीवित करण्यासाठी बरेच प्रयत्न चालले आहेत. त्यांना थोडफार यशही मिळतं आहे. 1991 साली उझबेकिस्तान हा स्वतंत्र आणि सार्वभौम देश झाल्यापासून त्याची बर्‍यापैकी प्रगती सुरू आहे. मध्यपूर्वेतल्या अरबी इस्लामी देशांप्रमाणे हे मध्य आशियाई तुर्क इस्लामी देश अतिरेकी इस्लामी चळवळींचे अड्डे नाहीत.
 
 
 
गेल्या साधारण पाच वर्षांच्या काळात काराकलपाक लोकांना अचानकपणे एका नव्या फायदेशीर व्यवसायाचा शोध लागला आहे. तो म्हणजे ज्येष्ठमध या औषधी वनस्पतीची शेती. ज्येष्ठमध हे साधारण साडेतीन-चार फूट उंच वाढणारं झाड आहे. त्याला जांबळट रंगाची फुलं आणि फळंही येतात. पण, औषधासाठी वापरली जातात, ती त्याची मूळं. अरल समुद्राच्या पात्रात आणि परिसरात ही झाडं विपुल प्रमाणात आहेत. ती मुळासकट उपटायची आणि त्याचे भारे बांधून ‘काराकलपाक बोयान’ या कंपनीच्या आवारात आणून टाकायची हा अनेकांचा रोजगार बनला आहे. कंपनी ज्येष्ठमधापासून शांपू, चहा, औषधं बनवून त्याची निर्यात करते. 2021 या संपलेल्या वर्षांत निर्यातीचा आकडा 30 दक्षलक्ष डॉलर्सवर पोहोचला आणि जागतिक बँकेच्या नोंदीनुसार उझबेकिस्तान हा ज्येष्ठमध या वस्तूची निर्यात करणारा सर्वोच्च निर्यातदार ठरला.
 
 
 
सर्वच देशांप्रमाणे काराकलपाकस्तानचं एक विशेष मद्य आहे. त्याला ‘काराटो’ असं नाव आहे. ज्येष्ठमध मिसळल्यावर ही काराटो दारू अधिकच चविष्ट लागते, असं त्या विषयातल्या तरबेज लोकांना वाटतं. निसर्गप्रेमींच्या द़ृष्टीनेे महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठमध ही वनस्पती जमिनीतले क्षार खेचून घेते. अरल समुद्र परिसरात ज्येष्ठमधाची पद्धतशीर लागवड सुरू झाल्यामुळे तिथली जमीन आता क्षारयुक्त होऊ लागली आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.