चिनी चिप आणि अमेरिकी चाप

    18-Oct-2022   
Total Views |
CHINA CHIP

 
 
कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’च्या विसाव्या अधिवेशनामध्ये शी जिनपिंग यांना अध्यक्षपदाचा तिसरा कार्यकाळ मिळणे जवळपास निश्चित झाले आहे. त्याचवेळी अमेरिकेने चीनवर नेमका निशाणा साधला आहे. अमेरिकेने निर्यात नियंत्रण विषयक नियमांचा एक व्यापक संच सादर केला आहे, ज्यामुळे चिनी कंपन्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, विशेषतः सेमीकंडक्टर विकसित करणे अधिक कठीण होणार आहे. या नियमांचे लक्ष्य केवळ लष्करी उपयोजनामध्ये कार्यरत कंपन्याच आहेत, असे नाही. तर, प्रगत संगणकीय आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील सर्व चिनी तंत्रज्ञान विकास कंपन्यांना त्यामुळे चाप लावण्याचा अमेरिकेचा इरादा आहे. यातून चिनी चिप उद्योगास चाप लावण्यासोबतच अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडन हेदेखील आपल्या पूर्वसुरींप्रमाणेच चीनविषयी कठोर धोरणाचा अंगिकार करतात, हे दाखवून देण्याचा बायडन प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळेच अमेरिकेने स्वदेशी सेमीकंडक्टर उत्पादन, रचना आणि संशोधनाला बळ देण्यासाठी २८० अब्ज अमेरिकी डॉलर्सची तरतूद करणारे विधेयक मंजूर केले आहे.
 
 
 
नवीन नियमांनुसार, अमेरिकी कंपन्यांना चीनला महत्त्वपूर्ण चिप-निर्मिती साधने निर्यात करण्यापासून प्रतिबंधित केले जाईल. तसेच, अमेरिकी नागरिकांना व कंपन्यांना प्रगत चिप-निर्मितीत कार्यरत असलेल्या चिनी कंपन्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष साहाय्य देण्यासही मनाई केली जाईल. चीनकरिता गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या होण्याकरिता अमेरिका आपला थेट परदेशी उत्पादन नियम (एफडीपीआर) वापरत आहे. याद्वारे कोणत्याही अमेरिकी किंवा बिगर अमेरिकी कंपनीला-त्यांच्या संपूर्ण पुरवठा साखळीत अमेरिकी तंत्रज्ञान असलेल्या ‘हार्डवेअर’ किंवा ‘सॉफ्टवेअर’सह सूचीबद्ध चिनी कंपन्यांना पुरवठा करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने हा नियम ‘हुवावे’ला संगणक चिप्स नाकारण्यासाठी वापरला होता आणि त्याचे उत्पादन व विक्री कमी केली होती.
 
 
  
अगदी अलीकडे, युक्रेनवर झालेल्या आक्रमणानंतर, कंपन्यांना रशियासोबत व्यवसाय करण्यापासून रोखण्याकरता याचा वापर केला जात आहे. ज्या कंपन्या चिप्सची निर्यात करतात, अशा अमेरिकी कंपन्या आणि चीनमधील त्याच्या सहयोगी देशांना याचा अपवाद केला जाईल. मात्र, व्यवहारात, अमेरिकी कंपन्यांना चीनमध्ये व्यवसाय करणे कठीण होण्याची शक्यता आहे. काही अमेरिकी कंपन्यांना चीनमध्ये व्यवसाय करणे कठीण बनवून चीन अमेरिकेच्या या खेळीला प्रत्युत्तर देईल अशीही शक्यता आहे. अमेरिका यशस्वी होईल की नाही याचा अंदाज करणे सोपे नाही.
 
 
 
परंतु, चीनची आघाडीची ‘मेमरी चिपमेकर’ कंपनी-यांगत्झे ‘मेमरी टेक्नॉलॉजी कंपनी’ (वायएमटीसी) आणि त्यांच्या प्रोसेसर्सचे आघाडीचे उत्पादक सेमीकंडक्टर ‘मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन’(एसएमआयसी) यांच्या, तसेच उच्च-गुणवत्तेच्या चिप फॅब्रिकेशनमध्ये गुंतलेल्या इतर कंपन्यांच्या प्रयत्नांनादेखील ते खीळ घालतील, यात शंका नाही. चिनी इलेक्ट्रॉनिक कंपन्या आणि इंटरनेट व्यासपीठांवर याचा व्यापक प्रभाव पडेल.
 
 
 
सेमीकंडक्टर डिझाइन आणि उत्पादन यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांत आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा अनेक पिढ्या पुढे राहणे हे अमेरिकेचे जागतिक धोरण होते. परंतु, चिनी प्रयत्न आणि सेमीकंडक्टर ‘मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन’, ‘हुआ हाँग’ आणि ‘यांगत्झे मेमरी टेक्नॉलॉजी’ कंपनी यांसारख्या चिप निर्मात्यांच्या वाढीमुळे बदल घडून आला. ‘५-जी’ आणि ‘हुवावे’च्या बाबतीत चिनी तंत्रज्ञानाचे प्रयत्न सक्रियपणे कमकुवत करण्याविषयीची उपाययोजना अमेरिकेने योजण्याची मागणी आता होत आहे.
 
 
दोन जागतिक महासत्तांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेची चीनविरोधातील कारवाई पाहायला हवी; कारण तैवान आणि युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाला चीनच्या पाठिंब्याच्या संबंधातील ही खेळी आहे. अलीकडच्या वर्षांत, त्यात एक महत्त्वाचा तांत्रिक घटक आहे, जो आता ऐरणीवर आला आहे. चीनविरोधातील तंत्रज्ञान युद्धात अमेरिकेचे बळ दुप्पट झाल्याने चीनला स्वतःचा उद्योग विकसित करण्याच्या प्रयत्नांना चालना देण्याखेरीज पर्याय नाही. २०१४ सालापासून देशातील चिनी सेमीकंडक्टर उद्योगाला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेळ देणार्या आणि मेहनत करणार्या शी जिनपिंग यांच्यासाठी सद्य परिस्थिती व्यक्तिश: अपमानास्पद आहे. त्यासाठी गेल्या अधिवेशनानंतर देशाच्या प्रगतीचा आढावा घेणार्या ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’च्या अधिवेशनाची वेळ साधणार्या अमेरिकेने अतिशय योग्य वेळ साधली आहे.