कॅप्टन विरुद्ध गांधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2021   
Total Views |

sidhu2_1  H x W

सध्याची कॅप्टन अमरिंदर सिंग यांची भूमिका पाहता काहीही करून काँग्रेस नेतृत्वाला धडा शिकवण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. कॅप्टन त्यात यशस्वी ठरल्यास स्वयंभू प्रादेशिक नेतृत्वाचे खच्चीकरण करण्याच्या आपल्या परंपरेचाही काँग्रेस नेतृत्वाला विचार करावा लागणार, हे नक्की.

वा “प्रियांका गांधी-वाड्रा आणि राहुल गांधी हे मला माझ्या मुलांसारखे आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीने हा प्रकार घडला आहे, तो तसा घडायला नको होता; त्यामुळे मी दुखावला गेलो आहे. गांधी भावंडं राजकारणामध्ये अननुभवी आहेत आणि त्यांचे सल्लागार त्यांची अधिकच दिशाभूल करीत आहेत,” असे स्पष्ट मत पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केले आहे. प्रियांका गांधी- वाड्रा आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाविषयी यापूर्वी काँग्रेसमधील ‘जी-२३ ’ या ज्येष्ठ नेत्यांच्या गटाने वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकदा पक्षाच्या बैठकीत वादंगही झाले आहेत. मात्र, अशाप्रकारे जाहीररीत्या दोघा भावंडांच्या राजकीय वकुबाविषयी भाष्य करण्याचे धाडस मात्र कॅप्टन यांनी केले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे, ते म्हणजे कॅप्टन यांच्याकडे आता गमाविण्यासारखे काहीही नाही. त्याचप्रमाणे ‘जी-२३’ नेत्यांप्रमाणे ते दरबारी नेतेही नाहीत, त्यामुळे अप्रत्यक्ष टीका करण्याची त्यांना काहीही गरज नाही. त्यामुळे कॅप्टन यांच्या विधानास महत्त्वदेखील प्राप्त होते.

कॅप्टन यांनी राहुल गांधी यांचे नेतृत्व किती उपयोगी आहे, हे २०१६ सालच्या विधानसभा निवडणुकीवेळीच ओळखले होते. त्यामुळेच त्यांनी राहुल गांधी यांना पंजाबमध्ये प्रचारास पाठवू नये, असा हट्ट धरला होता. त्यानंतर देशभरात भाजपची लाट असतानाही पंजाबमध्ये त्यांनी स्वबळावर काँग्रेसची सत्ता आणून दाखविली होती. मात्र, तेव्हापासूनच कॅप्टन यांचे नेतृत्व काँग्रेसश्रेष्ठींना खुपायला लागले होते, असे म्हणण्यास वाव आहे. कारण, काँग्रेसची संस्कृती पाहिल्यास स्वबळावर मोठ्या होणार्‍या, पक्षाला सत्ता मिळवून देणार्‍या नेत्यांना काही काळाने जाणीवपूर्वक दूर केले जाते आणि त्याजागी आपले ऐकणारा नेता बसविला जातो. जेणेकरून काँग्रेसमधील गांधी कुटुंबांच्या स्थानास कोणीही आव्हान देऊ नये, हा स्पष्ट हेतू त्यामागे असतो. त्याचप्रमाणे कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधातही तसे जाळे विणण्यात आले. प्रथम नवज्योतसिंग सिद्धू यांचा काँग्रेस प्रवेश, त्यानंतर कॅप्टन यांचा विरोध डावलून त्यांना प्रदेशाध्यक्ष करणे, कॅप्टनविरोधात सिद्धू यांनी केलेली गटबाजी आणि अखेरीस कॅप्टन यांचा राजीनामा हे सर्व कथानक अतिशय व्यवस्थितपणे रचले गेले होते आणि सिद्धू यांना बळ देण्यामागे राहुल गांधी अतिशय सक्रिय होते. त्यामुळे पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी कॅप्टन यांचे कितीही सलोख्याचे संबंध असले, तरीदेखील पंजाबचा विषय पूर्णपणे राहुल गांधी हेच हाताळत आहेत. अर्थात, त्यामुळे राहुल गांधी यांची जबाबदारीदेखील आता वाढली आहे, कारण निवडणुकीत विजय मिळविण्याचा त्यांचा ‘ट्रॅक रेकॉर्ड’ काही चांगला नाही. त्यामुळे पंजाबमध्ये पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून देण्याची जबाबदारीदेखील आता राहुल गांधी यांच्यावरच आली आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासारख्या बेभरवशी नेत्याच्या साथीने जर विधानसभा निवडणूक जिंकण्याचे मनसुबे राहुल गांधी बाळगत असतील, तर त्यात त्यांना अपयश येण्याची शक्यता आहे. कारण, ज्याप्रमाणे गांधी भावंडांनी सिद्धू यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कॅप्टनना लक्ष्य केले; तोच पॅटर्न आता कॅप्टन यांनीही स्वीकारला आहे. राजीनामा दिल्यानंतरच त्यांनी सिद्धू यांना लक्ष्य केले आणि त्यांच्या पाकिस्तानप्रेमावर टीका केली. सध्याचा कॅप्टन यांचा मूड पाहता, ते आरपारची लढाई खेळण्यास पूर्णपणे सज्ज असल्याचे स्पष्ट आहे. सध्या ते अजिबात आक्रस्ताळेपणा न करता, आपले पत्ते उघड न करता अगदी शांतपणे वागत आहेत. त्यामुळे त्यांची ही शांतता काँग्रेससाठी धोकादायक ठरू शकते. सध्या अनेक आमदारांनी कॅप्टन यांची साथ सोडल्याचे दिसत आहे. मात्र, आपले पद वाचविण्यासाठी त्यांना तसे करणे भाग आहे. काँग्रेसने जर नवज्योतसिंग सिद्धू यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पुढे केले, तर त्यांचा पराभव करण्यासाठी आपण अतिशय मजबूत उमेदवार पुढे करू, कारण, पाकिस्तानशी संबंध असलेल्या व्यक्तीचा पराभव करणे देशासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. काँग्रेसने त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढल्यास दहाचा आकडा गाठणेही अवघड होणार आहे, असे अगदी स्पष्ट विधान कॅप्टननी केले आहे. आता याचा एक स्पष्ट अर्थ म्हणजे केवळ सिद्धूच नव्हे, तर काँग्रेसच्या अन्य कोणत्याही मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचा मी पराभव करणार, असा स्पष्ट इशाराच त्यांनी काँग्रेस नेतृत्वाला दिला आहे.

कॅप्टन यांनी अद्याप तरी काँग्रेस पक्ष सोडलेला नाही. मात्र, त्यांच्या या बंडखोर पवित्र्याचा लाभ भाजपला होणार की अकाली दलास, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कॅप्टन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अतिशय सलोख्याचे संबंध आहेत, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. कॅप्टन हे स्वत:चा पक्ष काढून काँग्रेसला कोंडीत पकडणार की कसे, याविषयीदेखील अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. मात्र, कॅप्टन यांचा पूर्वेतिहास पाहिल्यास स्वत:चा पक्ष काढून राजकारण करण्याचा त्याचा प्रयत्न फसला आहे. कॅप्टन यांनी १९७७ मध्ये आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत पटियाला लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढविली, त्यात त्यांना अपयश आले. मात्र, १९८० साली झालेल्या निवडणुकीत त्याच मतदारसंघातून ते विजयी झाले. पुढे १९८४ साली ‘ऑपरेशन ब्लू स्टार’च्या विरोधात त्यांनी काँग्रेस सोडून काही काळ अकाली दलात प्रवेश केला. अकाली दलाशीही त्यांचे फारसे पटले नाही आणि १९९२ साली ‘अकाली दल (पंथक)’ हा नवा पक्ष त्यांनी स्थापन केला. त्यानंतर सोनिया गांधी यांनी त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणले आणि १९९८ साली त्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता. मात्र, वय आणि अस्तित्वाचा लढा असलेली पुढील विधानसभा निवडणूक पाहता कॅप्टन नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतील, याविषयी साशंकता आहे.मात्र, सध्याची कॅप्टन यांची भूमिका पाहता काहीही करून काँग्रेस नेतृत्वाला धडा शिकवण्याचा चंग बांधला असल्याचे स्पष्ट आहे. कॅप्टन त्यात यशस्वी ठरल्यास स्वयंभू प्रादेशिक नेतृत्वाचे खच्चीकरण करण्याच्या आपल्या परंपरेचाही काँग्रेस नेतृत्वाला विचार करावा लागणार, हे नक्की.

काँग्रेसपुढील संकट केवळ पंजाबपुरते मर्यादित नाही, त्यात आता राजस्थानसह छत्तीसगढचाही समावेश झाला आहे. छत्तीसगढमध्ये अडीच वर्षांच्या ठरलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे आता आपल्याला मुख्यमंत्री करावे, यासाठी आरोग्यमंत्री टी. एस. सिंह देव हे अडून बसले आहेत. मात्र, सध्या तरी भूपेश बघेल यांना हटविणे काँग्रेसला शक्य नाही. मात्र, छत्तीसगढमध्येही पंजाबप्रमाणेच आपल्याच मुख्यमंत्र्यांविरोधात मंत्र्यास बळ देण्याचा प्रकार काँग्रेस करीत आहे. दुसरीकडे राजस्थानमध्ये पुन्हा एकदा ‘पायलट विरुद्ध गेहलोत’ वादाने नव्याने जोम धरला आहे. काँग्रेसने आता राजस्थानमध्ये निवडणूक प्रचार व्यावसायिक प्रशांत किशोर यांना सक्रिय केले आहे. प्रशांत किशोर यांच्या अहवालानुसार, आगामी निवडणुकीसाठी राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बदलणे अत्यंत गरजेचे आहे, असे नमूद केले आहे. आता चेहरा बदलायचा असल्यास त्यावर सर्वप्रथम दावा करणार ते सचिन पायलट. मात्र, पायलट यांनीही काँग्रेस नेतृत्वाला आव्हान देऊन आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे पुन्हा पायलट यांच्याकडे नेतृत्व देण्याचा विचार काँग्रेस नेतृत्व करण्याची शक्यता धुसर आहे. नेतृत्वबदलास पायलट यांना पुन्हा डावलले, तर ते यावेळी पक्ष सोडण्याच्या मनःस्थितीत असल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे.

त्यामुळे सध्या एकूणच काँग्रेससमोर राष्ट्रीय आणि प्रादेशिक नेतृत्वाचा मोठा तिढा उभा राहिला आहे. त्यातच ममता बॅनर्जी यांनी आतापासूनच विरोधी पक्षांच्या राष्ट्रीय आघाडीच्या नेतृत्वावर दावा दाखविला आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या पक्षाच्या मुखपत्रातून राहुल गांधी यांची खिल्ली उडवून योग्य तो संदेशही दिला आहे. त्यामुळे पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या भूमिकेचा मोठा परिणाम काँग्रेसवर होणार, यात कोणतीही शंका नाही.




@@AUTHORINFO_V1@@