बेडूक मित्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Sep-2021   
Total Views |
beduk_1  H x W: 
 
 
 बेडकांवर प्रेम करणारी माणसं मिळणं तसं दुर्मीळच. मात्र, ज्या बेडकांना आपण घरातून पळवून लावतो, त्याच बेडकांचे पालन करणार्‍या बेडूक मित्र मंगेश सुहास माणगावकर यांच्याविषयी...
  
  
बेडूक म्हटला की, काहींना तो पाहून अंगावर शिसारी येते, काहींना तो किळसवाणा वाटतो, तर काही जण त्याला पाहून धूम ठोकतात. मात्र, जगात अशीही काही माणसं असतात, ज्यांना बेडकांसारखे इतरांना विचित्र वाटणारे जीव अगदी प्रिय असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशाच एका अवलियाने चक्क आपल्या परसबागेत बेडूक उद्यान तयार केले आहे. या बेडूक उद्यानात अनेक प्रजातींचे बेडूक अगदी नैसर्गिक अधिवासात गुण्यागोविंदाने राहतात. बेडकांचा मित्र बनून हा माणूस त्यांचे संरक्षण आणि संवर्धनही करतो. पर्यावरणीय परिसंस्थेत स्वच्छतादूत असलेल्या बेडकांच्या संरक्षणाचा विडा उचललेला हा माणूस म्हणजे बे़डूक मित्र मंगेश माणगावकर.माणगावकर यांचा जन्म दि. ४ मे, १९७६ साली ठाण्यात झाला.
 
 
 
त्यांच्या वडिलांना निसर्ग संवर्धनाची आवड होती. हेच बीज मंगेश यांच्यामध्येही रुजले. ठाण्यात शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दापोलीतील कोकण कृषी महाविद्यालयामधून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीपासूनच मंगेश यांना कोकणात स्थायिक होण्याची इच्छा होती. त्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते वडिलांबरोबर वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे या गावात स्थायिक झाले. याच ठिकाणी त्यांनी एका खासगी संस्थेत नोकरी करायला सुरुवात केली. अशावेळी निसर्गाचा छंद त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे त्यांनी घराजवळील बागेत पक्ष्यांची कृत्रिम घरटी, त्यांच्यासाठी खाद्य आणि पाण्याची डबकी बांधली. सोबतच कुक्कुटपालन आणि गांडूळ खतनिर्मितीसारखे उपक्रमही सुरू केले.
 
 
 
पक्ष्यांसाठी बांधलेल्या या डबक्यामध्ये पावसाळ्यात बेडूक येऊ लागले. पावसाळ्यात ते याच डबक्यांमध्ये अधिवास करू लागले. कालांतराने प्रत्येक पावसाळी हंगामानुसार बेडकांची संख्या वाढू लागली. कृषी विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असताना ‘डिटेक्शन’ शिकल्यामुळे त्यांनी बेडकांना हाताळून त्यांचे निरीक्षण करायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात विविध प्रजातींचे बहुरंगी बेडूक त्यांना दिसू लागले. त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांनी डॉ. वरद गिरी, काका भिसे, डॉ. गणेश मर्गज यांसारख्या तज्ज्ञांची मदत घेतली. पक्ष्यांसाठी बांधलेल्या डबक्यामध्ये बेडकांची संख्या वाढल्यामुळे २००६ साली त्यांनी बेडकांसाठी स्वतंत्र डबकीही बांधली. या स्वतंत्र डबक्यांमध्ये बेडूक राहू लागल्यानंतर त्यांच्या नैसर्गिक स्वभाववैशिष्ट्याला धक्का न लावता माणगावकरांनी त्यांची निगा राखण्यास सुरुवात केली.
 
 
 
बेडकांचे नैसर्गिक अधिवासात शत्रू असल्याने त्यांच्या अंड्यांचे पालन करणे, त्यातून जन्माला आलेल्या पिल्लांची जोपासना करणे, त्यांना वाढवणे आणि त्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देण्याचा माणगावकरांचा नित्य उपक्रम आहे. अन्य काही कारणांनी एखाद्या बेडकाला इजा झाली, तर माणगावकर त्यांची सेवाशुश्रूषाही अगदी आपल्या मुलाप्रमाणे करतात. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या मदतीने ते जखमी बेडकांवर उपचार करून प्राणिप्रेमाचे कृतार्थ दर्शन घडवतात. २०१६ पर्यंत माणगावकरांच्या बेडूक उद्यानात सात प्रजातींचे बेडूक दिसत होते. त्यामध्ये ‘इंडियन बुल फ्रॉग’, ‘फंगॉईड फ्रॉग’, ‘नॅरो माऊथ फ्रॉग’, ‘कॉमन ट्री फ्रॉग’, ‘बलून फ्रॉग’, ‘स्किटरिंग फ्रॉग’ आणि ‘कॉमन टोड’ या प्रजातींचा समावेश होता.
 
 
 
२०१६ साली माणगावकर यांच्या बेडूक उद्यानात पश्चिम घाटामध्ये प्रदेशनिष्ठ असलेल्या ‘मलबार ग्लायडिंग फ्रॉग’चे दर्शन झाले. त्याच वर्षी त्याची या ठिकाणी वीणही झाली. या बेडकांकडून झाडावर तयार करण्यात येणार्‍या ‘फोमनेस्ट’ची माणगावकर यांनी निगा राखण्याची सुरुवात केली. ‘फोमनेस्ट’मधून खाली डबक्यातील पाण्यात पडणार्‍या बेडकांच्या पिल्लांचे संगोपन करण्यास त्यांनी सुरुवात केली. जिथे-जिथे ‘होमनेस्ट’खाली पाण्याचा स्रोत नसेल, तिथे पिंप लावून त्याला जाळीचे संरक्षण देऊन पिल्लांना वाढवण्याचा मोर्चा त्यांनी सुरू केला. यंदाही त्यांच्या उद्यानात ‘मलबार ग्लायडिंग फ्रॉग’ची घरटी झाली आहेत. या ४९ घरट्यांच्या देखरेखीत ते सध्या व्यस्त आहेत.
 
 
 बेडकांच्या छंदाशिवाय माणगावकर यांना हिंदी, इंग्रजी, मराठी या भाषांबरोबर कन्नड, गुजराती आणि उर्दू भाषाही उत्तम अवगत आहेत. याशिवाय त्यांच्याकडे ३५ देशांची नाणी आणि चलनी नोटांचादेखील संग्रह आहे. जिल्ह्यातील शिक्षण संस्था, ‘युवा प्रतिष्ठान संस्था’ आणि अन्य काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शेतकरी वर्ग आणि मित्र-बांधवांना ते मार्गदर्शन करतात. त्यांना व्यायामाची आवड असून, शरीरसौष्ठव प्रकारातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. “बेडूक हा प्राणी तसा निष्पाप आणि निरागस आहे. तो मानवी जीवनास किंवा शेतीस हानिकारक नसताना आपण त्याला मारतो, हे सुजाण नागरिकाचे लक्षण नाही. निसर्गात कीटक नियंत्रणाचे मोठे कामही बेडूक करतो. त्यामुळे बेडकांचे संवर्धन केले नाही, तरी चालेल. मात्र, दिसताक्षणी त्यांचा जीव घेऊ नये,” असे माणगावकर सांगतात. बेडकांना कुठेही बंदिस्त न करता त्यांचे नैसर्गिक अधिवासामध्येच संगोपन करणारे आणि वन्यजीव संवर्धनाचा वेगळा धडा आपल्याला देणार्‍या माणगावकर यांना शुभेच्छा
 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@