अदनान मेंडेरीस आणि रसीप एर्दोगान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

vicharvimarsh_1 &nbs


जेरेमी सील या प्रवाशाने एर्दोगान यांच्या वर्तमान हालचालींची माहिती देताना त्यांच्या पूर्वीच्या अशाच एका हुकूमशहाची माहिती दिली आहे. त्याचं नाव आहे अदनान मेंडेरीस.

रसीप तय्यप एर्दोगान हे सध्या तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष आहेत. सध्या ते ६७ वर्षांचे आहेत. इस्तंबूल शहरातल्या कालीमपाशा या उपनगरात लहानाचे मोठे झालेल्या एर्दोगान यांचं सुरुवातीचं आयुष्य खूप हलाखीत गेलं. उपजीविकेसाठी त्यांनी चौकातल्या ट्रॅफिक सिग्नलवर खाद्यपदार्थ विकले. पाण्याच्या बाटल्या विकल्या. १९९४साली एर्दोगान इस्तंबूल शहराचे महापौर म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेलं नाही. २००३ ते २०१४ या कालखंडात ते तुर्कस्तानचे पंतप्रधान होते. २०१४साली ते राष्ट्राध्यक्ष बनले. २०१६ साली त्यांच्या सरकारविरुद्ध लष्करातल्या एका गटाने बंड पुकारले. मोहम्मद फत्तेउल्ला गुलेन हा एक तुर्की विद्वान, साहित्यिक, कवी आणि राजकीय नेता आहे. तुर्कस्तानमधल्या प्रस्थापित राजवटीशी न पटल्यामुळे तो १९९९पासूनच अमेरिकेत राहतो आहे. एर्दोगान यांनी जाहीरपणे असं म्हटलं की, “लष्कराच्या या बंडाला गुलेनची म्हणजेच पर्यायाने त्याला आश्रय देणार्‍या अमेरिकेची फूस आहे.”

नंतर एर्दोगान यांनी हे बंड अतिशय निर्घृणपणे चिरडून टाकलं आणि एक वर्षाआधीच म्हणजे २०१८ सालीच निवडणुका घेतल्या. त्या जिंकून ते पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनले. म्हणजे आता आगामी काळात २०२३ मध्ये तुर्कस्तानात सार्वत्रिक निवडणुका होणं अपेक्षित आहे. २००३ पासून आज २०२१ पर्यंत म्हणजे १८ वर्षं एर्दोगान तुर्कस्तानचे सर्वोच्च सत्ताधारी आहेत. या कालखंडात तुर्कस्तान हा देश नावापुरताच लोकशाही देश राहिलेला असून, त्याची वाटचाल हुकूमशाही आणि कट्टर धार्मिकतेकडे होताना दिसते. २०२३च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून एर्दोगान आणि त्यांच्या ‘जस्टिस अ‍ॅण्ड डेव्हलमेंट पार्टी (एकेपी)’चे कार्यकर्ते तुर्की जनतेला आतापासूनच घाबरवून सोडत आहेत. ते सांगत आहेत की, “लक्षात ठेवा, जर का विरोधी रिपब्लिकन पक्ष पुन्हा सत्तेवर आला, तर आतापर्यंत मिळवलेलं सर्व काही गमावून बसाल.” आता खरं म्हणजे यात नवीन काय आहे? कोणत्याही देशातला सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाबद्दल असाच प्रचार करीत असतो.


पाश्चिमात्य राजकीय निरीक्षक आणि पत्रकार यांना असं वाटतं की, २०१६चं बंड जरी एर्दोगान यांनी यशस्वीपणे चिरडलं असलं तरी त्यांना आतून भीती वाटते आहे. जगातल्या कोणत्याही हुकूमशहाकडे बघितल्यास आपल्याला हेच आढळतं की, एकीकडे तो विरोधकांची मुस्कटदाबी करीत असताना, कत्तल करीत असताना, स्वत:च्या जीवाला फार घाबरत असतो. जे हत्यार आपण विरोधकांवर वापरत आहोत, तेच आपल्यावरही उलटू शकतं याची त्याला जाणीव असतेच. एर्दोगान यांचं तेच होत आहे, असं या निरीक्षकांना वाटतं. जेरेमी सील हा असाच एक ब्रिटिश निरीक्षक आहे. तो स्वत:ला प्रवासी आणि तुर्कस्तानबद्दलची नाना प्रकारची माहिती जमा करण्याची हौस असणारा, असं म्हणवतो. सध्या अशा लोकांना ‘एन्थूझियास्ट’ म्हणजे आवडीच्या विषयाकडे हौसेने, उत्साहाने लक्ष पुरवणारा, त्या विषयातली अद्ययावत माहिती मिळवत राहून ती लेख, पुस्तकं, भाषणं किंवा समाजमाध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवणारा, असं म्हटलं जातं.

या ‘एन्थूझियास्ट’ लोकांमुळे आपल्याला आज नाना प्रकारची माहिती घरबसल्या फुकटात मिळते, हा भाग सोडा; अन्यथा याला चोंबडेपणा म्हणता येईल आणि इंग्रजांना असला चोंबडेपणा करण्याची भयंकर हौस असते. याचं ऐतिहासिक उदाहरण पाहा - ३ एप्रिल, १६८० या दिवशी रायगडावर छत्रपती शिवरायांचा मृत्यू झाला. आता त्यावेळी ‘ब्रेकिंग न्यूज’ वगैरे द्यायला खंडीभर वाहिन्या, दूरदर्शन, आकाशवाणी एवढंच नव्हे, तर वर्तमानपत्रंसुद्धा नव्हती. तरी रायगडावरची ही वार्ता मुंबईकर इंग्रजांना कळून, लगेच मुंबईकरांचं सुरतेच्या मुख्यालयाला २५ एप्रिल, १६८० या दिवशी पत्र गेलं की, “आम्हाला अशी पक्की खबर मिळाली आहे की, २३ दिवसांपूर्वी शिवाजी मेला. मरण्यापूर्वी १२ दिवस तो आजारी होता.” आता सुरतेहून ही खबर हुगळी म्हणजे कोलकात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍याला कळवण्यात आली. त्यावर तो सुरतवाल्यांना लिहितो, “शिवाजी मेला अशी ‘पक्की खबर’ आत्तापर्यंत इतक्या वेळा आम्हाला कळली आहे की, तो अमरच असला पाहिजे, अशी आमची खात्री झाली आहे.” १६६६ साली शिवराय आग्य्राहून परतल्यावर अनेकदा त्यांच्या मृत्यूची अफवा देशभर पसरली होती. त्याला उद्देशून कोलाकातावाला हे लिहितो आहे. ते कसंही असो. पण, कुठे रायगड, कुठे मुंबई, कुठे सुरत आणि कुठे कोलकाता! तुम्ही व्यापार करायला आलात ना रे, आमच्या देशात? मग गपगुमान व्यापार करा ना! पण नाही, कोण जगला, कोण मेला, केव्हा मेला, आजारी होता की अचानक मेला, सगळ्या रिकामटेकड्या चौकशा आणि खबरांमध्ये यांचा ‘एन्थूझियाझम’ ओसंडून वाहत असतो, असल्या खबरा काढूनच या लबाड व्यापार्‍यांनी जगभर साम्राज्य कमावलं.

असो. तर जेरेमी सील या प्रवाशाने एर्दोगान यांच्या वर्तमान हालचालींची माहिती देताना त्यांच्या पूर्वीच्या अशाच एका हुकूमशहाची माहिती दिली आहे. त्याचं नाव आहे अदनान मेंडेरीस. कॉन्स्टन्टिनोपल हे काळा समुद्र आणि भूमध्य समुद्र यांच्या संगमावरचं एक अतिशय प्राचीन आणि सुंदर शहर आहे. दक्षिण युरोप, पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिका खंडातल्या रोमन साम्राज्याला म्हणायचे बायझन्टाईन साम्राज्य. युरोप खंडातल्या रोमन साम्राज्याची राजधानी जशी शहर रोम, तशी बायझन्टाईन साम्राज्याची राजधानी शहर कॉन्स्टन्टिनोपल. सन १४५३साली तुर्कांनी ते जिंकून त्याला ‘इस्तंबूल’ बनवलं. तुर्कांनी इस्तंबूल जिंकल्यामुळे युरोपीय व्यापार्‍यांचा भारताकडे जाणरा खुष्कीचा मार्ग खुंटला. त्यामुळे ते नवा मार्ग शोधू लागले. त्यातून प्रथम कोलंबस भारताकडे निघाला. पण, तो अमेरिकेत पोहोचला. मग वास्को-दि-गामा निघाला. तो मात्र आफ्रिकेला वळसा घालून केरळातल्या कोळिकोडे (भ्रष्ट पोर्तुगीज नाव-कालिकत) बंदरात पोहोचला. इत्यादी तपशील आपण शालेय इतिहासात वाचलेला असतो. तर हे इस्तंबूल शहर १४५३ ते १९२२ अशी साधारण ४५० वर्षं तुर्कांच्या ऑटोमन साम्राज्याची राजधानी होती. १९२२ साली केमाल पाशा उर्फ केमाल अतातुर्क याने राजधानी अंकारा शहरात नेली. इस्तंबूलच्या दक्षिणेला मार्मारा समुद्रात मासिआडा नावाचं एक बेट आहे. आतापर्यंत तिथे काही जुनाट बंगले आणि अफाट झाडीचं गचपण माजलेलं होतं.

आता अगदी अलीकडे एकदम मासिआडा बेटावर सरकारी कामगारांची गर्दी झाली. गचपण छाटण्यात आलं. जुनाट बंगले पाडण्यात आले. जमीन सपाट करण्यात आली. मग एक मशीद, एक छानसं हॉटेल. एक चटपटीत माहिती केेंद्र आणि एक म्युझियम उभारण्यात आलं. त्यात एक न्यायालय, न्यायाधीश, वकील, प्रेक्षक, फिर्यादी आणि आरोपी यांच्या मेणाच्या हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आल्या. मासिआडा बेटाचं नाव ‘डेमोक्रसी अ‍ॅण्ड फ्रीडम आयलंड’ असं ठेवण्यात आलं. हे सगळं ज्याची स्मृती जागवण्यासाठी करण्यात आलं, त्याचं नाव अदनान मेंडेरीस. कोण होता तो? १९२२साली केमाल पाशा या लोकप्रिय नेत्याने आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षाने तुर्कस्तानात नवा झंजावती मनू सुरू केला. केमालने खिलाफत रद्द केली, धर्माचं महत्त्व घरापुरतं मर्यादित केलं. मशिदींच्या संख्येवर मर्यादा आणून अनेक मशिदी बंद केल्या. खमीज, सलवार, बुरखा, इस्लामी फेज टोप्या इत्यादी धर्माशी निगडित पोषाख रद्द करून पुरुषांना सूट-बूट-हॅट, तर महिलांना पाश्चिमात्य स्त्रियासारंख्या पोषाख सक्तीचा केला. मशिदीच्या मिनारावरून नमाजासाठी दिली जाणारी बांग म्हणजे ‘अजान’ ही अरबी भाषेत न देता तुर्की भाषेत आणली. राज्यकारभारातली अरबी भाषा साफ काढून तिथे तुर्की भाषा सक्तीची केली. १९३८ साली केमाल मरण पावला. केमालच्या अफाट लोकप्रियतेमुळे त्याने धर्माविरुद्ध जाऊन केलेलं हे आधुनिकीकरण धकून गेलं. पण, धर्मप्रिय तुर्क नागरिकांना सुधारणेबरोबरच इस्लामही हवा होता. तो बदल अदनान मेंडेरीसने घडवून आणला. मूळ केमालच्या रिपब्लिकन पक्षातच असणार्‍या अदनानने बाहेर पडून नवा ‘डेमोक्रॅटिक’ पक्ष काढला आणि १९५०ची सार्वत्रिक निवडणूक जिंकली.

अदनान मेंडेरीसने व्यापार, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांमध्ये पूर्वीचंच धोरण ठेवलं. पण, बंद पडलेल्या मशिदी उघडल्या. राजधानी अंकाराच्या मध्यवर्ती भागात एका टोलेजंग मशिदीचा पाया घातला. अजान पुन्हा अरबी भाषेत सुरू केली. इतकंच नव्हे, तर “तुम्हाला हवीच असेल तर आपण खिलाफतीचं पुनरुज्जीवन करूया,” असंही तो लोेकांना सांगू लागला.पण, लोकप्रिय राज्यकर्ता हळूहळू हुकूमशहा बनू लागतो, तसंच त्याचं झालं. तुर्क आणि ग्रीक यांचं फार जुनं हाडवैर आहे. १९५५ साली इस्तंबूलमधल्या अल्पसंख्य ग्रीक नागरिकांविरुद्ध दंगा पेटवण्यात आला. पत्रकार आणि विरोधक यांनी सरकारवर टीका केल्यावर अदनानने सर्व विरोधकांना तुरुंगात डांबलं. त्याला जरीही विरोध सहन होईना. मे १९६० मध्ये तुर्की लष्करातल्या एका गटाने बंड पुकारून अदनान मेंडेरीस आणि त्याच्या सरकारमधल्या ६०० अधिकार्‍यांना पकडलं. मासिआडा बेटावर नेऊन त्यांच्यावर थातुरमातूर खटला चालवण्यात आला आणि १७ सप्टेंबर, १९६१या दिवशी अदनान आणि त्याचा अर्थमंत्री व परराष्ट्रमंत्री अशा तिघांना फासावर लटकावण्यात आलं.

यश डोक्यात गेल्यामुळे अदनान हुकूमशहा बनला आणि त्याने विरोधकांची मुस्कटदाबी केली. पण, धार्मिक बाबतीत त्याने ज्या सवलती दिल्या, त्यामुळे त्याला ठार मारावं इतकी जनता संतप्त नव्हती. अदानानने विरोधकांना तुरुंगात टाकलं. पण, कू्रर अत्याचार, जुलूम, कत्तली असं केलं नव्हतं. शिवाय, दिसायलाही तो मोठा छबकडा होता. त्यामुळे त्याला फाशी देऊ नये, असे दूरध्वनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडींपासून अनेकांनी बंडखोरांना केले. पण, बंडखोरांनी त्याला ठार केलंच! १९९० साली तत्कालीन तुर्क सरकारने अदनान आणि त्याच्या सरकारला सार्वत्रिक माफी जाहीर केली. अदनानच्या मृतदेहाचे अवशेष मासिआडामधून राजधानी अंकारामध्ये आणून त्यांच्यावर स्मृतिस्थळदेखील उभारण्यात आलं.आता एर्दोगान सरकारने मासिआडा बेटावर म्युझियम उभं केलं आहे. ही सर्व माहिती आपल्यासमोर ठेवून जेरेमी सील असं सुचवतो आहे की, हुकूमशहाची अखेर कशी होते हे एर्दोगान यांना पक्कं समजलं आहे, म्हणूनच ते जणू लोकांना सांगत आहे की, “पाहा, अदनानच्या विरोधी पक्षाने, म्हणजे रिपब्लिकन पक्षाने, त्याचं काय केलं. मग परत तुम्ही त्याच पक्षाला (माझ्याऐवजी) संधी द्याल का?”
@@AUTHORINFO_V1@@