पालघर साधू हत्याकांड: मुख्य आरोपींचा शोध अद्याप नाहीच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

palghar_1  H x


आणखी १४ जणांची सुटका; आत्तापर्यंत एकूण २०८ आरोपींची जामिनावर मुक्तता


मुंबई, दि. ८ :
पालघरसह संपूर्ण देशभरात खळबळ माजविणार्‍या गंडचिंचले येथील साधू हत्याकांड प्रकरणाला वर्षभरापेक्षा अधिक कालावधी लोटल्यानंतरही याप्रकरणाचा तपास करणार्‍या यंत्रणांना मुख्य आरोपींचा शोध घेण्यात अपयश आल्याचा आरोप होत आहे.

या प्रकरणात राज्यातील सत्ताभागीदारी पक्षाच्याच कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा आरोप सुरुवातीपासूनच होत आहे. मात्र ज्या सत्ताभागीदारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा यात सहभाग असल्याचा आरोप आहे, त्याच पक्षाकडे राज्याच्या गृहखात्याचा कारभारदेखील आहे. गृहखात्याचे नियंत्रण असणारे राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) या प्रकरणाचा तपास करत आहे. त्यामुळे तपास यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. आत्तापर्यंत याप्रकरणातील शेकडो आरोपी जामिनावर मुक्त झाले असून याप्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापपर्यंत मोकाटच आहेत. त्यांचा शोध घेण्यात तपास यंत्रणांना अद्याप यश आलेले नाही. म्हणूनच याप्रकरणाची चौकशी ‘सीआयडी’ऐवजी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्यात यावी अशी आमची आधीपासूनची मागणी असल्याचा पुनरुच्चार भाजपचे पालघर जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी गुरुवार, दि. 8 जुलै रोजी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना केला.


गडचिंचले येथे झालेल्या साधू हत्याकांड प्रकरणातील आणखी १४ जणांचा जमीन नुकताच मंजूर करण्यात आला. ठाणे अतिरिक्त सत्र न्यायालयाने याबाबतचा आदेश दिला. आत्तापर्यंत एकूण २०८ जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे साधूंना न्याय मिळवून देण्याऐवजी राज्यातील सत्ताधारी सरकारकडून मुख्य आरोपींना पाठीशी घालण्याचे काम होत असल्याचा घणाघात जनाठे यांनी केला.

ते पुढे म्हणाले, “इतक्या मोठ्या प्रमाणात अनेकांची जामिनावर मुक्तता होण्याचे कारण म्हणजे तपास यंत्रणांनी जे आरोपी नव्हते त्यांनाच पकडले होते. जे याप्रकरणात मुख्य आरोपी आहेत त्यांना कधी पकडलेच नाही. त्यांनी मुख्य आरोपींना पकडले पाहिजे. सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्यानेच त्यांना पकडण्यात टाळाटाळ करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यात शामिल आहेत. राष्ट्रवादीच्या हातात सत्ता आहे. राज्याचे गृहमंत्री पद त्यांच्याकडे आहे. त्यामुळे तपास यंत्रणांवर राष्ट्रवादीचे नियंत्रण आहे. म्हणून ते मुख्य आरोपींना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना वाचवण्याचे काम करत आहेत,” असा आरोपही जनाठे यांनी केला आहे.

१६ एप्रिल २०२० रोजी या प्रकरणात जुना आखाड्याचे साधू चिकणे महाराज कल्पवृक्षागिरी (७०), सुशीलगिरी महाराज (३५) आणि त्यांच्यासोबत असलेला चालक निलेश तेलंगडे हे आपले गुरु महंत रामगिरी यांच्या अंत्ययात्रेत सामील होण्यासाठी सुरतकडे जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी त्यांची गाडी पालघरमधील गडचिंचले या गावातून जात असताना वनविभागाच्या तपासणी नाक्यावर अडविण्यात आली होती. गडचिंचले गावातील जमावाने त्यांना रोखून अमानुषपणे मारहाण केली. घटनास्थळी पोलिस आल्यानंतरही दोन्ही साधू व त्यांचे चालक अशा तिघांचीही निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटल्यानंतर पालघर जिल्ह्याचे तत्कालीन पोलिस अधिक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. तर कासा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद काळेंसह ५ अंमलदारांना निलंबित करुन जवळपास ४० पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने २१ एप्रिल रोजी २०२० रोजी या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविला होता. सीआयडीने १५ जुलै २०२० रोजी संबंधित २ गुन्ह्यांचा तपास पूर्ण करुन, गुन्हा घडल्यानंतर ३ महिने मुदतीत न्यायालयासमोर आरोपपत्र सादर केल होतेे.

याप्रकरणी, ठाणे जिल्हा मॉब लिचिंग विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.पी. जाधव यांनी नुकताच ४७ आरोपींचा १५ हजाराच्या जातमुचलक्यावर जामिन मंजूर केला. यावेळी सुनावणीदरम्यान न्यायालयात आरोपींच्यावतीने अ‍ॅड.अमृत अधिकारी आणि अतुल पाटील यांनी न्यायालयात युक्तीवाद केला. पोलिसांनी निरपराध लोकांना अटक केली. त्यांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेले होते तेव्हा त्यांची जामिनावर सुटका करावी,असा युक्तीवाद करण्यात आला. तर विशेष न्यायालयाने यापूर्वीच याच प्रकरणातील तब्बल ३६ आरोपीना जामीन नाकारला. कारण सदर ३६ आरोपींचा गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचे तपासात आढळल्याने न्यायालयाने त्यांचा जामीन नाकारला. या प्रकरणात तीन स्वतंत्र गुन्हे १६ एप्रिल, २०२०रोजी दाखल केले.

@@AUTHORINFO_V1@@