पॅलेस्टेनियन इस्लामिक जिहाद - नवा रक्तबिंदू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


jihad_1  H x W:




इस्रायलने प्रत्येक घटनेला कडवा जबाब दिला. मग तर अतिरेकी आणखीनच बेफाम झाले. पश्चिमी देश इस्रायलची पाठराखण करतात , म्हणूनच ते पश्चिमी देशांवरही तुटून पडले. ‘हेजबोल्ला’, ‘हमास’, ‘तालिबान’, ‘अल् कायदा’, ‘इसिस’ आणि आता हा नवा ‘पॅलेस्टेनियन इस्लामिक जिहाद’ एका रक्तबिंदूतून शेकडो रक्तबिंदू!



दोन-तीन आठवड्यांपूर्वीच्या ‘विश्वसंचार’मधून आपण जेरुसलेमची हवा कशी कायमच गरम असते, त्याकडे दृष्टिक्षेप टाकला होता. त्यात शेवटी धर्मेंद्रचा उल्लेख होता. अनेक वाचकांना तो संदर्भ लक्षात आला नाही, असं त्यांच्या दूरध्वनींवरून कळलं, त्यामुळे त्या संदर्भावरून आजच्या रक्तबिंदूकडे वळूया.लोकप्रिय हिंदी चित्रपट अभिनेता धर्मेंद्र भयंकर दारू पितो. तुम्ही जर त्याला समजावायला गेलात, तर तो तुम्हाला अजिबात विरोध न करता उलट म्हणेल, “अरे तुम भी क्या याद करोगे दोस्त। चल, तुझ्या शब्दाखातर ही मी सोडली दारू आजपासून!” आणि मग पुढे म्हणेल, “अशी आतापर्यंत कित्येकदा सोडलीय मी दारू!”



पॅलेस्टिनी अरब आणि इस्रायल याचं अगदी असंच चाललेलं असतं. अरब खोडी काढतात. इस्रायली सरकार ‘तुम एक मारोगे, तो हम चार मारेगें।’ असं उघडपणे म्हणत त्यांच्या पेकाटात सणसणीत लाथा घालतं. त्यामुळे गप्प बसण्याऐवजी ते आणखीनच तिरमिरतात आणि माजलेल्या खोंडासारखे इस्रायली आत्मविश्वासाच्या अभेद्य तटबंदीवर निष्फळ टकरा देत राहतात.मग, जगात कायदा आणि सुव्यवस्था नांदावी, यासाठीच देवाने आपल्याला जन्माला घातलेलं आहे, असा स्वत:बद्दलचा गोड गैरसमज असलेली अमेरिका त्वरेने धावून येते. शांतता, प्रेम, सलोखा, बंधुभाव, शांततामय सहजीवन वगैरे घासून गुळगुळीत (नि बुळबुळीतसुद्धा) झालेल्या शब्दांची नव्याने कारंजी उडू लागतात. बराच घोळ घालून झाला की, अखेर शांतता होते. संयुक्त राष्ट्राच्या शेकडो समित्यांपैकी कोणती तरी समिती युद्धबंदीचा काही हजारावा वगैरे ठराव पारित करते. दोन्ही युद्धमान भिडू त्याच्यावर सह्या करतात आणि मनोमन म्हणत असतात, ‘अशा कित्येकदा युद्धबंद्या केल्या आहेत आम्ही!’



तर १४ मे, २०२१ रोजी रमझान ईदच्या दिवशी जेरुसलेमच्या पवित्र अल् अक्सा मशिदीत नमाज अदा करण्यासाठी जमलेल्या गर्दीवरून अरब आणि इस्रायल यांच्यात जी धुमश्चकी झाली, ती २३ मे रोजी थांबली, हे आपण पूर्वीच पाहिलं आहे. आता या युद्धबंदीला महिना उलटून गेलेला असताना या संदर्भातल्या नवीन गंभीर गोष्टी पुढे येत आहेत.इस्रायल या चिंचोळ्या देशाच्या पूर्वेला असलेला वेस्ट बँक प्रदेश आणि इस्रायलच्या पश्चिमेला असलेली चिमुकली गाझापट्टी मिळून ‘पॅलेस्टेनियन नॅशनल ऑथोरटी’ हा स्वायत्त प्रदेश बनतो. या प्रदेशांचं प्रशासन ‘हमास’ या संघटनेकडे आहे. गेल्या महिन्यात गाझापट्टीतून ‘हमास’च्या गनिमी सैनिकांनी जेरुसलेमवर छोट्या क्षेपणास्त्रांचा भडिमार केला होता. इस्रायलने ‘आयर्न डोम’ या अत्याधुनिक प्रणालीने ही क्षेपणास्त्रे कशी वाटेतच उडवून टाकली, हे आपण दूरदर्शनच्या पडद्यावर पाहिलंच असेल. पाठोपाठ इस्रायलने गाझापट्टीवर बॉम्बवर्षाव करून अतिरेक्यांनी जमिनीखालच्या भुयारामधून तयार केलेली आश्रयस्थानं साफ उद्ध्वस्त करून टाकली होती.



आता यासंदर्भात अशी माहिती पुढे येत आहे की, जेरुसलेमवर क्षेपणास्त्रे डागणारे गनिमी सैनिक हे ‘हमास’चे नसून ‘पॅलेस्टेनियन इस्लामिक जिहाद’ या संघटनेचे होते. आजमितीला त्यांच्याकडे किमान आठ हजार लघु पल्ल्याची क्षेपणास्त्रे (शॉर्ट रेंज्ड मिसाईल्स) तयार आहेत. पुढची गंभीर बाब अशी की, या लोकांनी अशी छोटी क्षेपणास्त्रं स्वत:च बनवण्याचा सोपा मार्ग शोधून काढला असून, त्यामुळे ही संस्था वेगाने वाढू शकते. म्हणजेच, यानंतर ही क्षेपणास्त्रं स्वदेशी असतील.त्याकरिता या अतिरेक्यांना बाहेरच्या कोणत्याही देशावर अवलंबून राहावं लागणार नाही. अर्थात, तरीही त्यांच्यामागे इराण आहेच. इस्रायली प्रवक्त्याने सरळच आरोप केलाय की, ‘हमास’ काय किंवा आता ही नवी ‘पॅलेस्टेनियन इस्लामिक जिहाद’ संघटना काय? त्यांना पैसा आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा इराणकडून होतो.



आपल्याकडच्या पुराणांमध्ये रक्तबिंदू नामक राक्षसाची गोष्ट येते. जगदंबेने रक्तबिंदूचा वध केल्यावर त्याच्या रक्ताच्या थेंबागणिक अनेक रक्तबिंदू राक्षस निर्माण होऊन ते मोठ्या आवेशाने जगदंबेशी युद्ध करू लागतात.आता यावर उपाय काय करावा जगदंबेच्या सैन्यातही भूत, प्रेत, पिशाच, गण, वेताळ, झोटिंग असतातच. जगदंबा त्यांना आज्ञा करते. राक्षसांच्या रक्ताचा एकही थेंब भूमीवर पडू द्यायचा नाही. त्यापूर्वीच तुम्ही ते रक्त पिऊन टाकायचं. भूत-पिशाचांना काय आवडीचंच काम मिळालं. त्यांनी ते चोख पार पाडलं आणि रक्तबिंदूचा शेवट झाला.



आजच्या काळात असं म्हणता येईल की, १९२८ साली इजिप्तमध्ये ‘मुस्लीम ब्रुदरहुड’ नावाची संघटना स्थापन झाली. तिथपासून इस्लामी जगतात एका पाठोपाठ एक संघटना निघत गेल्या. पहिल्या महायुद्धानंतर म्हणजे १९१८ नंतर अरब देशांमध्ये तेल सापडलं. या पेट्रो डॉलर्सच्या जोरावर इस्लामी संघटनांना पुन्हा एकदा जग जिंकण्याची स्वप्नं पडू लागली. दुसर्‍या महायुद्धानंतर लगेचच म्हणजे १९४८ साली इस्रायलची निर्मिती झाली आणि अरब देश पिसाळले. आमच्या अगदी पोटातच हे ज्यू स्वतःचा देश निर्माण करतात? आणि ब्रिटन-अमेरिका यांच्या पाठीशी उभे राहतात? अरब देश जीव खाऊन इस्रायलवर तुटून पडले. इस्रायलने अरबांना कणखरपणे पिटून काढलं. मग इस्लामी संघटनांनी अतिरेकी वळण घेतलं. ‘पॅलेस्टेनियन लिबरेशन ऑर्गनायझेशन’ उर्फ ‘पीएलओ’ ही अरब अतिरेकी संघटना आणि तिचे असंख्य गट माणसं मारीत नि विमानं पळवीत हैदोस घालू लागले.इस्रायलने प्रत्येक घटनेला कडवा जबाब दिला. मग तर अतिरेकी आणखीनच बेफाम झाले. पश्चिमी देश इस्रायलची पाठराखण करतात, म्हणूनच ते पश्चिमी देशांवरही तुटून पडले. ‘हेजबोल्ला’, ‘हमास’, ‘तालिबान’, ‘अल् कायदा’, ‘इसिस’ आणि आता हा नवा ‘पॅलेस्टेनियन इस्लामिक जिहाद’ एका रक्तबिंदूतून शेकडो रक्तबिंदू!



दरम्यान, गाझा आणि इस्रायल यांच्यात शीतयुद्ध चालू आहेच. गाझापट्टीतून विविध प्रकारचा भाजीपाला इस्रायलमध्ये येत होता. इस्रायलने ही आयात बंद करून टाकली. लगेच पॅलेस्टाईन स्वायत्त सरकारने इस्रायलकडून येणारी फळफळावळ बंद करून टाकली. पॅलेस्टेनियन इस्लामिक जिहाद’वाल्यांनी गाझापट्टीत किमान ३०० अत्याधुनिक सुसज्ज अशी भुयारं बांधली असून, ती एकमेकांना जोडलेली आहेत. या भुयारांमधून लष्करी ट्रक्सदेखील नेले जातात, असं सांगून इस्रायली प्रवक्ता म्हणाला की, “आमच्या हवाई हल्ल्यांनी ही भुयारी यंत्रणा साफ उद्ध्वस्त करून टाकली आहे. आमच्या नागरिकांच्या केसालादेखील धक्का लागलेला आम्ही सहन करणार नाही.”




तर या विधानाचा प्रतिवाद करताना ‘हमास’चा प्रवक्ता म्हणाला की, “आमच्या भुयारी व्यवस्थेची फारशी खराबी झालेली नव्हतीच आणि जी काही झाली होती, ती आम्ही गेल्या महिनाभरात दुरुस्त केली आहे.”आता पुढच्या काळात ‘पॅलेस्टेनियन नॅशनल ऑथोरिटी’ आणि इस्रायल यांच्यात काय हर्षाहर्ष घडतो, यापेक्षाही ‘हमास’ आणि ‘पीआयजे’ यांच्यात काय घडतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ‘हमास’ संघटना ही पॅलेस्टाईन स्वायत्त प्रदेशाची प्रशासक आहे. त्यामुळे तिला नुसताच अतिरेकी हुच्चपणा न करता, अनेक प्रशासकीय कामं करायची आहेत. ‘पीआयजे’ला अतिरेकी कारवायांखेरीज दुसरं कामच नाही. माथेफिरू लोकांना असलीच कामं आवडतात. त्यामुळे येणार्‍या काळात असे घडू शकतं की, ‘हमास’ला मागे सारून ‘पीआयजे’ पुढे सरसावेल म्हणजे धुमचक्री पुन्हा सुरू! सोडलेली दारू पुन्हा सुरू! दारू सोडा नव्हे; दारू आणि सोडा!!




मेन स्ट्रीम मीडिया’चं भूत



एक भूत होतं. त्याने गंमत म्हणून एका कुंभाराच्या गाढवाच्या मानेची दोरी सोडली. मोकाट सुटलेल्या गाढवाने शेजारच्या शेतात धुमाकूळ घातला. संतापलेल्या राखणदार शेतकर्‍याने गाढवाला बडवलं. वर्मी फटका बसून गाढव मेलं. चिडलेल्या कुंभाराने शेतकर्‍याला ठार मारलं. शेतकर्‍याच्या मुलाने कुंभाराला ठार मारलं आणि घर पेटवून दिलं. दोन शेजार-शेजारची घरं बर्बाद झाली. एका जाणत्या माणसाने भुताला विचारलं, “तू गाढवाला सोडलंस. त्यातून एवढा अनर्थ झाला. काय मिळालं तुला यातून?” त्यावर साळसूदपणे भूत म्हणालं, “मी काय केलं? मी बिचार्‍या गाढवाला बंधनातून मुक्त केलं.”




आपल्या स्वघोषित ‘मेन स्ट्रीम मीडिया’ची म्हणजे इंग्रजी वृत्तपत्रे आणि वाहिन्यांची हीच कथा आहे. ‘ब्रेकिंग न्यूज’च्या पुड्या सोडायच्या आणि भांडणं लावून, पेटवून द्यायची.तर या ‘मेन स्ट्रीम मीडिया’ला अचानक लक्षात आलं की, व्हॉट्स अ‍ॅप, ट्विटर, युट्यूब सर्वत्र खूप मोठ्या प्रमाणावर ‘हिंदूसाम्राज्य दिवस’ हा ट्रेंड सुरू आहे. म्हणजे या प्रयोजनाने अनेक लोक एकमेकांना अभीष्टचिंतन करतायत, ट्विट करतायत, फेसबुकवर अनेक वक्ते तासातासांची लाईव्ह भाषणं करतायत आणि हजारो लोक त्यांना फॉलो करतायत.




मेन स्ट्रीम मीडिया’चे जन्माने हिंदू; पण संस्कृतीने ख्रिश्चन असलेले पत्रकार चकित झाले. हा कोणता नवा उत्सव? मग त्यांना कळलं की, हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस असून तो हिंदू कॅलेंडरप्रमाणे (हो कॅलेंडरच. पंचांग त्यांना माहीतच नाही.) ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला, संघवाले लोक साजरा करतात.मग, ‘मेन स्ट्रीम मीडिया’च्या इतिहासात बहुधा प्रथमच, हिंदूसाम्राज्य दिन या उत्सवाची बातमी चक्क छापून आली. पुलंच्या शब्दांत-‘या दिवसाची नोंद सुवर्णाक्षरांत करणे महाग पडले, तरी कसल्यातरी अक्षरात करणे भागच आहे.’ म्हणजे ‘मेन स्ट्रीम मीडिया’ने शिवरायांचा उत्सव नि तोसुद्धा संघवाल्यांनी केलेला, या नोंदीची पण विंचवाप्रमाणे डंख मारण्याची सवय सहजासहजी जाणार थोडीच! त्याचप्रमाणे त्यांनी बातमीत सहज सफाईने दोन मुद्दे आणलेच. एक- ‘हे मराठी राज्य होतं.’ म्हणजेच हे ‘हिंदवी स्वराज्य’ नव्हतं आणि दुसरा- ‘हा राज्याभिषेक चांगल्या मुहूर्तावर न झाल्यामुळे २४ सप्टेंबरला शिवरायांनी पुन्हा तांत्रिक पद्धतीने अभिषेक करून घेतला.’ म्हणजे वाचकाच्या मनात आपोआप ‘कॉन्ट्रोव्हर्सी’ निर्माण व्हावी! कलहाच्या पुड्या सोडत राहायचं.










@@AUTHORINFO_V1@@