सांस्कृतिक शक्ती विरुद्ध सैनिकी शक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Aug-2021   
Total Views |

tali-afgh_1  H

रशिया आणि अमेरिकेला असे वाटले की, आपल्याकडे अफाट ‘फायर पॉवर’ आहे. त्याच्या जोरावर आपण लोकांना मनवू शकतो. पण, ‘फायर पॉवर’पेक्षा देशाची ‘कल्चरल फायर पॉवर’ ही शतपट शक्तिशाली असते. रशिया आणि अमेरिकेने हे समजून घ्यायला पाहिजे.


अमेरिकन सेनेने अफगाणिस्तानातून माघार घेण्याचा निर्णय एक वर्षापूर्वी केला. या संदर्भात दोहा येथे तालिबान आणि अमेरिका राजप्रतिनिधी यांच्यात वाटाघाटी झाल्या. अफगाणिस्तानात अशरफ घनी यांचे शासन होते. अमेरिकेच्या सैन्यशक्तीच्या आधारावर ते सत्तेवर राहिले. अमेरिकेने सुमारे साडेतीन लाख सैन्य उभे करण्याचा प्रयत्न केला. या साडेतीन लाख सैन्याचे वर्णन अर्ध्याहून अधिक लढण्यास कुचकामी, अधिकारी भ्रष्ट आणि बहुसंख्य सैन्य सैनिकाची म्हणून जी लढण्याची नीतिमत्ता असते तिचा अभाव. असे सैन्य तालिबानी सैन्यापुढे लढू शकत नव्हते. ज्या सैन्यातील सैनिकाला हे माहीत असते की, मला का लढायचे आहे, कशासाठी मी लढतो आहे आणि लढून मला काय साधायचे आहे, असे सैन्य संख्याबळाने जरी कमी असले, तरी त्याला पराभूत करणे कठीण असते. तालिबानी सैन्य आपण कशासाठी लढतो आहोत आणि आपल्याला काय साध्य करायचे आहे, याबाबतीत पक्के आहेत. घनींचे सैन्य भाडोत्री सैन्य समजले पाहिजे. त्यांना अमेरिकेने आधुनिक शस्त्रे दिली खरी, पण अमेरिका लढण्याची जिद्द, पोलादी मनगट आणि दृढ अंत:करण देऊ शकत नाही. यामुळे अमेरिकेलाही कल्पना नव्हती की, एवढ्या कमी काळात तालिबानी पूर्ण अफगाणिस्तानावर कब्जा मिळवतील.

घड्याळाचे काटे पुन्हा पहिल्या वळणावर आले आहेत. २००१ साली अमेरिकेने तालिबानी राजवट नष्ट करण्यासाठी अफगाणिस्तानवर आक्रमण केले. अमेरिकन आणि नाटो सैन्य अफगाणिस्तानमध्ये आले. तालिबानची राजवट कोसळली, परंतु तालिबान काही संपले नाही. जनरल मुशर्रफ याने तालिबान्यांना संरक्षण दिले. त्यांच्या सर्व प्रमुख नेत्यांना पाकिस्तानात आश्रय दिला. ओसामा बिन लादेनलादेखील लपवून ठेवले. एकीकडे अफगाणिस्तानची तालिबानी राजवट संपविण्यासाठी मुशर्रफ याने अमेरिकेकडून अब्जावधीचे साहाय्य मिळविले आणि दुसर्‍या बाजूला ज्यांना नाहीसे करायचे, त्यांचे रक्षण केले. आंतरराष्ट्रीय राजकारणातील हा ‘डबल गेम’ असतो. ‘९/११’च्या हल्ल्यामुळे अमेरिका सुडाने पेटली होती, त्यामुळे मुशर्रफ आपल्याला कसा फसवित आहे, हे त्यांच्या लवकर लक्षात आले नाही.
 
या तालिबानचे पूर्वज होते मुहाझिर. त्यांना निर्माण करण्याचे काम अमेरिकेने केले. रशियन सेना १९७९ साली अफगाणिस्तानात घुसल्या, त्यांनी तेथे कम्युनिस्ट राजवट सुरू केली. तिला रोखण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीने मुहाझिर उभे केले. याला ‘जिहादी सैनिक’ असे म्हणतात. ‘धर्मासाठी लढणारे योद्धे’ म्हणजे ‘तालिबान’ किंवा ‘मुहाझिर.’ हा धर्म म्हणजे इस्लाम. कम्युनिस्ट हे ईश्वर न मानणारे त्यामुळे ते पाखंडी. अशा पाखंडींचे राज्य इस्लामी अफगाणिस्तानात असता कामा नये. त्यासाठी वेगवेगळ्या संघटना उभ्या राहिल्या. त्यांची नावे अशी- ‘हक्कानी’, ‘अल कायदा’, ‘इसिस’, ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘लष्कर-ए जांगवी’, ‘मुजाहिदिन युनायटेड काऊंसिल’, ‘तारिकी-ए-तालिबान पाकिस्तान.’ हे सर्व गट स्वतंत्र आहेत. अफगाणिस्तानात परकीय सैन्य नको आणि अफगाणिस्तानात इस्लामी राजवट हवी, याबाबतीत सर्वांचे एकमत आहे. परंतु, हे सर्व गट एका नेतृत्वाखाली संघटित नाहीत. प्रत्येकाची राजकीय सूची वेगवेगळी आहे, हेतू वेगवेगळे आहेत. आज जरी तालिबानी गटाने काबूलवर ताबा मिळविला असला, तरी उद्या ‘हक्कानी’ गट आणि अन्य गट यांच्यात सत्तेसाठी रक्तरंजित संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे अफगाणिस्तान पुन्हा एकदा यादवी युद्धात जाण्याची शक्यता आहे.

अफगाणिस्तानच्या लढाईचा इतिहास शेकडो वर्षे मागे जाऊनही पाहता येतो. एकेकाळी अफगाणिस्तानात ग्रीकांची सत्ता होती. त्यानंतर बुद्धसम्राट कनिष्क याची सत्ता होती. अफगाणिस्तानात बौद्ध धर्माचा मोठा प्रचार झाला. बामियान बुद्धासारखी एका दगडात कोरलेली प्रचंड मूर्ती अफगाणिस्तानात उभी राहिली. व्यापारी मार्गांवर अनेक विहार उभे राहिले. जातक कथांचे शिलालेखही तिथे सापडले. गांधार शैलीतील अनेक सुंदर बुद्ध मूर्ती तिथे सापडल्या. अफगाणिस्तान असा देश आहे की, ज्याच्या सीमा वेगवेगळ्या संस्कृती व्यक्त करणार्‍या देशांशी जोडलेल्या आहेत. फाळणीपूर्व त्याची सीमा भारताला जोडली होती. इराणला जोडलेली आहे. रशियाला जोडलेली आहे आणि मध्य आशियातील काही देशांना जोडलेली आहे. अफगाणिस्तानात कट्टर इस्लामी राजवट सुरू होण्यापूर्वी या वेगवेगळ्या संस्कृती समूहातील लोक राहत असत. हिंदू, जैन, बौद्ध, इराणी, सुफी मुस्लीम यांची वस्ती तेथे होती.

अफगाणिस्तान हा प्राचीन देश आहे. युरोपातील देशांपेक्षाही तो प्राचीन आहे. प्रत्येक प्राचीन देशाला स्वत:ची संस्कृती असते. ही संस्कृती त्या देशाचा इतिहास, भूगोल, निसर्ग, शेती, व्यापार यातून घडत जाते. त्यातून काही सांस्कृतिक मूल्ये तयार होतात. ही मूल्ये पिढ्यान्पिढ्या जपली जातात. अफगाणिस्तानच्या संस्कृतीची सांस्कृतिक मूल्ये अशी स्वतंत्र आहेत. ‘अतिथी सत्कार’ हे त्यांचे मुख्य सांस्कृतिक मूल्य आहे. ‘पारिवारिक जीवन’ हे दुसरे सांस्कृतिक मूल्य आहे. आलेल्या पाहुण्यांचे सर्व प्रकारे स्वागत करणे, त्यांचा आदर-सत्कार करणे हेदेखील एक सांस्कृतिक मूल्य आहे. आत्मसन्मान जपणे आणि स्वतंत्र राहणे हे त्यांचे आणखी एक सांस्कृतिक मूल्य. निसर्ग आणि भौगोलिक रचना यामुळे टोळ्यांत जगणे हा त्यांचा स्वभाव झाला.

 
समूहाने जगायचे असल्यामुळे समूहाचे कायदे-कानून यांचे पालन करणे, समूहाच्या रक्षणासाठी उभे राहणे दुसर्‍या भाषेत ‘समूहशरण जीवन जगणे’ हा अफगाणी माणसाचा स्वभाव आहे. समूहाचे नियमन करण्यासाठी जे मंडळ बसते, त्याला ‘जिग्गा’ असे म्हणतात. त्याच्या बैठका वारंवार होतात. विविध प्रश्नांची चर्चा होते. नियम ठरविले जातात. समूहाचा नेता निवडला जातो आणि त्याप्रमाणे सर्वजण आपला व्यवहार करतात. अफगाणी माणसाला परंपरेने संगीत आणि काव्याची आवड आहे. त्यांचे म्हणून स्वत:चे संगीत आहे. तिथली तंतुवाद्ये कर्णमधुर असतात. पण, इस्लामला संगीत मान्य नाही, असे सांगितले जाते. त्याबद्दल विवाद आहे. अफगाणी लोकांना संगीत प्रिय आहे. तालिबानी कट्टर आहेत. ते सुन्नी पंथाचे आहेत. या सुन्नी पंथामध्ये ओसामा बिन लादेनचा ‘वहाबी सुन्नी पंथ’ हा अधिक कट्टर समजला जातो. इस्लामपूर्व कशालाही ते किंमत देत नाहीत. कोणत्याही प्रकारची मूर्तिपूजा त्यांना अमान्य आहे. स्त्रियांनी शिक्षण घेणे, सार्वजनिक ठिकाणी जाणे, नोकरी करणे या गैरइस्लामिक कल्पना आहेत, असे त्यांचे म्हणणे. तालिबानींचे प्रशिक्षण या इस्लाममध्ये झालेले आहे.

म्हणून अफगाणिस्तानातील संस्कृती संघर्ष हा ‘वहाबी’, ‘सुन्नी,’ ‘तालिबानी’, ’इस्लाम’ आणि ‘अफगाणी’ इस्लाम यांच्यामधील राहील. प्रत्येक देशाचा एक स्वभाव असतो. त्याच्या आंतरिक ऊर्मी असतात. त्या दीर्घकाळ दाबून ठेवता येत नाहीत. इराणमध्ये तसा प्रयत्न रेझा शाह पहेलवी यांनी केला. लोकांनी अयातुल्ला खोमेनी यांना आपला नेता केले आणि इराणमध्ये इस्लामिक क्रांती घडवून आणली. म्हणजे काय झाले? तर इराण आपल्या शेकडो वर्षांच्या सांस्कृतिक मूल्यांकडे परत गेला. धर्म इस्लाम राहिला, पण राष्ट्रीय अभिव्यक्ती ‘इराणी’ झाली.

अफगाणिस्तानचा धर्मदेखील इस्लामच राहील, पण तो ‘अफगाणी इस्लाम’ असेल. वर जी त्यांची सांस्कृतिक मूल्य दिलेली आहेत, ती मूल्ये तालिबानी ‘एके ४७’ने मारून टाकता येत नाहीत. ती काही काळ दबलेली राहतील. देशोदेशीच्या इस्लाममधील संघर्ष हा त्या देशाची मूळ संस्कृती आणि इस्लामिक कट्टरतावाद यामधला आहे. रशिया आणि अमेरिकेने अफगाणिस्तानावर एकापाठोपाठ एक आक्रमणे केली. दोघांना पराभव पत्करावा लागला. त्याचे कारण काहीजण इस्लामिक कट्टरतावादाला देतात. ते खरे नाही. अफगाणिस्तानचा मूळ स्वभाव स्वतंत्र राहण्याचा, परकीयांचे दास्यत्व न स्वीकारण्याचा, आपली जीवनमूल्ये जपण्याचा, विदेशाची नक्कल न करण्याचा राहिलेला आहे. तो रशियालादेखील समजला नाही आणि अमेरिकेलादेखील समजलेला नाही. दोघांना असे वाटले की, आपल्याकडे अफाट ‘फायर पॉवर’ आहे. त्याच्या जोरावर आपण लोकांना मनवू शकतो. ‘फायर पॉवर’पेक्षा देशाची ‘कल्चरल फायर पॉवर’ ही शतपट शक्तिशाली असते. रशिया आणि अमेरिकेने हे समजून घ्यायला पाहिजे.

त्या त्या देशाची सांस्कृतिक ओळख त्यांच्या लोककथांतून होत असते. शेवटी दोन लोककथा बघूया. राजे लहरी असतात. एखाद्याला डोक्यावर बसवतील आणि एखाद्या गुणी माणसाला कैदेत टाकतील. म्हणून ज्याला आत्मसन्मानाने जगायचे आहे, त्याने चुकूनही राजाश्रय मागू नये. हा विचार सांगणारी ही कथा आहे. अफगाणिस्तानाच्या एका राजाच्या मर्जीतून त्याचा कार्यक्षम मंत्री उतरला. त्याचा काही दोष नव्हता, पण राजाची मर्जी. राजाने त्याला दूर केले. तो मंत्री दूर अरण्यात गेला आणि शांतपणे आपले जीवन घालवू लागला. राज्यकारभाराच्या रोजच्या कटकटीपासून तो मुक्त झाला. साधकांबरोबर त्याचा काळ आनंदात जाऊ लागला.

राजाला त्याची उणीव भासू लागली. त्याने त्याचा शोध घेतला. जंगलात तो त्याला भेटायला गेला. मंत्र्याला पुन्हा राज्यात येण्याची विनंती केली. मंत्री म्हणाला, “मी इथे आनंदात आहे आणि आता पुन्हा राजकारणात पडण्याची माझी इच्छा नाही. राजाच्या अगदी जवळ राहून त्याच्या क्रोधाग्नीची शिकार बनण्याची माझी इच्छा नाही. मी इथे आनंदात आहे.” असे म्हणून त्याने राजाला निरोप दिला. मूळात ही कथा भारतीय आहे. तिचा प्रवास अफगाणिस्तानात झाला आणि अफगाणिस्तानची ती लोककथा झाली. राजसत्तेचे लांगूलचालन नको, हा तिचा संदेश आहे.

ही दुसरी कथा अमेरिकेला लागू पडते. कुस्ती आणि मुष्टी युद्धातील गुरू असतात. ते आपल्या शिष्याला सगळे डावपेच शिकवितात. शेवटचा एक डाव शिकवत नाहीत. त्या शिष्याला असे वाटते की, कुस्ती आणि मुष्टीयुद्धातील माझ्यासारखा श्रेष्ठ दुसरा कोणी नाही. माझ्या गुरूंनासुद्धा मी हरवू शकतो. म्हणून तो त्यांना आव्हान देतो. राजदरबारात दोघांचा सामना होतो. गुरूने शिकविलेले अनेक पेच तो टाकतो. त्यातून गुरू सुटका करून घेतात आणि त्याला न शिकविलेला शेवटचा पेच त्याच्यावर टाकतात, त्यात शिष्य आडवा होतो. अमेरिकेने तालिबान्यांचे सर्व प्रशिक्षण केले. युद्धात वापरणारी शस्त्रे त्यांना दिली. ते वापरण्याचे प्रशिक्षण दिले. खांद्यावर ‘रॉकेट लाँचर’ ठेवून अचूकपणे विमान किंवा हेलिकॉप्टर पाडण्याचे प्रशिक्षणही दिले. त्यांना वाटले रशियाविरुद्ध युद्ध जिंकण्यात याचा उपयोग होईल. रशियाविरुद्धचे युद्ध त्यांनी जिंकले आणि नंतर शिष्याने गुरूलाच आव्हान दिले. अफगाणिस्तानातल्या गुरूकडे शेवटचा डाव होता. अमेरिकेकडे तो नसल्यामुळे ट्रम्प आणि बायडन यांना अमेरिकेतून माघार घ्यावी लागली. अमेरिका आणि रशियाने आपापली संस्कृती लादण्याचा प्रयत्न अफगाणिस्तानवर केला. रशियाला ‘इक्वॅलिटी’ आणायची होती आणि अमेरिकेला ‘लिबर्टी’ आणायची होती. अफगाणी जनतेच्या ‘फॅटर्निटी’ने या दोघांना पराभूत केले. संस्कृतीची शक्ती अशी असते.










 
@@AUTHORINFO_V1@@