‘युथफूल’ होण्याचे भाजपचे ‘लक्ष्य’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2021   
Total Views |

BJP_1  H x W: 0
 
 
‘टिनएजर्स’ आणि तरुण मतदारांना आपल्याकडे खेचणे आणि त्यानंतर त्यांना बांधून ठेवण्यासाठी राजकीय पक्षांना अनेक कार्यक्रम आखावे लागतात. सध्या भाजपने पक्षस्तरावर अशाच तरुण मतदारांना भाजपसोबत बांधून ठेवण्यासाठी विशेष रणनीतीवर काम सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी युवकांची ताकद नेमकेपणाने ओळखून संघटनेला तशाप्रकारे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
स्थळ - हरियाणातील जिंदमधील एक महाविद्यालय : संघटन कौशल्यात तरबेज असलेल्या भाजपचा एक मराठी नेता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधत होता. विद्यार्थ्यांनी त्यांना एक प्रश्न विचारला, तो म्हणजे - “शेकडो कोटी रुपये खर्च करून भाजपने सरदार वल्लभभाई यांचा पुतळा गुजरातमध्ये बांधला. असा पुतळा उभारण्याऐवजी शाळा बांधता आली नसती का?” यावर त्या नेत्याने विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने मुद्दा समजावून सांगितला. “आज तुम्ही ज्या जिंद या गावात राहता, ते एक संस्थान होते. भारत स्वतंत्र झाला १५ ऑगस्ट, १९४७ रोजी. मात्र, तुमचं हे गाव २० ऑगस्ट, १९४८ रोजी म्हणजे तब्बल एक वर्षाने स्वतंत्र झाले. स्वतंत्र झाले म्हणजे त्याच्या शासकाने भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. देशात जुनागढ, हैदराबाद, भोपाळसह अशी डझनभर संस्थाने भारतात विलीन होण्यास तयार नव्हती. मात्र, सरदार पटेलांनी ते काम करवून घेऊन भारताला एकसंध बनविले. आता देशाच्या निर्मितीमध्ये सिंहाचा वाटा असलेल्या नेत्याचे भव्य स्मारक उभारायला हवे की नको?” नेत्याच्या या प्रश्नावर विद्यार्थ्यांनी होकारार्थी मान डोलावली. कारण, त्यांना सरदार पटेल आणि त्यांचे नेमके कार्य अतिशय चांगल्या प्रकारे समजावून सांगण्यात त्या नेत्याला यश आले. “आता यापुढे अशा प्रकारचे खोडसाळ प्रश्न विचारण्यापूर्वी विद्यार्थी प्रथम त्यामागील इतिहास समजून घेतील आणि तेच तर आमचे काम आहे,” अशी प्रतिक्रिया त्या नेत्याने अनौपचारिक गप्पांमध्ये दिली.
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता सर्व वयोगटांमध्ये आहे. अगदी चार-पाच वर्षांची लहान मुले, ‘टिनएजर्स’ ते अगदी वयोवृद्धांनाही पंतप्रधान मोदी आपलेसे वाटतात. त्यांची लोकप्रियता ही सत्ताधारी भाजपसाठीही महत्त्वाची ठरते. कारण, पंतप्रधानांच्या चेहर्‍याकडे बघून सर्वसामान्य लोक भाजपच्या विचारसरणीकडे आकर्षित होतात, ती विचारसरणी स्वीकारायचा विचार करतात. पुढे निवडणुकीत पक्षाला याचा लाभ होतो. मात्र, निवडणुकीचे गणित एवढे सोपे नसते, एकदा आपल्याला मत दिलेल्या मतदाराने पुढेही तसेच करावे यासाठी राजकीय पक्षांना मोठी मेहनत घ्यावी लागते. वयाचा विशिष्ट टप्पा म्हणजे साधारणे चाळिशी ओलांडलेले मतदार हे आपल्या मतांवर सहसा ठाम असतात, त्यामुळे त्यांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांना फारशी मेहनत घ्यावी लागत नाही.
 
 
 
मात्र, ‘टिनएजर्स’ आणि तरुण मतदारांना आपल्याकडे खेचणे आणि त्यानंतर त्यांना बांधून ठेवण्यासाठी राजकीय पक्षांना अनेक कार्यक्रम आखावे लागतात. सध्या भाजपने पक्षस्तरावर अशाच तरुण मतदारांना भाजपसोबत बांधून ठेवण्यासाठी विशेष रणनीतीवर काम सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी युवकांची ताकद नेमकेपणाने ओळखून संघटनेला तशाप्रकारे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याविषयी भाजपच्या एका नेत्याने अतिशय वैशिष्ट्यपूर्ण माहिती दिली. ते म्हणाले, “देशातील युवा मतदारांचा टक्का साधारणपणे २२ टक्के आहे, त्यातील ९० टक्के युवा हे हमखास मतदान करणारे आहेत. केवळ मतदानच नव्हे, तर त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जाणिवा अतिशय प्रगल्भ आहेत. कोणताही नेता अथवा पक्षाचे आंधळेपणाने समर्थन ते करीत नाहीत, प्रत्येक घटनेमागील कारण समजून घेऊन आपली मते बनविण्याकडे त्यांचा कल असतो. तर अशा युवा मतदारांपैकी बहुसंख्य मतदारांनी २०१४ साली पहिल्यांदा मतदान केले आणि त्यातील जवळपास ९० टक्के युवकांनी भाजपला मतदान केले. त्यानंतर पाच वर्षांचा कारभार पाहून त्यांनी पुन्हा 2019 भाजपला मतदान केले. मात्र, आता २०२४ साली ते भाजपलाच हमखास मतदान करतील असे नाही. त्यातील अनेक युवा कदाचित अन्य पक्षालाही मत देतील.
 
 
 
भाजपकडून अन्य पक्षाकडे ते गेल्यास त्याचे प्रमुख कारण कदाचित सलग दहा वर्षांचे सरकार हेही असू शकेल. कारण, या तरुणांनी २०१४ पासून म्हणजे राजकीय जाणिवांच्या विकासाच्या टप्प्यामध्ये केवळ भाजपचेच सरकार पाहिले,” असे या नेत्याने सांगितले. “त्यांना चांगली-वाईट अशी भाजपविषयीच अधिक माहिती असणेही स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांच्याशी विविध प्रकारे प्रामुख्याने त्यांच्या ‘युथफूल’ भाषेत संवाद साधण्याचे धोरण सध्या भाजप राबवित आहे. ज्यावेळी या युवकांना संस्थानांचे विलीनीकरण कोणी केले, १९६२च्या युद्धात देशाच्या पराभवाची कारणे काय, त्यासाठी जबाबदार कोण, १९७५ साली आणीबाणी लादल्यावर काय झाले होते, ‘बोफोर्स घोटाळा’ काय होता आणि एकाच कुटुंबाने देशावर आपले वर्चस्व लादण्याचा कसा प्रयत्न केला हे लक्षात येईल; त्यावेळी त्यांना अन्य पक्ष आणि भाजप यातील फरक लक्षात येईल. त्यामुळे आता देशातील २२ टक्के तरुणाईसोबत त्यांच्याच भाषेत संवाद साधण्यास भाजपने संघटनस्तरावर काम सुरू केले आहे. त्यामध्ये आम्हाला सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत, त्यामुळे २०२४ साली सलग तिसर्‍यांदा भाजपचे सरकार येण्यामध्ये तरुणाई मोठी भूमिका बजावेल,” असा विश्वासही या संघटक नेत्याने व्यक्त केला आहे.
 
 
 
मतदारांपासून तुटण्याची विरोधकांनाच घाई!
 
 
 
एकीकडे भाजप २०२४चे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून युवावर्गास आपल्याकडे खेचण्याच्या तयारीत असताना, आपले आहेत ते मतदार कसे दुरावतील, याकडे विरोधी पक्षांचे विशेष लक्ष आहे. नुकत्याच संपलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी जो धुमाकूळ घातला तो अभूतपूर्व होता. सलग २० दिवस लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज वेठीस धरण्याचे काम विरोधी पक्षांनी केले. यामुळे संसदेचे कामकाज मोठ्या प्रमाणावर बाधित झाले.
 
 
कामकाज बाधित करणे, सरकारच्या धोरणांना विरोध करणे हा विरोधी पक्षांचा अधिकारच आहे. मात्र, त्यासाठी गदारोळ अथवा राडेबाजी करणे, हाच एकमेव मार्ग नाही. संसदेमध्ये प्रश्न विचारून, विविध मुद्दे मांडूनही सरकारला घेरता येते. देशातील अनेक नेत्यांनी तसे सिद्धही करून दाखविले आहे. मात्र, सध्याचा विरोधी पक्ष हा पूर्णपणे गोंधळलेला आणि नैराश्यात असल्याने चर्चा करून सरकारला कोंडीत पकडण्याची कुवतच त्यांच्यात राहिलेली नाही. त्यामुळे मंत्र्यांच्या हातातील कागद फेकणे, महिला मार्शलला जखमी करणे, टेबलवर चढून फेकाफेकी करणे, असे अश्लाघ्य प्रकार त्यांनी केले. यामध्ये महाराष्ट्राला काहीतरी वैचारिक संचित वगैरे दिल्याचा आव आणणारे एक ज्येष्ठ संपादक खासदारही आघाडीवर असल्याचे आता सर्वांनी बघितले आहे.
हा सर्व प्रकार देशातील जनता आणि युवा मतदारांनीही बघितला आहे. एकीकडे ‘संसदीय परंपरांचे पालन करा,’ असे सांगणारे पंतप्रधानही त्यांनी बघितले आहेत आणि संसदेत गदारोळ घालून त्या परंपरा पायदळी तुडविणारे विरोधकही त्यांनी पाहिले आहेत. पुढे मतदान करताना या सर्व बारीकसारीक गोष्टींचा ते विचार करणार, यात कोणतीही शंका नाही. या सर्व प्रकारामुळे विरोधक आपला उरलासुरला जनाधारही गमावतील आणि राजकीय अस्तित्वच गमावून बसतील, अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता सर्वाधिक आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@