‘उर्दू भाषा केंद्रा’साठी शिवसेनेचे लांगूलचालन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2022   
Total Views |
uddhv thackrey
 

मराठीबहुल भागात ‘उर्दू भाषा केंद्र’ का? स्थानिकांचा सत्ताधार्‍यांना सवाल
मुंबई : मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून गेली अनेक वर्षे राजकारण करणार्‍या सत्ताधारी शिवसेनेने एका विशिष्ट समाजाला खूश करण्यासाठी भायखळ्यात थेट ‘उर्दू भाषा केंद्र’ उभारण्याचा घाट घातला आहे. मराठीबहुल भाग असूनही याठिकाणी ‘उर्दू भाषा केंद्र’ उभारण्याचा महापालिका प्रशासनाच्या निर्णयाला स्थानिकांकडून आक्षेप घेण्यास सुरुवात झाली आहे. याप्रकरणी पहारेकरी भाजपनेही आक्रमक पावित्रा घेत एका विशिष्ट समाजाच्या लांगूलचानसाठी सत्ताधार्‍यांचा हा प्रयत्न असल्याची घणाघाती टीका केली आहे.
 
 
 
मुंबई महापालिकेच्या निवडणुका काही आठवड्यांवर येऊन ठेपल्या आहेत. प्रस्तावित वेळेत निवडणुका घेण्याचा निर्णय जर निवडणूक आयोगाच्यावतीने घेण्यात आला, तर येत्या काही दिवसांत निवडणूक कार्यक्रमदेखील जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या संदर्भातील या घडामोडी सुरु असतानाच मुंबईच्या राजकीय भूमीवर आरोप-प्रत्यारोपांचे युद्ध सुरू झाले आहे. या युद्धात आता नव्याने एका प्रकरणाची भर पडली आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातील भायखळा मतदारसंघातील आग्रीपाडा विभागामध्ये मागील काही दिवसांपासून ‘उर्दू भाषा केंद्रा’च्या उभारणीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिका प्रशासनाच्यावतीने हे उर्दू भाषा शिक्षण केंद्र उभारण्यात येत असून या केंद्राच्या उभारणीवरून आता भाजप-स्थानिक विरुद्ध महापालिका प्रशासन-शिवसेना असा ‘सामना’ रंगण्याची शक्यता आहे.
 
 
 
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. २१२ मधील आग्रीपाडा परिसरामध्ये राज्य सरकारच्या अधिपत्याखालील एक भूखंड आहे. साधारणपणे २५ ते ३० वर्षांपूर्वी या ठिकाणी आकाशवाणी केंद्र अस्तित्वात होते. मात्र, कालांतराने सदरील भूखंड हा शैक्षणिक कारणांसाठी आरक्षित करण्यात आला. आरक्षित भूखंड हा राज्य सरकारच्या अधिपत्याखाली असल्याने या जागेवर औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणार्‍यांसाठी निवासाची सोय करण्यात आली होती. मात्र, कालांतराने हा भूखंड रिक्त झाला होता आणि मागील महिनाभरापासून या ठिकाणी उर्दू भाषा शिक्षण केंद्र उभारण्याच्या हालचाली प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहेत, अशी माहिती काही स्थानिक रहिवाशांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिली आहे.
 
 
’भायखळ्यातील आग्रीपाडा परिसरातील या भूखंडावर औद्योगिक प्रशिक्षण केंद्रासाठी राखीव भूखंड असा फलक होता, जो रातोरात इथून हटविण्यात आला आहे. या भूखंडावर कशाचे बांधकाम केले जात आहे, काय घडामोडी घडवल्या जात आहेत, याबाबत स्थानिक नागरिक अनभिज्ञ आहेत. औद्योगिक प्रशिक्षण केंद्रासाठी राखीव ठेवण्यात आलेला भूखंड अचानक उर्दू भवनासाठी का देण्यात आला? या कृतीच्या आडून काही विशिष्ट समाजाला खूश करण्याचे तर प्रयत्न केले जात नाहीत ना? याचे उत्तर सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासनाने द्यावे. या मैदानावर प्रस्तावित असलेल्या या उर्दू भवनाच्या उभारणीला स्थानिकांचा तीव्र विरोध असून कुठल्याही विशिष्ट वर्ग किंवा समुदायाला गोंजारण्यासाठी जर हे प्रयत्न केले जात असतील तर ते नक्कीच अयोग्य आहे. मुळात हा परिसर मराठीबहुल लोकवस्तीचा असतानाही या परिसरात ‘उर्दू भवन’ उभारणी करण्याचा घाट कशासाठी घातला जात आहे, असा सवाल स्थानिक नागरिकांनी दै.‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना उपस्थित केला आहे.
 
“गीता गवळींची सावध भूमिका  

“माझ्या प्रभागात उभारण्यात येत असलेल्या या कामासाठी थेट स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी स्वतः निधी मंजूर केला आहे. या कामासाठी मी कुठल्याही प्रकारची विनंती केलेली नाही. या ठिकाणी उर्दू भाषा शिक्षण केंद्र उभारण्याचा माझा विरोध नाही, पण स्थानिकांच्या आग्रही मागणीचा विचार करता त्याच भूखंडावर स्थानिकांसाठी काही जागा राखीव ठेवण्यात यावी,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नगरसेविका गीता गवळी यांनी दै.‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केली आहे.”

 
 
‘उर्दू भाषा केंद्र’च्या अनधिकृत उभारणीत यशवंत जाधव यांचा थेट सहभाग
“अवघ्या महिनाभरापूर्वी सदर जागा ही औद्योगिक प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या निवासासाठी आरक्षित आहे, असा फलक या ठिकाणी लावलेला होता. मात्र, अचानक काही घडामोडी घडत तो फलक काढून त्या ठिकाणी उर्दू भाषा केंद्राचा फलक त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. सदरील भूखंड हा शैक्षणिक कारणासाठी आरक्षित आहे. मात्र, यावर काहींच्या छुप्या पाठिंब्याने अनधिकृतरीत्या ‘उर्दू भाषा केंद्र’ उभारण्यात येत आहे. काही विशिष्ट वर्गातील मतदारांचे लांगूलचालन करण्याचा या मागे हेतू असून स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांच्या पाठिंब्यानेच ही उभारणी केली जात आहे,” असा आरोप भाजपचे भायखळा विधानसभा अध्यक्ष नितीन बनकर यांनी दै.‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना केला.
पुढे ते म्हणाले की,“वास्तविकपणे मराठी माणसाची मातृभूमी असलेल्या मुंबईत मराठी भाषेची स्थिती दयनीय बनत चालली आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार मागील दहा वर्षांमध्ये पालिका शाळांच्या संख्येत १३० शाळांची घट झाली असून विद्यार्थी संख्येत सुमारे ६५ हजार विद्यार्थी हे कमी झाले आहेत. त्यामुळे एकीकडे मराठीची बिकट होत असलेली अवस्था सुधारण्याऐवजी मराठीला बळकटी आणि उभारणी देण्याऐवजी या ठिकाणी ‘उर्दू भाषा केंद्र’ बांधण्याचे मनसुबे सत्ताधारी शिवसेनेच्या माध्यमातून रचले जात आहेत आणि त्याला भाजपचा तीव्र विरोध आहे,” असे बनकर यांनी म्हटले आहे.



 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@