एका कानावर पगडी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2021   
Total Views |


rahul gandhi_1  


मराठीत एक म्हण आहे - ‘एका कानावर पगडी, घरी बाईल उघडी.’ अर्थात, बाहेर पराकोटीचा बडेजाव आणि घरात मात्र दारिद्य्र! काँग्रेसची अवस्थाही सध्या अशीच काहीशी म्हणावी लागेल. कारण, काँग्रेसचे आंतरराष्ट्रीय संघटन असलेल्या ‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस’ने नुकत्याच त्यांच्या युरोपीय देशांतील अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. पण, दुर्दैवाने हीच काँग्रेस मायदेशी पूर्ण वेळ अध्यक्ष निवडण्यास मात्र सपशेल अपयशी ठरली आहे.


२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न त्यांच्या आई-बहिणीपासून ते इतर काँग्रेस नेत्यांकडूनही सातत्याने केले गेले. पण, राहुल हैं की मानते नही! परिणामी, सोनिया गांधींकडेच पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाची धुरा आता जवळपास दोन वर्षे उलटली तरी कायम आहे. परंतु, अडचण अशी की, वाढते वय आणि आजारपणामुळे सोनिया गांधींच्याही काही मर्यादा आहेत. त्यामुळे काँग्रेसला पराभवाच्या छायेतून विजयमार्गाकडे न्यायचे असेल, तर पूर्ण वेळ पक्षाध्यक्षाशिवाय काँग्रेसला पर्याय नाहीच. असे असले तरी तरणेताठे राहुल अध्यक्षपदाचा काटेरी मुकूट धारण करायलाही तयार नाहीत आणि तो गांधी घराण्याच्या बाहेरही कोणाच्या माथ्यावर ठेवायलाही ते धजावत नाहीत. परिणामी, देशातील सर्वात जुनी राजकीय संघटना असलेला काँग्रेस पक्ष नेतृत्वहीन आणि लुळापांगळा झालेला गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पाहायला मिळतो. देशांतर्गत पक्षाची अशी बिकट अवस्था असताना, परदेशात मात्र काँग्रेसने त्यांच्या ‘ओव्हरसीज’ संघटनेच्या नियुक्त्यांचा धडाकाच लावला आहे.

‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस’चे (आयओसी) अध्यक्ष आहेत सॅम पित्रोदा. काँग्रेसनिष्ठ असलेल्या पित्रोदांकडे म्हणूनच ‘आयओसी’ची धुरा सोपविण्यात आली. ‘आयओसी’तर्फे विदेशातील भारतीय वंशाचे नागरिक तसेच परदेशी नागरिकांपर्यंत काँग्रेसची विचारधारा पोहोचावी आणि विविध विषयांवर चर्चा, संवाद व्हावा, या उद्देशाने हे संघटन कार्यरत आहे. याचा हेतू हाच की, परदेशातील भारतीय नागरिक भारताशी जोडले जावेत आणि विचारांची देवाणघेवाण व्हावी. अशा प्रकारचे संघटन विदेशात सक्रिय ठेवणे आणि सातासमुद्रापार आपला पक्षविस्तार करणे गैर नाहीच. पण, या संघटनेवर यापूर्वी एका कार्यक्रमात पाकिस्तानचे झेंडे फडकाविण्याचाही आरोप करण्यात आला होता, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे वरकरणी या संघटनेची उद्दिष्टे सांस्कृतिक-सामाजिक-राजकीय वाटत असली, तरी या संघटनेच्या आड काँग्रेस परदेशातही छुप्या पद्धतीने भारतविरोधी ‘लॉबिंग’ करीत असल्याचे म्हटले जाते. एवढेच नाही, तर ‘आयओसी’च्या जर्मनीमधील संघटनेने केंद्रातील कृषी कायद्यांविरोधात आंदोलनही केले आणि आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांना तब्बल एक कोटी रुपयांची भरघोस मदतही जाहीर केली. त्यामुळे ज्याप्रमाणे देशातील काँग्रेस मोदी सरकारविरोेधात काही ना काही षड्यंत्र रचण्यात ज्याप्रकारे धन्यता मानते, त्याच धर्तीवर ‘आयओसी’ने परदेशात भारतातील मोदी सरकारविरोधात अपप्रचाराची जबाबदारी सुपूर्द केलेली दिसते.

‘आयओसी’च्या या युरोपीय देशातील नियुक्त्यांवर एक नजर टाकली असता लक्षात येते की, यामध्ये अगदी शास्त्रज्ञांपासून उद्योगपतींचाही तितकाच भरणा आहे. नॉर्वेचे भारतीय वंशाचे उद्योजक असलेले गॅरीसोबर सिंग गिल हे ‘चक्र’ नामक एका बीअर कंपनीचे मालक आहेत आणि त्यांची नियुक्ती ‘आयओसी’च्या नॉर्वे देशाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. याचाच अर्थ असा की, यांसारख्या परदेशी भारतीय वंशाच्या धनाढ्यांचा वापर काँग्रेसची तिजोरी भरण्यासाठीच केला जात असेल, हे वेगळे सांगायला नकोच.

एकूणच काय तर काँग्रेसची परदेशातील प्रतिमानिर्मिती आणि पक्षफंडाच्या उभारणीमध्येही ‘आयओसी’ची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसते. पण, एवढे करूनही जागतिक पातळीवर सोडा, देशातही काँग्रेसची किंमत खालावली आहे, त्याकडे कोण बघणार? सक्षम पक्षनेतृत्वाचा अभाव, कार्यकर्त्यांमधील निराशा आणि तळागाळातला संपर्क गमावून बसलेला हा पक्ष अजूनही संभ्रमावस्थेतच असून दिशाहीन झालेला दिसतो. त्यामुळे ‘आयओसी’च्या अध्यक्षांच्या निवडीइतकीच तत्परता आता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने त्यांच्या मूळ देशातील अध्यक्षनिवडीतही दाखवली, तर ‘बुडत्याला काडीचा आधार’ याप्रमाणे ‘काँग्रेसला अध्यक्षाचा आधार’ मिळेल, हीच अपेक्षा!






 

 
 
@@AUTHORINFO_V1@@