ग्राहकांनी वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करा !

    26-Jun-2021
Total Views |

MSDCL_1  H x W:


मुंबई:
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही महावितरणने ग्राहकांना अखंडित वीजपुरवठासह चांगली सेवा दिली आहे. यापुढेही ग्राहकांना उत्तम दर्जाची सेवा देण्यास महावितरण कटिबद्ध आहे. त्यामुळे, ग्राहकांनी या कोरोना काळातील थकीत वीजबिलासह आपली चालू वीजबिले भरून महावितरणला सहकार्य कराव, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले.

काल (दि.२५ जून २०२१) रोजी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी कळवा येथील राज्य भार प्रेषण केंद्राला भेट देऊन, तेथील दैनंदिन कामकाजाची पाहणी केली. यासोबतच, श्री. विजय सिंघल यांनी ठाणे ईटरनिटी येथील इलेक्ट्रिक व्हेहिकल चार्जिंग स्टेशनचे उदघाटन केले. यावेळी, मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) परेश भागवत यांनी चार्जिंग स्टेशनबद्दल माहिती दिली. याप्रसंगी बोलताना सिंघल म्हणाले, "इलेक्ट्रिक मोबिलीटी'साठी राज्य व केंद्र सरकार अत्यंत गंभीर असून, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक महत्वपूर्ण योजना रबविल्या आहेत. याची व्यवहार्यता लक्षात घेऊन राज्यात इलेक्ट्रिक व्हेहीकल चार्जिंग स्टेशनची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. चार्जिंग स्टेशनची संख्या अजून मोठ्या प्रमाणात वाढविण्याची गरज असून पुढच्या काही दिवसात किमान १०० नवीन चार्जिंग स्टेशन कार्यान्वित करावे, असेही निर्देश अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले आहेत. या पाहणी दौऱ्यात, त्यांच्यासोबत कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके व भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर उपस्थित होते.

राज्य भार प्रेषण केंद्राच्या पाहणी प्रसंगी, राज्य भार प्रेषण केंद्राचे कार्यकारी संचालक श्रीकांत जलतारे यांनी राज्य भार प्रेषण केंद्राच्या कामाचे संगणकीय सादरीकरण केले. याप्रसंगी, राज्य भार प्रेषण केंद्राच्या मुख्य अभियंता सौ. जुईली वाघ यांनी ४०० केव्ही व ७६५ केव्ही वीज पारेषण नेटवर्क बद्दल सविस्तर माहिती दिली.भांडूप परिमंडलातील नूतनीकरण केलेल्या तांत्रिक व माहिती तंत्रज्ञ विभागाचे उदघाटन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तसेच, त्यांनी भांडूप परिमंडल येथील स्काडा सेंटरची पाहणी केली. यावेळी, उपकार्यकारी अभियंता ज्ञानदीप सांगेलकर व सहाय्यक अभियंता मिथुन पाटील यांनी स्काडा सेंटरच्या कामकाजाबाबत संगणकीय सादरीकरण केले.