हल्ल्यासाठी आता पाकिस्तानकडून ‘ड्रोन’चा वाढता वापर - ब्रिगे. (निवृत्त) हेमंत महाजन

    05-Jul-2021
Total Views |

hemant mahajan_1 &nb

मुंबई : ‘आयएसआय’ या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेने ‘ड्रोन’च्या साहाय्याने ‘एके - ४७’ रायफल्स, स्फोटके, अमली पदार्थ आणि बनावट नोटाही भारतात पाठविल्या आहेत. पंजाबातील खलिस्तानी दहशतवाद्यांना ‘ड्रोन्स’द्वारे शस्त्रपुरवठाही केला जात आहे. काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये महत्त्वाच्या विकास कामांमधील वाढ, राजकीय चर्चा, पर्यटनामधील सकारात्मकता यामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. त्यातूनच नाराज झालेल्या पाकिस्तानने काश्मीरमध्ये हिंसाचारालाही प्रोत्साहन दिले आहे, असे सांगत ड्रोन हल्ल्यांबाबत व ‘ड्रोन’च्या पाकिस्तानकडून वाढता वापर होत आहे, अशी माहिती ब्रिगे. (निवृत्त) हेमंत महाजन यांनी रविवार, दि. ४ जुलै रोजी दिली.


स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या रविवारी झालेल्या ‘ऑनलाईन’ व्याख्यानामध्ये ते बोलत होते. ‘स्ट्रॅटेजिक सेंटर’चे मानद संचालक असलेले ब्रिगे. (निवृत्त) महाजन यांनी यावेळी अलीकडेच झालेल्या ‘ड्रोन’ हल्ल्याबाबत तपशीलवार माहिती दिली. तसेच गेल्या काही काळात झालेल्या भारतीय जवानांच्या हौतात्म्याबाबतही माहिती देत त्यांना सलाम केला.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, “काश्मीरमध्ये भारतीय ‘ऑल क्लिअर हे ऑपरेशन लष्कराने सुरू केले आहे. अजूनही तेथे दोनशे- अडीचशे दहशतवादी आहेत, त्यांना संपवण्यासाठी ही कारवाई सुरू केली गेली आहे. परदेशी दहशतवाद्यांच्या संख्येत घट झाली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये वा बलुचिस्तानसारख्या भागात वा अन्य वझिरीस्तान आदी पाकिस्तानातील भागात राहाणारे दहशतवादी बनण्यास तयार नाहीत. हाफिज सईद हा लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख आहे, त्याला पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रापुढे दिखावा करण्यासाठी त्याला स्थानबद्ध केले असले, तरी त्याच्याकडून दहशतवादी कारवायाचे काम चालू आहे. मात्र ते पाकिस्तानच्या लष्कराला समाधानकारक वाटत नसल्याने आता त्याच्या घराच्या पुढेही स्फोट घडवण्यात आला आहे. त्यामागेही पाकिस्तानी लष्कर आहे, ते नाखुश असल्यानेच त्यांनी सईदविरोधात ही इशार्‍याची कारवाई केली आहे.”

ते पुढे म्हणाले की, “जम्मूतील हवाई दलाच्या तळावर २७ जून या दिवशी पहाटेच्या सुमारास दोन कमी तीव्रतेचे स्फोट झाले. हा दहशतवादी हल्ला ‘ड्रोन’ने करण्यात आला होता व हे ‘ड्रोन’ पाकिस्तानातून आले होते. देशात पहिल्यांदाच ‘ड्रोन’द्वारे हल्ला झाला आहे. तपासाची सूत्रे ‘एनआयए’कडे देण्यात आली आहेत. ‘जम्मू एअरफोर्स स्टेशन’च्या ‘टेक्निकल एरिया’जवळ स्फोट झाल्यामुळे दोन हवाईदलाच्या जवानांना किरकोळ जखमी व्हावे लागले. पाच मिनिटांच्या फरकाने दोन स्फोट झाले. पहिला स्फोट कॅम्पस इमारतीच्या छतावर आणि दुसरा त्या खाली झाला. हा स्फोट क्षेत्रात उभ्या असलेल्या विमानांना बरबाद करण्याकरिता होता. स्फोटके ‘ड्रोन’मधून खाली टाकण्यात आली होती.