मल्लखांबचा जागरकर्ता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2021   
Total Views |
manas_1  H x W: 
 
 
‘भारताचा प्राचीन खेळ’ अशी ओळख असलेल्या मल्लखांबच्या प्रसारासाठी कार्यरत असलेल्या नाशिक येथील संतोष भालेराव यांच्याविषयी...
 
 
 नाशिक नगरी ही जितकी आध्यात्मिक नगरी म्हणून ओळखली जाते, तितकीच क्रीडाभूमी म्हणूनदेखील आपली वेगळी नाशिकने निर्माण केली आहे. तसेच नाशिकमधील खेळाडूंनी अगदी ‘ऑलम्पिक’पर्यंत मजल मारली आहे. दुसरीकडे भारतीय मातीतील खेळांनाही नाशिकमध्ये तसेच मानाचे स्थान... नाशिकमधील काही व्यायामशाळा व शैक्षणिक संस्थांमध्ये मल्लखांब खेळाचे धडे आजही दिले जातात.तसा अगदी फारसा चर्चेत नसलेला हा खेळ. मात्र, या खेळाची गरज नक्कीच आहे, हेच ओळखून नाशिक येथील संतोष भालेराव हे आपल्या उतारवयातदेखील मल्लखांबचा प्रसार व प्रचार करण्यासाठी कार्यरत आहेत.
 
 
 
संतोष भालेराव यांची नाशिक जिल्ह्यातील एक नामवंत मल्लखांबपटू अशी ओळख. परंतु, दुर्लक्षित क्रीडापटू असल्याची खंत त्यांच्याबाबत ऐकावयास येते. भालेराव यांनी राजीव गांधी भारताचे पंतप्रधान असताना महाराष्ट्र राज्यातर्फे प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील परेडमध्ये सहभागदेखील नोंदविला होता. मल्लखांबचे शास्त्रोक्त प्रशिक्षण त्यांनी आबासाहेब घाडगे आणि श्रीधरपंत कुलकर्णी यांच्याकडून यशवंत व्यायामशाळा येथून घेतले. आजही वयाच्या ५९व्या वर्षीदेखील ते मल्लखांबचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत आणि या वयातदेखील ते मल्लखांब प्रात्यक्षिके दाखवतात, हे विशेष.भालेराव हे वाणिज्य व कला शाखेचे पदवीधर आहेत.
 
 
 
नाशिक येथे धर्मवीर डॉ. बाळकृष्ण मुंजे यांनी स्थापन केलेल्या ‘सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी’ संचालित भोंसला मिलिटरी स्कूल या भारतातील पहिल्या सैनिकी शिक्षण देणार्‍या शाळेत त्यांनी नऊ वर्ष मानधनावर व आठ वर्षे वेतनश्रेणीवर सेवा केली. या सेवाकाळात त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले.मल्लखांब या खेळाबाबत सांगताना भालेराव सांगतात की, “या खेळाला प्राचीन परंपरा लाभली आहे. अंगमेहनतीचा हा खेळ असून फार थोडे विद्यार्थी या खेळास पसंती देताना दिसून येतात.” तसेच ‘सातत्य’ हा या खेळाचा मूलभूत गुणधर्म असल्याचेही भालेराव आवर्जून अधोरेखित करतात.या खेळात मेहनत व दीर्घकाळ साधना आवश्यक असते. त्यानंतरच हवा तसा खेळाडू या खेळात घडत असतो. ‘भोंसला सैनिकी शाळा’ ही निवासी असून येथे विद्यार्थ्याने इयत्ता पाचवीत प्रवेश घेतला की, तो दहावी किंवा बारावीपर्यंत शाळेत प्रविष्ट असतो. या काळात विद्यार्थ्यांना मल्लखांबचे प्रशिक्षण देण्याचे कार्य भालेराव करत असतात.
 
 
 
मात्र, शालेय व सैनिकी अभ्यासक्रम पूर्ण करताना या खेळाला हवा तेवढा पुरेसा वेळ देता येणे, विद्यार्थ्यांना शक्य होत नसल्याची खंतदेखील ते बोलून दाखवितात. तरीही येथील खेळाडू हे राज्य व राष्ट्रीय पातळीवर सहभाग नोंदवत असतात. परंतु, विशेष प्रावीण्य मिळवण्यात कमी पडत असल्याची खंत भालेराव व्यक्त करतात.मल्लखांबमुळे विद्यार्थ्यांच्या साहसी गुणास वाव मिळण्याबरोबरच त्यांच्या या गुणाची वृद्धी होण्यासदेखील मदत होत असते. साहस असल्याशिवाय हा खेळ शक्य नाही. एकाग्रता साधण्यास हा खेळ उपयुक्त आहे. एकग्रता नसेल, तर खेळात अपघाताला सामोरे जावे लागते. या खेळामुळे शरीराचे रक्ताभिसरणासदेखील चालना मिळते. मानसिक संतुलन राखण्यास फार उपयुक्त असा खेळ आहे.
 
 
 
दिलेल्या ठरावीक वेळेत खेळ पूर्ण करणे गरजेचे असते. त्यामुळे वेळेचे नियोजन करण्याची चांगली सवय बळावते. शरीर अत्यंत चपळ लवचिक व बांधेसुद बनते. रोगप्रतिकारशक्ती वाढते. या खेळातील खेळाडूंना सहसा औषध, गोळी डॉक्टरांची गरज पडत नसल्याची माहिती मल्लखांबचे मानवी जीवनातील महत्त्व विशद करताना भालेराव आवर्जून नमूद करतात.मल्लखांब या खेळाला आता राज्यमान्यता प्राप्त होण्यास सुरुवात झाली आहे. या खेळात ‘छत्रपती पुरस्कार’ प्राप्त अनेखेळाडूंचा आता समावेश आहे. ‘खेलो इंडिया’सारख्या अभियानात या खेळाचा समावेश झालेला आहे. शासकीय नोकर्‍यांमध्ये काही जागा या खेळासाठी आता राखीव म्हणून होण्यास सुरवात झाली आहे.
 
 
 
ही एक समाधानाची बाब असल्याचे भालेराव सांगतात. आपल्या मानसिक आणि भौतिक स्थितीला सामोरे जाण्याचा गुण हा या खेळाडूच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येत असल्याचेही भालेराव सांगतात.उत्कृष्ट मलखांबपटू होण्यासाठी सराव, चिकाटी, सातत्य तसेच आपले ध्येय साध्य करणाचा ध्यास असणे, जिद्द असणे गरजेचे आहे.आजच्या खेळाडूंनी व तरुण वर्गाने आपल्या इतिहासाचे अध्ययन आणि अवलोकन करणे आवश्यक आहे. व्यायाम भीष्माचार्य गुरुवर्य माणिकराव, व्यायामाचार्य महाबळ गुरुजी, धर्मवीर डॉ. मुंजे, बाजीप्रभू देशपांडे, वीर सावरकर आदी थोर महापुरुषांच्या चरित्राचे वाचन तरुणांनी करणे आवश्यक असल्याचा संदेश भालेराव देतात.
 
 
 
व्यसनाच्या अधीन न जाता देवाने दिलेल्या सुंदर जीवनात शरीरसंपदा वाढवणे, बलदंड होणे, या मातृभूमीचे रक्षण करण्यास सज्ज होणे, हीच देशाची आजच्या तरुणांकडून अपेक्षा असल्याचे मत भालेराव व्यक्त करतात.भारतासह जगात क्रिकेटसारख्या खेळाचा बोलबाला आपल्याला कायम दिसतो. मात्र, भारतीय परंपरेतील प्राचीन खेळ असलेला मल्लखांब हा खेळ म्हणूनदेखील आणि खेळाडू म्हणूनदेखील तुलनेने दुर्लक्षित आहे. अशावेळी भालेराव करत असलेले कार्य हे नक्कीच महत्त्वाचे आहे. त्यांच्या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@