प्रोजेक्ट एम. के. अल्ट्रा : मनोविच्छेदाचा अमेरिकन प्रयोग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


alta_1  H x W:

 
 सर्वशक्तिमान अमेरिकेने एकदा करायचंच म्हटल्यावर अशक्य काय होतं? लवकरच अमेरिकन रसायन-औषधी शास्त्रज्ञ, मनोवैज्ञानिक आणि गुप्तहेर अधिकारी यांच्या सहकार्याने एक जबरदस्त महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाला. त्याचं नाव होतं ‘प्रोजेक्ट एम. के. अल्ट्रा.’
 
कोरोनाच्या कहरामुळे अनेक गोष्टी, कार्यकम रद्द झालेत किंवा लांबणीवर पडलेत. अनेक महत्त्वाकांक्षी चित्रपट किंवा चित्रमालिका तयार आहेत. पण, निर्माते, वितरक त्यांचं प्रसारण करण्याबाबत द्विधा मनःस्थितीत आहेत. टॉम क्रूझ या हॉलिवूडच्या अव्वल लोकप्रिय अभिनेत्याचे ‘टॉप गन-२’ आणि ‘मिशन इम्पॉसिबल ७’ हे चित्रपट केव्हाचे तयार आहेत. तीच गत जेम्स बाँडच्या ‘नो टाईम टू डाय’ या चित्रपटाची आहे.‘मिशन इम्पॉसिबल’ किंवा जेम्स बाँड चित्रपटांचा एक विशिष्ट साचा असतो. एखादा महाखलनायक काहीतरी प्रचंड कारस्थान रचून संपूर्ण जगावर हुकमत गाजवू पाहत असतो. ईथन हंट (‘मिशन इम्पॉसिबल’ मालिकेचा गुप्तहेर नायक) किंवा जेम्स बाँड मोठ्या हिकमतीने महाखलनायकाचं कारस्थान हाणून पाडतात. हे करताना नायकाला अत्याधुनिक शस्त्रास्त्रं, आलिशान गाड्या, फटाकड्या नायिका वगैरे मसाला पुरवण्यासाठी त्याचा देशभक्त बॉस आणि त्याचं संपूर्ण गुप्तहेर खातं अगदी सुसज्जपणे पाठीशी उभं असतं.

 
हा साचा किंवा फॉर्म्युला निर्माण केला १९६२ साली पडद्यावर आलेल्या ‘डॉ. नो’ या पहिल्या बाँड चित्रपटाने. हा चित्रपट जगभर इतका लोकप्रिय झाला की, आता सुमारे ६० वर्षांनंतरही ‘नो टाईम टू डाय’ या पंचविसाव्या बाँडपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.बाँड चित्रपटाप्रमाणेच ‘दि इपक्रेस फाईल’ ही चित्रमालिकाही कोरोनामुळे लांबणीवर पडली आहे. ती गुणवत्तेत कशी असेल कोण जाणे; पण याच नावाचा १९६५ साली पडद्यावर आलेला चित्रपट मात्र त्याच्या वेगळेपणामुळे आजही जाणत्या प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. १९६२च्या जेम्स बाँडच्या ‘डॉ. नो’च्या तुलनेत हॅरी पामर या नायकाचा १९६५ सालचा ‘दि इपक्रेस फाईल’ हा चित्रपट खूपच वास्तवाच्या जवळ जाणारा होता. जेम्स बाँड मालिकेचे आतापर्यंत २५ चित्रपट झाले. त्यापैकी पहिल्या काही चित्रपटांत शॉन कॉनरी या स्कॉटिश अभिनेत्याने बाँडची भूमिका केली. पुढे शॉन कॉनरीला ‘सर’ हा किताब मिळाला. हॅरी पामरचे पुढे चार चित्रपट निघाले. सर्व चित्रपटात मायकेल केन या कॉकनी अभिनेत्याने पामरची भूमिका केली. ‘कॉकनी’ ही एकेकाळी इंग्लंडमधली हलक्या दर्जाची जमात समजली जात असे. त्यांची एक विशिष्ट बोलीसुद्धा होती. मायकेलचा बाप गोदीत हमाल होता आणि आई स्वयंपाकीण होती. मात्र, आज मायकेल केन हा एक अव्वल गुणवत्तेचा ब्रिटिश अभिनेता आहे. त्यालाही ‘सर’ किताब मिळाला. आज ८८ वर्षांचा असलेला सर मायकेल आणि अलीकडेच मरण पावलेला सर शॉन कॉनरी हे व्यक्तिगत जीवनातही चांगले मित्र होते.

तर आता ‘द इपक्रेस फाईल’ या आगळ्या नावाच्या वेगळ्या कथानकाकडे पाहू. ब्रिटनमधल्या एका महत्त्वपूर्ण संरक्षण प्रकल्पातून १५ प्रमुख शास्त्रज्ञ एकापाठोपाठ एक असे बाहेर पडतात. १६वा शास्त्रज्ञ रेल्वेने प्रवास करत असताना त्याचं अपहरण केलं जातं नि त्याचा शरीर संरक्षक ठार होतो. कर्नल रॉस हा गुप्तहेर प्रमुख सार्जंट हॅरी पामर या गुप्तहेराला त्या ठार झालेल्या शरीर संरक्षकाच्या रूपात हे रहस्य उलगडण्याच्या कामगिरीत जुंपतो.आता व्यक्तिरेखा आणि त्यांची पार्श्वभूमी यातला फरक पाहा. बाँड हा ब्रिटिश शाही नौदलात ‘कमांडर’ या अधिकारी श्रेणीत आहे. सहाजिकच तो मध्य लंडनमधल्या सुखवस्तू वस्तीत राहतो; तर पामर हा ब्रिटिश पायदळातला साधा सार्जंट आहे. सार्जंट म्हणजे शिपायांचा प्रमुख. साहजिकच तो लंडनच्या कनिष्ठ मध्यमवर्गीय चाळीत राहतो. अपहरण झालेल्या रॅडक्लिफ या शास्त्रज्ञाच्या मागावर असताना पामरला एक ध्वनिफीत सापडते. तिच्यावर लिहिलेलं असतं - ‘इपक्रेस’. म्हणजे काय?

ती ध्वनिफीत वाजवून पाहिली असता तिच्यातून काही चित्रविचित्र कर्णकर्कश आवाज आणि अगम्य शब्द ऐकू येतात. त्यांचा अर्थ कुणीही उलगडू शकत नाही. रहस्य गडद होऊ लागतं. इतक्यात पामरचं स्वत:चंच अपहरण होतं आणि त्याला कळतं की, आपले शत्रू साधेसुधे नाहीत. ते विशिष्ट मनोवैज्ञानिक प्रक्रियांद्वारे आपलं मनच ताब्यात घेऊ पाहत आहेत. ‘माईंड कंट्रोल’ किंवा ‘ब्रेन वॉशिंग’ या नावांनी ओळखल्या जाणार्‍या या प्रक्रियेचं शास्त्रीय नाव आहे - ‘इंडक्शन ऑफ सायकोन्यूरोसिस बाय कंडिशंड रिफ्लेक्स अंडर स्ट्रेस’ याच्याच आद्याक्षरांचा शब्द होतो ‘इपक्रेस.’

पामर आपलं मन शत्रूच्या ताब्यात जाऊ न देण्याचा आटोकाट; पण अयशस्वी प्रयत्न करतो. त्याला कळतं की, आपला पथकप्रमुख मेजर दाल्बी हादेखील फितूर आहे. क्लायमॅक्सच्या प्रसंगी सार्जंट पामर मेजर दाल्बीच्या ‘माईंड कंट्रोल’वर मात करून त्याला ठार करतो. हे सगळं पाहणारा त्याचा गुप्तहेर प्रमुख बॉस कर्नल रॉस त्याला म्हणतो, “तू आज्ञापालन न करणारा आहेस, म्हणूनच तुला हे जमलं,” म्हणजे शाबासकीत पण एक चिमटा! वैतागलेला पामर त्याला म्हणतो, “तुमच्या असल्या प्रायोगिक खेळामध्ये माझा जीव गेला असता तर?” त्यावर रॉस उतरतो, “मग, काय बिघडलं? त्यासाठीच आम्ही तुला पगार देतो!” नोकरशाहीमध्ये बॉस आणि हाताखालचे लोक यांच्यातले संबंध दाखवणारं हे चित्रण वास्तवाच्या खूप जवळ जाणारं होतं. म्हणजेच ग्लॅमरस वगैरे अजिबात नव्हतं. एक प्रकारे बाँड चित्रपटांच्या थेट विरुद्ध असं हे चित्रण होतं. विशेष असं की, अशा प्रकारचा चित्रपट निघतो आहे, हे कळल्यावर बाँड चित्रपटाचा सहनिर्माता हॅरी साल्टझ्मन याने या चित्राचे सगळे हक्क विकत घेतले. बाँडप्रमाणेच या चित्रपटाचं प्रेक्षकांनी भरघोस स्वागत केलं.
 
 
तुमच्या जर लक्षात येत असेल, तर १९६७च्या देव आनंदच्या ‘ज्वेल थीफ’ या चित्रपटात ‘दि इपक्रेस फाईल’मधला ब्रेनवॉशिंगचा भाग, हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या पचनी पडेल इतपत सौम्य करून झकासपैकी दर्शविण्यात आला आहे. पटकथालेखक आणि दिग्दर्शक विजय आनंद उर्फ गोल्डीची ही किमया होती. खलनायक अर्जुन म्हणजे अशोक कुमार हा ‘ब्रेनवॉशिंग’ प्रक्रियेने नायक विनय म्हणजे देव आनंदला अमर या एका आंंतरराष्ट्रीय हिरे चोराच्या व्यक्तिमत्त्वात परिवर्तित करतो. म्हणजे आपणच अमर आहोत, असं विनयला वाटू लागतं, इत्यादी.आता यातला खतरनाक भाग असा की, ‘दि इपक्रेस फाईल’मध्ये जो ‘ब्रेनवॉशिंग’ नामक प्रकार दाखवला गेला, ते सगळं सत्य होतं आणि चित्रपटापेक्षा अधिक भीषण सत्य होतं.
मनोविज्ञान क्षेत्रातल्या या भीषण प्रयोगाची सुरुवात सोव्हिएत रशियाने केली. १९५० साली कोरियामध्ये यादवी युद्ध सुरू झालं.

 साम्यवादी उत्तर कोरियाने लोकशाहीवादी दक्षिण कोरियावर आक्रमण केलं. रशियाने उत्तर कोरियाची बाजू घेतल्यावर अमेरिकेने साहजिकच दक्षिण कोरियाची बाजू घेतली. उत्तर कोरियाने पुष्कळ अमेरिकन सैनिकांना कैद केलं. पुढे युद्ध थांबलं. सामंजस्य करार झाला. उत्तर कोरियाने अमेरिकन युद्धकैद्यांना मुक्त केलं. पण, आश्चर्य म्हणजे अनेक अमेरिकन सैनिकांनी मायदेशी न परतता उत्तर कोरियातच राहणं पसंत केलं. जे बंदी अमेरिकेत परतले, ते कडवे कम्युनिस्ट बनले आहेत आणि मोठ्या हिरिरीने आपल्या मताचा अमेरिकेत प्रचार-प्रसार करीत आहेत, असं त्यांच्या वरिष्ठांना आढळलं. अमेरिकन गुप्तचर खात्याने या सगळ्या प्रकाराची कसून चौकशी केली. तेव्हा त्यांना असं आढळलं की, या युद्धबंद्यांवर ‘ब्रेनवॉशिंग’चा प्रयोग करून त्यांच्या मेंदूत साम्यवादी तत्त्वज्ञान ठोकून बसवण्यात आलं आहे.
 
 
अमेरिकन लोक हे फारच उत्तम प्रचारक असतात. १९३५ साली अमेरिकन गुप्तचर खात्याचा प्रमुख अ‍ॅलन डल्लेस याने प्रिन्स्टन विद्यापीठात एक जाहीर भाषण करून, या प्रकाराची माहिती जनतेसमोर उघड केली. अशा रीतीने व्यक्तीचा मेंदू आणि मन ताब्यात घेण्याच्या नि ते करताना ‘एलएसडी’ या एका नशा येणार्‍या पावडरचा भरपूर उपयोग करण्याच्या सोव्हिएत शास्त्रज्ञांच्या पद्धतीला डल्लेसने ‘अमानुष’ म्हटलं. अमेरिकन जनतेसकट सगळेच लोकशाहीवादी देश हादरले. सोव्हिएत रशियाला बदनाम करण्याचा डल्लेसचा हेतू सफल झाला. खरी गोष्ट अशी होती की, जे तंत्र आणि जी पावडर सोव्हिएत शास्त्रज्ञांना माहीत आहे, ती आमच्या शास्त्रज्ञांना का माहीत नाही, यावरून डल्लेस हैराण होता.पण, सर्वशक्तिमान अमेरिकेने एकदा करायचंच म्हटल्यावर अशक्य काय होतं? लवकरच अमेरिकन रसायन-औषधी शास्त्रज्ञ, मनोवैज्ञानिक आणि गुप्तहेर अधिकारी यांच्या सहकार्याने एक जबरदस्त महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाला. त्याचं नाव होतं ‘प्रोजेक्ट एम. के. अल्ट्रा.’

कोणताही नवा शास्त्रीय प्रयोग स्वत:वर करायला उत्सुक असलेले काही वैज्ञानिक, काही कोरियातून परतून कम्युनिस्ट बनलेले सैनिक, काही गुन्हेगार अशांवर हे प्रयोग सुरू झाले. हा प्रकल्प नागरिक, राजकारणी, पत्रकार इतकंच नव्हे, तर खुद्द ‘सीआयए’मधल्याही अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांपासून गुप्त ठेवण्यात आला.परंतु, काही काळाने बातम्या बाहेर फुटल्याच. एका डॉक्टरने पाचव्या मजल्यावरच्या घराच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली. व्हीटी बल्गर नावाचा एक गुन्हेगार कैदी म्हणतो, “मला भयानक भास होऊ लागले. माझ्या समोरच्या माणसांच्या ठिकाणी मला सांगाडे दिसू लागले. एकाच्या हातात कॅमेरा होता. त्याजागी मला कुत्रा दिसू लागला. बाजूच्या भिंतीमधून रक्त वाहत आहे, असं मला वाटू लागलं. माजी पचनसंस्था पार बिघडून गेली.” इतरांचे अनुभव यापेक्षाही भयानक होते. त्यामुळे खुद्द ‘सीआयए’मध्येच अंतर्गत बोंबाबोब झाली. तेव्हा घाईघाईने प्रकल्प गुंडाळण्यात आला आणि संबंधित फाईल्स नष्ट करण्यात आल्या.
 
हे झालं अमेरिकन नागरिकांबद्दल; पण ‘सीआयए’ने हा प्रकल्प हाती घेतला, तो शत्रूच्या माणसांचं ‘ब्रेनवॉशिंग’ किंवा ‘माईंड कंट्रोल’ करण्याचं तंत्र शोधण्यासाठी, अधिकाधिक विकसित करण्यासाठी. त्याचं काय झालं? त्याबद्दल कुणीही, काहीही सांगत नाही. मानसशास्त्रज्ञ एखाद्या रोग्यावर उपचार करण्यासाठी मोहिनीविद्येचा-‘हिप्नॉसिस’चा उपयोग करतात. पण, तो अंमल कायम टिकत नाही. ‘ब्रेनवॉशिंग’ करून साम्यवादाला अनुकूल बनवलेले लोक कायमचे साम्यवादी राहत नाहीत. मात्र, त्यांच्या मनावरचा तो अंमल टिकेपर्यंत ते आपल्या बॉससाठी बरंच काम करून गेलेले असतात.

 सध्या काही मोठ्या कंपन्यांच्या संगणक कार्यक्रमांमधले घोटाळे चर्चिले जात आहेत. त्याबाबतीत असंच काही तर घडलं नसेल ना?






 
@@AUTHORINFO_V1@@