जांबोरी मैदानातील विविध कामांवर स्थानिकांचे तीव्र आक्षेप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2022   
Total Views |
 
jambori-maidan
 
 
 
मुंबई : वरळी मतदारसंघातील बीडीडी चाळींचा पुनर्विकासाचा प्रश्न हा मागील अनेक वर्षांपासून जैसे थे या स्थितीच प्रलंबित आहे. २०१७ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा शुभारंभ करण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा एकदा त्या कामाला कुठेतरी खीळ बसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यातच आता जांबोरी मैदानावर करण्यात येत असलेल्या विविध कामांवर देखील स्थानिक नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला आहे. मैदानावर करण्यात आलेल्या या विकासकामांचे लोकार्पण रविवार, दि. २३ जानेवारी रोजी करण्यात आले. दरम्यान, लोकार्पण करण्यात आलेल्या या विकासकामांवरून आणि त्याच्या दर्जावरून आता स्थानिकांनी आपला रोष व्यक्त केला आहे.
 
 
 
वरळीच्या ऐतिहासिक जांबोरी मैदानाचे सुशोभीकरण करून त्याचा लोकार्पण सोहळा, स्थानिक आमदार व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवार, दि. २३ जानेवारी रोजी पार पडला. मैदानावर स्थानिकांसाठी आणि युवकांसाठी नवा पादचारी ट्रॅक, दिव्यांचे लोखंडी खांब, लहान मुलांसाठी ट्रेकिंगची सुविधा अशी विविध कामांचे लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले आहे. मात्र, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेली ही सर्व कामे अत्यंत निकृष्ठ दर्जाची असून केवळ दिखाव्यासाठी ही सर्व कामे करण्यात आल्याचे स्थानिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे.
 
 
 
'जांबोरी मैदान परिसरातील जीर्ण झालेल्या जुन्या वास्तूंना केवळ बाहेरून रंगरंगोटी करून त्या वास्तूतील जुन्या खांबांवर पुन्हा एकदा सिमेंट-वाळूच्या मिश्रणाचा मुलामा लाडावून रंग रांगोटी करण्यात आली आहे. सुस्थितीत असलेले जुने पेवर ब्लॉक्स काढून पुन्हा त्या ठिकाणी अनावश्यकपणे नवीन ब्लॉक्स टाकण्यात आले आहे. वरकरणी हे काम चांगल्या प्रकारे पूर्णत्वास आल्याचे जरी दाखविण्यात आले असले तरीही या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. सदरील कामामध्ये कुठल्याही आवश्यक घटकांचा वापर केल्याचे दृश्य स्वरूपात दिसून येत नाही. कामासाठी लागणार वेळ देखील न देता घाईघाईत हे काम उरकण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक नगरसेवकांच्या माध्यमातून करण्यात आलेले आणि स्थानिक आमदार आदित्य ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेले हे काम म्हणजे निव्वळ दिखावा आहे,' अशी भावना बहुतांश स्थानिक नागरिकांनी बोलून दाखवली आहे.
 
 
 
या संदर्भात भाजपचे वरळी विधानसभा सरचिटणीस विजय बांदीवडेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सदर विकास कामाबाबत मनपा कार्यालयात माहिती विचारली व सतत पाठपुरावा केला असल्याचे सांगितले, परंतु अद्यापपर्यंत त्यांना कुठलाही प्रतिसाद दिला जात नाही. अपील करूनही अद्यापपर्यंत कुठलीही माहिती दिली जात नाही, असे म्हणत हा सुशोभीकरणाचा खर्चिक अपव्यय कशासाठी ?' असा सवाल उपस्थित केला आहे.
 
 
 
लोकार्पण सोहळे केवळ निवडणुकीपुरतेच !
'मुंबई महापालिकेची प्रस्तावित निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. संपूर्ण मुंबईत ज्या प्रमाणे विकासकामांचे उदघाटन केले जात आहे त्याच पार्श्वभूमीवर महापालिका निवडणूक जवळ आल्यामुळे वरळीतही हे प्रकार सुरु झाले आहेत. जांबोरी मैदानात विकासकामांच्या नावाखाली एकप्रकारे राजकारण सुरु असल्याचे दिसून येत आहे. जांबोरी मैदान सुशोभीकरणाच्या नावाखाली ज्या स्टॉलधारकांना बाजूला करण्यात आले आहे, ते आज अक्षरशः रस्त्यावर आले आहेत. अशाच प्रकारे जर इमारत पुनर्विकासाच्या नावाखाली आम्हाला सध्याची घरे रिकामी करायला लावली तर कदाचित आमच्यावरही उद्या रस्त्यावर येण्याची वेळ येऊ शकते, अशी आम्हाला भीती आहे.'
- दीपक सावंत, भाजप पदाधिकारी, वरळी विधानसभा
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@