चीन-इस्रायल भाऊ भाऊ, नाते एकदा तपासून पाहू!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

china_1  H x W:
भारतात ज्यू लोक आहेत; युरोपातल्या विविध देशांंमध्ये ज्यू लोक होते. तिथून ते वेळोवेळी अमेरिकेत स्थलांतरित झाले, हे सगळं आपल्याला साधारण माहिती असतं. पण, चीनमध्येसुद्धा ज्यू लोक होते?
इस्रायलमधल्या तेल अवीव शहरातील ‘इन्स्टिट्यूट फॉर नॅशनल सिक्युरिटी स्टडीज’ या नावावरून आपल्याला काय कळतं? आपल्याला एवढंच कळतं की, राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात अभ्यास करणारी संस्था म्हणजेच इस्रायली संरक्षण मंत्रालयाशी संबंधित अशी काहीतरी ही संस्था असली पाहिजे. आता हे दुसरं नाव पाहा- ‘अ‍ॅडव्हायझरी कमिटी टू इन्स्पेक्ट नॅशनल सिक्युरिटी आस्पेक्ट्स ऑफ फॉरिन इन्व्हेस्टमेंट्स’ आपण सामान्य माणसं अशी लांबलचक नावं वाचता वाचताच विसरून जातो आणि म्हणूनच अशी नावं ठेवलेली असतात. बाह्यदर्शनी सगळा खुला कारभार आहे, असं दाखवलेलं असतं. पण, अशा समित्या नि अशा अध्ययन संस्था नेमक्या काय करतात, त्यांचा हेतू काय, तिथे कोण, कसली अध्ययनं करतात, याचा कोणालाही काहीही पत्ता नसतो आणि एक प्रकारे तो नसलेलाच बरं असतं.अशा संस्था नि समित्या विविध क्षेत्रांमधली माहिती जमा करून, ती सतत अद्ययावत ठेवण्याचं काम करत असतात. ही माहिती खुलीही असू शकते आणि गुप्तही असू शकते. त्या माहितीमधून निष्कर्ष काढणं आणि त्याबाबत त्वरित निर्णय घेणं, हे फार फार महत्त्वाचं असतं. ताजं उदाहरण म्हणजे ११ सप्टेंबर, २००१च्या उत्पाताचं. ‘अल कायदा’ खुद्द अमेरिकन भूमीवर काहीतरी जबरदस्त विध्वंस घडवण्याच्या प्रयत्नात आहे, अशा सूचना अनेक संस्थांकडून तत्कालीन बुश प्रशासनाला मिळत होत्या. त्यातून योग्य निष्कर्ष आणि झटपट निर्णय घेण्यात बुश प्रशासन कमी पडलं. आता दुसरं विलक्षण उदाहरण पाहा.तो इ. स. १६७० सालचा सप्टेंबर महिना होता. स्वतः शिवाजी महाराज काही निवडक सैन्यासह कल्याणला येऊन दाखल झाले. पुरंदरच्या तहामध्ये मोगलांकडे गेलेली कल्याण-भिवंडी त्यांनी नुकतीच म्हणजे मार्च १६७० मध्ये पुन्हा जिंकली होती. महाराजांच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणची सैन्यपथकं कल्याणमध्ये येऊन महाराजांच्या मुख्य सैन्याला मिळत होती. एकूण १५ हजार घोडेस्वार जमा होईपर्यंत महाराज कल्याणमध्येच थांबले होते. म्हणजे बघा, या सगळ्या हालचाली अगदी उघडपणे चालू होत्या. १५ हजार माणसं, तितकेच घोडे, त्यांना लागणारं धान्य, चारा, अन्य वस्तू हे काहीच लपून राहण्यासारखं नव्हतं. माहिती अगदी खुली होती. प्रश्न होता, तो हा की, हे सैन्यघेऊन आता शिवाजी कुणावर कोसळणार? आणि या बाबतीत, महाराजांच्या उद्योगावर बारकाईने लक्ष ठेवून असणार्‍या मुंबईकर इंग्रजांचा निष्कर्ष अचूक ठरला.


१२ सप्टेंबर, १६७०ला मुंबईचा अत्यंत चाणाक्ष इंग्रज गव्हर्नर जेराल्ड आँजियर आपल्या सुरतेच्या मुख्यालयाला लिहितो, “शिवाजी कल्याणहून मोठ्या फौजेनिशी गुजरातवर स्वारी करणार आहे. तो पहिल्यांदा नक्की सुरतेवर येणार. तरी तुम्ही आपल्या कंपनीच्या मालाची आवश्यक ती काळजी घ्या” आणि खरोखरच ३ ऑक्टोबर, १६७० रोजी महाराज सुरतेवर येऊन कोसळले. इंटरनेट, टेलिफोन, टेलिग्राम, टेलेक्स कोणतीही आधुनिक वैज्ञानिक सुविधा निर्माण होण्यापूर्वीच्या युगातील इंग्राजांची ही कार्यक्षमता खरोखर थक्क करून टाकणारी आहे. विलक्षण आहे.असो. तर तेल अवीवच्या ‘नॅशनल सिक्युरिटी स्टडीज इन्स्टिट्यूट’मधला एक अभ्यासक डोरोन एला हा फक्त चीन आणि इस्रायल यांच्यातल्या संबंधांचा अभ्यास करतो. त्याच्या अभ्यासामुळे आपल्याला हे माहिती झालं की, चीनमध्येसुद्धा ज्यू लोक होते आणि आजही थोडेसे आहेत. इथे आपल्याला पहिला धक्का बसतो. म्हणजे भारतात ज्यू लोक आहेत; युरोपातल्या विविध देशांंमध्ये ज्यू लोक होते. तिथून ते वेळोवेळी अमेरिकेत स्थलांतरित झाले, हे सगळं आपल्याला साधारण माहिती असतं. पण, चीनमध्येसुद्धा ज्यू लोक होते? होय, १८०० वर्षांपूर्वी रोमन सम्राटांनी पॅलेस्टाईन या ज्यू लोकांच्या मायभूमीतून त्यांना हद्दपार केलं. तेव्हा ते अक्षरशः दशदिशांना पळाले. आशिया, आफ्रिका खंडांमध्ये तर गेलेच. पण, पॅलेस्टाईनला लागूनच असलेल्या भूमध्य समुद्रामुळे पलीकडेच असणार्‍या युरोप खंडात जास्त प्रमाणात गेले. आता आसरा तर मिळाला. पण, पोटापाण्यासाठी उद्योग काय करावा? तत्कालीन युरोपात शेती आणि सैनिकी पेशा हे दोन अत्यंत प्रतिष्ठित व्यवसाय होते. युरोपने ज्यू लोकांना आसरा दिला. पण, त्यांच्याकडे अत्यंत तुच्छतेने, हेटाळणीने पाहिले. त्यामुळे ज्यूंना शेती आणि सैनिकी पेशा हे प्रतिष्ठित व्यवसाय नाकारण्यात आले. तेव्हा ज्यूंनी मध्यम आणि छोट्या प्रमाणातले व्यापार सुरू केले. व्यापारात जम बसल्यावर ते सावकारी करू लागले. युरोप-अमेरिकेतल्या सर्व छोट्या-मोठ्या ऐतिहासिक बँका या एकेकाळी किंवा आजही ज्यू लोकांच्या मालकीच्या होत्या, आहेत. व्यापाराच्या निमित्ताने जगभरच्या सर्व देशांमध्ये, विशेषतः व्यापारी बंदरांमध्ये ज्यू लोक गेले. तसेच ते चीनच्या शांघाय, नाानकिंग, हारबिन आणि अर्थातच हाँगकाँगमध्येही गेले. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे १८८१ पासून पुढे रशियामध्ये ज्यूंविरुद्ध मोठे दंगे झाले. रशियन झार अलेक्झांडर दुसरा याचा खून झाला. त्याच्या मारेकर्‍यांमध्ये ज्यूंचा हात असल्याची अफवा पसरली आणि ज्यूंविरुद्ध आग पेटली.


आपल्याकडे गावोगाव सुगीनंतर शिकार पार्ट्या निघतात किंवा निघत असत. गावातले सगळे हौशे, नवशे, बाप्ये, पोरं, बाळं गावानजीकच्या रानात घुसायची आणि रानडुकरं, ससे, भेकरं, पाणकोंबड्या, कवडे असं मिळेल ते मारून आणायची. तसे रशियन गुंड-पुंड मिळेल ते हत्यार हातात घेऊन गावाजवळच्या ज्यू वस्तीवर तुटून पडायचे आणि ज्यू माणसांना शिकार करावी, तसं मारायचे. या मोहिमेला म्हणायचं - ‘पोग्रोम’! (प्रोग्रॅम नव्हे!) पोग्रोम म्हणजे तुफान. या दंग्यांच्या दहशतीनेही असंख्य ज्यू रशियातून पळाले आणि सरहद्द ओलांडून चीनमध्ये शिरले. भारताच्या खालोखाल चीन हाच असा एकमेव देश होता की, जिथल्या बौद्ध राजवटींनी ज्यू लोकांचा कसलाही आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक छळ केला नाही. भारतातल्या प्रमाणेच ज्यू लोक चिनी समाजाशी सहजतेने मिसळून गेले. मात्र, त्यांच्या व्यापारी पेशामुळे त्यांच्या वस्त्या मुख्यत: चीनच्या व्यापारी शहरांमधूनच राहिल्या. १९११ साली चीनमधली राजेशाही संपून सन्यत् सेन यांची लोकशाही राजवट आली. १९४९ साली माओ झेडाँगने लोकशाही उलथून टाकून साम्यवादी सरकार आणलं. पण, राजवटींच्या या बदलांचा चीनमधल्या ज्यू समाजाला कोणताही उपद्रव पोहोचला नाही.नास्तिक साम्यवाद्यांनी सर्वच धार्मिक स्थळांना कुलुपं ठोकली, तशी ती ज्यूंच्या सिनेगॉगनाही ठोकली. परंतु, कोणताही वांशिक संघर्ष उद्भवला नाही. साम्यवाद्यांनी बाटवाबाटवी करणार्‍या ख्रिश्चन मिशनर्‍यांची एक गठ्ठा हकालपट्टी केली, तसा ज्यूंच्या बाबतीत प्रश्नच नव्हता.साम्यवाद्यांच्या एकच वर्ष आधी म्हणजे १९४८ साली इस्रायल हे केवळ ज्यू लोकांचं नवीनच राष्ट्र निर्माण झालं होतं. जगभरचे ज्यू लोक इस्रायलकडे जात होते. तसे चीनमधलेही गेले. इस्रायल हा सुरुवातीपासूनच अमेरिकेचा मित्र असल्यामुळे त्याचा ओढा तैवानकडे होता. माओने हाकलून दिलेला लोकशाहीवादी नेता चॅग कै शेक हा फोर्मोसा बेटावर गेला आणि तिथे त्याने अमेरिकेच्या पाठिंब्याने तैवान हे नवे राष्ट्र स्थापन केले. इस्रायलने सुरुवातीला तैवानला पाठिंबा दिला. नंतर अमेरिकेने ज्याप्रमाणे चीनच्या प्रचंड बाजारपेठेवर नजर ठेवून तैवानला चुचकारत चीनशीही व्यापार सुरू केला; तोच कित्ता इस्रायलने अधिक सफाईने गिरवला. कारण, इस्रायल आणि चीन यांच्यात ऐतिहासिक काळापासून सांस्कृतिक, व्यापारी संबंध होतेच.परिणामी, १९८० पासून तर हे संबंध आणखी दृढ होत गेले. कारण, त्या काळात माओ झेडाँगचं आचरट साम्यवादी तत्त्वनिष्ठ युग संपलं. चीनचा नवा नेता डेंग झियाओ पिंग हा अत्यंत ‘प्रॅक्टिकल’ होता.


त्याने साम्यवादाचा बाह्य बुरखा तसाच ठेवून, आतून भांडवली अर्थनीती स्वीकारली. चीनची वेगाने प्रगती सुरू झाली. त्याच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या घोडदौडीत त्याला भरपूर मदत करणारा मित्र होता इस्रायल.१९८४ सालच्या एका महोत्सवी संचलनात चिनी लष्कराने त्यावेळच्या अमेरिकन आणि रशियन लष्करांच्या तोडीस तोड अशा अजस्र, अवजड रणगाड्यांचं प्रदर्शन केलं. हे रणगाडे त्याला इस्रायलने पुरवले होते. पण, म्हणजे इस्रायल अत्याधुनिक अवजड रणगाड्याचं उत्पादन करीत होता? नव्हे, ते रणगाडे मूळचे रशियन बनावटीचे. रशियाने इजिप्तला पुरवलेले. १९७३च्या ‘योम किप्पूर’ युद्धात इस्रायलने इजिप्तचे व जवळपास अडीच हजार रणगाडे पाडाव केले. तेच त्याने ‘दी-फिटिंग’ करून चीनला विकले. संरक्षण व्यापारातला हा विनोद! अशा रीतीने शेती, कारखानदारी, जलशुद्धीकरण, अन्न प्रक्रिया, अर्थपुरवठा संरक्षण इत्यादी अनेक क्षेत्रांत गेली किमान चार दशकं चीन आणि इस्रायल यांच्यात अगदी उत्तम संबंध आहेत. हे संबंध सुरळीत राहतील, टिकतील, वाढते राहतील, यासाठी सतत अध्ययन करत राहणं हे ‘इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल सिक्युरिटी स्टडीज’चं काम. येतंय का लक्षात?पण, अमेरिकेने सूचना दिली आणि ‘अ‍ॅडव्हायझरी कमिटी टू इन्स्पेक्ट नॅशनल सिक्युरिटी आस्पेक्ट्स ऑफ फॉरेन इन्व्हेस्टमेंट’ या कंटाळवाण्या नावाची समिती आली. या अज्ञात समितीच्या, अज्ञात सदस्यांच्या बैठका कुठे झाल्या, कुणास माहीत! पण, त्यांनी इस्रायली व्यापार जगताला इशारा दिला की, चीन हा आपला लंगोटी मित्र असला तर अमेरिकाही आपला पाळण्यातला मित्र आहे आणि चीन आता अमेरिकेवर कुरुघोडी करू पाहत आहे. तेव्हा यापुढे चीनशी विज्ञान, तंत्रज्ञान, संरक्षण क्षेत्रात सहकार्य नाही. अन्नप्रक्रिया, अन्नपुरवठा इत्यादी क्षेत्रांतले संबंध पूर्ववत ठेवायला हरकत नाही.झालं! तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रातली चीन-इस्रायल यांच्या कंपन्यांमधली कत्राटं भराभर संपायला लागली. २०२० या वर्षात ही संख्या ७२ वरून ४५ पर्यंत घसरली. दोन्ही बाजूंनी याचं कारण ‘कोविड’ महामारी वगैरे देण्यात आलं. पण, खरं कारण दोघेही जाणून आहेतच, अभ्यासक डोरोन मला गंमतीने म्हणतो, “केक खायला पण हवा आणि शिल्लक पण राहायला हवा” (टू ईट द केक अ‍ॅण्ड हॅव इट टू) हे धोरण आतात बदलायला हवं. आमच्या नात्यामध्ये आम्हाला बदल करायला हवा. अमेरिकेला राग येणार नाही. एवढाच व्यापार चीनशी ठेवायचा.







@@AUTHORINFO_V1@@