कष्ट आणि गुणवत्तेला पर्याय नाही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Aug-2021   
Total Views |

Olympic_1  H x
 
नीरजनेसुद्धा हे दाखवून दिले की, स्वतःच्या गुणांनी मोठे होता येते. त्यासाठी आपल्या क्षमतांचा विकास करावा लागतो. खूप कष्ट करावे लागतात. त्याने खेळात आरक्षणाची कधी मागणी केली नाही की, मीराबाई चानूनेदेखील केली नाही. जो नियम खेळाला लागू आहे, तोच जीवनाच्या खेळाला लागू आहे. या खेळात यशस्वी होण्यासाठी गुणवत्तावाढ, क्षमतावाढ आणि त्यासाठी सातत्याने कष्ट करण्याची मानसिकता याला कसलाही पर्याय नाही.
 
‘टोकियो ऑलिम्पिक’ची सांगता झाली. जोपर्यंत ‘ऑलिम्पिक’चे खेळ चालू होते, तोपर्यंत भारतीय खेळाडूंच्या खेळाबद्दल पहिल्या पानावर रोज मोठ्या बातम्या असत. महिला हॉकी टीम पदक जिंकणार का? पुरुष हॉकी टीम सुवर्ण पदक मिळविणार का? नेमबाजीत आपल्याला काही पदक मिळेल का? पी. व्ही. सिंधू कोणते पदक मिळविणार? अशा चांगल्या बातम्या वाचायला मिळत होत्या. आपल्या वृत्तपत्रांची सवय संपादकीय भाष्य करून बातम्या देण्याची आहे. खासकरून राजकीय बातम्या अशा दिल्या जातात. ‘ऑलिम्पिक’ खेळाच्या संदर्भात अशा बातम्या दिल्या गेल्या नाहीत, हे आपले नशीब!
 
 
 
बातम्या देण्याची दुसरी पद्धती आहे, ती म्हणजे बातमी देताना तिला जातीय किंवा धार्मिक रंग द्यायचा. आपला देश मोठा, लोकसंख्या अफाट, भांडणे अगणित, त्यामुळे रोज कोठे ना कोठे मारामारी, खून, बलात्कार होतच असतात. असे काही घडले की, मग जातीचा शोध घेणे सुरू होते. पीडित व्यक्ती मागास जातीतील असेल, अनुसूचित जाती-जमातीतील असेल तर बातमीला किती पान्हे फुटतील, हे सांगता येत नाही आणि अशा जातींपैकी कुणी नसेल तर खून झाला किंवा बलात्कार झाला, तरी त्याची बातमी होत नाही. अशा काही अजब बातम्या टोकियो ऑलिम्पिकच्या केल्या नाहीत, हे आपले भाग्य!
 
 
 
‘टोकियो ऑलिम्पिक’मध्ये भारतीय खेळाडूंनी सात पदकांची कमाई केली आहे. ‘वेटलिफ्टिंग’मध्ये मणिपूरच्या प्रतिकूल परिस्थितीत वाढलेल्या मीराबाई चानू हिने रौप्यपदक जिंकून यंदाच्या ‘ऑलिम्पिक’मधील पदकांची मालिका सुरू केली. आसामच्या लवलीनाने मुष्टियुद्धात कांस्यपदक पटकावले. हैदराबादची फुलराणी पी. व्ही. सिंधूला यंदा कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. हरियाणाच्या रविकुमार दहियाने रौप्यपदक कमावले. पुरुष हॉकी टीमने कांस्यपदक पटकावून भारतीय हॉकीप्रेमींना आशेचा किरण दाखवला. हरियाणातील झाझर गावातील बजरंग पुनिया याने मुष्टियुद्धात कांस्यपदक मिळविले. हरियाणाच्या खांद्रा गावी राहणार्‍या शेतकरी कुटुंबातील (नीरज चोप्राने) दुर्लक्षित असलेल्या ‘भालाफेक’ या खेळात भारताला सुवर्णपदक मिळवून भारताला ‘ऑलिम्पिक’कडे पाहण्याची सुवर्णदृष्टी बहाल केली. या सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांची पदक कमाई जेवढी मोठी आहे, त्याहूनही मोठी त्यांची राष्ट्रीय भावना जागविण्याची कमाई आहे. कोण कुठला खेळाडू असतो, त्याचे नावही आपल्याला प्रथमच समजते. पण, त्याने पदक जिंकल्यानंतर तो सर्व भारतीयांच्या घरात जातो. आपला देशबंधू/भगिनी म्हणून तिचा किंवा त्याचा आपल्याला मोठा अभिमान वाटू लागतो. रोज जाती आणि राजकीय चिखलात लोळणारे आपण काही क्षणापुरता आपापले पक्ष विसरून, आपापल्या जाती विसरून आम्ही सर्व भारतीय आहोत, याची अनुभूती घेत राहतो. या सर्व खेळाडूंचे हे कार्य खरोखरच अफाट आहे.
 
 
 
मणिपूरच्या मीराबाई चानू हिने ४९ (किलो)ग्रॅम भारवर्गात २०२ किलो वजन उचलून भारताला पहिले रौप्यपदक प्राप्त करून दिले. सर्व भारत आनंदित झाला. मीराबाई हे नाव तसे भारतीयांना अपरिचित नाही. आपल्या भजनाने मीरा घरोघर पोहोचलेली आहे. ‘वेटलिफ्टिंग’मध्ये रौप्यपदक प्राप्त करून मीराबाई चानू घरोघर पोहोचली. एका सामान्य परिवारात तिचा जन्म झाला आणि बालपणापासून तिला ‘वेटलिफ्टिंग’ची आवड निर्माण झाली. त्यासंबंधीचे तिने प्रशिक्षण घेतले. तिच्या घरापासून इंफालचे प्रशिक्षण केंद्र २५ किलोमीटर दूर होते. रोज सरावासाठी तिला इंफाळ येथे जावे लागे. स्वतःचे खासगी वाहन नव्हते. सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था बेभरोशाची होती. त्या रस्त्यावरून वाळूचे ट्रक जात. या ट्रक ड्रायव्हर्सनी मीराबाईला इंफाळ येथील प्रशिक्षण केंद्रावर सोडायला सुरुवात केली.
 
 
ट्रक ड्रायव्हरबरोबर एकट्या मुलीने प्रवास करणे धोकादायक असते. परंतु, तिला घेऊन जाणारे सर्व ट्रक ड्रायव्हर देवदूतच निघाले, असे म्हणावे लागेल. घरापासून इंफाळपर्यंत जाण्यासाठी अन्य वाहन नाही, म्हणून मीराबाई हातपाय गाळून बसली नाही. अन्य ठिकाणी मदतीची याचना करीत बसली नाही किंवा स्वजातीचे कार्ड पुढे करून सवलती मागण्याचा तिने कधी विचार केला नाही. आपल्याला आपल्या कर्तृत्वावर मोठे व्हायचे आहे. आपल्याला आपले कर्तृत्व सिद्ध करायचे आहे आणि त्यासाठी जे कष्ट करायचे आहेत, त्याची सिद्धता तिने ठेवली. सर्वांपुढे एक आदर्श ठेवला की, आयुष्यात विकास करायचा असेल तर कष्टाला पर्याय नाही, गुणवत्तावाढीला आणि क्षमतांच्या विकासाला पर्याय नाही. बाकी सर्व गोष्टी कृत्रिम आहेत, त्या व्यक्तीला पंगू करतात.
 
 
पदक मिळाल्यानंतर मीराबाई आपल्या गावी आली. तिने, तिला मदत करणार्‍या ट्रक ड्रायव्हर्स आणि क्लीनर्स अशा १५० जणांना घरी भोजनास बोलाविले. प्रत्येकाला एक शर्ट आणि मणिपुरी दुप्पटा देऊन तिने त्यांचा सन्मान केला. एका ट्रक ड्रायव्हरला वाकून नमस्कार करतानाचा फोटो खूपच व्हायरल झाला. यावर ‘महिंद्रा’ कंपनीचे आनंद महिंद्रा म्हणतात, “मीराबाई चानू यांचा हा विनम्रपणा त्यांना खर्‍या अर्थाने ‘गोल्ड मेडलिस्ट’ बनविणारा आहे. त्यांनी चरणस्पर्श करताना पाहून माझे डोळे पाणावले. आपल्या देशातील अतिशय सुंदर भावातील चरणस्पर्श हा एक भाव आहे.”
 
 
 
जगरहाटी अशी आहे की, ‘गरज सरो आणि वैद्य मरो.’ अनेकांचे हे अनुभव आहेत की, अडचणीत ज्याला मदत करावी, तो परिस्थिती सुधारल्यावर तोंडही दाखवित नाही. स्वतःचा स्वार्थ साधला की झाले, अशी अनेकांची स्थिती असते. मीराबाई त्याला अपवाद ठरली. आपल्या जीवनमूल्यांचे दर्शन तिने आपल्या वागणुकीतून केले. म्हणून या मीरेचा प्रत्येकाला अभिमान वाटतो.
 
 
भारताला पहिले सुवर्णपदक नीरज चोप्रा याने मिळवून दिले. नीरज चोप्रा याने ८७.५८ मीटर दूर भालाफेक करून विक्रमी नोंद केली. ‘ऑलिम्पिक’मध्ये भारताला मिळालेले हे एकमेव सुवर्णपदक आहे. नीरजचे नावदेखील घरोघर झाले आहे. आपल्या देशात क्रिकेट खेळाला अवाजवी महत्त्व दिले गेल्यामुळे अन्य खेळ असतात आणि त्यात प्रावीण्य संपादित करायचे असते, याकडे कुणी लक्ष देत नाही. यामुळे ‘ऑलिम्पिक’सारख्या खेळात भारताची पदक मालिका अतिशय कमी असते. अमेरिकेने या ‘ऑलिम्पिक’मध्ये ११३ पदके मिळविली आहेत. कारण, तिथे सर्व खेळांना सारखे महत्त्व दिले जाते. क्रिकेट कुणी खेळत नाही.
 
 
 
सामान्य शेतकरी कुटुंबात नीरजचा जन्म झाला. हरियाणातील खांद्रा गावात तो लहानाचा मोठा झाला. वयाच्या अकराव्या वर्षापासून त्याला ‘भालाफेक’ या खेळाची आवड निर्माण झाली. या खेळात त्याने प्रावीण्य संपादन केले. २०१८च्या ‘एशियन गेम्स’मध्ये त्याने सुवर्णपदक मिळविले. त्याला ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ प्राप्त झाला. २०१६च्या ‘यु-२०’ जागतिक स्पर्धेतदेखील त्याला पदक मिळाले. अशा प्रकारे ‘ऑलिम्पिक’च्या पदकापूर्वीच त्याने अनेक पदके प्राप्त केली होती. तरीदेखील त्याचे नाव सर्वतोमुखी झाले नव्हते. क्रिकेटमधील एका खेळाडूने एक सिक्सर मारला तरी तो घरोघर चर्चेचा विषय होतो. आपणही आपल्या सर्व खेळाडूंचे कौतुक करायला शिकले पाहिजे.
 
 
 
मीराबाई चानूची जात अजूनपर्यंत तरी कुणी काढली नाही. परंतु, नीरज चोप्राची जात काढायला पुरोगामी महाराष्ट्रच धावला. तो मराठा असल्याचे वृत्त प्रसारित झाले. पानिपतच्या तिसर्‍या युद्धानंतर हरियाणात मराठे राहिले. त्या परिवारातील नीरज चोप्रा आहे, याचा शोध लावला गेला. त्याचे मराठी अडनाव ‘चोपडे’ शोधून काढण्यात आले. अनेक राजकारण्यांनी तो मराठा असल्याचा आनंद आणि अभिमान व्यक्त केला. आपल्या घरातील मुलगा नापास झाला. पण, शेजारील घरातील मुलगा ‘फर्स्ट क्लास फर्स्ट’ आला, त्याबद्दल जर नापास घरातील बाप पेढे वाटू लागला, तर त्याला आपण काय म्हणणार? महाराष्ट्रातील मराठा ‘ऑलिम्पिक’मध्ये का नाही, याची खंत व्यक्त करा आणि पुढील ‘ऑलिम्पिक’मध्ये महाराष्ट्रातील मराठी माणूस एक नाही तर दहा पदके कशी आणतील, याचा विचार केला पाहिजे. नीरज चोप्राच्या यशाचे श्रेय आपण मराठा म्हणून लाटण्याचे कारण नाही, ते हरियाणाचे आहे.
 
 
 
नीरजनेसुद्धा हे दाखवून दिले की, स्वतःच्या गुणांनी मोठे होता येते. त्यासाठी आपल्या क्षमतांचा विकास करावा लागतो. खूप कष्ट करावे लागतात. त्याने खेळात आरक्षणाची कधी मागणी केली नाही की, मीराबाई चानूनेदेखील केली नाही. जो नियम खेळाला लागू आहे, तोच जीवनाच्या खेळाला लागू आहे. या खेळात यशस्वी होण्यासाठी गुणवत्तावाढ, क्षमतावाढ आणि त्यासाठी सातत्याने कष्ट करण्याची मानसिकता याला कसलाही पर्याय नाही. ‘ऑलिम्पिक’मधील आपण मिळविलेली सगळी पदके हाच संदेश देत आहेत, असे मला वाटते.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@