गोराई-मनोरीतील कांदळवन संरक्षित; 'एमटीडीसी'चे ४६६ एकर कांदळवन वन विभागाच्या ताब्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jun-2021   
Total Views |

mtdc_1  H x W:



मुंबई (अक्षय मांडवकर) : 
गोराई आणि मनोरी खाडीपरिसरातील 'महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा'च्या (एमटीडीसी) मालकीची जवळपास ४६६.७२ एकर कांदळवन आच्छादित जमीन वन विभागाच्या कांदळवन कक्षाकडे (मॅंग्रोव्ह सेल) हस्तांतरित करण्यात आली आहे. यामुळे गोराई आणि मनोरी भागातील कांदळवनांना ‘वन कायद्या’अंतर्गत संरक्षण मिळाले आहे.
 
 

मुंबई महानगर परिक्षेत्रातील कांदळवनांमध्ये अतिक्रमण दिवसागणिक वाढते आहे. ही बाब लक्षात घेऊन आता वेगवेगळ्या सरकारी विभागांच्या मालकीच्या कांदळवन आच्छादित जमिनी वन विभागाच्या ताब्यात देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेऊन मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघरमधील जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेच्या अधिपत्याखालील कांदळवनांच्या जमिनी वन विभागाच्या ताब्यात देण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात ठाकरेंनी 'एमटीडीसी' आणि वन विभागाच्या अधिकार्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत गोराई आणि मनोरी येथील 'एमटीडीसी'च्या ताब्यातील कांदळवन आच्छादित जमीन ‘कांदळवन कक्षा’च्या ताब्यात देण्याची सूचना ठाकरेंनी दिली होती. त्यावर आता अंमलबजावणी झाली असून 'एमटीडीसी'ने या जमिनी वन विभागाला हस्तांतरित केल्या आहेत.
 
 
 
 
‘एमटीडीसी'ने गोराई आणि मनोरी येथील खाडीपट्टयातील ४६६.७२ एकर कांदळवन आच्छादित जमीन २४ मे रोजी आमच्या ताब्यात दिल्याची माहिती 'कांदळवन कक्षा'चे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी यांनी दिली. यामध्ये मनोरीतील ४६०.८५ एकर आणि गोराईमधील ५.८७ एकर जमिनीचा समावेश असल्याची माहिती कक्षाचे विभागीय वन अधिकारी आदर्श रेड्डी यांनी दै. ‘मुंबई तरूण भारत’ला दिली. या जमिनी ‘वन कायद्या’अंतर्गत संरक्षित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या हस्तांतरणामुळे मनोरी आणि गोराई खाडीतील कांदळवनांना वन विभागामार्फत संरक्षण मिळाले आहे.
 
 


कांदळवन क्षेत्र

राज्यातील कांदळवन क्षेत्राचा आढावा घेतल्यास १७ हजार हेक्टर शासकीय जमिनीवर कांदळवन आहे. त्याव्यतिरिक्त साधारण १३ हजार हेक्टर खासगी मालकीचे कांदळवन क्षेत्र आहे आणि १६ हजार ६९९ क्षेत्राला वन विभागाअंतर्गत राखीव वनांचा दर्जा देण्यात आला आहे. २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘भारतीय वन सर्वेक्षण अहवाला’नुसार राज्याच्या कांदळवन क्षेत्रात वाढ होत आहे. २०१७च्या अहवालानुसार राज्याच्या किनारपट्टीवरील ३०४ चौ.किमी क्षेत्रावर कांदळवने होती. २०१९ मध्ये १६ चौ. किमीने वाढ झाली असून राज्यातील ३२० चौ.किमी क्षेत्र कांदळवनांनी आच्छादलेले आहे. भारतीय वन सर्वेक्षणानुसार मुंबईत सध्या ६,६०० हेक्टर (हेक्टर)कांदळवन क्षेत्र आहे. त्यापैकी २७६ हेक्टर हे मुंबई शहराच्या हद्दीत असून ते राखीव वन म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे. मुंबई उपनगरामध्ये ३,९४८.४ हेक्टर राखीव वन म्हणून अधिसूचित करण्यात आले असले, तरी त्यातील ३,७०६.४ हेक्टर क्षेत्र वनविभागाच्या ताब्यात आहे. उर्वरित २४२ हेक्टर क्षेत्र मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) यांच्या मालकीचे आहे. वन विभागाने दि. १२ जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार सिंधदुर्ग, रायगड, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यातील (अंधेरी-बोरिवली) १,३८६ हेक्टर कांदळवन क्षेत्र राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. सोबतच ठाणे महापालिकेच्या ताब्यातील ३५०.५१ हेक्टर आणि मीरा-भाईंदर पालिकेच्या ताब्यातील१०३६.८८ हेक्टर कांदळवन आच्छादित जमीन ‘कलम ४’ अंतर्गत राखीव वनक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी प्रस्तावित करण्यात आली आहे.
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@