‘सीमांचल’ नव्हे ‘सीमावर्ती’!

    14-Oct-2022   
Total Views |

गुजरात 
 
 
 
 
‘सीमांचल’ या शब्दाचा वापर करून किशनगंज, अररिया, कटिहार, पूर्णिया आणि सुपौल या बिहारमधील अल्पसंख्याकबहुल जिल्ह्यांना वेगळे राज्य बनवण्याच्या उद्देशाने हा शब्दप्रयोग सुरू करण्यात आल्याचा आरोप भाजपसह या भागातील अनेकांनी करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे बिहारमधील मुस्लीम लांगूलचालनाच्या राजकारणास अमित शाह यांनी थेट आव्हान दिले आहे.
 
  
सध्या संपूर्ण देशाला वेध लागले आहेत ते दिवाळीचे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साजर्‍या होणार्‍या दिवाळीसोबतच देशातील राजकीय वातावरणही वेग घेऊ लागणार आहे. गुजरातसह अन्य राज्यांच्या होणार्‍या विधानसभा निवडणुका, संसदेचे हिवाळी अधिवेशन आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची कथित ‘भारत जोडो यात्रा’ सध्या देशाच्या राजकीय अवकाशात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. त्यापैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह व सहकारमंत्री अमित शाह यांचे गृहराज्य असलेल्या गुजरात निवडणुकांसाठी भाजप कसून तयारी करत आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह हे महिन्यातून किमान दोनतरी कार्यक्रम गुजरातमध्ये घेत आहेत. त्याचवेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्षदेखील गुजरातमध्ये सक्रिय झाला आहे.
 
 
मात्र, गुजरातमध्ये प्रचार करताना अरविंद केजरीवाल यांना दिल्ली आणि पंजाबमधील आपल्या सरकारांच्या कार्यशैलीविषयी उत्तरे द्यावी लागत आहेत. केजरीवाल हे गुजरातमध्येदेखील ‘सर्वकाही फुकट’ या प्रकारची आश्वासने देत आहेत. मात्र, त्यांना तेथे फारसा प्रतिसाद सध्या तरी मिळत नसल्याचे चिन्ह आहे. त्याचप्रमाणे गुजरातमध्ये प्रचार करताना दिल्ली सरकारमधील मंत्री राजेंद्र पाल गौतम यांचा धर्मांतरण कार्यक्रमातील सहभागदेखील आता त्यांना अडचणीचा ठरू लागला आहे. त्यामुळे एरवी अशा विषयांकडे दुर्लक्ष करणार्‍या केजरीवाल यांनी पाल यांचा तातडीने राजीनाम घेऊन ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आता गुजरातध्ये या घटनेचा त्यांचा फटका बसू लागला आहे. त्यातच केजरीवाल यांचे एकेकाळचे सहकारी आणि सध्या दिल्ली भाजपचे नेते कपिल मिश्रा हेदेखील ‘राष्ट्रविचार मंचा’च्या माध्यमातून केजरीवाल यांच्या दिल्लीतील कारभाराचे सत्य मांडत आहेत. त्यामुळे गुजरातमध्येही आपला वारू सुसाट धावेल, अशी अपेक्षा असणार्‍या केजरीवाल यांना आपली रणनीती बदलावी लागणार आहे.
 
 
त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये गुजरातमध्ये विविध प्रकल्पांच्या उद्घाटन-पायाभरणी कार्यक्रमांमध्ये नागरिकांशी संवाद साधत आहे. यावेळी ते प्रामुख्याने गुजराती भाषेमध्येच भाषणे करत आहेत. गुजरातच्या विकासासोबतच गुजरातच्या विकासात जाणीवपूर्वक अडथळे आणणार्‍या तीस्टा सेटलवाड, मेधा पाटकर यांच्यावर प्रथमच थेट प्रहार करत आहेत. मेधा पाटकर यांच्यावर टीका करताना त्यांनी ‘शहरी नक्षलवादी’ हा शब्ददेखील वापरला आहे. विशेष म्हणजे, गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून ते आजपर्यंत मोदी यांनी प्रथमच या दोघांवर टिप्पणी केली आहे. त्याचे कारण म्हणजे, गुजरात दंगल प्रकरणी तीस्टा सेटलवाड आणि सरदार सरोवर प्रकल्पाविषयी मेधा पाटकर हिचा उघडकीस आलेला खोटेपणा. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये अन्य मुद्द्यांसह हे दोन मुद्देदेखील अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत.
 
 
त्याचवेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची कथित ‘भारत जोडो यात्रा’ आता दक्षिण भारतातून महाराष्ट्रमार्गे उत्तर भारतामध्ये शिरणार आहे. भाजपविरोधी जनमत तयार करण्यासाठी सुरू असलेली ही यात्रा महाराष्ट्रात पुढीस महिन्यात म्हणजे दि. 5 नोव्हेंबर रोजी येणार आहे. या यात्रेदरम्यान महाराष्ट्र काँग्रेसमधील दुफळी अधिक स्पष्ट होते की सर्वकाही आलबेल राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यात्रेच्या स्वागताची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे, यात्रेचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार करणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र, पवार यांच्या मनात राहुल गांधी यांच्या नेतृत्वगुणांविषयीचा संशय पाहता ते खरोखर यात्रेचे स्वागत करतील की नेहमीप्रमाणे काहीतरी विधान करून यात्रेची हवा काढून घेतील, याचे उत्तर लवकरच मिळणार आहे. कारण, यात्रेचे स्वागत करून एकप्रकारे राहुल गांधी यांचे नेतृत्व मान्य करण्याची शक्यता धूसर आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून ही यात्रा निवडणूक असलेल्या गुजरातमधून न जाता मध्य प्रदेशमार्गे पुढे जाणार आहे.
 
 
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी नुकताच बिहार दौरा केला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात ‘एनडीए’ची साथ सोडल्यानंतर आता भाजपने तेथे स्वबळावर लढायची तयारी सुरू केली आहे. त्याचवेळी लालूप्रसाद यादव यांचे महत्त्वाकांक्षी पुत्र दररोज नितीश कुमार यांच्यापुढे नवी डोकेदुखी निर्माण करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे धरसोड वृत्ती असूनही राजकीय निर्णय सहसा न चुकविणार्‍या नितीश कुमार यांचा निर्णय चुकला असल्याचे आता स्पष्ट होत असल्याचे चिन्ह आहे. बिहारमध्ये ‘महागठबंधन’चे सरकार स्थापन झाल्यानंतर अमित शाह यांनी बिहारमध्ये सामान्यपणे मुस्लीम मतदार मोठ्या प्रमाणात असलेल्या सीमांचलमध्ये जाहीर सभा घेतली आहे. त्यामुळे यामागील नेमके कारण समजून घेण्याची गरज आहे.
 
 
लोकसभेच्या जागांवर नजर टाकली, तर बिहारमध्ये 2019च्या निवडणुकीत ‘एनडीए’ने 39 जागा जिंकल्या होत्या. यामध्ये सहा जागा रामविलास पासवान यांच्या ‘एलजेपी’च्या वाट्याला आल्या, 17 जागा भाजपने काबीज केल्या आणि नितीश कुमार यांच्या ‘जेडीयु’ने 16 जागा जिंकल्या. काँग्रेसच्या खात्यात एक जागा आली. आता समीकरणे बदलली असून ‘एनडीए’कडे 23 तर महाआघाडीकडे 17 जागा आहेत. सीमांचलमध्ये पूर्णिया विभागात लोकसभेच्या पूर्णिया, किशनगंज, अररिया आणि कटिहा या चार जागा आहेत. यापैकी ‘एनडीए’ला चार पैकी चार जागा मिळाल्या. अररिया भाजपच्या अंतर्गत तर पूर्णिया आणि कटिहार ‘जेडीयु’च्या अंतर्गत आले. दुसरीकडे, ‘महागठबंधन’मधील काँग्रेसने किशनगंजमध्ये चौथी जागा जिंकली होती. आता नितीश यांनी बाजू बदलल्यानंतर हे समीकरण बदलले आहे. सीमांचलमध्ये ‘एनडीए’च्या वाट्याला फक्त एक जागा आहे, तर महाआघाडीकडे तीन जागा आहेत. सीमांचलच्या चक्रव्यूहला पूर्णिया-किशनगंज-कटिहार आणि अररिया असे चार दरवाजे आहेत. हे दरवाजे तोडण्यासाठी भाजपने रणनीती आखण्यास प्रारंभ केला आहे.
 
 
शाह यांनी आपल्या सभेमध्ये अतिशय जाणीवपूर्वक ‘सीमांचल’ या शब्दाऐवजी ‘सीमांत’ आणि ‘सीमावर्ती’ या शब्दांचा वापर केला. कारण, ‘सीमांचल’ हा शब्द विभाजनवादी मानसिकतेचा असल्याची भाजपसह या भागातील अनेकांची भूमिका आहे. या भागातील माजी खासदार मोहम्मद तस्लिमुद्दीन यांच्या राजकीय प्रभावाच्या काळामध्ये ‘सीमांचल’ हा शब्द अधिक प्रचारात आला. या शब्दाचा वापर करून किशनगंज, अररिया, कटिहार, पूर्णिया आणि सुपौल या अल्पसंख्याकबहुल जिल्ह्यांना वेगळे राज्य बनवण्याच्या उद्देशाने हा शब्दप्रयोग सुरू करण्यात आल्याचा आरोप भाजपसह या भागातील अनेकांनी करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे बिहारमधील मुस्लीम लांगूलचालनाच्या राजकारणास अमित शाह यांनी थेट आव्हान दिले आहे.
 
 
अर्थात, शाह यांनी आपल्या दौर्‍यासाठी सीमांचलची निवड करणे, हे केवळ बिहार नव्हे, तर पश्चिम बंगालच्या राजकारणासाठीही महत्त्वाचे ठरणार आहे. किशनगंज जिल्ह्यापासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या, पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात विधानसभेच्या आठ जागा आणि 40 किलोमीटर दूर असलेल्या दार्जिलिंग जिल्ह्यात सात विधानसभेच्या जागा आहेत. दार्जिलिंग जिल्ह्याच्या सात विधानसभा जागा कलिमपोंग, दार्जिलिंग, कुर्सिओंग, माटिगारा, सिलीगुडी, फणसीदेवा, चोप्रा या आहेत. ज्यामध्ये कलिमपोंग आणि चोप्रा येथे तृणमूलचे आमदार आहेत, तर उर्वरित पाच विधानसभा जागा भाजपच्या ताब्यात आहेत. त्याचवेळी, उत्तर दिनाजपूरच्या आठ विधानसभा जागा इस्लामपूर, गवालपोखर-एक, चाकुलिया, करंदीघी, रायगंज, हेमताबाद, कालियागंज, इतर आहेत. यापैकी भाजपने रायगंज आणि कालियागंज जागा जिंकल्या होत्या, उर्वरित सर्व सहा जागांवर भाजप दुसर्‍या क्रमांकावर होता. तथापि, दोन्ही आमदार नंतर तृणमूलमध्ये सामील झाले.
 
 
त्यामुळे सीमांचल आणि प. बंगालच्या हे एकमेकांना लागून तर आहेतच, त्यासोबतच या प्रदेशातील राजकीय समीकरणेदेखील एकमेकांना परस्परपूरक आहेत. बिहारच्या सीमांचलमध्ये कोणतेही समीकरण केले, तर त्याचा परिणाम बंगालवरही होतो. त्यामुळेच शाह यांनी सीमांचलचा दौरा करून एकाचवेळी तृणमूल काँग्रेस, जदयु आणि राजदला आव्हान दिले आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.