संधीचे सोने होणार की माती?

    13-Oct-2022   
Total Views |
 
शिवसेना
 
 
 
यशस्वी राजकीय नेता होण्यासाठी राजकीय प्रतिभा, राजकीय निर्णयक्षमता, प्रचंड जनसंपर्क, नेत्याची प्रामाणिकता, सचोटी, कार्यकर्त्यांना मायेने जवळ करण्याची वृत्ती, भक्कम राजकीय वैचारिक अधिष्ठान असावे लागते. अशा क्षमता आपल्याकडे आहेत का, ते दाखविण्याची संधी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना मिळालेली आहे. या संधीचे ते सोने करतात की माती करतात, हे 2024ची निवडणूक सांगेल.तोपर्यंत आपण वाट बघूया.
 
 
 
उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे या दोघांनी माध्यमांना सतत बातम्या देण्याचे ‘कॉन्ट्रक्ट’ घेतले असावे, असे रोजची वर्तमानपत्रे वाचल्यानंतर वाटू लागते. या बातम्या कोणत्या असतात, हे आपण रोजच वाचत असतो. जो शिवसैनिक नाही, मग तो उद्धव यांचा असो की एकनाथ शिंदे यांचा असो, ते सोडले तर अन्य लोकांच्या मनात एक प्रश्न असा आहे की, उद्धव ठाकरे गट विरूद्ध एकनाथ शिंदे गट या लढाईत कोण विजयी होणार? राजकीय भाषेत सांगायचे तर दोन वर्षांनंतर येणार्‍या निवडणुकीत शिंदे गटाला जास्त जागा मिळतील की उद्धव गटाला? कोणाची शिवसेना अधिकृत गणली जाईल? या प्रश्नांची निश्चयात्मक उत्तरे देणे, याक्षणी अवघड आहे. परंतु, या निमित्ताने एका प्रश्नाचा आपण जरूर विचार करू शकतो. तो प्रश्न असा आहे की, राजकारणात कोणाचे नेतृत्त्व यशस्वी होते? गेल्या 75 वर्षांतील देशाच्या राजकारणावर ओझरती नजर टाकली, तर यशस्वी झालेल्या राजकारण्यांचे मापदंड आपण ठरवू शकतो. इंदिरा गांधी, राजीव गांधी, मुलायमसिंह यादव, मायावती, जयललिता, ममता बॅनर्जी, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, चंद्राबाबू नायडू अशा अनेक राजकीय नेत्यांची नावे समोर येतात. त्यांच्या यशस्वी होण्याच्या कारणांचा जर शोध घेतला, तर काही गोष्टी ठळकपणे समोर येतात.
 
 
 
इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांना घराण्याचा वारसा प्राप्त झाला. नेहरू घराणे राजकीय वलय असलेले घराणे होते. जनतेची या घराण्यावर श्रद्धा होती. त्यामुळे इंदिरा गांधींना लोकांनी स्वीकारले. त्यांची हत्या झाल्यानंतर राजगादी मोठ्या मुलाला मिळायला पाहिजे, अशी सामान्यपणे लोकभावना असल्यामुळे जनतेने राजीव गांधी यांना स्वीकारले. सहानुभूतीच्या लाटेवर राजीव गांधींचे नेतृत्त्व उभे राहिले. इंदिरा गांधी धाडसी होत्या. अचूक राजकीय निर्णय त्या घेत असत. पक्ष संघटनेवर त्यांची मजबूत पकड होती. पक्षाची विषयसूची ठरविण्याची बुद्धिमत्ता त्यांच्याकडे होती. राजीव गांधींकडे वारसा हक्काशिवाय काहीही नव्हते. त्यामुळे त्यांचे नेतृत्त्व नंतर अयशस्वी झाले.
 
 
 
मायावती आणि मुलायमसिंह यांनी उत्तर प्रदेशात आपले स्वतंत्र नेतृत्त्व निर्माण केले. मायवतींच्या राजकारणाचा सिद्धांत असा की, अगोदर आपण मजबूत दलित व्होट बँक निर्माण करूया. ही दलित मते काँग्रेस अथवा अन्य पक्षांकडे जात असत, ती त्यांनी आपल्या पक्षाकडे वळविली. त्यामुळे दलित मतं राजकीय शक्ती झाली. मायावतींची शक्ती त्यामुळे खूप वाढली. या शक्तीच्या बळावर त्या चार वेळा मुख्यमंत्री झाल्या. मुलायमसिंह यादव यांनी यादव जातीची व्होट बँक निर्माण केली. त्यात मुसलमानांना त्यांनी जोडले. त्यांचीदेखील स्वतंत्र राजकीय शक्ती निर्माण झाली आणि तेदेखील अनेकवेळा मुख्यमंत्री झाले. हे दोन्हीही नेते राजकीय डावपेच खेळण्यात अत्यंत हुशार होते. केव्हा कुणाशी जवळीक करायची आणि केव्हा केलेली जवळीक मोडायची, याबद्दलचे त्यांचे निर्णय चुकत नसत.
 
 
 
ममता बॅनर्जी यांच्या हे लक्षात आले की, जनता कम्युनिस्ट राजवटीला वैतागली आहे. जनतेला पर्याय हवा आहे. ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या राजकारणातील राजकीय पोकळी अचूकपणे ओळखली. ती भरून काढण्याचे राजकारण केले. त्यादेखील धाडसी आहेत, संघटनकुशल आहेत, पक्षावर मजबूत पकड असणार्‍या आहेत, जनमत आपल्याकडे कसे फिरवायचे, याबाबतीत त्या फार हुशार आहेत. म्हणून त्यांची गणना यशस्वी राजकारणी महिला यात करावी लागते.
 
 
 
तामिळनाडूत जयललिता यादेखील अशाच राजकारणी होत्या. तामिळनाडूत दोनच पक्ष आहेत. द्रमुक आणि अण्णाद्रमुक. दोघांची विचारसरणी सारखी होती. करूणानिधी यांचा डीएमके पक्ष होता. प्रस्थापित पक्षात, प्रस्थापित नेतृत्त्व निर्माण होते. ते दुसर्‍या, तिसर्‍या फळीतील कुणालाही पुढे येण्याचा वाव देत नाही. अशा असंतुष्ट लोकांना आपल्याकडे वळविण्याचे काम जयललिता यांनी केले. त्यादेखील कुशल राजकारणी होत्या. राजकीय डावपेचात त्या तरबेज होत्या. त्यामुळे त्या मरेपर्यंत मुख्यमंत्री राहिल्या.
 
 
 
महाराष्ट्राचा विचार करता, शरदराव पवार, बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथराव मुंडे यांचा विचार करावा लागतो. बाळासाहेबांच्या हे लक्षात आले की, राजधानी मुंबईतील मराठी माणूस नगण्य होत चाललेला आहे. त्या मराठी माणसाचा आवाज त्यांनी जीवंत केला. मराठी माणसाच्या अवहेलनेची पोकळी त्यांनी भरून काढली. रामजन्मभूमी मुक्तिआंदोलन शिगेला पोहोचल्यानंतर बाळासाहेबांच्या हे लक्षात आले की, महाराष्ट्रात हिंदुत्वाची फार मोठी जागा (पॉलिटीकल स्पेस) निर्माण झाली आहे. ती त्यांनी भरून काढण्यासाठी हिंदुत्वाची भूमिका घेतली. त्यामुळे शिवसेना महाराष्ट्रव्यापी झाली. बाळासाहेब यशस्वी राजकारणी झाले. शरदराव पवार यांच्या यशाचे गमक राजसत्तेच्या सदैव जवळ राहण्यात आहे. त्यांनी संपत्तीच्या आधारावर मराठा जातीत आपली एक जागा निर्माण केली. त्यांचा जो मराठा मतदार संघ आहे, त्याची बांधणी त्यांनी टोकाच्या ब्राह्मणविरोधावर केलेली आहे. सत्तेत राहण्यासाठी त्यांना कुणीही चालतं, ही त्यांची लवचिकता आहे. सिद्धांत, विचार, तत्त्वज्ञान, यांचा सोयीप्रमाणे ते वापर करतात. त्यामुळे ते अखिल भारतीय नेते होऊ शकलेले नाहीत. बारामतीचा पट्टा सोडला, तर महाराष्ट्रातही त्यांना सार्वत्रिक मान्यता नाही. त्यांची बरोबरी करील असा नेता महाराष्ट्रात काय तर देशातही सापडणार नाही!
 
 
 
उद्धव ठाकरे यांच्या पुढे कोणती राजकीय पोकळी आहे? एकनाथ शिंदे यांच्या पुढे कोणती राजकीय पोकळी आहे? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे वेगवेगळी आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे मराठी अस्मितेची पोकळी नाही, ती राज ठाकरे यांनी व्यापली आहे. हिंदू अस्मितेची पोकळी नाही, कारण ती भाजपने व्यापली आहे. राजकारणात यशस्वी होण्यासाठी त्यांना नवीन पोकळी निर्माण करावी लागेल किंवा निर्माण होणार्‍या पोकळीचा शोध घ्यावा लागेल. एवढी राजकीय प्रतिभा त्यांच्याकडे आहे का, हा प्रश्न आज अनुत्तरीत आहे. एकनाथ शिंदे यांच्या पुढे पोकळी आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल्याची पोकळी आहे. उद्धव यांची सेना हा प्रस्थापित पक्ष आहे. घराणेशाहीवर चालणारा आहे. घराणेशाहीत क्रमांक एक आणि दोनची जागा घराण्याबाहेर कुणाला मिळत नाही. राजकारणात 45-50 वर्षे काढल्यानंतर आपल्याला क्रमांक एकची जागा मिळावी, दोनची जागा मिळावी, अतिशय महत्त्वाचे स्थान मिळावे, असे वाटणारे नेते उभे राहतात. अशांना शिवसेनेत विशेष जागा राहणार नाही. एकनाथ शिंदेेंना भरून काढण्यासाठी ही पोकळी आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे तशी राजकीय प्रतिभा आहे का? अचूक निर्णय ते घेऊ शकतात का? या क्षमता त्यांना सिद्ध कराव्या लागतील.
 
 
 
यशस्वी राजकीय नेता होण्यासाठी राजकीय प्रतिभा, राजकीय निर्णयक्षमता, प्रचंड जनसंपर्क, नेत्याची प्रामाणिकता, सचोटी, कार्यकर्त्यांना मायेने जवळ करण्याची वृत्ती, भक्कम राजकीय वैचारिक अधिष्ठान असावे लागते. हे ज्याच्याकडे आहे, असा नेता इंदिरा गांधी होतो, अटलबिहारी वाजपेयी होतो, नरेंद्र मोदी होतो आणि महाराष्ट्राचा विचार करता बाळासाहेब ठाकरे किंवा गोपीनाथराव मुंडे होतात. मुंबईतील 1993च्या बॉम्बस्फोटानंतर ‘राजकीय गुन्हेगारी’ हा विषय पुढे आला. शरद पवार खलनायक झाले. त्यांच्या विरोधाची पोकळी गोपीनाथरावांनी भरून काढली. अशा क्षमता आपल्याकडे आहेत का, ते दाखविण्याची संधी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना मिळालेली आहे. या संधीचे ते सोने करतात की माती करतात, हे 2024ची निवडणूक सांगेल. तोपर्यंत आपण वाट बघूया.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.