कॅमिलो अ‍ॅग्रिपूह, भवानी देवी आणि तलवारबाजी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

bhavani devi
 
 
तलवारबाजीच्या आधुनिक प्रकारात आपला देश आत्ता कुठे जरा डोळे किलकिले करतोय. आणि तलवार हेच ज्याचं अत्यंत लाडकं शस्त्र होतं, तो महाराष्ट्र कुठाय? महाराष्ट्रातल्या काही ठळक शहरांमध्ये ‘फेन्सिंग क्लब्ज’, ‘फेन्सिंग असोसिएशन्स’ निघालेली आहेत. पण अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. सर्वात मोठा अडसर हा मानसिकतेचा असावा, असं वाटतं.
 
 
पाश्चिमात्य लोक एखादी गोष्ट, एखादी घटना सहजासहजी सोडून देत नाहीत. तिचा पुन:पुन्हा मागोवा घेतात, शोध करीत राहतात. अगदीच काही नाही, तर भाषणं करुन, लेख लिहून आणि आता ‘इंटरनेट’ युगात ब्लॉग लिहून स्मरण तरी करतात, आता हेच पाहा ना. दि. १ जानेवारी ही नव्या खिश्चन वर्षाची सुरुवात म्हणून त्याबद्दल बरंच काही बोललं, लिहिलं, वाचलं जातच असतं. पण १ जानेवारीला कॅमिलो अ‍ॅग्रिपूह याचा स्मरणदिन असतो, हे आवर्जून लक्षात ठेवून त्याच्याबद्दल लिहिलं जातं.
 
 
कॅमिलो अ‍ॅग्रिपूह मूळचा इटलीतल्या मिलानचा पण त्याचं कार्यक्षेत्र मात्र राजधानी रोम हे राहिलं. त्याचा जन्म नेमका केव्हा झाला ते महित नाही. पण, मृत्यू मात्र १ जानेवारी सन १६०० या दिवशी झाला. म्हणजे त्याच्या मृत्यूलाच आता चारशे-सव्वा चारशे वर्षं होतील. स्पेलिंगनुसार उच्चार केल्यास त्याचं नाव अ‍ॅग्रिप्पा असं होईल. पण, उच्चार मात्र अ‍ॅग्रिपूह असा केला जातो. अ‍ॅग्रिपूह आणि जगद्विख्यात चित्रकार मायकेल अँजेलो हे समकालीन होते. अ‍ॅग्रिपूह हा तत्कालिन रोममधला ख्यातनाम आर्किटेक्ट, इंजिनिअर, गणिती आणि तलवारबहाद्दर होता. या सगळ्याच कारणांनी तिथले लोक आजही १ जानेवारीला त्याचं स्मरण करतात.
 
 
आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं. इंग्लंड हा व्यापारी देश. त्याला अन्य युरोपीय देशांइतकी प्रदीर्घ लष्करी परंपरा नाही. इंग्लंडने जिंकलेल्या लढाया या मुख्यत: दर्यावरच्या होत्या. याचा अर्थ इंग्रजांना शिपाईबाणा अगदीच माहित नव्हता. असं नव्हे; पण, फ्रान्स, स्पेन , इटली आणि प्रशिया हे देश जास्त प्रदीर्घ अशी लष्करी परंपरा असणारे देश होते. प्रशिया आणि बरीचशी संस्थानं,जहागिऱ्या यांचाच मिळून पुढे जर्मनी हा देश बनला. पण, ती पुढची १९व्या शतकातली गोष्ट. कॅमिलो अ‍ॅग्रिपूहच्या काळात इटली, फ्रान्स इत्यादी देशांची लष्करं भलतीच जोरात असायची आणि त्यांचं मुख्य शस्त्र होतं, तलवार!
 
 
साहजिकच या तलवारीत आणि तलवारबाजीच्या तंत्रात सतत नवीन काय करता येईल, याबद्दल संबंधित मंडळी सारखा विचार करीत असायची. कॅमिलो अ‍ॅग्रिपूहचं या क्षेत्रातलं योगदान म्हणजे त्याने अनेक नवे पवित्रे, नवे वार, नव्या हालचाली चक्क भूमितीतल्या प्रमेयांवर आधारुन बसवल्या. आज सव्वाचारशे वर्षांनंतर तलवार हे शस्त्र म्हणून कालबाह्य झालेलं असूनही, पश्चिमी विद्वान कॅमिलो अ‍ॅग्रिपूहची आठवण काढतात ती उगीच नव्हे, आपलं हे सगळं संशोधन अ‍ॅग्रिपूहने ‘सायन्स ऑफ आर्म्स वुईथ फिलॉसॉफिकल डायलॉग’ नावाच्या ग्रंथात शब्दबद्ध करुन ठेवलं आहे. हा ग्रंथ सन १५५३ साली रोममध्ये प्रकाशित झाला होता. या कालखंडात उत्तर हिंदुस्थान मुघलांच्या तर महाराष्ट्र निजामशहा, आदिलशहा, इमादशहा यांच्या भयंकर सुलतानीत पिचून, भरडून निघत होता.
 
 
याचा अर्थ महाराष्ट्राची शस्त्रविद्या लुप्त झाली होती, असा मात्र नव्हे. याचा प्रत्यय नंतरच्या काळात आला. खिलजी, तुघलख, घोरी, मुघल हे सगळे तुर्क-अफगाणी होते. त्यांच्या सैन्यातले सेनापती आणि सैनिक पण तुर्क, अरब, अफगाणी, इराणी असे असायचे. महाराष्ट्रातल्या बहामनी सुलतानांना आणि नंतर त्याच बहामनी सल्तनतीची शकलं उडून निर्माण झालेल्या आदिलशहा, निजामशहांना लढण्यासाठी हव्या तेवढ्या प्रमाणात तुर्की, अफगाणी लोक मिळेनात. म्हणून मग त्यांनी आपल्या सैन्यात मराठी माणसांची भरती सुरु केली. मुसलमानी राजवटींपूर्वीचे हिंदू राजे चतुरंग दळानिशी युद्ध करीत. अश्वदळ, गजदळ, रथदळ आणि पदाती म्हणजेच पायदळ. पण, त्यांचा मुख्य भर गजदळ आणि पायदळावर असे. हत्तींनी शत्रूची फळी धडक मारुन फोडायची आणि मग पायदळाने त्या भगदाडातून आत घुसायचं. मुसलमानांनी हे युद्धतंत्र साफ बदलूनच टाकलं. त्यांच्या सैन्यात मुख्यत: अत्यंत चपळ असं घोडदळ असे आणि क्वचित पायदळ असे. या चपळ, लवचिक युद्धतंत्राच्या जोरावरच मुसलमानांनी अर्धे जग जिंकले होते. मुसलमानी सुलतानांच्या सैन्यात शिरण्याची संधी मिळाल्याबरोबर मराठी माणसांनी पाहता-पाहता हे युद्धतंत्र आत्मसात केलं. घोड्यावर स्वार झालेल्या मराठी सैनिकाचं आवडतं शस्त्र होतं तलवार! पण सतत प्रगती करणारं विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी तलवारीचं महत्त्व संपवलं. लांबवरुन मारा करु शकणाऱ्या तोफा आणि बंदुकांचा वापर रणांगणावर सुरु झाल्यावर तलवारी, भाले, घोडे सगळेच कालबाह्य ठरले. तरी फ्रेंचांना आपल्या तलवारबाजीचा फार अभिमान होता. १९१४ साली सुरु झालेल्या पहिल्या महायुद्धात सुरुवातीला अशा घटना घडल्या की, फ्रेंच सेनापती आपल्या पथकाच्या अगदी पुढे राहून नेतृत्व करीत. शत्रू सैन्य दृष्टिपथात आलं की, फ्रेंच सेनापती कमरेची तलवार उपसून आपल्या पथकाला ‘आगे बढो’चा आदेश देत असत. पण, समोरचा जर्मनी आधुनिक युद्ध खेळत होता. त्याच्याकडे मशीनगन हे काही मिनिटांत सलग हजार गोळ्या झाडणारं नवं शस्त्र आलं होतं. परिणामी अनेक नामवंत फ्रेंच सेनापती मशीनगनच्या माऱ्यात सापडून सलामीलाच ठार झाले आणि त्यांच्या पथकांचे धैर्य त्यामुळे खचले.
 
 
या अनुभावामुळे सर्वच युरोपीय देशांनी आपल्या युद्धतंत्रात त्वरेने बदल केला. तलवार हे फक्त एक प्रतिष्ठा दर्शविणारे शस्त्र राहिले. त्याचा प्रत्यक्ष उपयोग कायमचा संपला. पण पाश्चिमात्य लोक मोठे हुशार. त्यांनी या तलवारबाजीच्या परंपरेला जपण्यासाठी तिचं खेळात परिवर्तन करून टाकलं. त्यालाच म्हणतात ‘फेन्सिंग.’
 
 
आधुनिक ऑलिंपिक स्पर्धांना सन १८९६ साली सुरुवात झाली. तेव्हाही त्यात तलवारबाजी होतीच. पण सालोसाल तिच्या तंत्रात सतत सुधारणा होत गेली. आता हा स्पर्धात्मक खेळ असल्यामुळे त्यात प्रतिस्पर्ध्याला जखमी करणे किंवा ठार करणे असा उद्देश नसून, त्याच्यावर मात करणे एवढाच भाग राहिला.
 
 
आपल्याकडे मात्र एकंदरीतच शस्त्रविद्येला फार उतरती कळा लागली. १८५७च्या क्रांतीमुळे हादरलेल्या इंग्रज सरकारने भारतातल्या अक्षरश: प्रत्येक गावातून तलवार, भाला, जंबिया, कट्यार अशी शस्त्रं जप्त करून नेली आणि भारतीयांना पार नि:शस्त्र करून सोडलं. पण ही शस्त्रं नवीन बनवू शकणारे कारागीर गावोगाव होतेच की, तेव्हा १८७९ साली व्हॉईसरॉय लॉर्ड लिटन याने मुळी शस्त्रबंदीचा कायदाच करून टाकला. सहा इंचापेक्षा लांब पात्याचा चाकूसुद्धा बाळगण्यावर कायद्यानेच बंदी आली.
 
 
अशा स्थितीत भारतीयांची तलवारबाजीची परंपरा कशी टिकणार? त्यामुळे आपल्याकडे ‘फेन्सिंग असोसिएशन ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना व्हायलाच १९७४ साल उजाडलं. काँग्रेस या सत्ताधारी पक्षाच्या अहिंसेच्या विचित्र कल्पनांमुळे बहुधा या ‘एफ.ए.आय.’ला केंद्र सरकारची अधिकृत मान्यता मिळायला १९९७ साल उजाडलं आणि त्यानंतरसुद्धा तब्बल २३ वर्षांनी एक भारतीय व्यक्ती ऑलिंपिक स्पर्धेतल्या तलवारबाजीच्या खेळात भाग घ्यायला पात्र ठरली. तुम्हाला माहितच असेल की, २०२०च्या टोकियो ऑलिंपिकमध्ये भवानी देवी ही महिला खेळाडू पात्रता फेरीत उत्तीर्ण झाली. नुकताच तिला ‘अर्जुन’ पुरस्कारही मिळाला आहे. भवानी देवीची मातृभाषा तेलुगू. पण ती चेन्नईमध्ये राहते. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये ती तमिळनाडूचं प्रतिनिधित्व करते.
 
 
थोडक्यात, तलवारबाजीच्या आधुनिक प्रकारात आपला देश आत्ता कुठे जरा डोळे किलकिले करतोय. आणि तलवार हेच ज्याचं अत्यंत लाडकं शस्त्र होतं, तो महाराष्ट्र कुठाय? महाराष्ट्रातल्या काही ठळक शहरांमध्ये ‘फेन्सिंग क्लब्ज’, ‘फेन्सिंग असोसिएशन्स’ निघालेली आहेत. पण अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. सर्वात मोठा अडसर हा मानसिकतेचा असावा, असं वाटतं. फेन्सिंग, आर्चरी म्हणजे धनुष्यबाण आणि रायफल शूटिंग या खेळांचा महाराष्ट्रात हवा तितका प्रचार-प्रसार नाही, ही वस्तुस्थिती आहे. राज्यकर्त्यांच्या आणि त्यांच्यामुळे लोकांच्या मानसिकतेत अजूनही हे खेळ म्हणजे ‘हिंसक’ प्रकार आहेत, तेव्हा ते टाळलेले बरे, असं काहीतरी असावं.
 
 
आपण शिवछत्रपतींना देवासारखं नव्हे, देवच मानतो, त्या शिवछत्रपतींना तलवार आणि तलवारीचाच एक प्रकार असलेला पट्टा ही शस्त्रं अतिशय प्रिय होती. शिवरायांचं ब्रिटिश म्युझियममध्ये असणारं जे अस्सल चित्र आहे, त्यात त्यांच्या हातांत ही दोन्ही शस्त्रं दाखवलेली आहेत. हाताच्या पंजापासून मनगटापर्यंतचा भाग झाकणारा तो पट्टा आहे. दुसरी अर्थातच तलवार आहे. अफजल स्वारीच्या वेळेस महाराजांना स्वप्नदृष्टांत झाला होता. साक्षात आई भवानी त्यांच्या तलवारीत शिरून अदृश्य झाली होती. ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या पहिल्या भारतीय खेळाडूचं नाव भवानी देवी असावं, हा एक गंमतीदार योगायोग आहे. एकंदरीत महाराष्ट्राला या क्षेत्रात भरपूर काही करून दाखवायला हवं आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@