ॠषी सुनक यांचा प्रेरणादायी विजय!

    25-Oct-2022   
Total Views |
 
ॠषी सुनक
 
 
 
 
टीकेतील बहुतांश मुद्दे वस्तुस्थितीला धरून असले तरी सुनक यांचे यश ऐतिहासिक आहे. जगाच्या कानाकोपर्‍यांत स्थायिक झालेल्या सुमारे तीन कोटी लोकांसाठी ते प्रेरणादायी आहे. सुनक यांच्या विजयामुळे त्यांना आपण स्थायिक झालेल्या देशांमध्ये सक्रिय राजकारणात उतरून सर्वोच्च पदाचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवण्याची प्रेरणा मिळेल.
 
 
 
ॠषी सुनक अगदी अनपेक्षितरित्या ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यामुळे, भारतात तसेच जगभरातील भारतीय वंशाच्या लोकांमध्ये आनंदाला उधाण आले आहे. आपल्यातील एक, आपल्यावर दीडशे वर्षं राज्य करणार्‍या देशाच्या पंतप्रधानपदी बसला. असं म्हणतात की, 1947 साली भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना हुजूर पक्षाचे नेते व्हिन्स्टन चर्चिल यांनी भारतीय लोक कमी क्षमतेचे म्हणजेच वाळलेल्या गवताप्रमाणे असतात, असे म्हणून भारताला स्वातंत्र्य टिकवता येणार नाही, अशी दर्पोक्ती केली होती. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतकाळात ऋषी सुनक त्याच हुजूर पक्षाचे नेते म्हणून पंतप्रधानपदी विराजमान होत आहेत, हा दैवी योगायोग आहे. या विजयामुळे भारतातील समाजमाध्यमांवर वादचर्चांना उधाण आले आहे. यामध्ये जसे सुनक यांच्या विजयामुळे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले लोक आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्या पंतप्रधानपदाच्या उपयुक्ततेवर शंका उपस्थित करणारेही आहेत.
 
 
 
सुनक जन्माने ब्रिटिश नागरिक असल्याने ब्रिटनचेच हित पाहतील. त्यांच्या भारतीय वंशामुळे भारतासोबत केल्या जाणार्‍या वाटाघाटींमध्ये त्यांना अधिक टोकदार भूमिका घ्यावी लागेल. सुनक यांचे पंतप्रधानपद औटघटकेचे ठरेल. कारण, सत्ताधारी हुजूर (कॉन्झर्व्हेटिव्ह) पक्षामध्ये टोकाचे मतभेद असून देशाच्या हितासाठी कटू निर्णय घेतल्यास पक्षात उभी फूट पडेल. जर निर्णय नाही घेतले, तर अवघ्या दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या सार्वत्रिक निवडणुकांत हुजूर पक्षाची धूळदाण उडून डाव्या विचारांचा मजूर पक्ष प्रचंड बहुमताने सत्तेवर येईल आणि जरी हुजूर पक्षाला बहुमत मिळाले तरी ऋषी सुनक यांना बाजूला सारले जाऊन कोणा आंग्लवंशीय, श्वेतवर्णीय नेत्यास पक्षाचा नेता म्हणून निवडले जाईल, अशी भीती घालण्यात आली आहे. दुसरीकडे भारतात काँग्रेस नेते आणि समाजातील त्यांच्या भाटांकडून ‘बघा, धर्माच्या आधारावर युरोपपासून वेगळा झालेल्या ब्रिटनमध्ये एक सश्रद्ध हिंदू पंतप्रधान होऊ शकतो,’ असे म्हणत भाजपवर टीका केली आहे.
 
 
 
 
टीकेतील बहुतांश मुद्दे वस्तुस्थितीला धरून असले तरी सुनक यांचे यश ऐतिहासिक आहे. जगाच्या कानाकोपर्‍यांत स्थायिक झालेल्या सुमारे तीन कोटी लोकांसाठी ते प्रेरणादायी आहे. सुनक यांच्या विजयामुळे त्यांना आपण स्थायिक झालेल्या देशांमध्ये सक्रिय राजकारणात उतरून सर्वोच्च पदाचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवण्याची प्रेरणा मिळेल. ॠषी सुनक यांच्यापूर्वीही भारतीय वंशाचे लोक मॉरिशस, फिजी, सुरीनाम, पोर्तुगाल आणि आयर्लंडसारख्या देशांमध्ये सर्वोच्चपदांवर बसले. अमेरिकेतही उपराष्ट्रपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस विराजमान असून कॅनडा सरकारमध्ये शीख मंत्र्यांची संख्या मोठी आहे. ॠषी सुनक तरुण आहेत. उच्चशिक्षित आहेत. यशस्वी आहेत. ‘इन्फोसिस’चे संस्थापक एन. नारायण मूर्तींची कन्या अक्षताशी लग्न केल्याने त्यांची कौटुंबिक संपत्ती इंग्लंडच्या राजघराण्यापेक्षा जास्त आहे. आज दरडोई संपत्ती आणि शिक्षणाच्या बाबतीत भारतीयांनी त्या त्या देशांत स्थायिक झालेल्या यहुदी समाजालाही मागे टाकले आहे.
 
 
 
आजवर भारतीय वंशाचे लोक पाश्चिमात्य देशांतील मुख्यतः डाव्या-उदारमतवादी पक्षांकडे आकृष्ट होऊन तेथील राजकारणात वरिष्ठ पदावर पोहोचल्याचा इतिहास आहे. हे पक्ष मुख्यतः अल्पसंख्याक, गरीब आणि उच्चभ्रूंचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांच्या राजकारणावर स्थानिक उद्योगांना आणि कामगारांना संरक्षण, आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवाधिकार, महिला आणि अल्पसंख्याकांचे हक्क, टोकाचा पर्यावरणवाद यांचा प्रभाव असतो. ज्याचा भारताशी त्या देशाचे संबंध सुधारण्यात अडसर ठरतो. दुसरीकडे जे काही मोजके लोक पाश्चिमात्य देशांतील उजव्या विचारसरणीच्या पक्षांमध्ये यशस्वी झाले आहेत, त्यांना त्या राजकारणासाठी आपली धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख पुसावी लागली आहे. अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षातील भारतीय वंशाचे यशस्वी लोक कर्मठ ख्रिश्चन आणि अमेरिकन श्रेष्ठत्त्वाबद्दल पराकोटीचा अभिमान बाळगून असतात.
 
 
 
सुनक यांचे वेगळेपण म्हणजे ते उजव्या विचारांच्या हुजूर पक्षाचे नेते असले तरी त्यांनी आपली सश्रद्ध हिंदू ही ओळख लपवली नाही. कदाचित गेल्या काही वर्षांमध्ये ब्रिटनमधील मुख्यतः पंजाबी, गुजराती हिंदू समाज उघडपणे पाकिस्तानधार्जिण्या मजूर पक्षाला धुडकावून उजव्या विचारसरणीच्या हुजूर पक्षाकडे वळला असल्याचा हा परिणाम असावा. ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे सुमारे 15 लाख लोक असून आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या ते सर्वांत वरती आहेत. ब्रिटनमधील हुजूर पक्षामध्ये आजही ‘ब्रेक्झिट’च्या समर्थकांची संख्या मोठी आहे. या पक्षातील नेत्यांना वाटते की, युरोपीय महासंघात मिसळून आपले आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वेगळेपण घालवून बसण्यापेक्षा ब्रिटनने वेगळा मार्ग आखावा. अमेरिका आणि इंग्रजी भाषिक देशांशी आपली विशेष मैत्री आणि ब्रिटिश साम्राज्यातून तयार झालेला राष्ट्रकुल देशांचा संघ यांच्याशी ब्रिटनने भागीदारी करावी.
 
 
 
 
आपण भारत आणि अन्य वसाहतींमध्ये पायाभूत सुविधांचा विकास केला, तिथे लोकशाही रुजवली, लोकांना सुशिक्षित बनवले, असा त्यांचा समज असतो. ऋषी सुनक ब्रिटन आणि भारताला जोडणार्‍या भारतीय वंशाच्या लोकांच्या जीवंत पुलाचा भाग असल्यामुळे त्यांना बदलत्या भारताच्या इच्छा, आकांक्षा आणि संवेदनांची अधिक प्रगल्भ जाणीव आहे. 135 कोटी लोकसंख्या, वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि जगातील सर्वांत मोठी लोकशाही असणार्‍या भारताशी मैत्री हा ब्रिटनचा दैवदत्त अधिकार नसून ती आपल्याला कमवावी लागेल, असे ते भाषणांत नेहमी म्हणतात. त्यासाठी ब्रिटनला अन्य विकसित देशांशी स्पर्धा करावी लागेल. आंग्लवंशीय ब्रिटिश नागरिकांनी भारताला जवळून समजून घेण्याची गरज असल्याने भारतीय विद्यापीठांमध्ये अधिकाधिक संख्येने जाऊन शिकण्याचे आवाहन ते ब्रिटिश समाजाला करतात. दुसरीकडे भारतातील उच्चशिक्षित आणि कुशल तंत्रज्ञांना ते अधिक मोठ्या संख्येने ‘व्हिसा’ देण्याचे ते समर्थन करतात.
 
 
 
ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक त्या देशाचे हित पाहतील आणि भारताशी वाटाघाटी करतानाही पहिले ब्रिटनचा विचार करतील, यात शंकाच नाही. पण, तरीदेखील त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि ज्या कष्टांनी त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना यशस्वी होण्यासाठी मदत केली ते पाहाता, त्यांचे पंतप्रधानपदी बसणे भारतासाठी चांगलीच गोष्ट आहे. सध्या सामाजिक आणि आर्थिक संकटांमुळे ब्रिटन गटांगळ्या खात आहे. एकीकडे महागाईचा दर दहा टक्क्यांहून अधिक आहे. तो आवरण्यासाठी सरकारी योजनांवरील खर्च कमी केला, तर आर्थिक मंदीचे संकट आ वासून उभे आहे. अशा परिस्थितीत आर्थिक शिस्तीची कडू गोळी चाटवणे आवश्यक आहे. या सुधारणा करताना हुजूर पक्षात उभी फूट पडण्याची भीती आहे. बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर होत असलेल्या वादचर्चांमध्ये ऋषी सुनक सगळ्यात प्रभावी ठरले होते. पण, त्यांच्या प्रतिस्पर्धी लिझ ट्रस यांचा वर्ण, वंश आणि लोकानुनयी धोरण राबवण्याचा त्यांचा संकल्प यामुळे हुजूर पक्षाच्या सदस्यांनी अंतर्गत मतदानात लिझ ट्रस यांच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे अवघड निर्णय घेणे आणि ते स्वपक्षीयांच्या तसेच लोकांच्या गळी उतरवण्याचे मोठे आव्हान सुनक यांना पेलावे लागणार आहे. अशा परिस्थितीत सुनक हेच मार्ग काढू शकतात, या विश्वासानेच हुजूर पक्षाच्या अर्ध्याहून अधिक खासदारांनी त्यांच्या बाजूने कौल दिला. पंतप्रधान ॠषी सुनक जर ही आव्हानं पेलू शकले तर ते भारत-ब्रिटन संबंधांना एका नवीन उंचीवर नेऊन पोहोचवतील.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अनय जोगळेकर

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.  इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.