कोकणातील कासवांना का लावले 'सॅटेलाॅईट काॅलर' ? त्यांना त्रास होईल का ?

    31-Jan-2022   
Total Views |
sea turtle



भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर प्रथमच एखाद्या सागरी कासवाला ‘सॅटेलाईट ट्रान्समीटर’ लावण्याचा प्रयोग महाराष्ट्रात पार पडला. दि. २५ जानेवारी रोजी वेळास आणि आंजर्ले किनार्‍यावरील मादी कासवांना ‘सॅटेलाईट ट्रान्समीटर’ लावून त्यांना पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. त्याचे नामकरण अनुक्रमे ‘प्रथमा’ आणि ‘सावनी’ असे करण्यात आले. यामुळे आपल्याला या कासवांच्या विणीच्या नेमक्या जागा, नेहमीच्या अधिवासाच्या जागा, खाद्याच्या जागा आणि स्थलांतर मार्गांची माहिती मिळेल. विशेष म्हणजे माध्यम विश्वातील केवळ दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या टीमने ‘सॅटेलाईट ट्रान्समीटर’ लावण्याच्या या प्रक्रियेचे छायाचित्रण केले. सागरी कासवांना ‘सॅटेलाईट ट्रान्समीटर’ लावण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेविषयी माहिती देणारा हा लेख....


सागरी कासवांविषयी...
१) सागरी कासवे उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंध समुद्रातील अधिवास पसंत करतात.
२) समुद्री कासवांना डोके आणि पाय कवचामध्ये आत ओढून घेता येत नाहीत.
३) कासवांचे पुढील पाय वल्ह्यासारखे असतात त्यावर एक किंवा दोन नख्या असतात.
४) सरीसृप वर्गात नराचा आकार मोठा असतो, सागरी कासवांमध्ये मादी मोठी असते.
५) सागरी कासवांना उत्तम दृष्टी आहे. परंतु, प्रतिमा कृष्णधवल असते.
६) कासवांचे घ्राणेंद्रिय उत्तम असले, तरी स्वादेंद्रिय प्रगत नाहीत.
७) नर व मादी कासवांचे मीलन समुद्रात होते. नर सहसा किनार्‍यावर येत नाही.
८) मादी समुद्री कासव फक्त अंडी घालण्यासाठी किनार्‍यावर येते.
ऑलिव्ह रिडले कासव
जगभरात समुद्री कासवाच्या सात प्रजाती आढळतात. ज्यामधील ‘ऑलिव्ह रिडले’ ही सर्वात जास्त संख्या असलेली प्रजात आहे. हे कासव थंड तापमान असणार्‍या हिंद महासागरासारख्या समुद्रात अधिवास करणे पसंत करत नाही. उलटपक्षी अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरासारख्या उष्ण किंवा उपोष्ण कटिबंधीय समुद्रात अधिवास करते. याचे वजन ५० किलोपर्यंत वाढत असून आकार ६० ते ७० सें.मी. पर्यंत वाढतो. याच्या कवचाचा रंग ऑलिव्ह हिरवा असल्यामुळे त्याला ’ऑलिव्ह रिडले’ असे नाव पडले. इंग्रजीत ’रिडले’ म्हणजे लहान आकाराचा. या कासवाच्या वल्ह्यासारख्या पुढच्या परांवर एक नख असते. जेलिफीश हे त्याचे प्रमुख खाद्य आहे. नोव्हेंबर ते मार्च हा त्यांचा विणीचा हंगाम असून विणीच्या एका हंगामात ते २० ते २८ दिवासांच्या अंतराने एक ते तीन वेळा विण करू शकतात. हे कासव साधारण १०० ते १५० दरम्यान अंडी घालते.

कोकणातील विणीचा हंगाम
कोकणातील समुद्र किनार्‍यांवर प्रामुख्याने ‘ऑलिव्ह रिडले’प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. पूर्वीच्या नोंदीप्रमाणे पश्चिम मुंबई आणि पालघर जिल्ह्यांमधील किनार्‍यांवर या प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येत होत्या.यामध्ये प्रामुख्याने डहाणू, वसई, वर्सोवा, जुहू, राजभवन या किनार्‍यांचा समावेश होता. मात्र, वाढत्या शहरीकरणामुळे किनार्‍यांवर मानवी वावर वाढला. त्यामुळे याठिकाणी कासवांची विण होण्यास बंद झाली. आता प्रामुख्याने रायगडमधील चार आणि रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी १३ किनार्‍यांवर ‘ऑलिव्ह रिडले’ची विण होते. कधीकधी या किनार्‍यांशिवाय इतर किनार्‍यांवरही त्यांची घरटी सापडतात. नोव्हेंबर ते मार्च हा त्यांचा प्रमुख विणीचा हंगाम आहे. मात्र, हवामान बदलामुळे आता जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्येच कासवाची अंडी मोठ्या संख्येने सापडतात. ’ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या माद्या रात्रीच्या वेळेस किंवा पहाटे अंडी घालण्यासाठी किनार्‍यावर येतात. वाळूत साधारण दीड फूट खोल खड्डा करून त्यामध्ये अंडी घालतात. याला ’घरटे’ म्हटले जाते.




सागरी कासव संवर्धन कसे होते ?
राज्यात २००३ पासून ’सागरी कासव संवर्धन मोहिमे’ला चिपळूणच्या ’सह्याद्री निसर्ग मित्र’ या संस्थेने सुरुवात केली. सागरी कासव विणीच्या किनार्‍यांवर कासवमित्रांची नेमणूक करण्यात आली आहे. या कासवमित्रांना वन विभागाकडून मानधन देण्यात येते. सागरी कासवांमध्ये पालकत्व नसल्याने माद्या अंडी घालून पुन्हा समुद्रात परतात. त्यामुळे ही घरटी समुद्राच्या भरतीमुळे उद्ध्वस्त होण्याची भीती असते किंवा शिकारी प्राण्यांकडून त्यामधील अंडी फस्त केली जातात. अशावेळी मादी कासवाचे शरीर वाळूत घासल्यामुळे त्यावर तयार झालेल्या चिन्ह्याच्या मदतीने कासवमित्र घरटी शोधून काढतात. कासवमित्रांकडून ही अंडी टोपलीत सुरक्षितरित्या ठेवली जातात. भरतीरेषेपासून दूर कृत्रिम घरट्यांची निर्मिती करण्यासाठी उबवणी केंद्र तयार केले जाते. त्याला ’हॅचरी’ म्हणतात. या ’हॅचरी’त मादी कासवाने केलेल्या खड्ड्याप्रमाणे कृत्रिम खड्डा तयार केला जातो. त्यामध्ये ही अंडी ठेवून त्यावर वाळू टाकून खड्डा भरला जातो. त्याभोवती कुंपण तयार केले जाते. अंड़यांमधून बाहेर पडलेली पिल्ले इतरत्र भटकू नयेत म्हणून त्यावर जाळीदार टोपले ठेवले जाते. साधारण ५० ते ५५ दिवसांच्या उबवणीच्या कालावधीनंतर पिल्ले त्या कृत्रिम घरट्यामधून बाहेर पडतात. याला शास्त्रीय भाषेत ’इएक्स-सेटू कॉन्झर्वेशन’ असे म्हणतात. काही किनार्‍यांवर पौर्णिमेच्या मोठ्या भरतीरेषेपासून दूर कासवांचे घरटे आढळल्यास त्याला त्याच ठिकाणी ठेवून नैसर्गिक पद्धतीने संवर्धन केले जाते. याला ’इन-सेटू कॉन्झर्वेशन’ असे म्हटले जाते.


'सॅटेलाईट ट्रान्समीटर' का लावतात ?
सागरी कासवांच्या नेहमीच्या खाद्याच्या जागा (फीडिंग ग्राऊंड) आणि विणीसाठीच्या जागा यामधील अंतर काही हजार किलोमीटर इतके दूर असू शकते. तसेच सागरी कासवे स्थलांतरही करु शकतात. सागरी कासवांचे स्थलांतर किंवा त्यांच्या कायमस्वरुपी अधिवासाचा मागोवा घेण्यासाठी दोन प्रकारे त्यांचा शास्त्रीय अभ्यास केला जातो. त्याच्या परांवर खुणचिठ्ठी (टॅग) लावून किंवा कवचावर ’सॅटेलाईट ट्रान्समीटर’ लावून. परावर खुणचिठ्ठी लावलेले कासव इतर कोणाला दिसून आल्यावरच त्याची माहिती मिळते. मात्र, ’सॅटेलाईट ट्रान्समीटर’द्वारे आपल्याला दररोज त्यांची इत्यंभूत माहिती अवगत होते. ओडिशामध्ये अशाच प्रकारे ’सॅटेलाईट ट्रान्समीटर’ लावून सागरी कासवांचा अभ्यास झाला होता. त्यावेळी या कासवांनी श्रीलंकापर्यंत प्रवास केल्याचे समोर आले होते.


'सॅटेलाईट ट्रान्समीटर' म्हणजे ?
‘सॅटेलाईट ट्रान्समीटर’ हे सामान्यपणे ’सॅटलाईट’शी जोडलेले असते. खासकरून वन्यजीवांच्या संबंधित अभ्यासासाठी अवकाशात सोडलेल्या काही उपग्रहांशी ते जोडलेले असते. ज्याला ’पोलार ऑरबिटिंग सॅटेलाईट’ असे म्हणतात. वेळास आणि आंजर्ले किनार्‍यांवरील कासवांना लावलेले ट्रान्समीटर हे ’अ‍ॅडव्हान्स रिसर्च अ‍ॅण्ड ग्लोबल ऑब्झर्वेशन सॅटेलाईट’ या कंपनीशी जोडलेले असून ’भारतीय अवकाश संशोधन संस्थे’चे (इस्रो) ’सरल’ नामक ‘सॅटेलाईट’ हे या कंपनीशी जोडलेले आहे.




'ट्रान्समीटर' कसे काम करते ?
सागरी कासवांच्या कवचावर पुढच्या बाजूला ’सॅटेलाईट ट्रान्समीटर’ लावले जाते. वेळास आणि आंजर्ले किनार्‍यांवरील कासवांना लावलेल्या ’सॅटेलाईट ट्रान्समीटर’मध्ये महत्त्वाचा भाग हा बॅटरीने व्यापलेला आहे. त्याच्या पुढच्या बाजूला अँटेना असून ’ट्रान्समीटर’चीसंदेशवहन प्रणाली आहे. बॅटरीवर दोन ’स्क्रू’सारखी बटणं आहेत, ज्याला ’स्लॉट वॉटर स्वीच’ म्हणतात. जी बॅटरीला कार्यान्वित करुन संदेशवहन प्रणालीला ’सॅटेलाईट’ला संदेश पाठवण्यासाठी मदत करतात. हे यंत्र पाण्यामध्ये असल्यावर पाण्याच्या दाबामुळे ’स्लॉट वॉटर स्वीच’ बंद असतो. मात्र, सागरी कासवांना विशिष्ट काळाने समुद्राच्या पृष्ठभागावर श्वास घेण्यासाठी यावे लागते. अशा वेळी कासवाने श्वास घेण्यासाठी डोके वर काढल्यावर त्याच्या पाठीवरील ’ट्रान्समीटर’ पाण्याबाहेर येतो. पाण्याच्या दाब कमी झाल्यामुळे ’स्वीच’ सुरू होऊन बॅटरी कार्यान्वित होते. अशावेळी ’सॅटेलाईट’ हे अवकाशातून त्याच प्रदेशामधून जात असेल, तर ’ट्रान्समीटर’ची संदेशवहन प्रणाली कासवाच्या स्थानाचे संदेश त्याला पाठवते. हे ’सॅटलाईट’ दर दिवशी भारताच्या अवकाशातून साधारण चार ते पाच तासांसाठी प्रवास करते आणि अशावेळी ते पाच हजार किलोमीटर क्षेत्रातील संदेशांचा स्वीकार करते. यामुळे आपल्याला कासवाचे स्थलांतर मार्ग, अधिवासाच्या जागा, त्याची पोहण्याची खोली, या सर्वांविषयी माहिती मिळते.

कासवांना त्रास होतो का ?
सागरी कासवांच्या संवर्धनासाठी त्यांच्या विणीच्या जागा, नेहमीच्या अधिवासाच्या जागा, खाद्याच्या जागा आणि स्थलांतर मार्गांची माहिती असणे आवश्यक असते. ही सर्व माहिती ’सॅटेलाईट ट्रान्समीटर’मुळे आपल्याला मिळते. सुरुवातीच्या काही काळासाठी कासवांना ’सॅटलाईट ट्रान्समीटर’चा त्रास होतो. कारण, पाठीवर यंत्र असल्याने अवघडल्यासारखे होते. मात्र, कालांतराने या यंत्राची त्यांना सवय होते. शिवाय या यंत्राचे वजन हे कासवाच्या शरीराच्या एकूण वजनापैकी केवळ तीन टक्के असते. वेळास आणि आंजर्ले किनार्‍यावरील कासवांचे वजन ३८ ते ४० किलोच्या आसपास होते आणि यंत्राचे वजन ४०० ग्रॅम होते. शिवाय त्याची रचनाही कासव पोहताना पाण्याच्या प्रवाहाला छेदून जाईल, अशी असते.

पाच कासवांना टॅगिंग
कोकण किनारपट्टीवर विणीसाठी येणार्‍या सागरी कासवांना ’सॅटेलाईट ट्रान्समीटर’ लावण्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासाठी ’मँग्रोव्ह फाऊंडेशन’ने ’भारतीय वन्यजीव संस्थान’ला (डब्ल्यूआयआय) ९ लाख, ८३ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले आहे. या प्रकल्पाअंतर्गत पाच कासवांना ’सॅटेलाईट टॅग’ लावण्याचा आमचा मानस आहे. २५ जानेवारी रोजी वेळास आणि आंजर्ले येथे दोन मादी कासवांना ’सॅटेलाईट ट्रान्समीटर’ लावण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात गुहागर किनार्‍यावर उर्वरित तीन कासवांवर ’ट्रान्समीटर’ बसवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- विरेंद्र तिवारी, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष

दीड वर्ष माहिती मिळेल
वेळास आणि आंजर्लेसोबत येत्या काळात सागरी कासवांना लावण्यात येणारे ’सॅटेलाईट ट्रान्समीटर’ हे ५०० दिवस आपल्याला संदेश पाठवतील. म्हणजेच साधारण दीड वर्ष कासवाच्या प्रवासाची माहिती आपल्याला मिळू शकेल. ओडिशामध्ये ’सॅटेलाईट ट्रान्समीटर’ लावलेली ‘ऑलिव्ह रिडले’ कासवे ही अरबी समुद्रात आलेली नव्हती. त्यामुळे महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रातील ‘ऑलिव्ह रिडले’ कासवे ही अरबी समुद्रात अधिवास करत असल्याची शक्यता आहे. माझ्या अंदाजानुसार ही कासवे जास्तीत जास्त अरबी समुद्राच्या दक्षिणेकडील शेवटच्या टोकापर्यंत प्रवास करु शकतील.
- डॉ. आर.सुरेश कुमार, शास्त्रज्ञ, डब्ल्यूआयआय
संवर्धनाला वेगळी दिशा
२००३ साली ’सह्याद्री निसर्ग मित्र’च्या माध्यमातून आपण महाराष्ट्रात सागरी कासव संवर्धनाला सुरुवात केली. यामाध्यमातून आपण स्थानिक लोकांना संवर्धनाच्या कार्यात गुंतवून वन विभागाला या कार्यात सहभागी करुन घेतले. गेल्या २० वर्षांपासून सुरू असलेल्या संवर्धनाच्या कामाला संशोधनाची जोड देणे आवश्यक होते. आता ’सॅटेलाईट ट्रान्समीटर’ लावून संशोधनाच्या कामाला सुरुवात झाल्याने त्यातून निघणार्‍या निष्कर्षांच्या माध्यमातून संवर्धनाच्या कामाला एक वेगळी दिशा मिळेल.
- भाऊ काटदरे, संस्थापक, सह्याद्री निसर्ग मित्र

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.