नकारात्मकता आणि सकारात्मकता

    15-Oct-2022   
Total Views |
 
हिंदू धर्म
 
 
 
अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री राजेंद्र पाल गौतम यांना त्यांच्या मंत्रिपदाचा नुकताच राजीनामा द्यावा लागला. राजीनाम्याचे कारण असे की, दसर्‍याला दिल्लीत बौद्ध धर्म प्रवेशाचा एक कार्यक्रम होता. बौद्ध धर्म स्वीकारताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांना ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या आहेत, त्यातील पहिल्या काही प्रतिज्ञा या हिंदू देवदेवता नाकारणार्‍या आहेत. त्याचे जाहीर उच्चारण या कार्यक्रमात गौतम यांनी केले आणि तेच त्यांना भोवले. यानिमित्ताने गौतम बुद्ध आणि त्यांचा बौद्ध धर्म याविषयी थोडे सकारात्मक चिंतन करणे आवश्यक आहे.
 
 
 सध्या देशभर हिंदू धर्म अभिमानाचे जबरदस्त वातावरण आहे. ज्या देवदेवतांना नाकारण्यास डॉ. बाबासाहेबांनी सांगितले, त्यांच्या यात्रा, महोत्सव, धार्मिक विधी, प्रचंड प्रमाणात आता होतात. भाविकांची अलोट गर्दी असते. केजरीवाल हे धूर्त राजकारणी आहेत. गौतम यांना मंत्रिमंडळात ठेवले, तर ‘गौतम यांच्या 22 प्रतिज्ञांना आमचा पाठिंबा आहे,’ असा संदेश जातो आणि त्यामुळे हिंदू मते धोक्यात येतात. केजरीवाल हनुमान चालीसा पाठ करतात, मंदिरात जातात, मतांसाठी हे सर्व चाललेले आहे, हे खरे आहे. त्यामुळे गौतम यांच्या 22 प्रतिज्ञा आपल्याला महागात पडतील, गुजरातमध्ये तर फारच महागात पडतील, म्हणून त्यांनी राजेंद्र गौतम यांचा राजीनामा घेतला. बातमी अशी आली की, राजेंद्र यांनी राजीनामा दिला. कोणताही मंत्री सुखासुखी राजीनामा देत नाही, हे लोकांना माहीत आहे.
 
 

हिंदू धर्म 
 
 
 
यानिमित्ताने गौतम बुद्ध आणि त्यांचा बौद्ध धर्म याविषयी थोडे सकारात्मक चिंतन करणे आवश्यक आहे. भगवान गौतम बुद्ध यांचा कालखंड अडीच हजार वर्षांपूर्वीचा आहे. त्या काळात आज ज्या देवतांची आपण पूजा करतो, त्या देवता अस्तित्त्वात आलेल्या नव्हत्या. मंदिर संस्कृतीदेखील नव्हती. लोक यज्ञ-याग करीत असत. त्यात पशूंचा बळी दिला जाई आणि बळी दिलेले पशू नंतर खाल्ले जात. भगवान गौतम बुद्धांच्या काळी ‘धर्म’ हा शब्दप्रयोग होता. पाली भाषेत त्याला ‘धम्म’ असे म्हणतात. ‘हिंदू धर्म’ नावाचा शब्दप्रयोग तेव्हा नव्हता. ‘हिंदू’ हा शब्द त्यानंतर शेकडो वर्षांनी प्रचलनात आलेला आहे. त्यामुळे गौतम बुद्धांनी हिंदू धर्म नाकारला, या म्हणण्याला काही अर्थ राहत नाही. जो शब्द अस्तित्त्वात नाही, तो नाकारण्याचा प्रश्न येत नाही. भगवंतांच्या कोणत्याही प्रवचनात (त्यांना सूक्त असे म्हणतात, ती असंख्य आहेत) ‘मी हिंदू धर्म नाकारतो आहे,’ असे वचन नाही.
 
 
 
भगवंतांनी धर्म नाकारलेला नाही. धर्म नाकारणारे ते सेक्युलर पंडित नव्हते, याउलट धर्माची किती आवश्यकता आहे, हे त्यांनी प्रत्येक प्रवचनात मांडलेले आहे. यज्ञ-याग म्हणजे धर्म नव्हे. हिंसा म्हणजे धर्म नव्हे. मौजमजा करणे म्हणजे धर्म नव्हे. मातापित्यांची अवहेलना करणे म्हणजे धर्म नव्हेे, हे त्यांनी सांगितले. ज्या आत्म्याला आपण कधी पाहू शकत नाही आणि ज्या ब्रह्माला आपण कधी पाहू शकत नाही, त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे व्यर्थ आहे, हे त्यांनी ठणकावून सांगितले. आकाशातील ईश्वर, ब्रह्माडांचे संचालन करणारा ईश्वर असा कुणी ईश्वर आहे, ही गोष्ट त्यांनी नाकारली. त्यांचा सरळसोपा प्रश्न असे, ज्या आत्म्याची गोष्ट तुम्ही करता, ब्रह्मांडनायकाची गोष्ट करता, त्याला तुम्ही किंवा तुमच्या वाडवडिलांनी किंवा आणखी कुणी पाहिले आहे का? मग ज्याला पाहिलेले नाही, त्याची आराधना करण्यासाठी कशाला शक्ती व्यर्थ करता? त्याऐवजी ज्यांना आपण पाहतो त्या माणसाची सेवा करा, प्राणिमात्रांची सेवा करा, जीवजंतू, वनस्पती यांचे रक्षण करा, हाच खर धर्म आहे.
 
 
 
भगवंतांचे सगळे उपदेश माणसाने चांगला माणूस कसे बनावे, यासाठीचे आहेत. चांगला माणूस बनण्यासाठी पंचशीलांचे पालन करा, असे त्यांनी सांगितले. पंचशील असे आहे. 1. जीवहिंसा करणार नाही. 2. चोरी करणार नाही. 3. व्यभिचार करणार नाही. 4. खोटे बोलणार नाही. 5. मादक पदार्थांचे सेवन करणार नाही. याचा थोडा विचार करूया. ज्या काळात भगवंतांनी हा उपदेश केला आहे, त्या काळात जीवहिंसा वाढली असावी, चोर्‍या वाढल्या असाव्यात, व्यभिचार वाढला असावा, खोटे बोलणे वाढले असावे आणि मादक पदार्थांचे सेवनही वाढले असावे. यापैकी काहीही वाढले नसते तर असे उपदेश करण्याचे काही कारण नव्हते. भगवान गौतम बुद्धांच्या मांडणीत नकार आहे. हा नकार वाईट गोष्टींसाठी आहे. म्हणून तो दिसायला नकार असला तरी त्यातील सकारात्मक आशय अतिशय मोठा आहे.
 
 
 
भगवंतांच्या काळात भारतात अफाट समृद्धी होती. भगवंतांच्या एका शिष्याचे नाव होते, अनाथपिंडक. त्यांच्याकडे इतकी अफाट संपत्ती होती की, जेतवन खरेदी करण्यासाठी ती भूमी त्यांनी सोन्याने आच्छादून टाकली. त्या भूमीची ती किंमत मागितली गेली होती. भगवंतांचे प्रारंभीचे सगळे शिष्य अतिशय समृद्ध घरातील होते. धनाच्या त्यांच्या कथा आपण केवळ ऐकत राहाव्यात. भारतात एवढे धन प्रजेने उद्योग करून मिळविले. शेती उत्पादन, खनिज उत्पादन, अत्युत्कृष्ट वस्तूंची निर्मिती, धातू उत्पादन, औषधी निर्मिती, या सर्व बाबतीत भारत अग्रेसर होता.
 
 
अशी समृद्धी असली तरी गरिबी होतीच. आर्थिक विषमता होतीच. दास-दासी होत्या. गुलामदेखील होते. चोर्‍यामार्‍या होत असत. विरप्पनची कथा आपल्याला माहीत आहे. अंगुलीमाल हा त्या काळातील विरप्पन होता, म्हणजे दरोडेखोर होता. भगवान गौतम बुद्धांची महानता यात आहे की, श्रीमंतापासून गरिबांपर्यंत आणि पंडितापासून ते दरोडेखोरापर्यंत सर्वांना त्यांनी धर्म समजावून सांगितला. जे भिक्कू झाले, त्यांना अत्यंत कडक आचारधर्म, नियम सांगितले. भिक्कूने संग्रह करता कामा नये. अन्नाचादेखील संग्रह करता कामा नये. दोन वस्त्रेच त्याच्याकडे असावीत. आवश्यक ती औषधे, सुईदोरा असावा. भिक्षापात्र हे त्याचे भांडे. या नियमांचे भिक्कू वर्गाने तंतोतंत पालन केले. भिक्कू परंपरा आणि संन्यास धर्माची परंपरा आचारनियमांच्या संदर्भात सामान्यतः समान आहेत आणि ही भारताची जगाला देणगी आहे.
 
 
 
सर्वांनी संन्यास घेतला पाहिजे, भिक्कू झाले पाहिजे, असे भगवंतांनी कधी सांगितले नाही. ज्याचा जितका अधिकार तेवढा त्याला धर्माचा उपदेश त्यांनी केला. महामंगल सूक्तात भगवंत म्हणतात,“खूप शिकले पाहिजे, कौशल्य संपादन केले पाहिजे, अनुशासनबद्ध जीवन जगले पाहिजे, मधुर बोलले पाहिजे आणि सर्वांशी स्नेहाने वागले पाहिजे. हे सर्वोच्च आचरण आहे. आई-वडील, पत्नी, मुले या सर्वांशी उत्तम काळजी घेतली पाहिजे. नातेवाईक, रक्तसंबंधी, यांच्या बाबतीतील कर्तव्यांचे पालन केले पाहिजे. वाईट कृत्याचा त्याग केला पाहिजे. मद्यपान करू नये. धर्म मार्गावर आपले चित्त ठेवले पाहिजे. हाच जगण्याचा पवित्र मार्ग आहे.”
 
 
 
ब्रह्मसूक्तात भगवंत सांगतात, “माता आणि पिता हेच ब्रह्म आहेत. (न दिसणार्‍या ब्रह्माची उपासना करण्याऐवजी माता-पित्यांची उपासना करा) ते आपले प्रथम गुरू असतात. म्हणून त्यांची सेवा केली पाहिजे. त्यांचा सन्मान केला पाहिजे. त्यांना अन्न, वस्त्र, दिले पाहिजे. उतारवयात त्यांना स्नान घालणे, त्यांचे अंग पुसणे असे काम केले पाहिजे. आई-वडिलांची अशी सेवा केली तर या लोकात आणि परलोकातही कल्याण होते.” न पाहिलेल्या देवतांची पूजा करण्यऐवजी आपल्या जन्मदात्या मातापित्यांची सेवा केली पाहिजे, हा भगवंतांच्या उपदेशाचा सकारात्मक भाग आहे.
 
 
 
राजेंद्र गौतम यांनी भगवंतांच्या जीवनाचा उत्तम अभ्यास केला असेलच आणि त्यांच्याही वाचनात भगवंतांचे हे विचार आले असतील. ते आज लोकांपुढे मांडण्याची गरज आहे आणि हाच खर्‍या अर्थाने बुद्ध उपासक होण्याचा मार्ग आहे, असे माझे मत आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.