‘ऑपरेशन बार्बारोझा’चा ऐंशीवा स्मृतिदिन!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

operation_1  H
 
 
दि. २२ जून, १९४१ या दिवशी पहाटे ठीक ३ वाजून १५ मिनिटांनी जर्मन तोफांनी रशियन फौजांनी व्यापलेल्या पोलंडच्या प्रदेशावर आग ओकायला सुरुवात केली आणि ‘ऑपरेशन बार्बारोझा’ या मोहिमेची सुरुवात झाली.
 
 
दि. १९ जून, २०२१ या दिवशी जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी एक ध्वनिचित्रफीत प्रसारित केली. या चित्राफितीमध्ये अँजेलाबाई म्हणतात, “हिटलरने रशियन, युके्रनियन, बेलोरशियन आणि बाल्टिक नागरिकांवर या दिवशी जे खुनी युद्ध लादले, त्याबद्दल आम्हाला लाज वाटते.” दि. २२ जून, २०२१ या दिवशी हिटलरच्या या भीषण आक्रमणाला ८० वर्षे पूर्ण होणार होती. त्या अगोदरच दोन दिवस जर्मनीच्या विद्यमान प्रमुख नेत्या जाहीरपणे त्या युद्धाला ‘खुनी युद्ध’ म्हणतायत आणि आपल्या देशाच्या तत्कालीन सत्ताधार्‍यांनी ते युद्ध लादल्याबद्दल शरम, दु:ख व्यक्त करतायत, हे दृश्य अवघ्या जगाने पाहिलं. अँजेलाबाई पुढे म्हणतात, “या भीषण आक्रमणातून जगून-वाचून शिल्लक राहिलेले जे थोडेसे लोक आजही जीवंत आहेत, त्यांना आम्ही नम्रपणे झुकून अभिवादन करतो. या लोकांनी मागचं सगळं विसरून आमच्याशी पुन्हा जुळवून घेतलं, पुन्हा हातमिळवणी केली, याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. आम्ही जर्मनांनी त्यांचं जे काही केलंय (म्हणजे बेछूट कत्तली केल्या आहेत) ते लक्षात घेता त्यांची ही कृती (म्हणजे पुन्हा जुळवून घेण्याची) हा जवळपास चमत्कारच म्हटला पाहिजे.”
 
 
२१व्या शतकाच्या २१व्या वर्षी जर्मन राष्ट्रप्रमुख ज्या घटनेबद्दल नि:संदिग्ध शब्दांत खेद आणि शरम व्यक्त करतायत, त्या घटनेची पार्श्वभूमी १०० वर्षांपूर्वीची आहे. १९१८ साली पहिलं महायुद्ध जर्मनीच्या पराभवाने संपलं. अँग्लो-फ्रान्स-अमेरिका ही विजेती राष्ट्र तहाचा मसुदा ठरवायला बसली. व्यवहारातला एक साधा अनुभव आहे की, एखाद्या मांजराला तुम्ही पार भिंतीपर्यंत रेटत नेलंत, त्याला पळायला जागाच ठेवली नाहीत, तर अखेर ते पलटून उडी मारून तुमची नरडी पकडणार, तेव्हा एक तर त्याला ठार मारा किंवा सणसणीत तडाखे देतानाच निसटून जायला फट ठेवा, म्हणजे मग ते पुन्हा तुमच्या वाटेला जाणार नाही. हाच नियम राजकारणातही लागू असतो. अँग्लो-फ्रेंच-अमेरिकन राजनेते हा नियम विसरले. विशेषतः फे्ंरचांनी तर जर्मनीची अतोनात मानहानी करणार्‍या अनेक अटी तहाच्या करारात सूडबुद्धीने घातल्या. जून १९१९ मध्ये झालेल्या या ‘व्हर्सायच्या तहा’ने जर्मन राष्ट्राला जगणेच मुश्कील करून टाकले. जर्मनीची अस्मिता एक राष्ट्र म्हणून भलतीच प्रखर होती. हिटलरने ती अस्मिता फुंकरा मारून पुन्हा चेतवली. मात्र, त्याने या अस्मितेला एक अत्यंत विकृत आणि घातक वळण दिलं. जर्मन लोक हे ‘नॉर्डिक’ किंवा ‘आर्यन’ या जगातल्या एकमेव शुद्ध वंशाचे लोक असून, ते जगावर राज्य करण्यासाठीच जन्माला आले आहेत, असा सिद्धान्त त्याने मांडला. यात जर्मनीच्या पश्चिमेकडील देशांबाबत म्हणजे फ्रान्स किंवा इंग्लंडबद्दल तो थोडा तरी सौम्य होता. पण, पूर्व युरोपातले देश आणि रशिया यांना तर तो माणूस म्हणायलाही तयार नव्हता. पूर्व युरोपीय देश आणि रशियन लोक ‘स्लाव्ह’ या वांशिक गटाचे आहेत, स्लाव्ह लोक अर्धमानव आहेत आणि त्यात पुन्हा तिथले ज्यू आणि बोल्शेव्हिक लोक (म्हणजे रशियातले सत्ताधारी बोल्शेव्हिक गटाचे साम्यवादी) हे तर पूर्णपणे पशूच आहेत. म्हणून हे स्लाव्ह, हे ज्यू, हे बोल्शेव्हिक, हे आशियाई लोक यांचा संपूर्ण निकाल लावून पश्चिम रशिया साफ करणं, तिथं जर्मन नागरिकांच्या वसाहती करणं ही हिटलरची भव्य महत्त्वाकांक्षा होती. हे तो उघडपणे बोलतही असे. एवढंच नव्हे, तर ‘माईन काम्फ’ या आपल्या पुस्तकात हे तत्त्वज्ञान त्याने लेखी मांडलेलं आहे.
 
 
 
आता जगाच्या रंगमंचावर एकाच वेळी कसे गंमतीदार प्रवेश रंगात असतात पाहा हं! १९१९च्या ‘व्हर्सायच्या तहा’ने जर्मनीला खच्चीच करून टाकलं होतं. तिकडे रशियात लेनिनने १९१७ मध्ये साम्यवादी क्रांती करून सत्ता हडपली. पण, खुद्द झार, झारनिष्ठ नेते आणि अन्य प्रतिस्पर्धी यांना ठार मारून राज्य स्थिरस्थावर करायला त्याला १९२०-२१ साल उजाडलं. आता जर्मनी आणि सोव्हिएत रशिया यांची एकंदर स्थिती जवळपास सारखीच होती. शेती, कारखानदारी, उद्योगधंदे, वाहतूक व्यवस्था, सैन्य सर्वांचीच पुनर्रचना करण्याची निकड होती. जर्मनीला तर फक्त एक लाख एवढंच सैन्य ठेवण्याची मुभा होती आणि जगात त्यांना कुणीही मित्र नव्हता. साहजिकच समान अवस्थेतले हे दोघे देश जवळ आले. जर्मनीजवळ तज्ज्ञ प्रशिक्षित इंजिनिअर्स होते, तर रशियाजवळ अफाट जमीन आणि स्वस्त मजूर होते. त्यामुळे असंख्य औद्योगिक आणि सैनिकी प्रकल्प सोव्हिएत रशियन भूमीवर उभे राहिले. १९२१ ते १९३३ या १२ वर्षांत अनेक जर्मन अधिकार्‍यांनी रशियन लष्करी महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण घेतलं, यातली मोठी नावं म्हणजे हान्झ गुडेरियन, एरिक मानस्टाईन, विल्हेल्म कायटेल आणि वॉल्टर र्मोडेल. दुसर्‍या महायुद्धात हे सर्व अधिकारी जनरलच्या हुद्यापर्यंत पोहोचले होते. तसंच पुढे युद्धात नावारूपाला आलेल्या जर्मनीच्या ‘पॅन्झर’ या वेगवान रणगाड्याचे पहिले आराखडे रशियात बनले होते. म्हणजे डोकं जर्मन इंजिनिअर्सचं आणि हात रशियन कामगारांचे असा एक मामला होता. पण, रशियन्स तेवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी जर्मनांकडून सगळ्याच यांत्रिकी आधुनिक गोष्टींचं तंत्र आणि मंत्र दोन्ही आत्मसात केलं.
 
 
 
१९३३ साली जर्मनीत हिटलर चॅन्सलर झाला आणि त्याच्या ‘राष्ट्रीय समाजवादी’ उर्फ ‘नाझी’ या पक्षाच्या वंशश्रेष्ठत्वाच्या विशिष्ट तत्त्वज्ञानामुळे रशिया आणि जर्मनी यांच्या १२ वर्षांच्या मैत्रीत वितुष्ट आलं. पण, तरीही ते लगेच शत्रू झाले, असं घडलं नाही. १९३३ ते १९३९ पर्यंत हिटलरची पावलं पश्चिम युरोप गिळंकृत करण्याच्या दिशेनेच पडत होती. दि. १ सप्टेंबर, १९३९ या दिवशी जर्मन सेना पोलंडमध्ये घुसल्या आणि त्यांनी पोलंड पादाक्रांत केला. आता पोलंड आणि रशियाची सरहद्द एकमेकीला भिडून नि पोलंडवर स्टॅलिनचा कधीपासून डोळा ; त्यामुळे पोलंडवरून हिटलर आणि स्टॅलिनची झक्कड लागणार. परिणामी, पश्चिम युरोपवरचा जर्मन रेटा कमी होणार अशा आशेवर इंग्लंड असताना हिटलरने त्यांना धक्का दिला. अर्धा पोलंड खुशीने रशियाला देऊन हिटलरने ऑगस्ट १९३९ मध्ये केलेला ‘मोलोटोव्ह- रिबेनट्रॉप’ मैत्री करार पाळला. इतकंच नव्हे, तर स्लाव्ह वंशीय लोकांबद्दल वाटणारा तिरस्कार वगैरे बाजूला ठेवून स्टॅलिनला इंग्लंड विरुद्ध आपल्याबरोबर युद्धात उतरण्याचा खूप आग्रह केला. स्टॅलिनने काहीच उत्तर दिलं नाही.
 
 
सप्टेंबर १९३९ ते डिसेंबर १९४० या सव्वा वर्षाच्या काळात एक इंग्लंड वगळता संपूर्ण युरोप खंड हिटलरच्या पायाशी लोळण घेऊ लागला. मग हिटलर आपल्या भव्य महत्त्वाकांक्षेकडे वळला. स्लाव्ह वंश आणि स्लाव्ह वंशीय देशामधल्या ज्यू वंशीय लोकांचा समूळ नायनाट करायचा आणि त्या ‘स्वच्छ’ केलेल्या भूमीवर जर्मन वंशीय लोकांची वसाहत करायची. जानेवारी १९४१ पासूनच हिटलर रशियावरच्या भव्य मोहिमेच्या पूर्वतयारीला लागला. नव्या संशोधनानुसार त्याने जुलै १९४० पासूनच या पूर्वतयारीला सुरुवात केली होती.
 
 
दि. २२ जून, १९४१ या दिवशी पहाटे ठीक ३ वाजून १५ मिनिटांनी जर्मन तोफांनी रशियन फौजांनी व्यापलेल्या पोलंडच्या प्रदेशावर आग ओकायला सुरुवात केली आणि ‘ऑपरेशन बार्बारोझा’ या मोहिमेची सुरुवात झाली. जर्मनी आणि रशिया यांच्यातील तब्बल दोन हजार ९०० किमी लांबीच्या सरहद्दीवरून ३० लाख ८० हजार जर्मन सेना रशियन प्रदेशात घुसली. या विशाल सेनेच्या दिमतीला साडेतीन हजार रणगाडे, तीन हजार चिलखती वाहनं, पाच हजार ३०० विमानं, २३ हजार ४०० (भारी) तोफा, १७ हजार मॉर्टर तोफा, सहा लाख साधी वाहनं आणि पिछाडीवरील कामांसाठी सहा लाख घोडे, एवढी प्रचंड युद्धसामग्री होती. जगाच्या तोपर्यंतच्या ज्ञात इतिहासात, एकाच वेळी ३० लाख ८० हजार सैनिक शत्रूप्रदेशावर आक्रमण करून गेल्याचं उदाहरण नव्हतं आणि आज त्यानंतर अजून तरी घडलेलं नाही.
 
 
आता एवढ्या भीषण युद्धाला तोंड लागल्यावर त्यात भरपूर माणसं मरणार, दोन्हीकडची मरणार, सैनिकांप्रमाणेच युद्ध जिथे होणार तिथले निरपराध नागरिकही फुकट मरणार, हे ओघानेच आलं. त्याबद्दल वाईट वाटलं, तरी ते अपरिहार्यच असतं. पण, आक्रमक जर्मनांनी आपल्या वर्णश्रेष्ठत्वाच्या गंडापायी लाखो बिनलढाऊ ज्यू लोक, लाखो बिनलढाऊ स्लाव्ह वंशीय नागरिक आणि हजारो युद्धकैदी यांना कोंबड्या-बकर्‍यांप्रमाणे गोळ्या घालून ठार केलं. अनेक गावं, शहरं यांतील बिनलढाऊ नागरिकांना उपाशी ठेवून, भुकेने, तहानेने तडफडून मरायला लावलं. कारण, त्यांच्या मते ज्यू आणि स्लाव्ह वंशाचे लोक ही माणसं नव्हतीच मुळी. ते पशू होते. त्यांना जनावरांप्रमाणे मारायलाच हवं होतं.
 
 
‘ऑपरेशन बार्बारोझा’ ही मोहीम २२ जून, १९४१ ते ५ डिसेंबर, १९४१ अशी पाच महिने चालू होती. यात जर्मनीने दहा लाख सैनिक गमावले, तर रशियाने ४९ लाख ७३ हजार सैनिक गमावले. ही झाली युद्धातली प्राणहानी. पण, जर्मन सैन्याने जनावरांप्रमाणे मारलेल्या आणि भुकेने मेलेल्या लोकांची संख्या किती होेती? १४ लाख ज्यू वंशीय आणि एक कोटी ८० लाख स्लाव्ह वंशीय. यांपैकी एका लेनिनग्राड शहरातच दहा लाख लोक ठार झाले नि त्यात चार लाख तर मुलं होती. ज्यू आणि स्लाव्ह लोकांना ठार मारून पश्चिम रशिया ‘स्वच्छ’ करण्याच्या या राक्षसी प्रयोगात रशियन भूमीवरची ७० हजार खेडी आणि एक हजार ७०० मध्यम आकाराची गावं नकाशातूनच नव्हे, तर पृथ्वीच्या पाठीवरून कायमची नष्ट झाली. वर्णश्रेष्ठत्वाचा भयानक गंड आणि त्याने घडवलेला हा भीषण उत्पात यांना कालच्या जून महिन्यात, फार नाही, फक्त ८० वर्षे पूर्ण झाली.
 
 
@@AUTHORINFO_V1@@