माध्यमांतील अंधारलेले निसर्गभान!

    14-Aug-2021   
Total Views |

media_1  H x W:

पर्यावरणीय वार्तांकनामध्ये संशोधन, तज्ज्ञांशी चर्चा, सखोल अभ्यास याला पर्याय नाही. आपण ज्या विषयावर काम करत आहोत, त्याकडे भावनिकतेने न पाहता, कसलेही पूर्वग्रह मनात न ठेवता, स्वत: केलेले निरीक्षण, स्थानिकांचे मत, अधिकारी किंवा प्रशासनाची बाजू समजून घेणे आवश्यक आहे. आपण पर्यावरणवादी कार्यकर्ते नाही, याचेही भान जपणे तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र, सध्याची पर्यावरण पत्रकारिता ही पर्यावरणवादी आणि राजकीय त्वेषाने बरबटलेली असल्याचे पाहावयास मिळते.

वन विभागातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने मुंबईत वाढलेला मानव-बिबट्या संघर्ष निवारण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मीदेखील त्या परिषदेला उपस्थित होतो. त्यावेळी एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने “मानव-बिबट्या संघर्षाच्या प्रश्नासाठी तुम्ही आम्हाला बोलावून का समज देत आहात?” असा प्रश्न त्या अधिकार्‍याला उपहासात्मक पद्धतीने विचारला. त्यावर “बेटा, मी त्या बिबट्याला बोलावून समजावू शकत नाही. म्हणून मी तुमच्यासारख्या माध्यम प्रतिनिधींना बोलावून त्याच्याबद्दल समजावत आहे,” असे मिश्किल मात्र सूचक उत्तर त्या अधिकार्‍याने त्याला दिले. एकाअर्थी त्या अधिकार्‍याने या उत्तराद्वारे माध्यमांची जनजागृती करण्याची ताकद आणि माध्यमकर्मींचे पर्यावरणीय परिसंस्था समजून न घेण्याबद्दलचे अज्ञानच अधोरेखित केले होते. वृत्त माध्यमे ही समाजमनाचा आरसा मानली जातात. माहिती पोहोचवणे आणि त्याद्वारे जनजागृती करणे हे माध्यमांचे मूळ आहे. समाजमनाच्या याच आरशावर पर्यावरण वार्तांकनाच्या अनुषंगाने मात्र धूळ बसलेली पाहावयास मिळते.
 
 
संपर्क आणि प्रसार प्रक्रियेमध्ये पायाभूत मानली जाणारी मुद्रित माध्यमे, गेल्या दोन दशकांमध्ये घराघरात पोहोचलेली इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि नव्या काळाच्या उंबरठ्यावर उभी असलेली डिजिटल माध्यमे, यांचा आढावा घेतल्यास अद्याप ‘पर्यावरण’ हा विषय या माध्यमांच्या मुख्य प्रवाहात आलेला नाही. काही बातम्या, पुरवण्यांमधील लेख, मुलाखती आणि दृश्य माध्यमे एवढ्यापुरताच तो मर्यादित आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा वर्तुळांमध्ये माध्यमांच्या भूमिका निर्णायक ठरतात. पर्यावरणाच्या वर्तुळात तरी अजूनही माध्यमे ठोस भूमिका घेताना दिसत नाही. माध्यमांमध्ये ‘पर्यावरण’ विषयातील खास करून संवर्धनात्मक बाजूच्या अनुषंगाने पायाभूत काम होणे आवश्यक असून आपण या लेखाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनातील माध्यमांची भूमिका आणि सध्याचे पर्यावरण पत्रकारितेचे स्वरुप समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
 
माध्यमकर्मींचे पर्यावरणभान
 
आजमितीस मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल अशा तिन्ही स्वरूपातील माध्यमांनी समाजजीवन व्यापून गेले आहे. या तिन्ही माध्यम विश्वामध्ये पर्यावरणीय परिसंस्था समजून घेऊन त्यासंबंधीचे वार्तांकन करणारे माध्यमकर्मी हे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आहेत. इंग्रजी माध्यमांमध्ये याबद्दलची परिस्थिती चांगली असली, तरी मराठीत माध्यम क्षेत्रात ‘पर्यावरण’ हा विषयच समजून घेण्याची वानवा आहे. आज ‘राऊंड ग्लास सस्टेन’, ‘डाऊन टू अर्थ’, ‘मोंगा-बे’, ‘बीबीसी वर्ल्ड’ अशी इंग्रजी माध्यमांची संकेतस्थळे पर्यावरण आणि वन्यजीवांसंदर्भात उत्कृष्ट वृत्तांकन करताना दिसतात.


मुळातच बर्‍याच इंग्रजी माध्यमांमध्ये पर्यावरणविषयक वार्तांकन करण्यासाठी स्वतंत्र पत्रकारांची नेमणूक केलेली दिसते. ही मंडळी केवळ अन् केवळ पर्यावरणविषयक बातम्यांचे वार्तांकन करतात. त्यासाठी आठवडाभर बातमीवर संशोधनात्मक काम करण्यासाठी वेळ घेतात. ‘वेळ घेतात’ म्हणण्याऐवजी इंग्रजी माध्यमांमध्ये त्या प्रकारचा ‘वेळ दिला जातो.’ परंतु, मराठी माध्यमांमध्ये हा प्रकार फारच दुर्मीळ. आजमितीस मराठी माध्यमविश्वात केवळ पर्यावरणविषयक वार्तांकन करणार्‍या पत्रकारांची संख्या ही हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. त्यातही दुय्यम स्तरावर आणि पर्यावरण हा विषय वैयक्तिक आवडीचा असल्याने या विषयाचे वार्तांकन करण्याची संधी त्या-त्या माध्यमसंस्थेने त्यांना दिली आहे.

 
 तहान लागल्यावरच विहीर खोदण्याचा प्रकार मराठी माध्यम विश्वात पर्यावरणीय वृत्तांकनाबाबत दिसून येतो. उदा. चिपळूणमध्ये पूर आल्यानंतर किंवा सह्याद्रीच्या खोर्‍यात दरडी कोसळण्याचे प्रकार घडल्यानंतरच मराठी वृत्तवाहिन्यांना सह्याद्रीच्या डोंगररागांची वा नद्यांची आठवण झाली. त्यापूर्वी त्यांना सह्याद्रीमध्ये झालेल्या वृक्षतोडीची, तिथल्या पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रासंबंधीच्या प्रश्नाची आणि नद्यांमधील अतिक्रमणांची जाणीव झालेली नव्हती. त्यातही हे वार्तांकन करताना पुरामुळे शहरी भागात वाहून आलेल्या मगरींसंदर्भातील उथळ आणि भडक बातम्यांची भाऊगर्दी दिसली. नैसर्गिक-भौगोलिक घटनांना वैज्ञानिक दृष्टीने मांडणे आणि साध्या-सोप्या निरीक्षणातून पर्यावरण समजून देण्याचे तंत्र काही मराठी माध्यमांनी अवलंबण्याची गरज आहे. पर्यावरण पत्रकारितेला वेगवेगळ्या विषयाचे कंगोरे आहेत. पर्यावरणीय कायदे, आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय करार, शाश्वत विकास, हवामान बदल, प्रदूषण, वन्यजीवन, वनसंवर्धन असे वेगवेगळे मुद्दे त्यासाठी समजून घेणे गरजेचे आहे.
 
 
डिजिटल माध्यमांतील तथ्यहीनता

रोजच्या जगण्यामध्ये अन्न, वस्त्र आणि निवार्‍याइतकीच महत्त्व प्राप्त झालेली फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसारखी समाजमाध्यमे ही आजच्या घडीचे वास्तव आहे. ते योग्य की अयोग्य, त्याचे फायदे किती, तोटे कोणते याच्या तपशीलात न जाता, पर्यावरणसारखे विषय या डिजिटल माध्यमांमध्ये कसे मांडले जातात, याचा वेध घेणे महत्त्वाचे ठरेल.आज डिजिटल माध्यमांनी जोर पकडला आहे. माध्यमांच्या संकेतस्थळांमध्ये आणि समाजमाध्यमांवर एकच स्पर्धा निर्माण झाली आहे. आज डिजिटल बातम्यांचे किंवा आशयाचे गणित हे ‘क्लिक बीट’ आणि ‘पेज व्ह्यू’ या निकषाच्या जाळ्यात गुंतलेले दिसते. या निकषाच्या आधारावरच काम करणार्‍या व्यक्तींची वा आशय निर्मात्यांची प्रगती मोजली जाते. त्यामुळे आशयाची सत्यता वा शुद्धतेला महत्त्व उरलेले नाही. बातमीचे शीषर्क आकर्षक करून वाचकाला बातमीची लिंक ‘क्लिक’ करण्यासाठीच सध्या डिजिटल पत्रकारितेमधले जग काम करताना दिसते. यामध्ये काही गैर आहे असेही नाही. कारण, शेवटी तो व्यवसाय आणि आर्थिक बाबींचा भाग आहे. मात्र, बातमी ‘क्लिक’ करून ती उघडल्यानंतर त्यामधील आशयाचा सत्याशी किंवा अचूक बाबींशी संबंध असणेही तितकेच आवश्यक आहे.
 
डिजिटल क्षेत्रामध्ये खासकरून वन्यजीवांसंदर्भातील बातम्यांमध्ये तथ्य आणि सत्य यामध्ये अजिबात ताळमेळ नसलेला पाहायला मिळतो. मुळातच मराठी माध्यमविश्वात ‘वन्यजीवन’ हे मनोरंजन म्हणूनच पाहिले गेले आहे. त्यासंबंधीच्या वृत्तांकनाला संवर्धानात्मक बाबीची किनार फार कमी वेळाच पाहावयास मिळते. इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांमध्ये तर वन्यजीव म्हणजे मनोरंजानत्मक खेळणे वा समाजाला मिळालेला शाप, याच अनुषंगाने त्याचे वार्तांकन होताना दिसते. उदा. मराठीमधील एका वृत्तवाहिनीच्या एका संकेतस्थळाने ‘घरात पाली नकोय? मग ‘या’ टिप्स नक्की ‘फॉलो’ करा!’ या आशयाची बातमी प्रसिद्ध केली होती. (अशा मथळ्याच्या अनेक बातम्या तुम्हाला इंटरनेटवर अगदी सहज दिसतील). या बातमीमध्ये पाल विषारी असून तिला घरातून बाहेर काढण्यासाठीचे काही उपाय सांगितले होते.


 मात्र, एकही भारतीय पाल किंवा सरडा हा विषारी नाही. ते क्वचितच चावतात आणि जरी ते चावले तरी काळजी करण्याची गरज नाही.कारण, त्यांचे चावणे हे धोकादायक नसते. तसेच घरात रोगांचा प्रसार करणारे कीटक आणि लहान पृष्ठवंशीय प्राण्यांना खाऊन त्यांची संख्या नियंत्रणामध्ये ठेवण्याचे महत्त्वाचे काम पाली करतात. अशा प्रकारच्या तथ्यांचा विचारच वन्यजीवविषयक बहुतांश डिजिटल बातम्यांमध्ये केलेला दिसत नाही. हे केवळ उदाहरण आहे.


जागतिक पातळीवर वन्यजीव संवर्धनासाठी कार्यरत असणार्‍या एका बड्या इंग्रजी संकेतस्थळाच्या भारतातील मराठी संकेतस्थळालादेखील वन्यजीवांचे वार्तांकन करताना तथ्यांचा विसर पडल्याचे पाहून अचंबित व्हायला होते. चित्त्यासंदर्भातील वार्तांकनामध्ये बिबट्याचे छायाचित्रण प्रदर्शित करणे किंवा ’वन्यजीव संरक्षण कायद्या’अंतर्गत संरक्षित असलेल्या मगरींना पाळणार्‍या व्यक्तीला प्रोत्साहन देऊन त्यांचे व्यक्तिविशेष वार्तांकन करण्याचे धारिष्ट्य या संकेतस्थळाने केले आहे. हे पाहिल्यानंतर डिजिटल माध्यमांमधील तथ्यहीनता लक्षात येते. तसेच राज्यातील वन्यजीवांसंदर्भातील चीडिचूप असणारी डिजिटल माध्यमे इतर राज्यांमध्ये वन्यजीवांचा मृत्यू झाल्यास त्याचे वार्तांकन चवीने करताना दिसतात. डिजिटल माध्यम हे माध्यमविश्वाचे भविष्य आहे. अशा परिस्थितीत जर हीच माध्यमे तथ्यहीन पर्यावरणीय वार्तांकन करत असतील, तर पर्यावरण जनजागृतीचे भविष्य अंधारमय आहे

पर्यावरण आणि राजकारण

पर्यावरणीय वार्तांकनामध्ये संशोधन, तज्ज्ञांशी चर्चा, सखोल अभ्यास याला पर्याय नाही. आपण ज्या विषयावर काम करत आहोत, त्याकडे भावनिकतेने न पाहता, कसलेही पूर्वग्रह मनात न ठेवता, स्वत: केलेले निरीक्षण, स्थानिकांचे मत, अधिकारी किंवा प्रशासनाची बाजू समजून घेणे आवश्यक आहे. आपण पर्यावरणवादी कार्यकर्ते नाही, याचेही भान जपणे तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र, सध्याची पर्यावरण पत्रकारिता ही पर्यावरणवादी आणि राजकीय त्वेषाने बरबटलेली असल्याचे पाहावयास मिळते. काही पर्यावरणवाद्यांच्या शास्त्रीयदृष्ट्या तथ्यहीन असलेल्या मुद्द्यांवर वार्तांकन होण्याचे प्रमाण वाढलेले दिसते आहे. तसेच आपणच पर्यावरणवादी आहोत, या वृत्तीनेच काही पत्रकार मंडळी वावरताना दिसून येतात. याशिवाय पर्यावरणवाद्यांच्या भूमिकादेखील आता उपाययोजनात्मक असण्याऐवजी टीकात्मक किंवा संघर्षात्मक झालेल्या पाहावयास मिळतात. काही मोजकी पर्यावरणवादी आणि वनसंवर्धक मंडळी ही राजकीय त्वेषाने प्रेरित असल्याचे दिसून येते.
 
आपली राजकीय त्वेषाची पोळी भाजण्यासाठी ही मंडळी माध्यमांना हाताशी धरतात. उपाय असणार्‍या प्रश्नालादेखील तो प्रश्न पर्यावरणास हानिकारक असल्याचे चित्र निर्माण करतात. त्याविषयी जनभावना भडकवतात आणि त्यावर आपली आर्थिक पोळी भाजून घेतात. शहरी भागांमध्ये असे प्रकार सर्रास घडताना दिसतात. अर्थात, काही पर्यावरणवादी याला नक्कीच अपवाद आहेत. समस्या मांडल्यानंतर पर्यावरणवाद्यांची भूमिका ही त्या समस्येच्या उपाययोजना मांडण्याच्या बाजूने असणे आवश्यक आहे. मात्र, तसे घडताना दिसत नाही. राजकीय द्वेषाने बरबटलेल्या काही पर्यावरणवादी आणि पत्रकार मंडळींनी पर्यावरणीय पत्रकारितेचा अक्षरश: चुराडा केला आहे. आपल्या दुटप्पी पर्यावरणवादी भूमिकेमुळे या मंडळींनी पायाभूत विकासात्मक कामांमध्ये आडकाठी आणली आहे. त्यामुळे राजकीय द्वेष आणि आर्थिक तुंबडी भरून घेण्याची लागलेली कीड ही सध्याच्या पर्यावरण संवर्धनासमोरील एक मोठी समस्या आहे.
 
भविष्य काय?

जगाच्या कोपर्‍यात कुठेही गेल्यावर पर्यावरण हा विषय आणि त्यामधील प्रश्न हे सारखेच आहेत. म्हणूनच या विषयाकडे जगाच्या परिप्रेक्षातून पाहणे आवश्यक आहे. जागतिक इंग्रजी माध्यमे ज्या पद्धतीने उपाययोजनात्मक दृष्टिकोनामधून अभ्यासू वृत्तीने आणि गांभीर्याने पर्यावरणीय विषय हाताळतात, तशा स्वरुपात मराठी माध्यमांनी काम करणं आवश्यक आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे वाढती शहरे आणि त्यामुळे निर्माण होणार्‍या पर्यावरणीय समस्या, हवामान बदल हे विषय आपल्याला भेडसावत आहेत. त्यामुळे पर्यावरण पत्रकारितेचे स्वरुप हे केवळ प्रश्न मांडण्यापुरते मर्यादित राहणार नसून त्या प्रश्नांच्या उत्तरांवर भर देणारे असले पाहिजे.


 वातावरणातील बदल, नव्याने उभी राहणारी किंवा पुनरुज्जीवित केली जाणारी जंगले, पर्यावरणस्नेही जीवनपद्धती, कचरा आणि सांडपाण्यावरील पुनप्रर्किया, प्लास्टिकचा पुनर्वापर हे विषय सध्या कळीचे आहेत. या विषयांवरील उपाययोजनात्मक वृत्तांकन ही काळाची गरज आहे. सध्या आपण अशा जीवनशैलीमध्ये जगत आहोत, जिथे लोकांचा लक्षपूर्वक पाहण्याचा आणि ऐकण्याचा संयम अतिशय कमी आहे. त्यामुळे कमी वेळात, अगदी मोजक्या शब्दांत विषय मांडण्याला महत्त्व प्राप्त झालेले दिसते. त्यासाठी दृश्य माध्यमांचा आपल्याला प्रभावीपणे उपयोग नक्कीच करता येऊ शकतो.














 
 
 
 
 

 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.