शेतकरी राष्ट्राध्यक्ष, रुबाबदार राणी नि दुर्लक्षित विद्वान

Total Views |
rajkaran
 
 
 
गेल्या महिन्यात तीन मोठी माणसं काळाच्या पडद्याआड झाली. त्यापैकी एकाने शंभरी ओलांडली होती. दुसरी दोघं नव्वदी ओलांडलेली होती. सोव्हिएत रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह हे ३० ऑगस्ट रोजी मरण पावले. ते ९१ वर्षांचे होते. ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरी ही ८ सप्टेंबर रोजी मरण पावली. ती ९६ वर्षांची होती. भारताचे सुप्रसिद्ध पुरातत्त्वशास्त्रज्ञ प्रो. बी. बी. लाल किंवा ब्रज बासी लाल हे १० सप्टेंबर रोजी मरण पावले. ते १०१ वर्षांचे होते. कालचक्र सतत फिरतच असतं. माणसं सतत मरतच असतात. त्यांच्याबद्दल बातम्या, मृत्यूलेख, श्रद्धांजलीपर लेख, शोकसभा, भाषणं हेदेखील सतत चालूच असतं.
 
 
आता ज्यांच्या मृत्यूची बातमी होते, ती माणसं सर्वसामान्यांपेक्षा तोडी जास्त कर्तबगार असणार, हे तर नक्कीच. पण, ज्यांच्या मृत्यूबद्दल नुसतेच शब्दांचे पोकळ बुडबुडे न उडवता त्यांच्या जगण्याबद्दल थोडं चिंतन करावं, अशी माणसं थोडीच असतात. हे चिंतन ज्याने-त्याने स्वत:साठी करायचं असतं. त्यामुळे आपली मानवी जीवनाबद्दलची एकंदर समजूत वाढते, निदान समजूत वाढण्याची शक्यता असते. यालाच साहित्यिक भाषेत ‘जाणिवा समृद्ध होणं’ वगैरे म्हणतात. तर गेल्या महिन्यात तीन मोठी माणसं काळाच्या पडद्याआड गेली. त्यापैकी एकाने शंभरी ओलांडली होती. दुसरी दोघं नव्वदी ओलांडलेली होती. सोव्हिएत रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह हे ३० ऑगस्ट रोजी मरण पावले. ते ९१ वर्षांचे होते.
 
 
ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरी ही ८ सप्टेंबर रोजी मरण पावली. ती ९६ वर्षांची होती. भारताचे सुप्रसिद्ध पुरातत्त्वशास्त्रज्ञ प्रो. बी. बी. लाल किंवा ब्रज बासी लाल हे १० सप्टेंबर रोजी मरण पावले. ते १०१ वर्षांचे होते. मिखाईल गोर्बाचेव्ह यांचा जन्म एका खेड्यात शेतकरी कुटंबात १९३१ साली झाला. रशियामध्ये १९१७ साली राज्यक्रांती झाली. व्लादिमीर लेनिन या नेत्याने झार राजांची अनियंत्रित हुकूमशाही राज्यव्यवस्था उलथून टाकून मार्क्सवादाच्या आधारावर नवी सोव्हिएत राज्यपद्धती सुरू केली. या पद्धतीत शेतीचंच सामुदायिकीकरण झालं. म्हणजे काय झालं? जगभरात सर्वत्र शेती व्यवसाय हा खासगी मालकीचा असे. मोठे जमीनदार, जहागीरदार, सरदार वगैरे लोक आपल्या अफाट जमिनीवर मजुरीने शेती करवून घेत, तर मध्यम आणि छोटे जमीन मालक स्वत:चं स्वत:ची जमीन कसून शेती उत्पादन करीत.
 
 
यात जमीन आणि तिचे मालक यांच्यात एक स्वामित्वाचा संबंध असे. या स्वामित्त्व संबंधाची नकारात्मक बाजू म्हणजे माणसं अधिकाधिक जमीन आपल्या मालकीची बनवण्यासाठी लांड्या-लबाड्या, भांडणं, खून, लढाया हे सर्व उद्योग करीत. यालाच मार्क्सने ‘शोषण’ असं म्हटलं. सोव्हिएत राज्यकर्त्यांनी हे शोषण संपवण्यासाठी जमिनीची खासगी मालकी रद्द करून टाकली. म्हणजे देशातली सगळी शेती ही सरकारची, म्हणजेच जनतेची, म्हणजेच सर्वांच्या सामुदायिक मालकीची, म्हणजे कालपर्यंत मी माझ्या स्वतःच्या शेतीत घाम गाळत होतो आणि त्या घामातून उगवलेले मोती माझ्या घरात नेत होतो वा बाजारात पाठवत होतो. आता आजपासून ती शेती माझ्या एकट्याची नव्हे. मी तिच्यात घाम पूर्वीप्रमाणेच गाळायचा. पण, निघणार्याी उत्पन्नाचा धनी मी नव्हे, ते उत्पन्न सरकारी गोदामात जमा होणार. त्यातला माझ्या कुटुंबाला आवश्यक तेवढा हिस्सा मला मिळणार. उरलेला भाग सरकार बाजारात पाठवणार नि त्याचं मूल्य सरकारी खजिन्यात जमा होणार.
 
 
आता कोणता शेतकरी हे सहन करेल? साहजिकच रशियन शेतकर्यांजनी संप, आंदोलन आणि अखेर बंड पुकारलं. १९२० ते १९२३ या काळात हे शेतकरी आंदोलन झालं. वंचित आणि शोषित यांचे कैवारी म्हणवून घेत सत्ता हडप केलेल्या सोव्हिएत राज्यकर्त्यांनी या आंदोलानाला कसं हाताळलं? त्यांनी आंदोलनकर्त्या शेतकर्यांतना सरळ गोळ्या घातल्या. रॉबर्ट काँक्वेस्ट या विद्वान संशोधकाच्या निष्कर्षानुसार, १९२३ सालापर्यंत किमान तीन लाख शेतकर्यां ना ठार मारण्यात आलं. कारण, त्यांनी सोव्हिएत सरकारच्या सामुदायिक शेती धोरणाला विरोध केला. म्हणून हा सगळा पाशवी कारभार हळूहळूस्थिरावल्यावर १९३१ साली मिखाईल गोर्बाचेव्ह यांचा जन्म झाला.
 
 
गोबाचेव्ह यांच्या वडिलांचे वडील आणि आईचे वडील ही दोन्ही कुटुंब शेतकरी होती. या कत्तलीमधून कसेबसे बचावल्यावर त्यांनी नाईलाजाने सरकारशी जुळवून घेतलं. दुसरं काय करणार? जगून राहायचं असेल, तर त्याखेरीज पर्यायच नव्हता. सोव्हिएत संघराज्यांमधल्या लाखो शेतकर्यांना तेच करावं लागलं. मिखाईल गोर्बाचेव्ह हे सगळं बघत-बघतच मोठे झाले. विद्यार्थी दशेतला मिखाईल हा एक हुशार विद्यार्थी आणि जबरा वाचक होता. गावाच्या ग्रंथालयातले अनेक उत्तमोत्तम ग्रंथ त्याने पालथे घातले. एकीकडे विद्यार्जन करीत असतानाच
 
मिखाईल आपल्या वडिलांप्रामणेच कुशल शेतकरी ही बनला. एका सुगीच्या मोसमात तो आणि त्याचे वडील सर्जी यांनी अखंड २० तास काम करून विक्रमी उत्पादन काढलं. त्याबद्दल दोघांनाही ‘ऑर्डर ऑफ लेनिन’ आणि ‘ऑर्डर ऑफ रेड बॅनर’ असे किताब देण्यात आले.
 
 
यामुळे ‘कायदा’ विषयातील उच्च शिक्षणासाठी मॉस्को विद्यापीठाची दारं मिखाईलला खुली झाली. तसंच कम्युनिस्ट पक्षाचा खंदा कार्यकर्ता म्हणूनही त्याची वर्णी लागली. अशा प्रकारे अगदी सामान्य शेतकर्या्पासून वर चढत चढत १९८५ साली मिखाईल गोर्बाचेव्ह सोव्हिएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. रशियाच्या सम्राटाला ‘झार’ असं म्हणत असत. कोणत्याही झारपेक्षा सोव्हिएत रशिया आणि त्याचे अंकित देश मिळून बनणारं सोव्हिएत साम्राज्य मोठ होतं, महाबळी होतं आणि एक खरोखरचा शेतकरी पुत्र त्याचा सर्वेसर्वा बनला होता.
 
 
पण, वरवर महाबळी भासणारं हे साम्राज्य आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलंय; साम्यवादी राज्यव्यवस्था अपयशी ठरलेली आहे; आर्थिक, वैज्ञानिक, सैनिकीदृष्ट्या आपण युरोप-अमेरिकेला टक्कर देऊ शकत नाही, याची पक्की जाणीव या शेतकरी सम्राटाला होती. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या हाताने सोव्हिएत साम्राज्याचं विसर्जन केलं. संपूर्ण जग आश्चर्याने थक्क झाले.आज मागे वळून पाहताना असं दिसतं की, १९८५ ते १९९१ या कालखंडात इतिहासाच्या प्रवाहाने गोर्बाचेव्ह यांच्याकडून त्यांच्याच साम्राज्याचं पतन घडवून आणलं नि मग खुद्द गोर्बाचेव्ह यांनाही बाजूला सारून तो प्रवाह पुढे निघून गेला. गोर्बाचेव्ह यांनी एकुलती एक मुलगी, जावई वगैरे मंडळींना पुढे रेटण्याचा प्रयत्न न करता पुढचा ३० वर्षांचा काळ शांतपणे व्यतीत केला. ‘खरे शेतकरी’ आणि ‘नुसतेच शेतकरी’ यांत असा फरक असतो.
 
 
तुम्ही जर पु. ल. देशपांड्यांचं लिखाण वाचत असाल, तर बर्यारचदा पुलं, ‘भो. भो. पंचम जॉर्ज भूपा’ असा एका कवनाचा उल्लेख करताना आढळतात. हा इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज, पुलं विद्यार्थी असताना ब्रिटिश साम्राज्याचा अभिषिक्त सम्राट होता. त्याच्या गौरवार्थ रचलेलं हे कवन सगळ्या मराठी शाळांमधून सक्तीने गायलं जात असे. पंचम जॉर्जचा युवराज होता एडवर्ड. १९३६ साली पंचम जॉर्ज मेल्यावर युवराज एडवर्ड हा ‘एडवर्ड आठवा’ या नावाने राजा झाला. आठव्या एडवर्डने रीतसर लग्न करून मुलबाळं निर्माण केली असती, तर त्याचा ज्येष्ठ पुत्र युवराज झाला असता. पण, आठव्या एडवर्डने वॉलिस सिंपसन नावाच्या अमेरिकन घटस्फोटित महिलेशी लग्न केलं. त्यामुळे त्याला नियमानुसार राज्यपद सोडावं लागलं. मग अकस्मात एडवर्डचा धाकटा भाऊ अल्बर्ट जॉर्ज हा ‘जॉर्ज सहावा’ या नावाने राजा बनला आणि त्याची दहा वर्षांची मुलगी एलिझाबेथ ही युवराज्ञी बनली. ध्यानीमनी नसताना एलिझाबेथकडे युवराज्ञीपद चालत आलं.
 
 
१९४७ साली युवराज्ञी एलिझाबेथचं फिलिप बॅटनबर्ग याच्याशी लग्न झालं, त्यावेळी ती २१ वर्षांची होती. त्याच वर्षी, काँग्रेसवाल्यांना थूक लावून भारताची फाळणी घडवून आणणारा लॉर्ड लुई माऊंटबॅटन हा या फिलिपचा सख्खा मामा होता.
आता युवराज्ञी ही तरुण, सुंदर, रुबाबदार वगैरे असलीच पाहिजे आणि तिचा नवरा तिला शोभणारा असा उंच, उमदा, देखणा, खानदानी असलाच पाहिजे, तर एलिझाबेथ आणि फिलिप ही जोडी अगदी अशीच होती. त्यातच पहिल्या फटक्यातच त्यांना १९४८ साली मुलगा झाला. तोच युवराज चार्ल्स. १९५२ साली सहावा जॉर्ज मरण पावला आणि १९५३ साली युवराज्ञी एलिझाबेथने ‘राणी एलिझाबेथ दुसरी’ या नावाने राज्यकारभार सुरू केला.
 
 
तसं तिचं राणीपद हे नामधारी असल्यामुळे प्रत्यक्ष राज्यकारभार करायचाच नव्हता. छानछान दिसायचं, देश-विदेशात प्रवास करायचा, थोरा-मोठ्यांच्या औपचारिक भेटी घ्यायच्या, अफाट श्रीमंतीचा उपभोग घेत आयुष्य घालवायचं, हेच तिचं जीवन होतं. सोनेरी पिंजर्याीतली सुंदर मैना तिला स्वत:ला याबद्दल काय वाटत होतं, हे अद्याप कधीच बाहेर आलेलं नाही. प्रो. बी. बी. लाल किंवा ब्रज बासी लाल हे मूळ झांशीचे. १९४३ साली त्यांनी भारतीय पुरातत्व खात्यात प्रवेश केला.
 
 
सर मॉर्टिमर व्हीलर या प्रख्यात इंग्रज पुरातत्त्व शास्त्रज्ञाच्या हाताखाली त्यांनी तक्षशीला आणि हडप्पा या ठिकाणी उत्खनन केलं. नंतरच्या काळात त्यांनी इजिप्तमध्ये न्यूबिया भागात उत्खनन करून अनेक महत्त्वूपर्ण शोध लावले. १९६८ ते १९७२ या काळात प्रो. लाल भारतीय पुरातत्त्व खात्याचे प्रमुख होते. त्यांनी मेरठ शहराजवळ हस्तिनापूर या महाभारतकालीन राजधानीचं उत्खनन केलं. १९७५-७६ या काळात त्यांनी अयोध्या, नंदिग्राम, चित्रकूटमधला भरद्वाज ऋषींचा आश्रम आणि निषादराज गुहक याची राजधानी श्रृंगवेरपूर इत्यादी रामायणाकालीन स्थानी उत्खनन केलं.
 
 
रामजन्मभूमी वादंगात प्रो. लाल यांनी एखाद्या वैज्ञानिकाप्रमाणे भूमिका घेतली. त्यांच्या म्हणण्याचा आशय असा की, “बाबरी ढाँचाखाली मला खांब आढळले, पण ते मंदिराचे की कसले, हे मी सांगू शकत नाही. कारण त्याची परीक्षा होण्याआधीच मला काम थांबवण्याचा आदेश मिळाला. ही भूमिका बाबरी मशीदवाले आणि त्यांचा उदोउदो करणारे डावे लिब्रांडू यांना एकदम पसंत पडली. त्यामुळे त्यांनी प्रो. लाल यांना ‘आपल्यातले’ ठरवून टाकलं. पण, १९९८ पासून प्रो. लाल यांनी ‘सरस्वती नदी शोध’, ‘सिंधू-सरस्वती सभ्यता’, ‘आर्य आक्रमणाचा मिथ्य सिद्धांत’, ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘अयोध्या’ यांच्याविषयी धडाधड अशी पुस्तकं लिहिली की, लिब्रांडू विचारवंतांची झोप हराम झाली. लगेच त्यांनी प्रो. लालना त्यांच्या ‘मेन स्ट्रीम’ इतिहासकारांच्या यादीतून काढून ‘सूडोआर्किओलॉजिस्ट’ म्हणजे ‘नकली पुरातत्त्व शास्त्रज्ञ’ ठरवून टाकलं.
 
 
 
भारत सरकारने लिब्रांडूंच्या डरांव-डरांवकडे संपूर्ण दुर्लक्ष करून २०२१ साली प्रो. लाल यांना ‘पद्मविभूषण’ पदवी दिली होती. मे २०२१ मध्ये प्रो. लाल यांनी वयाची शंभरी पूर्ण केली होती. त्यांचे चिरंजीव ब्रजेश लाल यांनी ‘आयआयटी कानपूर’मध्ये त्यांच्या नावाने एक अध्यासन सुरू केलं. पुरातत्त्व शास्त्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, हे या अध्यासनाचं कार्य असेल.
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.