माहितीचे लोकशाहीकरण आणि ऑनलाईन मजकूरनिर्मितीची समीकरणे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2021   
Total Views |


lokshahikaran 1_1 &n

एकविसावे शतक उजाडले आणि देशाच्या गावपाड्यावर आधुनिक तंत्रज्ञानाने पकड मजबूत केली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये संगणकापासून ते ‘५जी’ पर्यंतच्या प्रवासाची प्रक्रिया या देशाने अनुभवली आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात शेतीमध्ये स्वयंपूर्ण होण्याची स्वप्न बघणारा आपला देश एकविसाव्या शतकामध्ये जागतिक पातळीवर सर्वात जास्त मोबाईल आणि समाजमाध्यमांचा पगडा असणारा आणि त्याची मोठी बाजारपेठ असणारा देश ठरला आहे. ही मुळात या देशाच्या विकासप्रक्रियेची आणि आपल्या देशाच्या प्रगतीची खूणगाठ आहे. आपला देश विकास आणि पायाभूत सुविधा यांच्या जोखडातून मुक्त होत असताना आधुनिक तंत्रज्ञानप्रिय झाला, ही बाब सुखावणारी असली तरी या देशाच्या पारंपरिक ढाँच्यामुळे त्याचे विधायक आणि विघातक परिणामाची मीमांसा करण्याची सध्या वेळ येऊन ठेपली आहे.


पारतंत्र्यातून मुक्त होताना या देशाने स्वातंत्र्य हेच आमच्या जीवनाचे मुख्य ध्येय आहे, असेे मानून स्वातंत्र्याची लढाई जिंकली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी काहींनी रक्त सांडले, तर काहींनी वैचारिक लढाईने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्यानंतर ज्या देशाला अन्नधान्यावर इतर देशावर अवलंबून राहावे लागले, त्या देशाने आता विश्वगुरूच्या भूमिकेत जाताना या देशाची संक्रमणावस्था समजून घेणे भाग आहे. त्याबरोबरच त्या संक्रमणावस्थेच्या त्या त्या काळातील परिणामसुद्धा जाणून घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे.
 
देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी या देशामध्ये अनेक देशाचे पुढारपण करणार्‍या विचारवंतांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून इथल्या नागरिकांचे प्रबोधन केले. या देशातील अनिष्ट प्रथा-परंपरा याबाबत या देशातील जनसामान्यांना शिक्षित आणि जागे करण्याचे काम करताना वर्तमानपत्र हे एक माध्यम म्हणून पुढे आले आणि जनतेचा, जनसामान्यांच्या आवाजाचे ते स्वत:मध्ये एक प्रतीक बनले. स्वातंत्र्यानंतर प्राप्त झालेले अधिकार या देशाने १९७५ रोजी लागू केलेल्या आणीबाणीमध्ये पुन्हा गमावले असताना, त्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे जनतेवर प्रभाव पाडणार्‍या मुख्य वर्तमानपत्रावरसुद्धा गदा आणल्या गेल्या. म्हणजेच देशाच्या जडणघडणीमध्ये देशाची अभिव्यक्त होणारी जागा म्हणून वर्तमानपत्र, रेडिओ आदी माध्यमांनी त्यांचे त्यांचे स्थान पक्के केले. परंतु, लोकशाही मूल्य स्वीकारलेल्या देशामध्ये लोकशाही मूल्ये झिरपण्याससाठी ७0 वर्षांचा काळ द्यावा लागला आणि ती प्रक्रिया अद्याप सुरू असलेली दिसते. जसजशी या देशाने आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानामध्ये आपली स्वयंपूर्णता सिद्ध केली, त्याप्रमाणे इथल्या जनसामान्यांच्या अभिव्यक्तीची माध्यमेसुद्धा बदलत गेली.

तीच त्यांचा आवाज म्हणून स्वतःमध्ये वाढत गेली. माध्यमांच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये प्रबोधनापासून सुरुवात झालेल्या माध्यमांना अजेंडा ठरविण्यापर्यंतची भूमिका पार पाडण्यापर्यंत त्याचे एका बाजूला अवमूल्यन झाले, तर एका बाजूला ती तंत्रज्ञानाने, आवाक्याने सुदृढ होऊन गेली. या देशात लोकशाही मूल्ये रुजताना इथल्या विज्ञान- तंत्रज्ञानाच्या प्रगतीने माध्यमांचे लोकशाहीकरण होण्यास मदत झाल्याचे चित्र आहे. माध्यमांचे लोकशाहीकरण होताना इथल्या मध्यमवर्गीय समाजाच्या मताचा मुख्यप्रवाहामध्ये विचार करण्याइतकी लोकशाही आणि माध्यमे महत्त्वाची बनली, हे या देशाच्या माध्यमांचे आणि इथल्या लोकशाहीचे गमक म्हणावे लागेल. लोकशाहीबद्दल विचार करताना इथल्या माध्यमांमधून ‘आहे रे’ वर्गाचा आवाज येत असताना, जनतेसमोर माध्यमातून जाणार्‍या संदेशामध्ये इथल्या धनिकांचा वरचश्मा होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु, या देशातील मूल्याधारित व्यवस्थेमध्ये नव्या माध्यमांना जनतेशी जुळवून घेत असताना समाज शिक्षित होत गेल्याने माध्यमांवर ‘आहे रे’ वर्गाची पकड तितकीच घट्ट राहिली नाही. म्हणूनच लोकशाहीच्या यशाचे आणि इथल्या ‘स्वातंत्र्य’ नावाच्या संकल्पनेचे मूल्यमापन केले तर आज जनसामान्यांकडून होणारी मजकूर आणि आशयनिर्मिती हीच मुख्यप्रवाहामध्ये मोजली जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

कारण, तंत्रज्ञान अगदी परवडणार्‍या किमतीत जनसामान्यांना उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे एरवी आपली मते, आपल्या कुटुंबात, समाजात मांडणारा वर्ग समाजमाध्यमांवरही मनमोकळेपणे व्यक्त होऊ लागला. भारतात फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या विविध अ‍ॅप्सवरून मजकुराची निर्मिती करणारा वर्ग हा बहुतांश राज्यव्यवस्थेला प्रश्न विचारणारा किंवा काहीतरी बोलू इच्छिणारा असा मध्यमवर्गीय वर्ग आहे. त्यामुळे तथाकथित विचारवंतांच्या मतावर अवलंबून असणारी माध्यमे आता व्यक्तिकेंद्रित न होता, जनसामान्यांच्या आवाजावर अवलंबित झाल्याचे चित्र आहे. देशामध्ये कालानुरूप विकास होताना, नव्या माध्यमांची जडणघडण होताना, पारंपरिक माध्यमांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला गेला आणि जुने माध्यमे भविष्यात संपणार वगैरे अशा चर्चा सुरू झाल्या. परंतु, २00४ नंतर समाजमाध्यमांचा वाढलेला पगडा या देशांमध्ये ’नव माध्यम’ म्हणून स्वतःमध्ये उदयाला आला.

‘नव माध्यम’ म्हणून उदयाला आलेल्या माध्यमामध्ये समाजमाध्यमांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. संदेशवहनाच्या सुविधा नसणार्‍या देशामध्ये एखादा संदेश देशाच्या दुसर्‍या टोकाला पोहोचविण्यासाठी लागणारा कालावधी समाजमाध्यमांनी कमी केलाच, त्याप्रमाणे जागतिक संवादामध्ये नवी क्रांती निर्माण केली. हाच या समाजमाध्यमांचा महत्त्वाचा प्रभाव आहे. माध्यमांचा विचार करताना देशामध्ये रेडिओ, वर्तमानपत्रे, मासिके, पाक्षिके यांचा काळ जाऊन आता व्यक्त होण्याची, काही लिहिण्याचे व्यासपीठ म्हणून समाजमाध्यमे पुढे सरसावली. त्यामुळे पारंपरिक माध्यमातील मजकुराची निर्मिती करताना प्रामुख्याने याच माध्यमांवर अवलंबून वर्गाचा विचार केला जाई. परंतु, आता माहिती-तंत्रज्ञानाच्या विकासामुळे समाजमाध्यमांवरील मजकुराच्या निर्मितीसाठी आर्थिक गणिते आणि वाचकसंख्येची समीकरणे आडवी येऊ लागल्याने, मजकूर निर्मितीतील पारंपरिक माध्यमातील संशोधनाचा अभाव प्रकर्षाने पुढे येत गेला.
 
त्याचबरोबर समाजमाध्यमांच्या उदयामुळे पारंपरिक माध्यमांवर किंवा पारंपरिक पद्धतीवर अवलंबून राहिलेला वर्ग आता एका ‘क्लिक’वर मिळणार्‍या माहितीवर पोसला जाऊ लागल्याने माहिती-ज्ञानाची असणारी मक्तेदारी संपुष्टात आली. कोणताही संदर्भ शोधण्यासाठी आज वयाची पंचाहत्तरी पार केलेली मंडळी पुस्तके, ग्रंथ यांच्यावर अवलंबून होती. परंतु, आज जगभरातील कोणत्याही विषयाची माहिती इंटरनेटमुळे एका ‘क्लिक’वर उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लोकशाहीपूरक बाब घडताना, माहितीचे स्वातंत्र्य मिळताना नागरिकांकडून खोट्या माहितीचे प्रसारण आदी नकारात्मक बाबीसुद्धा वाढत आहेत. वर्तमानपत्रांवर अवलंबून असणारा वर्ग डिजिटल माध्यमांमध्ये वळला असला तरी वृत्तपत्रीय वाचनापासून तो पूर्णपणे दुरावलेला नाही. माहिती-तंत्रज्ञानाच्या व समाजमाध्यमांच्या विकासामुळे स्थळ, काळ आणि वेळ यांसारख्या कोणत्याच मर्यादा वाचकाला राहिल्या नसल्याने सध्या समाजमाध्यमांतून निर्माण होणार्‍या मजकुराकडे नेटिझन्स आकर्षित होताना दिसतात.
 
भारतामध्ये मोबाईल वापरणार्‍यांच्या संख्येमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वाढ झाली आहे आणि त्यामुुळेच पारंपरिक मजकूर निर्मितीपेक्षा इथल्या सर्वसामान्य माणसाला समाजमाध्यमांमुळे व्यक्त होण्याची संधी मिळाली आहे. समाजमाध्यमांमुळे लोकांपर्यंत काही क्षणात स्वत:चे मत पोहोचविण्याची संधी उपलब्ध झाल्याने समाजमाध्यमांकडे इथला बहुतांश वर्ग वळलेला दिसतो. पारंपरिक माध्यमांमध्ये कोणतीही बाब लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मजकुरावर अवलंबित्व होते. परंतु, समाजमाध्यमांममध्ये मल्टिमीडियाचा समावेश झाल्याने त्याची परिणामकता अधिक वाढलेली आहे. सामान्य नागरिकांना समाजमाध्यमांमुळे मल्टिमीडिया सुविधा हाताच्या बोटांवर उपलब्ध असल्यामुळे माहिती प्रसारणासाठी दृश्यात्मक माहिती, विशिष्ट आवाजातील माहितीचे संकलन करण्यासाठी स्वातंत्र्य प्राप्त झाल्याने सध्या समाजमाध्यमांचा नागरिकांवरील पगडा वाढलेला आहे. यामुुळे हल्ली प्रस्थापित माध्यमेसुद्धा सामान्यांच्या मजकुरांवर अवलंबून असलेली दिसतात. कारण, कोकण किनारपट्टीवर ‘तोक्ते’ चक्रीवादळाने यंदा धडक दिली. त्यामुळे किनारपट्टीवरील गावांना त्याचा जोरदार तडाखा बसला. परंतु, वादळाने धडक दिल्यानंतर तिथे निर्माण झालेली परिस्थिती तेथील जनतेने त्यांच्या मोबाईलद्वारे चित्रित केल्याने ती परिस्थिती मुख्यप्रवाहातील माध्यमांनापर्यंतही पोहोचू शकली. जर समाजमाध्यमांचा अवलंब या देशामध्ये झाला नसता, तर जलद गतीने गावाखेड्यातून उपलब्ध होणार्‍या मजकुरावर काहीप्रमाणात बंधने आली असती आणि हेच ‘नव माध्यमां’चे यश असून ‘सिटिजन जर्नालिझम’ या नव्या शाखेचा उदय होण्यामागे समाजमाध्यमांचा विकास कारणीभूत आहे.

समाजमाध्यमांमुळे शिक्षित झालेला समाज सध्या त्यामध्ये पुरता गुंतून पडल्याचेसुद्धा विघातक चित्र सध्या प्रकर्षाने दिसून येते. कारण, कोणत्याही माध्यमाच्या परिणामकारकतेचा विचार करताना, तिचा अतिप्रमाणात नागरिकांकडून होणारा वापर चिंताजनक आहे. सोशल मीडिया ‘अ‍ॅडिक्शन’, त्यातून वाढलेली अश्लिलता, त्याचबरोबर समाजमाध्यमांद्वारे अजेंडा थोपविण्यासाठी होणारा अतिवापर आदी बाबी नकारात्मकतेकडे घेऊन जाणार्‍या आहेत.माहितीवर अवलंबून असणारे प्रत्येक क्षेत्र आज समाजमाध्यमांचा उपयोग करून व्यावसायिक फायदे घेत आहे. त्याबरोबरच माध्यमांतून प्रतिमानिर्मितीमुळे याकडे सामान्यातील सामान्य नागरिक वळलेला दिसतो.
 
देशाच्या ग्रामपंचायत निवडणुकांपासून ते देशाच्या लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत प्रतिमानिर्मितीसाठी समाजमाध्यमांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जात आहे. त्यामुळे समाजमाध्यम हे ‘नव माध्यम’ म्हणून पुढे येत असताना, ते या देशातील नागरिकांचा सध्या जीवनावश्यक भागच बनल्याचे दिसते.सामान्यांच्या हातामध्ये देशाच्या राजकारणाविषयी टीकाटिप्पणी करण्याचा अधिकार देणार्‍या व खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य देणार्‍या समाजमाध्यमांमुळे इथल्या अस्सल देशी विचारांना, इथल्या संस्कृतीला जागतिक कॅनव्हास उपलब्ध झाला आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील कोणत्याही खेड्यातील विद्यार्थी आज समाजमाध्यमांद्वारे देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडला जाऊ शकतो, अशी परिस्थिती आज या ‘नव माध्यमां’च्या ताकदीने दिलेली आहे.
 
 
त्यामुळे या देशातील माहिती प्रसारणाच्या वेगामध्ये प्रचंड वाढ गेल्या काही काळात नोंदण्यात आली. भारतासारख्या १३0 कोटी लोकसंख्येच्या देशात १.१0 अब्ज म्हणजे लोकसंख्येच्या तब्बल ७९ टक्के लोकसंख्येकडे आज मोबाईल फोन असून, यामधील ६२४ दशलक्ष म्हणजे ४५ टक्के नागरिकांकडे इंटरनेटची जोडणी आहे. यामध्ये समाजमाध्यमांचा वापर करणारे लोक ४४८ दशलक्ष इतके नागरिक आहेत. म्हणजेच भारतीय लोकसंख्येच्या सर्वसाधारण ७0 टक्के लोकसंख्या आज मोबाईल वापरत असून ती समाजमाध्यमांचा वापरही करताना दिसते. त्यामुळे येथील समाजाच्या वैचारिक जडणघडणीमध्ये येत्या काळामध्ये समाजमाध्यमातून होणार्‍या मजकूरनिर्मिती आणि समाजमाध्यमातून निर्माण केलेल्या प्रतिमानिर्मितीचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होणार आहे. कारण, माध्यमांचे लोकशाहीकरण झाल्याने इथला सामान्य नागरिकच इथल्या वैचारिक, सामाजिक, राजकीय आदी बाबींमधील मजकूरनिर्मितीस जबाबदार असणार आहे.
 

 





 
 
 
@@AUTHORINFO_V1@@