छोड आए ‘वो’ वो गलिया।

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2021   
Total Views |

pak_1  H x W: 0
मिनार-ए-पाकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वी एका महिलेवर शेकडो पाकिस्तान्यांनी अत्याचार केला. क्रूरता, निर्लज्जता आणि भयंकर राक्षसीपणा हेच वर्णन. तर अशा या पाकिस्तानमध्ये महिलांची स्थिती काय आहे, यावर ‘द एक्सप्रेस ट्रिब्युन’ने एक ताजा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालामध्ये लिहिले आहे की, पाकिस्तानमध्ये महिलांविषयीची भूमिका ही मुखवटाधारी आहे. हा मुखवटा महिलांना स्वातंत्र्य आणि समतेचा हक्कही सांगतो. मात्र, त्याच वेळी महिलांना स्वातंत्र्य आणि समता मिळणार नाही, याचीही पुरेपूर काळजी या मुखवट्याआडचा खरा चेहरा घेतो. महिलांनी कायमच अमानवी हतबल जीणे जगावे, यासाठी हा खरा चेहरा प्रयत्नशील आहे. जर कुणी या चौकटीबाहेर जाण्याचा प्रयत्न केलाच, तर तिच्या स्वातंत्र्याच्या वाटांवर अत्याचाराचे काटे पेरण्याचे काम हा खरा चेहरा करतो.
 
 
‘ट्रिब्युन’ने आपल्या अहवालात मांडले आहे की, सार्वजनिक ठिकाणे त्यातही उद्याने, रस्ते, सांस्कृतिक केंद्रे त्यातही थिएटर, हॉल आणि त्यांच्या कामाच्या, उद्योगाच्या ठिकाणी महिलांना त्रास देण्याचा प्रयत्न जाणिवपूर्वक केला जातो. हे त्रास देणे अतिशय सूत्रबद्ध असते. शहरभागातील शिकलेल्या महिलांना आपल्या जगण्याच्या मर्यादा तरी माहिती आहेत. मात्र, पाकिस्तानातील दुर्गम गाव-खेड्यातील महिलांचे जगणे तर आजही पशूपेक्षा वाईट. त्यातच आकाशाला भिडलेली महागाई आणि दहशतवादाचा उन्माद दाखवताना तिच्यावरच केला जाणारा अत्याचार सहन करणे ही पाकिस्तानी महिलांच्या दुःखाची विवशता. बेनिझर भुट्टो आणि कुटुंब किंवा हिना रब्बानी यांसारख्या महिला म्हणजे पाकिस्तानचे महिलाविषयक खरे धोरण नाही. तसेच, शिक्षण, आरोग्याच्या सुविधा या सर्वसामान्य पाकिस्तानी पुरुषांना मिळत नाहीत, तर महिलांना कुठून मिळणार? ‘कोविड’च्या दरम्यानही उपचार किंवा लस घेणे याबाबत पाकिस्तानमध्ये महिला पुरुषांपेक्षा पिछाडीवरच आहेत.
 
 
‘ट्रिब्युन’चे हे निष्कर्ष काही नवे नाहीत. पाकिस्तानमधील महिलांच्या भाळी काय प्राक्तन असेल, हे फाळणीच्या वेळीच लिहिले गेले. नेहमी भारताशी तुलना करण्यासाठी धडपडणारा पाकिस्तान, त्यांच्या देशातील महिलांची भारतातील महिलांच्या विकासाशी तुलना का करत नाही? सध्या ‘ऑलिम्पिक’ची चर्चा आहे. पाकिस्तानमधील किती महिलांनी ‘ऑलिम्पिक’ पदक मिळवले? नाही. यात पाकिस्तानातील महिलांचे नाव नाहीच. कारण, मुलीबाळींनी मुक्तपणे कलागुणांना वाव द्यावा, असे वातावरण पाकिस्तानमध्ये नाही, असे समाजअभ्यासकांचे मत आहे. याच कारणामुळे पाकिस्तानमध्ये कुणी एक समाजअभ्यासक, विचारवंत किंवा लेखक महिला फार पुढे येताना कुठे दिसत नाही. संगीतक्षेत्रातही देशाच्या विभाजनात पाकिस्तानात गेलेल्या जुन्या गायिकाच आठवतात. नवीन गायिका कलाकार कुठे आहेत? नाही म्हणायला, सुफी परंपरेत गाणी गाणार्‍या गायिका आढळतात. पण, त्याला मुस्लीम संस्कृती आणि त्या धर्माची थोडी किनार आहे म्हणून या गायिका दिसतात तरी. पाकिस्तानच्या लोककलेमध्ये आज महिलांना बाजारू स्वरूपातच चित्रित केले जाते. शरीराच्या अवयवांवरून उत्तान अश्लील नृत्य करणे, लैंगिक चाळे व्यक्त करणारे शब्द बोलण्यासाठी त्यांना व्यासपीठ दिले जाते. आता कुणी भारतीय लोककलांबाबत म्हणेल की, भारतातही हे होते. पण, पाकिस्तानी महिला लोककलाकारांचे जाहीर संगीतनृत्य कार्यक्रम म्हणजे केवळ आणि केवळ स्त्री शरीराचा बाजारच! भारतीय लोककलेशी त्याची तुलना होऊच शकत नाही. कोणे एकेकाळी ‘मोहेंजोदडो संस्कृती’चा वारसा सांगणार्‍या पाकिस्तानमध्ये महिलांची इतकी वाताहत का? त्यात आता बाजूला तालिबानी आलेत. त्यांनी तर अफगाणिस्तानात फर्मान काढले आहे की, महिलांनी घराबाहेर निघूच नये. कारण, आमच्या सैनिकांना महिला मुलींशी सभ्यतेने कसे वागावे, हे माहिती नाही. थोडक्यात, आमचे सैनिक तुमच्याशी असभ्यच वर्तन करणार, अत्याचारच करणार. ते टाळण्यासाठी अफगाण महिलांनी घराबाहेर येऊ नये. ही दहशतवादाची बेडी अफगाण स्त्रियांच्या नशिबी आली. पाकिस्तानी महिला अफगाण महिलांची दयनीय परिस्थिती पाहून भयभीत आहेत. सध्या पाकिस्तानमध्ये सत्ताधारी आणि तिथले काही धर्ममार्तंड तालिबान्यांना समर्थन करताना दिसतात.
 
हे सगळे मिळून पाकिस्तानी महिलांसाठी
नवा तालिबानी पाकिस्तान तर बनवणार नाहीत ना, असे जगाला वाटत आहे. खरे तर पाकिस्तानचे महिलाविषयक धोरण हे छुपे तालिबानी धोरणच आहे. पण, हळूहळू विष द्यावे तसे ते पाकिस्तानी महिलांच्या जीवनात पेरले जात आहे. याची खंत पाकिस्तान्यांना वाटणे शक्यच नाही. सभ्यता, संस्कृतीबाबत पाकिस्तानातील बहुसंख्य लोक त्यातही तालिबानी समर्थक म्हणजे, ‘छोड आये ‘वो’ वो गलिया।’
 


 
@@AUTHORINFO_V1@@