‘एमपीएससी’ आणि वास्तव

    13-Jul-2021
Total Views |

mpsc_1  H x W:
‘एमपीएससी’ अर्थात ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग.’ महाराष्ट्र सरकार घेत असलेली सर्वात मोठी परीक्षा. पण, सध्या ही परीक्षा उत्तीर्ण होऊनही कित्येक उमेदवारांना सरकारी सेवेत नियुक्ती मिळालेली नाही. त्यातच स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आला. तेव्हा यानिमित्ताने ‘एमपीएससी’चे वास्तव मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...

‘एमपीएससी’चे वास्तव समजून घेताना पुढील काही मुद्द्यांचा प्रकर्षाने विचार करावाच लागेल. यामध्ये सर्वप्रथम ‘एमपीएससी’कडे वाढणारा विद्यार्थ्यांचा कल, ‘एमपीएससी’ करताना उद्भवणार्‍या अडचणी, परीक्षा पद्धती, जागांच्या तुलनेत परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या, शिकवण्यांची फी, प्रत्येक महिन्याला येणारा खर्च, वाढणारे वय आणि तसतशा निर्माण होणार्‍या आर्थिक-सामाजिक समस्या यांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते.

‘एमपीएससी’कडे विद्यार्थी वर्ग का ओढला गेला?

सरकारी नोकरीची स्वप्नं पाहणे आणि ती सत्यात उतरवणे, हा प्रत्येकाचाच अधिकार. तसेच या स्वप्नांचा पाठलाग करण्याची जिद्द जोपासणे यातही काहीच गैर नाही. पण, त्या स्वप्नांच्या पाठीमागे धावता धावता आपली वाट तर लागणार नाही ना, याचाही आता विद्यार्थ्यांनी विचार करायची वेळ आली आहे. हल्ली प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबातील पालकांना असं वाटतं की, आपला मुलगा/मुलगी चांगले शिक्षण घेऊन अधिकारी झाले पाहिजेत. तसेच बर्‍याच मुलांनाही आणि खासकरुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आपण अधिकारी व्हावं, असं वाटतं. पण, या विद्यार्थ्यांनी त्यादृष्टीने प्रयत्न करण्याबरोबरच आपल्या आयुष्यात एक ‘प्लॅन बी’ देखील नक्कीच तयार ठेवला पाहिजे.

खरंतर समाजातील सरकारी नोकरीचे आकर्षण, गावातील, जवळील नातेवाइकांमधील एखादी ओळखीची व्यक्ती अधिकारी झाली, तर त्याचा होणारा गवगवा, त्यांची मिरवणूक, चर्चा, समाजात त्या व्यक्तीला मिळणारा मानसन्मान, प्रतिष्ठा याला भुलून अनेक विद्यार्थ्यांची पावलं आपसुकच ‘एमपीएससी’कडे वळतात. यासोबतच ‘एमपीएससी’विषयी काही ज्येष्ठ अधिकार्‍यांची, या क्षेत्रातील तज्ज्ञांची प्रेरणादायी व्याख्याने ऐकूनही ‘एमपीएससी’चं खूळ अनेकांच्या डोक्यात घुसतं. काही विद्यार्थी तर आपले व्यावसायिक शिक्षण सोडून ‘एमपीएससी’चा मार्ग निवडतात. ‘एमपीएससी’कडे तसे पाहिला गेले तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जास्त कल असल्याचे दिसून येते. मोठ्या शहराबद्दल असणारं आकर्षण, अन्य क्षेत्रातील नोकर्‍यांना कमी लेखणे, अशी एक ना अनेक कारणे त्यामागे आहेत.

खरी अभ्यासाला सुरुवात होते तेव्हा...

‘दुरून डोंगर साजरे’ या म्हणीप्रमाणे ‘एमपीएससी’चा होणारा गवगवा, ‘एमपीएससी’चा आवाका, त्यासाठी करावा लागणारा प्रचंड अभ्यास, याबद्दल प्रत्यक्षात या सगळ्या प्रक्रियेत उतरल्यानंतर हळूहळू समजायला लागतं. त्यात एका वर्षातून होणारी एकच परीक्षा. म्हणजे राज्यसेवा कंबाईन गट ‘क’ परीक्षा ही वर्षातून एकदाच होते. नंतर ती परीक्षा थेट पुढच्याच वर्षी. हे सगळं हळूहळू जसा वेळ जाईल, तसं समजायला लागतं. तोपर्यंत आपण ‘एमपीएससी’ करतोय हे अख्ख्या गावाला, नातेवाइकांना समजलेलं असतं. त्यांनाही आशा लागलेली असते की, आता ‘एमपीएससी’ करणारा अमुक मुलगा अथवा मुलगी भविष्यात लवकरच चांगल्या सरकारी नोकरीला लागेल. साहजिकच घरच्यांच्या अपेक्षाही अगदी गगनाला भिडलेल्याला असतात. पण, ‘एमपीएससी’चं वास्तव इथेच तर सुरू होतं. हळूहळू एकामागून एक वर्ष सरत जातात. पण, विद्यार्थ्यांच्या हातात अभ्यास करण्यापलीकडे, प्रयत्न करण्यापलीकडे फारसं काहीच नसतं. हळूहळू राहण्या-खाण्यासाठी घरच्यांकडूनही या मुलांना पैसे मागावेसे वाटत नाहीत.
 
या सगळ्यात भरीस भर म्हणजे, सरकारची उदासीनता. आपलं सरकार काही सरकारी जागाही काढत नाही. त्यासाठी वेळेवर जाहिरातीही देत नाही. क्षमतेपेक्षा नेहमीच जागा कमी निघतात. वेळेवर परीक्षा होत नाहीत. परीक्षा झाल्याच तरी निकालही वेळेत लागत नाहीत आणि निकाल लागलेच तरी नियुक्ती मिळत नाही. नियुक्ती मिळाली तरी काही तरी तांत्रिक किंवा कायद्याच्या पेचात निकाल अडकतो. मग तेथून न्यायालयाच्या चकरा सुरू होतात. त्यामुळे ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांना अशा एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
त्याचबरोबर सामाजिक आणि आर्थिक समस्यांच्या गर्तेत ‘एमपीएससी’चे हे विद्यार्थी हकनाक अडकतात. जसा जसा वेळ जाईल, तसतशा लोकांंमध्ये, शेजार्‍यापाजार्‍यांमध्ये, नातेवाइकांमध्ये चर्चाही रंगू लागतात. काही जणं टोमणे मारू लागतात. घरच्यांना पैसे मागणेही मुश्कील होते. आपण आपलं उमेदीचं वय वाया घालवलं की काय, असं ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांना वाटायला लागतं. एवढच नव्हे तर मुला-मुलींची लग्नही रखडतात. वाढत्या वयामुळे लग्नालाही अडचणी निर्माण होतात. अशा अनेक गोष्टींना या विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागते.
 
पण, विद्यार्थ्यांनी ‘एमपीएससी’चा विचार डोक्यात असला तरी वेगवेगळ्या क्षेत्रात बर्‍याच संधी उपलब्ध आहेत, याचा अजिबात विसर पडू देऊ नये. तसं पाहिलं तर जास्ती जास्त नोकर्‍या या गट ‘क’, गट ‘ड’मधून उपलब्ध होतात. पण, या पाच वर्षांत जर अभ्यास केला, तर मोठ्या प्रमाणावर या नोकरभरतीत भ्रष्टमार्गाने विद्यार्थी भरले गेले आहेत. त्यामुळे ‘सरळसेवा’वरील विद्यार्थीवर्गाचा विश्वासच उडाला आहे. त्यामुळे विद्यार्थी हे ‘एमपीएससी’ला प्राधान्यक्रम देतात.
सरकारची उदासीनता

राज्यात सरकारी नोकरीत लाखो पदे रिक्त असताना सरकार ही पदे भरायला धजावत नाही. राज्यात जवळ जवळ अशी तीन लाख विविध सरकारी विभागात पदे रिक्त आहेत. सरकार ‘निधी नाही’ हे कारण पुढे करत ही पदे भरत नाही आणि याचा मोठा फटका या लाखो विद्यार्थ्यांना बसला आहे. त्याचबरोबर या आयोगाची सदस्य संख्या ही सहा असली पाहिजे. पण, गेल्या दोन वर्षांपासून केवळ दोनच लोकांच्या जीवावर हे काम चालू आहे आणि याचा फटका फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांनाच सहन करावा लागला आहे.
 
२०१९ साली झालेल्या ‘राज्य सेवा’ परीक्षेचा निकाल लागून आता एक वर्षाहून अधिक अवधी लोटला, तरी त्या उमेदवारांना अद्याप नियुक्ती मिळालेली नाही. ‘पोलीस उपनिरीक्षक’ या पदासाठी २०१९ साली परीक्षा झाली. पण, त्यातील मैदानी चाचणी अजून बाकी आहे. त्याचप्रकारे २०२० साली ‘मोटार वाहन निरीक्षक’ या पदासाठी पूर्व परीक्षा झाली. पण, त्या परीक्षेचा निकाल अजून प्रतिक्षेत आहे. एवढंच नव्हे तर गेल्या दोन वर्षांपासून वन, कृषी, गट ‘क’ विभागातील भरतीच्या जाहिरातीही सरकारने प्रसिद्ध केलेल्या नाहीत. अशा एक-दोन नव्हे, तर बर्‍याचशा परीक्षांचा काही ना काही गोंधळ कायम आहे.
या सगळ्या गोंधळलेल्या, अनागोदींच्या सरकारी कारभारामुळे साहजिकच विद्यार्थ्यांना नैराश्य येतं. त्यात वय वाढलेलं असतं. सामाजिक, आर्थिक समस्या तोंडासमोर आ वासून उभ्या असतात. हातात काहीच नसतं. पुन्हा घराकडे कसे जावे? घरच्यांना, गावातील लोकांना काय सांगावे? यांसारख्या प्रश्नांमध्येच हे विद्यार्थी अगदी गुरफटून गेलेले असतात. त्यामुळे मग स्वप्निल लोणकरसारखे हुशार, पण हताश विद्यार्थी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. पण, या समस्येवर आत्महत्या हा नक्कीच पर्याय नाही.


शेवटी एवढंच सांगेन...

‘एमपीएससी’साठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चढाओढ पाहायला मिळते. एक तर या सरकारी पदांसाठी जागा मुळात कमी निघतात आणि दुसरीकडे परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मात्र तुलनेने जास्त असते. यातूनच मग उमेदवारांची निवड होते. म्हणूनच प्रत्येकाला यश मिळेलच असे नाही, याची जाणीव ठेवली पाहिजे. अनेक विद्यार्थ्यांचा ‘प्लॅन बी’ ठरलेला नसतो. तो त्यांनी आवर्जून ठरवला पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे. यश मिळेल, न मिळेल. पण, अजिबात नाउमेद होऊ नका. नैराश्याला दूर ठेवा. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका. आयुष्याकडे डोळसपणे पाहायला शिका. आई-वडिलांनी आपल्याला मोठं करताना खूप खस्ता खाऊन वाढवलेलं असतं, हे सदैव ध्यानात ठेवा. टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी त्यांचाही एकदा जरुर विचार करा. या परीक्षांच्या निमित्ताने तुम्ही भरपूर अभ्यास केला आहे. या क्षेत्रात संधी नाही मिळाली तरी तुम्ही कमावलेले ज्ञान कदापि वाया जाणार नाही. तुम्ही अन्य क्षेत्रातही नक्कीच चमकू शकता! खूप काही करू शकता!!
स्वप्निल लोणकर या ‘एमपीएससी’ करणार्‍या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आणि पुन्हा एकदा ‘एमपीएससी’चा खरा चेहरा महाराष्ट्रासमोर आला. खरंतर स्वप्निल लोणकर या एकाच विद्यार्थ्याने आत्महत्या केली नसून, यापूर्वी देखील गेल्या सात-आठ महिन्यांत आठ ते नऊ विद्यार्थ्यांनी असाच आत्महत्येचा शेवटचा मार्ग पत्करला आहे. त्यामुळे स्वप्निल लोणकरची आत्महत्या नसून ही व्यवस्थेने केलेली हत्याच आहे. जर परीक्षेनंतर वेळेत मुलाखती झाल्या असत्या, तर स्वप्निलने हे टोकाचं पाऊल कधीच उचललं नसतं. त्यामुळे या घटनेला सरळ सरळ महाविकास आघाडी सरकारच सर्वस्वी जबाबदार आहे.


- महेश घरबुडे
(लेखक ‘एमपीएससी’ समन्वय समिती, महाराष्ट्रचे सदस्य आहेत.)